द्रौपदीची क्षमा – DROUPADEECHEE KSHAMAA


This article is translation of pravachan given by jain Guru shree Dhyansagarji maharaj. In this pravachan maharaj describes the importance of kshama dharm in our daily life. Maharaj gives many examples from Jain purankataha.

पर्युषण पर्व- उत्तम क्षमा, कैवल्य चांदणे -जिव्हाळा प्रकाशन पहिली आवृती – ९ .४.२००५ मूळ हिंदी प्रवचने – क्षु . १०५ श्री. ध्यानसागरजी  महाराज शब्दांकन व मराठी अनुवाद- सौ.सुनेत्रा नकाते

पर्युषण पर्व यातील पर्युषण या शब्दाची उत्पत्ति परि+उषण अशी सांगितली जाते. आपल्या जीवनात अधूनमधून जे मंगलमय अवसर अथवा काल येतात त्यांना पर्व असे म्हणतात. परित: उष्यते ध्ययत म्हणजे पर्युषण पर्वात सर्व तऱ्हेने चारी बाजूंनी पाप कर्मांना तपाद्वारे भस्म केले जाते. जैन पर्वामध्ये जास्तीत जास्त महत्व त्यागाचे असते. पर्युषण पर्वाचा उत्तम विधी म्हणजे दहा दिवस निर्जल उपवास. मध्यम विधी म्हणजे ४ दिवस उपवास व बाकीचे दिवस एकाशन. जघन्य विधी म्हणजे दहा एकाशन. म्हणजेच आहार जल एकवेळा घेणे.

दशलक्षण पर्वातील दहा धर्म म्हणजे उत्तम क्षमा, मार्दव, आर्जव, सत्य, शौच, संयम, तप, त्याग, अकिंचन्य व ब्रम्हचर्य होत. यातील क्षमेने क्रोध निघून जातो. मार्दवाने अहंकार व अभिमान निघून जातो. आर्जव म्हणजेच शुचितेने लोभाचे निवारण होते. पवित्रता व संतोष प्राप्त होतो. अशा तऱ्हेने पहिल्या चार धर्मांच्या पालनाने चार अंतरंग कषायांचे निवारण होते. त्यानंतर सत्य धर्माच्या पालनाने असत्याचा निषेध केला जातो. संयमाने हिंसेचा निषेध केला जातो. त्याग व अकिंचन्य धर्माच्या पालनाने ममत्वाचा त्याग केला जातो. अशा रीतीने सत्य, संयम, अकिंचन्य व ब्रम्हचर्य याद्वारे पाच पापांचे निवारण केले जाते. यातील तप धर्माच्या पालनाने आत्म्याची निद्रीस्त क्षमता जागृत होते. अशा उत्तम दहा धर्मांचे मुनी पालन करतात व दहा धर्म पर्व रुपात श्रावक साजरे करतात. हा पर्व माघ, चैत्र व भाद्रपद महिन्यात म्हणजेच वर्षातून एकूण तीन वेळा येतो. यामध्ये भाद्रपद महिन्यात येणारा पर्व हा विशेष महत्वाचा असतो. कारण हा काल वर्षायोगाचा असल्याने या पर्वात साधूंच्या सहवासाचा, उपदेशाचा लाभ होतो.

पर्वातील पहिला दिवस उत्तम क्षमेचा. पौराणिक दृष्टांतातील द्रौपदीची क्षमा सर्वश्रुत आहे. युद्धात द्रौपदीचे सर्व पुत्र मारले जातात. मग विजय प्राप्तीनंतर  पांडव तिच्या पुत्रांना मारणाऱ्यांना तिच्याकडे घेऊन येतात. त्यावेळी द्रौपदी म्हणते, “या सर्वांना सोडून द्या. कारण पुत्र वियोगामुळे मला जी वेदना होते आहे ती यांच्या आईला होऊ नये.”  जे स्वत:बाबत करू नये असे वाटते ते काम दुसऱ्यांच्या बाबतीत आपण करू नये हे धर्माचे  सार आहे.

१३ वे तीर्थंकर विमलनाथांचे गणधर मेरू मुनिराज होते. गणधरांकडे बऱ्याच ऋद्धी असतात. एकदा हे मेरू मुनिराज ध्यानात अगदी लीन झाले होते. त्यावेळी आकाशगामी विद्याधरांनी त्यांच्यावर बाण सोडला. मुनिराज अविचल राहिले. पण त्यांच्यावरील उपसर्ग थांबवण्यासाठी वैडू.र्य देवांनी विद्याधरांकडून येणारे बाण थोपवून धरले. ध्यानात लीन असणाऱ्या मुनीराजांना जेव्हा पूर्ण ज्ञान प्राप्ती झाली तेव्हा इंद्र उपस्थित झाला. त्याने मुनिराजांना प्रश्न विचारला, “विद्याधर आपणास बाण का मारीत होते?” तेव्हा मुनिराज म्हणाले, “जेव्हा पूर्वभवात माझ्याकडे राज्यपद  होते तेव्हा हा विद्याधर अपराधी होता. त्यावेळी मी त्याला दंड दिला होता. त्यावेळी मी त्याला दंड दिला होता. त्यामुळे तो या भवात वैरी होऊन माझ्यासमोर आला. इंद्राने विचारले, “आपण तर ऋद्धीधारी मुनी होता मग आपण आपल्या ऋद्धीचा उपयोग का केला नाही?”

पण ऋद्धीचा उपयोग केला असता तर केवलज्ञान कसे झाला असते? मेरू मुनींनी उपसर्ग होऊनही ऋद्धीचा उपयोग न करता क्षमाभाव धारण केला म्हणून त्यांना पूर्ण ज्ञानाची प्राप्ती झाली. आपण जी १०८ मण्यांची माळ जपतो त्यातील मण्याला मेरू म्हणतात. माळेतील प्रत्येक मेरू जपताना आपण मेरू मुनिराजांचा क्षमाभाव आठवावा म्हणून त्याला मेरू म्हटले जाते

अलीकडच्या काळातील एक गोष्ट आहे. एक पिता आपल्या छोटया मुलाला नेहमी रागावत असे. छोटया छोटया गोष्टींबद्दल नेहमी टोकत असे. कपडे मातीत का लोळवलेस? हाताची कोपरे जेवणाच्या टेबलावर का ठेवलीस? अशी लहान सहान कारणे काढून पिता त्याला रागावे. कधी कधी मारतही असे. एकदा दिवसभर पिता मुलाला रागावत राहिला. मुलगा खूप दु:खी होता. त्या रात्री त्याला खूप भीती वाटत होती. आता परदेशात मुले रात्री झोपायला जाताना आई वडिलांना गुडनाईट म्हणून जातात. मुलाला वाटत होते की आता मी झोपायला जाताना त्यांना गुडनाईट कसे म्हणू? ते तर मला सारखे रागावतात. तरीपण तो गुडनाईट करायला जातो. वडील त्यावेळी लायब्ररी रूममध्ये असतात. मुलगा जाऊन दाराच्या मागे उभा राहतो. हळूच आत डोकावतो. वडिलांना चाहूल लागते. ते विचारतात, “काय आहे?” मुलगा पळत आत येतो. पित्याच्या गळ्याला मिठी मारतो व गुडनाईट म्हणून पळून जातो. वडिलांचे हृदय द्रवते. त्यांना वाईट वाटते. ते मुलाच्या खोलीत येतात. मुलगा गाढ झोपलेला असतो. ते त्याच्या समोर गुडघे टेकून बसतात. म्हणतात, “बाळा, मी तुला सारखा रागावतो. त्याबद्दल मला क्षमा कर.” तू जागा असतास तर मी तुझ्यापुढे कधीच क्षमेची याचना करू शकलो नसतो. पण आता करतो. मला क्षमा कर.” आणि त्यानंतर वडील मुलाला रागावणे कायमचे सोडून देतात.

आयुष्य पूर्ण व्हायच्या आत काही कामे जरूर करावीत. जे जे संपर्कात आले व ज्यांचे आपल्याला स्मरण आहे अशांना हृदयापासून धन्यवाद द्यावेत. कारण त्यांनी आपल्याला त्रासाचा अनुभव दिला व दुसऱ्याला आपण असा त्रास देऊ नये हा विवेकही दिला. असा विवेक की आज मला त्रास होतो आहे कारण मी कधी कुणाला त्रास दिला होता. कष्ट देताना त्यातला त्रास कळत नाही पण कष्ट भोगताना तो त्रास कळतो.

आपण सर्वांना क्षमा करावी कारण जोपर्यंत आपण क्षमा करत नाही तोपर्यंत मन तणावग्रस्त राहते. जर सहा महिनेपर्यंत आपण कोणाला त्याच्या अपराधाबद्दल क्षमा नाही केली तर आपण स्वत:च अपराधी आहोत. क्षमा न केल्याने शारीरिक व मानसिक आजार होतात. म्हणूनच क्षमा करणे हा उत्तम आरोग्याचा मार्ग आहे.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.