ध्यान-सर्वोत्कृष्ट तप – DHYAAN-SARVOTKRUSHT TAP


This article is  translation of a pravachan given by jain Guru shree Dhyansagarji maharaj. In this pravachan maharaj says, Dhyaan is the best ‘TAP’. In this pravachan maharaj also tells us about the five essential things which helps us while doing dhyaan.(ध्यान- प्रवचन ३ रे – कैवल्य चांदणे)

बारा प्रकारच्या तपश्चरणात मुख्य तप ध्यान आहे. ध्यान हे सर्वोत्कृष्ट तप आहे. नित्य स्वाध्याय ध्यानात सहाय्यभूत ठरतो. स्वाध्याय म्हणजे नित्य धर्माचे अध्ययन. वैराग्य, तत्वविज्ञान, समचित्तता, निष्परिग्रहता आणि कष्ट सहिष्णुता या पाच गोष्टी ध्यानासाठी आवश्यक आहेत.

 ध्यानासाठी पहिली आवश्यक गोष्ट म्हणजे वैराग्य. ते नसेल तर  मन भटकत राहील.

सर्वजणच मोहाच्या जाळ्यात अडकलेले असतात. सगळे काही दिसत असते, कळत असते पण तरीही या संसारातल्या मोहजालात अडकलेला माणूस संसारातून बाहेर पडू इच्छित नाही. या संसारात कोणी कोट्याधिश असतो तर कोणी एकवेळेच्या अन्नालाही महाग असतो. कोणाचे हातपाय तुटलेले असतात. कोणी आजारी रुग्ण असतो. त्यांच्याजवळ औषधालाही पैसे नसतात. कोणी रूपसंपन्न, बुद्धिमान, सुदृढ असतो तर कोणी कुरूप, मंदबुद्धी, दुबळा असतो. संसारातली ही विषमता पाहून आपण कधी अंतर्मुख होतोका? आपल्याला कधी कधी भय जरूर वाटते की अशी वेळ आल्यावर आपण काय करायचे? पण आपल्याला असा कधी प्रश्न पडतोका की या विषमतेचे रहस्य काय? या मोहजालातून बाहेर पडण्याचा मार्ग कोणता?

 जीवन जगताना अश्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी कोणी पुरुषार्थ करतोका? पंडित जगन्मोहनशास्त्री म्हणतात, ‘मनुष्य आयुष्यभर दोनच गोष्टी करत असतो.  त्या म्हणजे अनिष्ट हटवणे आणि इष्ट जमवणे. ध्यानाच्या उत्पत्तीसाठी तत्वविज्ञानही जाणनेही  आवश्यक आहे. जैन तत्वविज्ञान हे जीवसिद्धांत आणि कर्मसिद्धांत यांचे मिळून बनलेले आहे. जीव आणि शरीर यामधील जीव अशी अदभुत वस्तू आहेकी जिचे वर्णन शब्दात नाही करता येणार. जीवाची परिपूर्ण व्याख्या शब्दबद्ध नाही करता येत. जे कृष्णमूर्ती म्हणतात, ‘No one can teach you about you!’ आपल्याबद्दल आपणच जाणायचे असते. त्यासाठी काही संकेत, दिशा मात्र गुरुचरणांपाशी मिळू शकतात. श्री मद राजचंद्र आपल्या ‘अपूर्व अवसर’ या गुजराथी काव्यातील एक पद आहे. त्याचा अर्थ असाकी, असे जिनेंद्र भगवान की ज्यांना केवल ज्ञान प्राप्त झाले आहे, ज्यांनी आत्म्याला जाणले आहे त्यांच्या सर्वोच्च वाणीतही आत्मा सामावू नाही शकला. त्या वाणीलाही जर आत्म्याचे वर्णन यथायोग्य नाही करता आले तर दुसऱ्या कोणाची वाणी त्याबद्दल काय सांगणार? रहिमचा एक दोहा आहे,

रहिमन बात अगम्य की कहन सुननकी नाही;
जो जानत सो कहत नाही कहत सो जानत नाही’

 तर सांगायची गोष्ट  ही की यथार्थ ध्यानात पोहोचणारा शब्दांना खूप दूर सोडतो. आमचे आचार्यश्री  तर म्हणाले होतेकी, ‘शब्दांचं महत्व फक्त अर्थ लक्षात येईपर्यंतच असतं, आणि अर्थाचं महत्व फक्त भाव लक्षात येईपर्यंतच असतं. भावांचीही आवश्यकता जोपर्यंत तुम्ही भावात लीन होत  नाही, तन्मय होत नाही तोपर्यंतच! तन्मय झाल्यानंतर भावही खूप मागे निघून जातात. मग जे आपल्याजवळ असतं ते काय असतं? त्यावेळी जे आपल्यापाशी उरतं ती चर्चा करण्याची गोष्ट नसते. ती प्रयोग करण्याची, समजण्याची गोष्ट असते. ती साधनेची गोष्ट असते. आता साधना काय गोष्ट आहे? गुरुंमुळे मिळालेल्या विवेकदृष्टीचा योग्य अभ्यास करणे म्हणजे साधनाहोय. आता दृष्टी काय आहे? एक डोळा जो विवेकाचा असतो, बंद असतो तो गुरुंमुळे उघडतो. मग मनुष्याला दृष्टी प्राप्त होते. त्या दृष्टीचा अभ्यास म्हणजे साधना! उदाहरणच पाहायचे तर, समजाकी गुरूने दृष्टी दिली की सुख आणि दु:ख हे भ्रम आहेत. तर मग याचा अभ्यास कसा करणार? समजा तुम्ही ध्यानासाठी बसला आहात. कोठूनतरी डासाचा आवाज येतो आहे. भय वाटते आहे की डास जवळ येईल, चावेल. पण मग त्यावेळी असला काही विचारच नाही करायचा. गुरूंनी सांगितले आहेकी, सुख-दु:ख भ्रम आहे, मग शांतच राहायचे.  हा अभ्यास जो करतो तो साधक. साधकालाच साधनेचा आनंद मिळतो.

 आता साधना म्हणजे फक्त बोलण्याची गोष्ट नाही. साधनेची व्याख्या ऐकणाऱ्याला तो आनंद नाही मिळत. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर परिस्थिती मनस्थिती बनू नये यासाठी प्रयत्न करणे म्हणजे साधना. खूप ऊन लागले, पावसात भिजलात, अशा स्थितीतही मनस्थिती परिस्थितीने प्रभावित नाही झाली तर त्याचे नाव साधना. घसा सुकला आहे तरी असं समजायचं की माझं स्वरूप तर नाही सुकलं? हा काही खेळ नाही. गोष्टी चर्चा तर कोणीही करू शकतो.

कोणी बाराव्या गुणस्थानाचीही चर्चा करू शकतो, पण ती कृती नाही करू शकत. याठिकाणी चर्चेचे बोलण्याचे काम कमी असते. जो बोलण्यातच अडकतो तो भटकत राहतो. कारण मग त्यात चर्चेचा रस, शाब्दिक रस मिसळतो. खरा रस मग त्यात कसा येणार? साहित्याचा रस म्हणजे साधनेचा रस नाही. ती एक वेगळीच गोष्ट असते. खरे ज्ञान जीवनात झळकल्याशिवाय रहात नाही. कधी रागी दिसणारा विरागी असू शकतो आणि विरागी दिसणारा रागीही असू शकतो. हे संभव आहे. वैराग्य तर कधी कधी सगळ्यांनाच जाणवते.

राजीव गांधी यांच्या चितेला राहुल गांधी याने अग्नी दिला, त्यावेळी कसे वाटले? त्यांच्या अन्त्येष्ठीचे दृश्य टी.व्ही. वर आपण पाहिले. त्यावेळी पूर्ण देशात कोणी हसत असेल काय? काहीतरी वेगळे वाटत होते,  असे की सगळ्यांचे एक दिवस हेच होणार. काही काळापुरते, तेवढ्यापुरते सगळ्यांना तसे वाटते. पण काही काळानंतर मन कुठल्यातरी दुसऱ्या गोष्टीत लागते. विचारांना गती नाही मिळत.

 जेव्हा आपले कोणी इष्टजन नेहमीसाठी निघून जातात तेव्हा जे मागे उरतात त्यांना काय वाटत असेल? त्यांची काय अवस्था होत असेल? वाटत असतेकी या व्यक्ती आणखी काही काळ आपल्या बरोबर राहिल्या असत्या तर बरे झाले असते. पण हा तर आपला स्वार्थच असतोना? गेलेल्या व्यक्ती आजही कुठेना कुठे असतातच ना?  कुंडलपूर येथे आमचे आचार्यश्री एकदा म्हणाले होतेकी, ‘What is death? It is a just change in dress and address!’

असंही नसतकी संपन्न व्यक्तीचा पुढचा भवपण संपन्नच असेल. लोकांच्या नजरेत सावकार असणारी व्यक्ती जर निजी आयुष्यात छल-कपट करणारी असेल तर पुढच्या भवात ती व्यक्ती त्याच्याच  धान्याच्या गोदामात उंदीरही बनू शकते. कर्म कोणालाही सोडत नाहीत.

वैराग्याची साधने तर चारी बाजूला कोठेही मिळतील. फक्त तेथपर्यंत दृष्टी जायला हवी. पूर्ण विचार केला की, आत्ताचा पत्ता ही एक धर्मशाळा आहे आणि आपण येथे पाहुणे आहोत तर नक्कीच फरक पडेल. स्वत:ला पाहुणा समजलात तर वागण्यात नक्कीच फरक पडेल. चुकीचा मार्ग निवडलात तर फळ कधीच चांगलं मिळणार नाही. आता कधी कधी कलियुग असल्याकारणाने वाटतकी बेईमानी करूनसुद्धा चांगलं होतचकी. पण यात सर्वात मोठं नुकसान म्हणजे मन आतल्या आत खात असतं.

पाप कशाला म्हणतात? एक ओळख आहे. जे काम केल्यानंतर आपला आतला आवाज सांगत असतोकी, हे काम नसतं केलं तर बरं झालं असतं. त्यावेळी समजा की ते पाप आहे. अशुभ काम आहे. कारण ते केल्यानंतर मनात अपराधी भावना जागृत होते. जर एखादयाला फसवून आपल्याला नफा झाला आणि तो आपण सुखाने नाही भोगू शकलो तर समजाकी तो नफा पापपूर्ण आहे. स्वत:च्या स्वार्थाबद्दल फक्त विचार केला तर  वैराग्य नाही येणार. त्यासाठी तटस्थ होऊन जीवनाकडे पहा.

वर्षगांठोके बहाणे जिंदगी कटती गयी
एक तरफ बढती गयी तो एक तरफ घटती गयी
मूढ मानवकी मनुजता मौजमस्तीमे गई
हो गयी काया पुराणी पर रही तृष्णा नयी

तृष्णा तर कधीही नवीच रहाते. जेव्हा असे विचार मनात येतील तेव्हा अंतरंगात वैराग्याचे तरंग उठतील. माणसामध्ये दोन प्रकारच्या शक्ती असतात. कल्पनाशक्ती आणि तर्कणाशक्ती. कोणामध्ये कल्पनाशक्ती जास्त असते तर कोणामध्ये तर्कणाशक्ती जास्त असते.  कोणाकोणामध्ये दोन्हींचेही संतुलन असते. दोन्ही शक्तींचा सदुपयोग होऊ शकतो आणि दुरुपयोगही होऊ शकतो. कुतर्क करणे हा तर्कणाशक्तीचा दुरुपयोग आहे. अतिरेक्यांनी केलेल्या आतंकवादी कल्पना म्हणजे कल्पनाशक्तीचा दुरुपयोग आहे.

ध्यानासाठी परिग्रहाचा त्याग ही आवश्यक गोष्ट आहे. ज्या वस्तूप्रती माणसाला लगाव असतो तो लगाव त्याला स्वस्थ बसू देत नाही. त्याला मुक्त विचारण करू देत नाही. तो त्याला जखडून टाकतो. परिग्रह ध्यानात बाधक आहे.

ध्यानासाठी चौथी आवश्यक गोष्ट म्हणजे समताभाव. सांगणं सोपं आहेकी सुखात आणि दु:खात सारखेच रममाण व्हा, पण प्रत्यक्षात असं होतका? टीका, निंदा, प्रशंसेतसुद्धा समताभाव ठेवणं ही केवढी मोठी गोष्ट आहे!

रेसकोर्सवर एखादा घोडा जिंकतो तेव्हा आनंद काय त्या घोडयाला होतो? घोडयाला त्याचे काहीच नसते. तो रात्री सुखाने झोपतो पण त्याचा मालक आनंदाच्या भाराने त्या रात्री त्या रात्री झोपू नाही शकत. प्रशंसा, निंदा मानवी मनाला विचलित करते. समजा तुम्ही मंदिरात आलात आणि कुणीतरी तुमच नाव घेतलं तर आपोआपच पावलं थबकतात. आपण तर भगवंताच्या दर्शनाला चालला होतात. जर तुमची प्रशंसा चालली असेल तर तुम्ही दर्शन करून परत येता. पण जर तुमची निंदा चालली असेल तर मात्र ती जाणून घेण्यासाठी तुम्ही नकळत थांबता. कारण निंदा कुणी परत रिपीट नाही करणार? ती ऐकायला नाही मिळणार? अशावेळी मन किती विचलित होते. पण जर आपल्याकडे समताभाव असेल तर आपण तेव्हाही थांबला नसतात. सरळ भगवंताकडे दर्शनाला गेला असतात.

सगळ्या सुखसोयी उत्तम असतील, वातावरण प्रसन्न असेल तर ध्यानात चांगले वाटेलही. पण ते उत्तम ध्यान असेलच असे नाही. उत्तम ध्यान तर ते असतेकी, जे सोडण्याची इच्छा होत नाही. ध्यानासाठी शेवटची अट म्हणजे कष्टसहिष्णुता. कोणी म्हणेल कल्याण तर आत्म्याचे करायचे आहे मग शरीराला कष्ट का म्हणून द्यायचे? तपस्या कशासाठी करायची? याचे उत्तर असेकी ,कारण
खरी परीक्षा होत असते की कष्टातही ध्यानात मन किती लागते?
शेवटी ध्यान ही एक कला आहे आणि त्या कलेचेही एक शास्त्र आहे. ते सगळ्यांना जमेलच असे नाही. पण प्रयत्न केल्यास जमणार नाही असेही नाही. यासाठी वर सांगितलेल्या पाच गोष्टींबरोबरच गुरूंचा उपदेश, साधना (अभ्यास) व अनुभव यांची जरुरी आहे.

इष्टोपदेशात ही तीन गोष्टी सांगितल्या आहेत. गुरूंचा उपदेश, अभ्यास आणि समवित्ती म्हणजेच अनुभव यांची जरुरी आहे. केवळ शास्त्र वाचून केवलज्ञान होत नाही. क्रमाचे उल्लंघन करून पुढे जाता येणार नाही. काहीजण विचारतात, “यात काही जवळचा मार्ग नाहीका?” कोठून मिळेल जवळचा मार्ग? नदीवर पूल असतो. नदी ओलांडण्यासाठी पूल हाच जवळचा मार्ग असतो. प्रवाह वेगवान असेल तर सरळ रेषेत पोहणं कठीण आहे. संसाराच्या तटापासून मोक्षाच्या तटापर्यंत गुरूच पोहोचवतात पण गुरू यात फक्त निमित्त असतात. ज्याला चालायचेच नाही त्याला कोण चालवणार? पुरुषार्थ करायचा नसेल तर गुरूही उद्धार नाही करू शकणार.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.