जैनत्व दर्शन(विश्वव्यवस्था) – JAINATVA DARSHAN(VISHAVA VYAVASTHAA)


This article is a translation of a pravachan given by Jain Guru Dhyansararji maharaj(book-kaivalya chandane). In this pravachan maharaj tells us about jiv-siddhant and karm-siddhant in jain philosophy.

हे सारे विश्व द्रव्यांनी भरलेले आहे. त्यात वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ विद्यमान आहेत. ही विश्वव्यवस्था अशी अदभूत आहेकी तिला कोणी चालवण्याची अथवा चिंता करण्याची जरूरी नाही. प्राकृतिक नियम आणि स्वाभाविक सिद्धांताप्रमाणे या सृष्टीची व्यवस्था अनादी काळापासून चालत आलेली आहे.
काहीजणांना वाटते, याच्यानंतर काय होईल? कसे होईल? पण विश्व व्यवस्था समजाऊन घ्यायची तर हे लक्षात ठेवावे की ‘मी’ म्हणजेच माझा जीव हा या विश्वव्यवस्थेतला एक अंश आहे. त्या द्रव्य समूहातालाच मी एक आहे. माझ्याव्यतिरिक्त द्रव्यसमूहातील इतर सर्व शेषद्रव्य माझ्यासाठी पर आहे. मुलाचा जीवही आईच्या जीवापेक्षा वेगळा आहे. भगवानही माझ्या जीवापेक्षा भिन्न आहेत. स्व आणि पर हे विश्वव्यवस्थेचे दोन भाग आहेत हे जाणायला हवे.
या विश्वात ज्या काही घटना घडतात, जेवढी काही कार्ये होतात त्यात दोन प्रकारच्या शक्ती अंतर्भूत असतात. त्या दोन शक्ती म्हणजे उपादान आणि निमित्त. म्हणूनच जैनसिद्धांत असे नाही सांगतकी ह्या विश्वाची व्यवस्था चालवणारा कोणी आहे. विश्वाच्या व्यवस्थेत फक्त जीवाची व्यवस्था नाही तर अजीवांचीही व्यवस्था सामील आहे. जैन तत्वज्ञान हे जीवसिद्धांत व कर्मसिद्धांत यांचे मिळून बनलेले आहे. जैन अध्यात्म हे जीवसिद्धांत आणि कर्मसिद्धांताचे सार आहे.
क्रिया करणे म्हणजे कर्म करणे आणि त्या क्रियेची प्रतिक्रिया म्हणजेच त्या त्या कर्माचे फळ होय. विद्या किंवा ज्ञान ग्रहण करण्याचाही एक क्रम असतो. त्या क्रमाने गेले तरच ग्रहण व्यवस्थित होते. संसारात भटकणारे आपण अनादी काळापासूनचे कर्मरोगी आहोत. आचार्य परमेष्ठी हे आपले वैद्य आहेत. आपली चर्या म्हणजेच आपले आचरण किंवा ग्रहण हेच आपले औषध आहे. या औषधाचे विधीवत सेवन आवश्यक आहे. नाहीतर त्याच्यापासून लाभ होणार नाही. पण आचरणाबरोबर आस्था किंवा श्रद्धा आवश्यक आहे. कार्य होण्यासाठी किंवा फलप्राप्तीसाठी उपादान म्हणजे स्वत:ची शक्ती आवश्यक आहे. उपादान म्हणजे निमित्त किंवा सहयोगी शक्ती.
एखाद्या वृद्ध व्यक्तीत चालण्याची शक्ती असते पण काठीच्या सहाय्याने चालण्याची शक्ती असते. एकट्याने चालण्याची शक्ती नसते. वृद्धाच्या चालण्यात काठी सहाय्यक ठरते. काठीमुळे त्याची चालण्याची शक्ती प्रकट होते. यात वृद्धामध्ये जी स्वत:त असलेली शक्ती असते ती उपादान असते. चालण्यात सहाय्यता करणारी काठी ही निमित्त आहे. आगगाडी धावते. तिच्या धावण्यात इंजिनाचे हॉर्स पॉवर हे उपादान आहे.
लोहपथ, सिग्नल या गोष्टी निमित्त आहेत.
कुठलेही कार्य घडताना दोन स्वाभाविक शक्ती काम करतात. भाकरी पिठाच्या सहाय्याने बनते. पिठामध्ये भाकरी बनण्याची क्षमता अगर शक्ती असते. त्या क्षमतेलाच उपादान शक्ती म्हणतात. भाकरी बनवताना लागणारे पाणी, शेगडी, विस्तव, तवा वगैरे आवश्यक गोष्टी निमित्त आहेत.
ज्याच्या उपस्थितीने किंवा असण्याने काम होते व त्याच्या नसण्याने काम होत नाही त्याला निमित्त म्हणतात. निमित्त कर्ता-धर्ता नाही. तो फक्त तेथे उपस्थित असतो. कामात सहाय्य करतो. जिनेन्द्र भगवान सिद्ध झाले त्यावेळी ते मध्यलोकातून ऊर्ध्वलोकात गेले. त्यांचे स्थानांतरण झाले. यात कोण निमित्त झाले? गमन क्रियेत सहयोगी असणारा यात निमित्त झाला. गमनसहित परिणमन यात कोण निमित्त झाले? यात कालद्रव्य निमित्त झाले.
समयसाराच्या शंभराव्या गाथेत निमित्ताचा निषेध केलेला नाही. मात्र निमित्ताच्या भरवशावर राहण्याचा निषेध केला आहे. निमित्ताला आपण नाकारू शकत नाही पण निमित्ताधीन दृष्टीचा निषेध केला आहे. म्हणूनच एकाच शक्तीच्या भरवशावर राहू नये. गुरूंच्या विनयाशिवाय पुण्य येत नाही. जो गुरूची गोष्ट ऐकायला तयार नाही त्याचे कल्याण होत नाही. मोक्षमार्गावर स्थीर होण्यासाठी गुरूंचे सान्निध्य, पुरुषार्थ म्हणजेच ध्यान,तप याखेरीज द्रव्य-क्षेत्र-काल, जसे कर्मभूमीत जन्म वगैरे गोष्टी आवश्यक आहेत. म्हणूनच निमित्ताची उपेक्षापण करू नये आणि त्याच्या भरवशावरही राहू नये.
तीर्थंकर भगवान हे अठरा दोषरहित आहेत. ते सर्व जाणतात. त्यांच्याप्रती निस्वार्थ गुणानुराग म्हणजेच हीच खरी भक्ती होय. अनुरागसहित करुणेने पुण्यसंचय होतो. सिद्ध भगवानांच्याजवळ करूणा आहे.
षटखंडागमाच्या धवला टीकेत तत्वार्थसार ग्रंथात लिहिले आहेकी सिद्धभगवान अठरादोषरहित असले तरीही त्यांच्यात करूणा आहे. कारण करूणा जीवाचा स्वभाव आहे. म्हणून भगवानांना धन्यवाद देणे चूक नाही. अनुरागसहित करुणेने पुण्यसंचय होतो.
क्षायिक सम्यग्दर्शन म्हणजे असे सम्यग्दर्शन की जे एकदा प्राप्त झालेकी परत नष्ट होत नाही. ज्याला क्षायिक सम्यग्दर्शन होते तो चौथ्या भवात मोक्षाला जातो. क्षायिक सम्यग्दर्शन वीतराग भगवंत व गुरू म्हणजे श्रुतकेवलींच्या सान्निध्यातच प्राप्त होते.
संसारात घडलेल्या घटनांचे अंतरंग कारण उपादान व बाहयकारण निमित्त आहे. प्रथम तीर्थंकर आदिनाथ प्रभूंचा नातू मारीच होता. तो भरत चक्रवर्तींचा पुत्र होता. तो म्हणे सत्य तर माझ्याजवळ आहे. सगळी महत्वाची पदे तर भ. आदिनाथांनी कुटुंबियांनाच दिली. प्रथम गणधर वृषभसेन, प्रथम मोक्षगामी व प्रथम कामदेव बाहुबली, प्रथम चक्रवर्ती भरत, प्रथम आर्यिका ब्राम्ही! अशा या मारीचाला स्वत: आदिनाथप्रभूपण बदलू नाही शकले. ज्याला स्वत:लाच नाही सुधारायचे त्याला तीर्थंकर काय करणार? पण पुढे हाच मारीचाचा जीव अनेक भवाअंती अंतीम तीर्थंकर भ. महावीर झाला. ज्याला स्वत:ला सुधारायचे आहे त्याला जिनवाणीचे एक वाक्यसुद्धा सुधारू शकते.
कोठेतरी भूकंप होतो. महापूर येतो. हजारो लोक एकदम मरतात. त्यावेळी वाटते एवढे लोक एकदम कसे मृत्यू पावले? कदाचित मारणारी कुठलीतरी दैवी शक्ती असेल, प्रकोप असेल, पण तसे नसते. काही पापे अशी असतातकी माणसे ती सामुहिक स्वरुपात करतात. जसे एखादा टीवी वरचा अश्लील किंवा हिंसक कार्यक्रम करोडो लोक एकाचवेळी पाहतात. त्यावेळी त्या सर्वांचे भाव एकसारखे होतात. अशावेळी सामुहिक प्रकारचा एकाच प्रकारचा कर्मबंध होतो. साऱ्यांना त्यावेळी एकाच प्रकारचे कर्म बांधले जाते. त्यामुळे काहीवेळा सामुहिक मृत्यू होतात. सामुहिक पापे शरीराप्रमाणे मनाकडूनही होतात.
एखाद्या दुर्बल, रोगपीडित व्यक्तीची दुसरी एखादी व्यक्ती चेष्टा करते, टिंगल करते तेव्हा इतर बरेचजण हसतात. त्याला साथ देतात. अशावेळी त्या व्यक्तीबरोबरच इतरांनाही त्या पापाचा बंध होतो. म्हणून बोलताना, हसताना सांभाळून बोलावे, हसावे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.