This pravachan is a translation of pravachan given by jain Guru shree Dhyaansaagarji maharaj. In this pravachan, maharaj speaks about the art and science of Jainatva.
E=mc2 हा आईनस्टाइनचा विज्ञान विषयातला सिद्धांत आहे. पण यापुढील गणिती सिद्धांतही जैन शास्त्रांमध्ये उपलब्ध आहेत. पूर्वजांचे सुक्ष्म गणित जैन शास्त्रांमध्ये उपलब्ध आहे. जैन गणिताचा शास्त्रशुद्ध सखोल अभ्यास केल्यास शिवी देणाऱ्याला त्याचे फळ काय मिळेल, किती काळानंतर मिळेल हे आपण कॉम्प्युटरवर सुद्धा पाहू शकू. आचार्य कुंदकुंदांच्या परिक्रमेमध्ये (decimal point) म्हणजेच दशांशचिन्ह उपलब्ध आहे. नवव्या शतकामध्ये आचार्य वीरसेन यांनी धवला ग्रंथ लिहिला. त्यात अपार ज्ञानभांडार आहे.
जैनत्व म्हणजे काय? जैन शास्त्रे अशी आहेतकी जितक्या वेळा वाचू तितक्या वेळा त्यात नवीन काहीतरी सापडते. चक्रवर्ती सिकंदर विजेता होता कारण तो युद्धक्षेत्रात सर्वांना जिंकणारा होता. पण धर्म क्षेत्रात जिंकणारा किंवा विजेता हा जिनच असतो. आत्म्याला परास्त करणाऱ्या विकारी भावांना जिंकणारे जिन असतात. संसारी जीवांना काम, क्रोध, मोह, मद, मत्सर आदी विकारांनी घेरलेले असते. जेव्हा दुसऱ्यावर क्रोध करण्याची हिम्मत नसते तेव्हा माणूस स्वत:ला कष्ट देतो. हासुद्धा क्रोधच आहे. स्वत:ला कष्ट देणे म्हणजे क्रोध जिंकणे नाही. यात विकार आपल्याला जिंकतात, आपण विकारांना जिंकत नाही. कर्मशत्रुंना जिंकणारा जिन असतो. जिन बनणे स्वबलावरच अवलंबून असते.
प्रथम तीर्थंकर आदिनाथ प्रभूंचा नातू मारिच नावाचा राक्षस होता. तीर्थंकर असुनही ते त्याला सुधारू शकले नाहीत. पण अनंत भवानंतर हाच मारिच स्वबलावर अंतिम तीर्थंकर महावीर बनला. संसारातील विषमतेचे कारण प्रत्येकाचे वेगवेगळे स्वयंउपाजित कर्म होय. मन, वचन, कायेने आपल्याकडून घडणाऱ्या कृतीला कर्म म्हणतात. सध्याच्या काळात जैन शब्द संप्रदायाशी निगडीत झालेला आहे. पणत्याचा खरा अर्थ म्हणजे जो जिनांचा अनुयायी तो जैन!
जैन किंवा जिन हा अत्यंत प्राचीन शब्द आहे. स्वामी दयानंद सरस्वतींनी सत्यार्थप्रकाश या ग्रंथात लिहिले आहेकी, मूर्तीपूजा सर्वप्रथम जैन धर्मात चालू झाली. वाल्मिकी रामायणात राम आणि वसिष्ठ ऋषींचा वार्तालाप चालू असतो. त्यावेळी श्रीराम म्हणतात, “मी जिनभगवान यांच्याप्रमाणे आत्मशांतीत स्थीर होऊ इच्छितो. वेद हे प्राचीन साहित्य मानले जाते. ऋग्वेदातही आदिनाथ, अजितनाथ व नेमीनाथ यांचा उल्लेख आला आहे. मार्कंडेय पुराण व प्रभास पुराणातही रात्री भोजनत्यागाचे उल्लेख येतात. सनातन धर्मातही चातुर्मासात रात्री भोजनत्याग सांगितला आहे. जैनत्वातला त्याग अन्यत्र कोठेही दिसून येत नाही. निर्ग्रंथ या शब्दात ग्रंथ याचा अर्थ शास्त्र नसून परिग्रह आहे. बाहय व अभ्यंतर असे चौदा परिग्रह असतात. निर्ग्रंथ म्हणजे या सर्व परिग्रहांचा त्याग करणारे, दिशारुपी वस्त्रांचे धारक! म्हणजेच दिगंबर!
जैन धर्मात ज्ञानाप्रमाणे भक्तीलाही स्थान आहे. जग किंवा जगातले व्यवहार कसे चालतात याबद्दल जैन मान्यता वेगळी आहे. गीतेमध्ये सांगितलेला निष्काम कर्मयोग हा वैदिक धर्मात सर्वोच्च मानला जातो पण जैन धर्मात अनासक्ती हीतर अगदी प्रारंभीक क्रिया सांगितली आहे. जैन धर्म हा नास्तिकांचा धर्म आहे असे काहीवेळा ऐकण्यात येते, पण जैन धर्मात ईश्वराचा निषेध केलेला नाही. वैदिक किंवा अन्य मतांमध्ये संसाराचा प्रारंभ ईश्वर असे सांगितले आहे. पण जैन मान्यतेप्रमाणे संसाराचा अंत ईश्वर आहे. जैन दर्शनात ईश्वराला मानतात पण ते शेवटी! याचा अर्थ असाकी जेव्हा आपल्या निजी संसाराचा अंत होतो तेव्हा तो जीव परमात्मा बनतो.
आचार्य अकलंक देव म्हणतात, ‘ज्याला मोक्षाची इच्छा असते त्याला मोक्ष कधीच मिळत नाही. जयला मोक्षाचीही इच्छा उरत नाही त्यालाच मोक्ष मिळतो. जैनांचे ईश्वर अरिहंत व सिद्ध आहेत. ते तात्विकदृष्ट्या कोणालाही सुखी अथवा दु:खी करत नाहीत. ईश्वराच्या इच्छेने संसार चालत नाही कारण ईश्वराला तर कसलीच इच्छा नसते. माणसाची इच्छा न संपणारी असते. या इच्छेलाच आकुलता म्हणतात. धर्म माणसाला निराकुल होण्यास मदत करतो. आकुलता माणसाला दु:खी बनवते. इच्छा पूर्ण झालीकी तेवढ्यापुरती इच्छा संपल्यासारखी वाटते. म्हणून आकुलता जाणे हेच सुख आहे. उदा. खाण्याने सुख मिळत नाही. आवडता पदार्थ खाल्ल्याने सुख मिळाले असे आपल्याला वाटते पण त्यावेळचे सुख हे त्या खाण्यामुळे मिळत नाही. त्या क्षणापुरती खाण्याची इच्छा संपल्याने ते मिळते. अशी एखादी इच्छा काही काळापुरती नष्ट झाली तर केवढे सुख मिळते. मग जर याप्रकारे सर्वच इच्छा नष्ट झाल्या अगदी कायमच्याच तर केवढे सुख मिळेल! तेतर सर्वोच्च सुख असेल. यालाच मोक्ष अथवा निर्वाणप्राप्ती म्हणतात.
कर्मजनित विकारांना भस्मसात करून प्रथम तीर्थंकर आदिनाथ भगवंतांनी केवलज्ञान प्राप्त केले. ज्यांना ऐकण्याचीही इच्छा होती अशांना तत्वांचा उपदेश दिला. तीर्थंकर केवलज्ञान प्राप्त झाल्यावरच उपदेश देतात. त्यांच्या समवशरणामध्ये पशु-पक्ष्यांसाठीसुद्धा एक कक्ष राखून ठेवलेला असतो. यावरून जैनत्वाची व्यापकता लक्षात येते. तीर्थंकरांच्या विशेषता म्हणजे ते सर्व काही जाणतात पण जाणूनही शांत रहातात. ते संसारातल्या जीवांना संसारातून सुटण्याचा मार्ग सांगतात.
अकराव्या व बाराव्या शतकात भारतात करोडो जैन होते. आता जैन अल्पसंख्य आहेत कारण जैनत्व योग्य प्रकारे प्रस्तुत केले नाही. त्यामुळे त्यांच्यात सांप्रदायिक भेद निर्माण झाले. त्यांच्यात विद्वेष निर्माण झाला. संकटे कोसळली. चौदाव्या शतकातील राजा वेंकटराम यास जैनांनी कन्या देण्याचे नाकारले. कारण तो व्यसनी होता. त्यावेळी जैन मंदिरे रुपांतरीत झाली. कित्येक जैन अजैन झाले. त्यावेळी आचार्य वीरसेन यांनी नियम घेतलाकी जोपर्यंत शंभर लोक स्वखुशीने जैनत्वाचा स्वीकार करतील तेव्हाच मी आहार घेईन. जैन दर्शनात कसलीही जबरदस्ती नाही.
आर्यसमाजी स्वामी नित्यानंद हा आपल्या गुरूंचा परमशिष्य होता. आपल्या गुरूंना अंतिमसमयी त्याने असे वचन दिलेकी, ‘मी जैनांशी शास्त्रार्थ करेन आणि जिंकेन आणि त्यासाठी मी जैन शास्त्रांचेही अध्ययन करेन.’ मग नित्यानंदाने सहा दिवस जैनांशी शास्त्रार्थ केला. त्यावेळी त्याने जैन शास्त्रांचाही सखोल अभ्यास केला. पण सहा दिवसानंतर त्याने आपला निर्णय सांगितला, “मी नित्यानंद, जैन शास्त्रांचे अध्ययन केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध बोलूच शकणार नाही.” असे सांगून त्याने जैन धर्माचा स्वीकार केला. तो कर्मानंद बनला. त्याने समयसारावर टीका लिहिली.
जैनधर्मात ज्ञानाप्रमाणे भक्तीलाही स्थान आहे. खरे ज्ञान ज्याच्याजवळ असते तो ज्ञानी असण्याचा गर्व करीत नाही. जीवनातल्या कठीण प्रसंगी नास्तिकालाही देव आठवतो, कारण स्वत:मधले दुबळेपण तेव्हाच त्याला जाणवते. समर्पण भावना भक्तीचेच रूप आहे. समर्पणात शांती असते. अहंकाराचे समर्पण केल्यास ‘मी’ आहे म्हणून जो त्रास असतो तो क्षणार्धात नष्ट होतो.
अष्टावक्र गीतेतील एक प्रसंग आहे. राजा जनकाच्या दरबारात अष्टावक्र आला.आठ ठिकाणी वाकलेल्या त्या कुरूप व्यक्तीला पाहून दरबारातील सर्वजण हसू लागले. पण राजा मात्र विवेकी होता. त्याने विचारले, “आपण कोण? कोठून आलात?” त्यावर अष्टावक्र म्हणाला, “मला जाणून घ्यायचे आहेकी ही विद्वानांची सभा आहे काय? आपणच राजा जनक आहात काय?” यावर मंत्री म्हणाले, “होय, ही विद्वानांचीच सभा आहे.” त्यावेळी अष्टावक्राने परत विचारले, “मंत्री सत्य बोलताहेतका?” मग राजा जनक म्हणाला, “आपण असे का बरे विचारीत आहात?” त्यावर अष्टावक्र म्हणाला, “कारण मला ही सभा विद्वानांची वाटत नाही. मलातर ही चर्मकारांची सभा वाटते. कारण हे सर्वजण माझ्या कातडीला पाहून हसले. इथे तर आत्म्याला कोणीच जाणत नाही.” यावर राजा जनक म्हणाला. “मला आत्म्याला जाणून घ्यायचे आहे.” त्यावर अष्टावक्र म्हणाला, “हे राजन, आत्मा दिसत नाही पण आत्म्याचा परिचय करून देता येतो.” मग राजा जनक आत्म्याला जाणून घेण्यासाठी विनीत बनला. अष्टावक्राच्या इच्छेनुसार राजा खाली बसला. अष्टावक्र सिंहासनावर बसला. त्यानंतर राजाने अष्टावक्राला विनंती केलीकी, “आतातरी मला आत्म्याच्या परिचयाचा उपाय सांगा.” त्यावर अष्टावक्र म्हणाला, “सांगेन, पण त्यासाठी मला गुरुदक्षिणा हवी. तुमच्याजवळ जे सर्व काही आहे ते मला समर्पित कराल?” यासाठीही राजा जनक तयार झाला पण थोडा चिंतेत पडला. ते पाहून अष्टावक्र म्हणाला, “राजा तू सर्व काही समर्पित करायला तयार तर झालास पण एवढी चिंता, एवढे नैराश्य कशासाठी?” त्याचवेळी मग राजाची मनस्थिती शून्य स्थितीला पोहोचली. राजाला वाटले, जाणवले, की आतापर्यंतचे आपले सर्व परिचय सापेक्ष होते. जसे, मिथिलेचा राजा! राणीचा राजा! पण सगळं काही अर्पण केल्यावर, तन-मन-धनही अर्पण केल्यावर काय उरलं माझ्याजवळ? त्याचक्षणी राजाने आपला परिचय जाणला व अष्टावक्रानेही राजाची स्थिती जाणली. त्यानंतर राजा जनक विदेही बनला. अशाच प्रकारची घटना आचार्य नेमीचंद्र यांनी समयसारात सांगितली आहे. खरा धर्म जाणल्यानेच निराकुलता येते. म्हणूनच जैनत्व ही कला आहे, जाणण्याची! जगण्याची!आणि मृत्युचीही!