रक्षाबंधन पर्व – RAKSHAA-BANDHAN PARVA


This article is translation of pravachan given by Jain Guru Dhyansagarji maharaj. It is included in the book Kaivalya chanadane.
In this pravachan maharaj tells us the story of rakshabandhan parva in jain puran.This is astory of pure love.

रक्षाबंधन पर्व  रक्षाबंधनाच्या नावाने एक प्रसिद्ध जैन कथाही आहे. पण जैन शास्त्रातली ही कथा यथार्थ आहे. सत्य आहे. ही वात्सल्याची कथा आहे. वात्सल्य म्हणजे अकृत्रिम स्नेह की ज्यात बनावटीपणा  नाही. जवळ वात्सल्य असेल तर समोरच्याला आपण पीडित पाहू शकत नाही. गायीचा आपल्या वासराप्रती असणारा स्नेह कसा असतो? गाय वासराला चाटते. वासरू आनंदाने उडया मारत असते. कधी कधी ते उडया मारत असताना एखादया खड्डयात जाऊन पडते पण गायसुद्धा त्यावेळी त्याच्यामागे जाते. जंगली जनावराने जर त्याच्यावर हल्ला केला तर ती मध्ये येते. आपला जीव धोक्यात घालते पण वासरावर संकट येऊ देत नाही. असाच स्नेह धार्मिक जनांप्रति आणि परस्परांमध्येही जो खरा धर्मात्मा असतो त्यांचा असतो. त्याचेच नाव वात्सल्य. असा स्नेह बदल्यामध्ये काहीही इच्छित नाही. तो निरपेक्ष असतो.

तर ही कथा वात्सल्याची आहे. ही घटना मुनिसुव्रत भगवानांच्या आधी आणि मल्लीनाथ तीर्थंकरांच्या नंतर घडलेली आहे. त्याविली नववे चक्रवर्ती महापद्म यांचा शासनकाल हस्तिनापुरात चालू होता. चक्रवर्तींचे दोन पुत्र होते. पद्म आणि विष्णुकुमार. एकदा काय झालेकी चक्रवर्तीच्या ज्या आठ कन्या होत्या त्यांना काही विद्याधरांनी पळवून नेले. त्यांना परत सुरक्षित आणण्यात आले पण झालेल्या घटनेमुळे त्यांना वैराग्य आले. त्यांनी दीक्षा धारण केली. मग त्यांना पकडून नेणारे जे विद्याधर राजकुमार होते त्यांनीपण दीक्षा धारण केली. आठ कन्या आणि आठ राजकुमार अशा सोळा दीक्षार्थींना पाहून चक्रवर्तींना वाटले या इच्छांचा काही अंत नसतो. त्यांना वैराग्य आले. इकडे विष्णुकुमार मुनी तप करता करता अनेक ऋद्धींचे भांडार बनले. नेहमी ऋद्धी-सिद्धी हे शब्द एकत्र वापरले जातात. पण त्यात फरक आहे सिद्धी या इच्छा करून विशेष विधीने, साधनेद्वारा प्राप्त केल्या जातात. पण ऋद्धी मात्र इच्छा करून प्राप्त केल्या जात नाहीत. इच्छेने त्या प्राप्तच होत नाहीत. तपस्येमुळे आपल्या आत जी पवित्रता निर्माण होते त्यामुळे त्या सहज प्राप्त होतात.

त्यावेळी उज्जयनीस राजा जयवर्मा राज्य  करीत होता. त्याचे चार मंत्री होते. बली, बृहस्पती, शुक्र म्हणजेच नमुची आणि प्रल्हाद. हे चारही मंत्री थोड्या वेगळ्या विचारसरणीचे होते. एकदा राजा जयवर्मा महालाच्या छतावर निसर्गाची शोभा पहात उभा होता. तेव्हा अचानकपणे त्याने कोलाहल ऐकला. त्याने मंत्रीगणांना त्याचे कारण विचारले. त्यावेळी उपवनात एक जैन साधुंचा संघ विराजमान होता. मंत्र्यांनी त्याबद्दल सांगितले आणि ते म्हणाले, “ते अज्ञानी जैन साधू आले आहेत पण आपण निश्चिंत रहा. कशासाठी आपण त्यांची चिंता करता? ” राजा म्हणाला,”माझी पूर्ण प्रजा तिकडे चालली आहे मग मी पण जाणारच.”

आता आचार्य अकंपनाचार्य जे त्या उपवनात विराजमान होते त्यांनी  अवधिज्ञानाने हे जाणलेकी राजाचे मंत्री उपद्रवी आहेत. त्यांच्यामुळे संघावर संकट येईल. म्हणून त्यांनी सर्व संघाला मौन राहण्याचा आदेश दिला होता. पण नेमके त्यावेळी संघातले श्रुतसागर मुनी बाहेर गेले होते. आता राजा मंत्र्यांना घेऊन आचार्यांच्या दर्शनाला आला. प्रणाम करून विनयपूर्वक तो बसून राहिला. राजाने निवेदन दिलेकी आम्हाला काही उपदेश देऊन पवित्र करावे. पण आचार्यांनी काहीच उत्तर दिले नाही. संघातील सर्व मुनीही मौन होते. त्यांनीही उपदेश नाही दिला. मग मंत्री म्हणाले, “अशा अज्ञानींच्या दर्शनाला जाऊ नका असे आम्ही सांगत होतो, कारण त्यांना काही येतच नाही.  मग राजा मंत्र्यांसहित परत निघाला तेव्हा एक मुनिराज जे बाहेर गेले होते ते परत येत होते. त्यांना आचार्यांच्या आदेशाबद्दल काहीच माहिती नव्हते. त्यांना समोरून येत असलेले पाहून मंत्री म्हणाले, “हा पहा समोरून एक तरुण बैल येत आहे.” तेव्हा मुनिराज राजाला म्हणाले, “बरोबरच म्हणताहेत ते राजन!” “ते कसे काय?” राजा म्हणाला.

तेव्हा मुनिराज म्हणाले, या संसारात भटकणारा जीव कधी मनुष्य, कधी पशुपक्षी, कधी देव तर कधी अधोगामीही बनतो. मीही कधी भूतकाळात या अवस्थेला प्राप्त केले असेल म्हणून मी हे स्वीकार करतो.” त्यावर राजा म्हणाला, “पण आज तर आपण साधू आहात.” त्यावर मुनी म्हणाले, “ही पण पाहण्याची एक दृष्टी आहे. आज मी साधू आहे हे बरोबर आहे. पण जसे  एखादे सेठजी होते आणि त्यांनी सारा कारभार, व्यापार पुत्रावर सोपवला तरी त्यांना सर्वजण सेठजीच म्हणतातना? तसेच मीपण मागच्या भवात तरूण बैल असेन. त्यांचे कथन त्या अपेक्षेने बरोबरच आहे.”

आता त्या चार मंत्र्यांमधला एकजण पुनर्जन्माला मनात नव्हता. तो म्हणाला, “पुनर्जन्म कोणी पहिला आहे?” त्यावर मुनी म्हणाले, “जी वस्तू दिसते तीच खरी असतेका?” “होय, जे दिसते तेच खरे असते.” “मग तुम्ही आपल्या पणजोबांना पाहिले आहेका?” मग तरीही ते होतेकी नाही?” यावर दुसरे काही मंत्री तर्क-वितर्क करू लागले. पण श्रुत सागर मुनींनी शास्त्रार्थ करून त्यांना निरुत्तर केले. कारण तेतर श्रुतसागर म्हणजे शास्त्रांचा जणू समुद्रच होते. राजा मग मंत्र्यांना म्हणाला, “तुम्ही जैन साधूंना अज्ञानी कसे काय म्हणालात?” यावर ते मंत्री काय बोलणार? ते गप्पच उभे राहिले. त्यांनी विचार केलाकी, त्या साधूंनी आमचा सन्मान धुळीला मिळवला.. त्यांनी मग एक योजना आखली. चारही जण तलवारी घेऊन निघाले. छान चांदणं पडलं होतं. ढगही नव्हते.

आता राजा व मंत्री गेल्यानंतर आणखी एक गोष्ट घडली होती. श्रुतसागर मुनींनी मंत्रांबरोबर झालेला वार्तालाप आचार्यांना कथन केला. आचार्यांनी ओळखले की आता संघावर काही संकट येणार. तेव्हा श्रुतसागर मुनी म्हणालेकी, “कृपया मला योग्य काही काम असेल तर आदेश द्या.” तेव्हा आचार्यांनी त्यांना जेथे वार्तालाप झाला त्याठिकाणी जाऊन कायोत्सर्ग करण्यास सांगितले. आता इकडे जेव्हा हे चार मंत्री चांदण्या रात्री तलवारी घेऊन निघाले होते तेव्हा त्यांना वाटेत हे श्रुतसागर मुनी उभे असलेले दिसले. चारी मंत्र्यांनी  जेव्हा हे दृश्य पहिले तेव्हा ते म्हणाले, “यांच्यामुळेच तर हे सर्व घडले. यालाच आपण आता मारूयात.” चारी मंत्री मिळून त्यांना मारू इच्छित होते. चौघांनीही आपापल्या तलवारी उचलल्या आणि ते प्रहार करणार तोच  वनदेवतेने त्यांना जागच्या जागी खिळवून ठेवले. हा तर मोठा चमत्कारच झाला.

सकाळी राजाला ही वार्ता समजली. त्याने मग मंत्र्यांना बंदिवान बनवले. तोपर्यंत श्रुतसागर मुनींनी ध्यान संपवले होते. ते म्हणाले, “राजन यांना मृत्यूदंड मात्र देऊ नका. कारण मग यांच्या मृत्यूला मीच जबाबदार ठरेन.” आता राजा यावर काय म्हणणार? तो म्हणाला, “हे मुनिवर, खरेतर हे चौघेही मृत्यू दंडाशिवाय अन्य कुठल्या शिक्षेस पात्र नाहीत. पण आता मी त्यांना स्थानभ्रष्ट करून इथून घालवून देत आहे.” मग हे चारही मंत्री फिरत फिरत पद्म राजा जेथे राज्य करीत होता त्या हस्तिनापुरात येऊन पोहोचले. पद्म राजाचा सिंघबल नावाचा राजा शत्रू होता. काहीतरी छलकपट करून या मंत्र्यांनी सिंघबलाला राजा पद्म याच्यासमोर हजर केले. तेव्हा राजा पद्म सिंघबलाला पाहून संतुष्ट झाला. तो म्हणाला, “या कामाबद्दल तुम्हाला हवे ते मागा.” तव्हा बली म्हणाला, “राजन आता तर आम्हाला काही नको आहे. पण जेव्हा वेळ येईल तेव्हा मागून घेऊ.”

त्यानंतर काही काळ लोटला. अकंपनाचार्यांचा संघ विहार करीत करीत हस्तिनापुरात आला. तेव्हा हे मंत्री परत चिंतेत पडले. त्यांनी एक योजना बनवली आणि राजाला त्याच्या वरदानाची आठवण करून दिली. बलीने मग राजाजवळ सात दिवसासाठी हस्तिनापुराचे राज्य मागितले. मग या मंत्र्यांनी यज्ञाचा बहाणा करून हवन करण्यास प्रारंभ केला. तेथील धूर जेथे साधू विराजमान होते तेथे जाईल अशी व्यवस्था केली. अशा धुरामध्ये माणूस किती काळ स्थिर राहील? आता महाराज पण कोणी सुपर मनुष्य थोडेच असतात की श्वास न घेता काम चालवतील? त्यांचा कंठ रुद्ध झाला. त्यांनी संकट ओळखले आणि संकल्प केलाकी संकट टळेल तेव्हाच आहार जल घेऊ. तात्काळ शरीरावरील लक्ष हटवून ते कायोत्सर्गात गेले. पण तरीही धुरामुळे त्यांच्या शरीरावर परिणाम होतच राहिला. काहीजण बेशुद्ध झाले. काहींचे डोळे लाल झाले. धूर मात्र वाढतच होता.

त्याचवेळी एके ठिकाणी सागरदत्त नावाचे आचार्य आपले सायंकाळचे सामायिक संपवून दोन क्षुल्लकजींच्या बरोबर विराजमान होते. त्यातले एक क्षुल्लकजी ज्योतिर्विद्या जाणणारे होते. रात्रीच्या वेळी जेव्हा त्यांनी आकाशाकडे नजर टाकली तेव्हा त्यांच्या तोंडून आह! असा आवाज निघाला. आकाशात श्रवणनक्षत्र कंपित होत असलेले पाहून त्यांनी ते उद्गार काढले होते. सागरदत्त आचार्यांनी जाणलेकी कोठेतरी मुनींवर उपसर्ग आला आहे. जेव्हा दुसरे क्षुल्लकजी पुष्पदंत यांनी गुरूंना त्याबद्दल विचारले तेव्हा ते म्हणाले, “सातशे मुनींवर बळी आदि मंत्र्यांकडून घोर उपसर्ग होत आहे. ते तर काहीच नाही करू शकणार कारण उपसर्ग तर त्यांच्यावर होत आहे. माझे शिष्य जे पूर्वी चक्रवर्तींचे पुत्र होते ते विष्णुकुमार मुनी चौसष्ट ऋद्धींचे धारक आहेत. विक्रिया ऋद्धीने ते शरीराला हवे तसे परिणत करू शकतात. तेच या मुनिंवरील उपसर्ग दूर करू शकतील.” मग पुष्पदंत मुनी आकाशगामिनी विदयेने धरणीभूषण नावाच्या पर्वतावर एका वटवृक्षाखाली जेथे विष्णुकुमार मुनी बसले होते तेथे आले. अजगरांचे फुत्कार आणि अन्य जंगली जनावरांचे आवाज येत होते.  क्षुल्लकजींनी नमस्कार करताच मुनींनी डोळे उघडले. पौर्णिमेच्या चांदण्यात त्यांनी पाहिले, कोणी क्षुल्लकजी या घनदाट जंगलात अवेळी आले आहेत. नक्कीच काही खास गोष्ट असणार. क्षुल्लकजींनी त्यांना मुनिंवरील उपसर्गाची बातमी सांगताच ते म्हणाले, “मग माझ्यापाशी का आलात?” आता यांच्याजवळ एवढ्या ऋद्धी आहेत पण यांना ते माहीतच नव्हते.

क्षुल्लकजींनीच मुनींना त्यांच्याजवळ असलेल्या ऋद्धीबद्दल सांगितले. मग ते पडताळून पाहण्यासाठी मुनींनी आपला हात सरळ केला. तर तो हात पर्वत नद्या समुद्र यांना पार करून मानुषोत्तर पर्वताला जाऊन भिडला. विष्णुकुमार मुनींनी मग सांगितलेकी जर काही कृती केली नाही तर अंतर्मुहुरतापर्यंत हे मुनी मृत होतील. राजा पद्म म्हणाला, “सात दिवसांसाठी मी हे राज्य बली आदि मंत्र्यांना दिले आहे. मी काहीच नाही करू शकत.” विष्णुकुमार मुनी मग तात्काळ हवनस्थळी  पोहोचले. हरिवंश पुराणात थोडी वेगळी गोष्ट आहे आणि उत्तर पुराणात थोडी वेगळी गोष्ट आहे.

विष्णुकुमार मुनींनी एका ब्राम्हण बटूचे रूप धारण केले. भाळावर सुरेख तिलक, डोक्यावर रुळणारी शेंडी, गळ्यात यज्ञोपवित असे सुंदर रूप धारण केलेला तो तेजस्वी ब्राम्हण बटूरुपात  तंबूजवळ  येऊन मधुर आवाजात लयबद्ध ऋचापाठ करू लागला. ते ऐकून तंबूतून बली बाहेर आला. म्हणाला, “हे ब्राम्हण आपण कोण आहात? आजचा दिवस तर माझा ब्राम्हणांना दान देण्याचा  दिवस आहे. काय देऊ तुम्हाला?” ब्राम्हणाने त्याच्याजवळ तीन पावले जमीन मागितली. दान देण्याचाही एक विधी असतो.

नमुची ज्योतिष आचार्य होता. त्याने ओळखले की हा हात कोणापुढे पसरू शकत नाही. असा हात तर दान करणारा असतो. पण बली प्रत्यक्ष प्रमाणाला मानणारा होता. तो म्हणाला, “हाताच्या कंकणाला आरसा कशाला? जर हे हात पसरलेलेच आहेत तर मी जलधारा का सोडू नये?” असे म्हणून बलीने जलधारा सोडण्याचा विधी पूर्ण केला. पाहता पाहता ब्राम्हणाने विशाल रूप धारण केले. म्हणाला, “चल आता, मी तीन पावले जमीन मोजतो. सामर्थ्य असेल तर दे.” त्याचे मस्तक ज्योतीर्पटलाला जाऊन भिडले. एक पाऊल जमिनीसाठी एक पाय मानुषोत्तर पर्वताला जाऊन भिडला. दुसरा पाय सुमेरू पर्वताला जाऊन भिडला. दोन पावलात पूर्ण मनुष्य लोक मोजून घेतले.

“तिसरे पाऊल कोठे ठेऊ?” ब्राम्हणाने विचारले. पाऊल हलू लागले. देवतांमध्ये खळबळ माजली. देवांची आसने कंपायमान झाली. त्यांनी अवधीज्ञानाने जाणलेकी विक्रिया ऋद्धीधारी मुनी बलीवर असंतुष्ट झाले आहेत. जर मुनींची शक्ती प्रकट झाली तर अकाली प्रलय पण होईल. चारणऋद्धीधारी मुनीही तेथे येऊन पोहोचले. विष्णुकुमार मुनींना शांत करण्यासाठी त्यांनी स्तोत्रपठण केले. देवता तीन वीणा घेऊन आल्या. घोषा, महाघोषा आणि सुघोषा या तीन वीणांशिवाय त्यांच्याबरोबर त्यांनी इतरही खूप वाद्ये आणली होती. त्यांनी क्षमेची मधुर गीते गायली. मुनिराज मग शांत झाले. मग देवतांनी बळीला बांधले. बलीने मग मुनिराजांकडे दृष्टी टाकली. हा छोटासा ब्राम्हण वामन नाही तर जैन मुनी आहे. जैन मुनीत एवढी क्षमता? त्याचा अभिमान चूर चूर झाला. विपरीत बुद्धीचे लोकही चमत्कारापुढे नतमस्तक होतात पण तो समोर घडला तरच!

चमत्कार नावाच्या गोष्टीचे अस्तित्व धर्माच्या क्षेत्रात जरूर आहे. मुक्तागिरी क्षेत्रावरचा एक दृष्टांत आहे. आ. शांतीसागर महाराज तेथे आले तेव्हा त्यांच्याबरोबर खूप लोक तेथे गेले. खूपच गर्दी झाली. मुक्तागिरीवर असणारी विहीर त्यावेळी पूर्ण रिकामी होती. पाण्याविना जनता काय करणार? सर्वजण चिंतेत पडले. आचार्यश्रीनी सांगितलेकी विहीर स्वच्छ वस्त्राने झाकून टाका, आणि ते स्वत:टेकडीवर ध्यानस्थ झाले. काही वेळानंतर स्वच्छ पाणी विहिरीतून भरून वाहू लागले.

तर अशा या चमत्कारापुढे बळीही झुकला. म्हणाला, “मी हठाग्रही होतो. माझी बुद्धी भटकत होती. मी तुम्हाला प्रणाम करतो. क्षमा मागतो.” बळीला मग सोडून दिले. त्यानंतर विष्णुकुमार मुनी आपल्या गुरूंकडे गेले. म्हणाले, “काही क्षण मला बळीचा राग आला होता. मला प्रायश्चित्त द्या. धवलाच्या चौथ्या पुस्तकात असा उल्लेख आहेकी, यावेळी मुनी थोड्या काळासाठी पंचम गुणस्थानात आले होते. पण परत लगेचच मूळस्थानी गेले. विष्णुकुमार मुनी तदभव मोक्षगामी होते. ते नंतर मोक्षाला गेले.

या घटनेमध्ये साहित्यकारांनी अगदी शेवटी शेवटी एक मार्मिक गोष्ट सांगितली आहे. या उपसर्गामुळे ज्या मुनींचे कंठ अवरूद्ध झाले होते त्यांच्या गळ्यातून खाली काहीच उतरत नव्हते. त्यादिवशी त्यांना असा आहार दिलाकी त्यामुळे त्यांच्या कंठात जो त्रास होत होता तो दूर झाला. त्यादिवशीच्या आहारात गायीच्या दुधात बनवलेली घृतयुक्त खीर होती. मुनींना आराम वाटला. ज्यांच्याइथे आहार झाला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इतर लोक गेले. अतिशय वात्सल्यपूर्ण वातावरण होते. सगळ्यांच्या हातात ते धागे होते. हा धागा खूप नाजूक असला तरी खूप मजबूत असतो. म्हणून या रक्षणाच्या क्षेत्रात कधीही श्रावकांनी, भक्तांनी  मागे राहू नये.

विष्णुकुमार मुनी प्रणम्य आहेत. कधीही हठाग्रहाने जिनेन्द्र भगवान, त्यांची वाणी, शास्त्र आणि त्यानुसार चालणाऱ्या साधुंप्रती अनादर करू नये. त्यांच्याप्रती श्रद्धा कायम ठेवली तरच धर्म सुरक्षित राहील, कारण धार्मिक जनांच्या हृदयातच धर्म असतो.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.