About Us


This is a website created for published works of Marathi writer and poetess, Sunetra Nakate. A well established writer with 4 published books, Sunetra Nakate shares poems, stories, and articles published in various newspapers and magazines on this website.

 

sunetranakate.com (सुनेत्रा सृष्टी) या वेब साईट द्वारा प्रिंट मिडियातून electronic मीडियात मी केलेले पदार्पण माझ्या लेखनाचा उत्साह वाढवणारे ठरले. माझ्या या शब्दसृष्टीत प्रवचनांचे अनुवाद आहेत. बालकथा, ललितकथा, कविता आणि गझलाही आहेत. लेखन कुठलेही असो; गद्य असो किंवा पद्य असो, त्यातून लेखक किंवा कवी वेगवेगळ्या मनोभूमिकेतून जीवनावर भाष्य करीत असतो. कधीकधी स्वत:च्या मनात उमटणाऱ्या सहजसुंदर भावनांवर शब्दांचा साज चढवित असतो. सुनेत्रासृष्टीत फेरफटका मारताना वाचकांना भावनाची आंदोलने अनुभवण्यास मिळतील. भावनांचा हा दरवळ वाचकांना वेगळ्या वातावरणात घेऊन जाईल आणि त्यांना आनंद मिळवून देईल अशी अपेक्षा करते. अगदी लहानपणापासूनच पाठ्यपुस्तकातील मुलामुलींशी पशु-पक्ष्यांशी, झाडांशी, फुलांशी माझी पटकन मैत्री जमायची. त्यांच्याशी संवाद करता करता मी नेमकी केव्हापासून लिहायला लागले हे लक्षात नाही पण प्राथमिक शाळेत चौथ्या इयत्तेत असतानाचा एक प्रसंग मला चांगलाच आठवतो. आमच्या वर्गाचे इन्स्पेक्शन होते. इन्स्पेक्टर काही मुलांना प्रश्न विचारीत होते की तुम्ही मोठेपणी कोण होणार?

माझ्या एका खास मैत्रिणीने सांगितलेकी, “मी डॉक्टर होणार.” जेव्हा मला प्रश्न विचारला गेला तेव्हा मात्र काहीही न ठरवता मी अगदी उत्स्फूर्तपणे म्हणाले होतेकी, “मी लेखक होणार.” त्यावेळी ते इन्स्पेक्टर मला म्हणाले होतेकी, “लेखक नाही, मी लेखिका होणार असे म्हणायचे.”

लौकिक अर्थाने मी electronics engineer झाले, पण नोकरी केली नाही. लग्नानंतर मी शालेय विद्यार्थ्यांचे क्लासेस घेतले. अगदी पहिलीपासून ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मी सर्व विषय शिकवीत असे. माझा क्लास म्हणजे जणू एक मुक्त विद्यापीठच होते. त्या विद्यापीठात शिकवता शिकवता मी स्वत:ही कितीतरी गोष्टी पुन्हा नव्याने शिकत गेले.
लहानपणापासूनच मला वाचनाचे भयंकर वेड होते. पंचतंत्रातल्या गोष्टी, परीकथा, चांदोबा, मुलांचे मासिक अशी पुस्तके वाचता वाचता चौथीत असल्यापासूनच मी कादंबऱ्याही वाचू लागले. ‘भंगलेले देऊळ’ ही ग. त्र्यं. माडखोलकरांची कादंबरी मी दहा बारा वर्षांची असताना वाचली असावी…
त्यानंतर कथा, कादंबऱ्या, कवितासंग्रह, ओशोंचे साहित्य, धार्मिक साहित्य, दिवाळी अंक असे जे जे मिळेल ते ते मी वाचत गेले. २००० साली मराठी तीर्थंकर मासिकात मी हळदीकुंकू नावाचा ललित लेख लिहिला. त्यानंतर खऱ्या अर्थाने माझ्या लेखणीला माझ्या मनीचा भाव गवसला. त्यानंतर मी कथाही लिहिल्या.
मी लिहिलेल्या फुलांच्या जन्मकथांमधून मला माझीच नव्याने ओळख झाली. निसर्ग, तिथले पशु-पक्षी, झाडे, फुले यांच्या माध्यमातून मी मानवी भाव भावनांचे प्रकटीकरण केले. फुलाच्या या कथा वेगळ्या बाजाच्या, वेगळ्या घाटाच्या तर आहेतच पण त्या प्रत्येक कथेमधून बाल वाचकांना एक छानसा संदेशही मिळतो.
या कथा सुमेरू प्रकाशनाने ‘कथा फुलांच्या’ या संग्रहाच्या रूपाने २००४ साली प्रकाशित केल्या. त्यानंतर जैन गुरु ध्यानसागरजी महाराज यांच्या हिंदी प्रवचनांचा मराठी अनुवाद मी ‘कैवल्य चांदणे’ या पुस्तकाच्या रूपाने प्रकाशित केला. ही प्रवचने सरल, सुबोध तरीही जीवनविषयक तत्वज्ञान सांगणारीही होती. म्हणूनच त्यांचा अनुवाद मला करावासा वाटला.
कविता तर मी अगदी लहानपणापासूनच लिहायचे. पण खऱ्या अर्थाने मी कविता २००५ सालापासूनच लिहायला लागले. त्यानंतर मी गझलाही लिहू लागले.
आज मी उत्तमोत्तम गझला लिहू शकते याचे श्रेय मी जे माझ्या प्रांजळ भावनांना आणि प्रतिभेला देते तसेच माझे गझल गुरु कविवर्य इलाही जमादार यांनाही देते. त्यांनी माझ्यातल्या भावनांचे बळ ओळखून त्यांच्या मन मोकळ्या प्रकटीकरणासाठी माझा आत्मविश्वास वाढवला.
‘दिडदा दिडदा’ हा माझा गझलसंग्रह २००६ साली प्रकाशित झाला. या संग्रहातून मी अक्षरगणवृत्ते व मात्रावृत्ते वापरून गझला लिहिल्या आहेत. प्रेम, अध्यात्म, समाजकारण, राजकारण, स्त्रीमुक्ती असे विविध विषय हाताळणाऱ्या गझला या संग्रहात आहेत.
कविवर्य इलाही जमादार यांच्या ‘तुझे मौन’ या ५७७ शेरांच्या प्रदीर्घ गझलेवर मी उत्स्फूर्तपणे आस्वादक भाष्य लिहिले. तेव्हाच गझल लेखनाप्रमाणेच गझलांची चिकित्सक आणि आस्वादक समीक्षाही मी करू शकते याची मला जाणीव झाली. त्यानंतर मी इलाही जमादार यांच्या सात गझलसंग्रहांवर चिकित्सक व आस्वादक समीक्षा लिहिली. त्या लेखनात मी मराठी गझल, मराठीतील इतर गझलकार, गझलेचे तंत्र आणि मंत्र, गझलसदृश्य काव्य यावर विस्तृत भाष्य केले आहे.
मराठी जैन ललित कथांवर मी विस्तृत आस्वादक व समीक्षात्मक लेखन केले आहे. ‘कथेनंतरची कथा’ या नावाने ते सुमेरू प्रकाशनामार्फत प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
अजूनही बरेच लेखन करण्याची माझी इच्छा आहे. त्यात प्रामुख्याने बाल व कुमार वाचकांसाठी अधिकाधिक लेखन करण्याचा माझा मानस आहे.