जैनत्व दर्शन-सात तत्वे – JAINATVA DARSHAN-SAAT TATVE


This article is a translation of the pravachan given by Jain Guru shree Dhyansagarji Maharaj. In this Pravachan Maharaj tells us about seven principles in Jain darshan.

जीव, अजीव, आस्त्रव, संवर, बंध, निर्जरा आणि मोक्ष ही जैन दर्शनातील सात तत्वे आहेत. यातील जीव म्हणजेच आत्मा. अजीव म्हणजे पुद्गल. शरीर पुद्गल द्रव्य असते. आस्त्रव म्हणजे जीवाकडे कर्म जेथून आकर्षित होतात ते द्वार. या म्हणणारे. संवर म्हणजे नव्याने प्रवेश करणाऱ्या कर्मांना थांबवणे. थांबा म्हणणे. निर्जरा म्हणजे आधीपासून जी कर्मे आत्म्याला चिकटलेली असतात त्यांना जाऊ देणे अथवा थोडे थोडे सुटे करून बाहेर काढणे. बंध म्हणजे अजीव व जीवाचे एकमेकांशी जखडणे. मोक्ष म्हणजे आतल्या सगळ्या कर्मबंधांना मोकळे करून पूर्णत: बाहेर काढणे. पूर्णपणे कर्ममुक्त होणे.   कोणी म्हणतात, शुद्ध भावानेच संवर आणि निर्जरा होते. शुभ भावाने संवर आणि निर्जरा होत नाही. पण हे अर्धसत्य आहे. जयधवला ग्रंथाच्या पृष्ठ चारवर आचार्य वीरसेन स्वामी म्हणतात, “नमस्कार केल्याने जेवढा पुण्यबंध होतो त्याच्या असंख्यात पट पापकर्मांचा क्षय होतो.” सम्यकदृष्टी जीव जेव्हा शुभभाव करतो तेव्हा पुण्यसंचयाबरोबरच पाप निर्जराही होते. जीवनात सगळीकडे विषमता आहे. विनाकारण विषमता असंभव आहे. त्याला निश्चित काही कारण आहे. आपण या संसारात अनेक भवामध्ये भटकतो यालाही काही निश्चित कारण आहे. ते कारण म्हणजे इच्छा, तृष्णा! पाहण्याची, ऐकण्याची, आणखी कशाकशाची!   आपण तेच बघतो जे पहावं वाटतं. इच्छारहित होऊन फक्त पाहण्याचा अभ्यास केला आणि जर अभ्यास करता करता निराकुल झालात तर कळेल की पाहण्याची, ऐकण्याची ही इच्छाच दु:खदायी आहे. जवळ उपलब्ध असलेल्या गोष्टींची आपण इच्छा नाही करत. कारण त्यावेळी इच्छा पूर्ण झालेली असते. कधी कधी इच्छापूर्ती झाल्यानंतरही काही काळानंतर परत परत इच्छा उत्पन्न होते. तेव्हा इच्छा खऱ्या अर्थाने पूर्ण झालेली नसते.   जैन तत्वज्ञान हे जीवसिद्धांत व कर्मसिद्धांत यांचे मिळून बनलेले आहे. जैन दर्शनात जिनवाणी ही साक्षात भगवतवाणी, माता सरस्वती आहे. षटखंडागमात कर्मांच्या सूक्ष्म अंगाचं गणित आहे. आज आपण जे करतो ते म्हणजे कर्म. त्या कर्मांचा परिणाम केव्हा कसा होईल याचेही सूक्ष्म गणित त्यात आहे. हे पाहून काही अजैन लोकही म्हणतात, एवढं सूक्ष्म गणित माणसाच्या डोक्यातून निर्माण होणार नाही. ते जाणणारा सांगणारा कोणी केवलीच असला पाहिजे.   कार्यपूर्ती मग ती संसारातल्या गोष्टींची असो किंवा धर्माच्या क्षेत्रातली असो त्यासाठी त्या कार्यात रुची असणे आवश्यक आहे. जो सुखातच आहे, ज्याच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत तो कशाला पुरुषार्थ करेल? संकटातच खऱ्या अर्थाने पुरुषार्थ करावा लागतो. जीवाची परीक्षा संकटात असताना, विपत्ती आल्यावरच होते. त्याचप्रमाणे संपत्ती जवळ आल्यावर माणसाचे आचरण कसे असते यावरही त्याची परीक्षा अवलंबून असते. विपत्ती आल्यावर माणसाच्या श्रद्धेची, आत्मबलाची परीक्षा होते. कठोर  संकटातही ज्याची धर्मावर, आत्म्यावर, णमोकार मंत्रावर  श्रद्धा असते तोच विपत्तीला निष्प्रभ करू शकतो. श्रद्धा डळमळीत असू नये. पण दु:खाप्रमाणेच सुखात असतानाही श्रद्धा दृढ असेल तर ती खरी श्रद्धा!   पालीताना येथे एक दिगंबर जैन मंदिर आहे. तिथले पंडितजी जगन्मोहनशास्त्री एकदा पूजा करीत होते. त्यावेळी दर्शनासाठी एक दाम्पत्य आले होते. त्या दाम्पत्याचा संवाद त्यांच्या कानावर पडला. त्यातल्या पत्नीचे वाक्य ऐकून त्यांनी पूजा करणे थांबवले. कोणते ते वाक्य? तर त्यातली पत्नी म्हणाली, “ही मूर्ती खरोखरच भगवंताची वाटते. हे खरे भगवान आहेत. या छबीच्या दर्शनाने जी शांती लाभली ती यापूर्वी कधीच लाभली नव्हती.” त्यावेळी पंडितजींनी त्यांच्याशी संवाद साधला. “आपण कोठून आलात?” “आम्ही बंगाल प्रांतातून आलो.” “मग तिथल्या कालीमाईची मूर्ती बघून तुम्हाला काय वाटतं?” “मी कालीमाईकडे कधीच जात नाही. तिथला रक्तपात बघून मला ते मंदिर नाहीतर कत्तलखाना वाटतो.” पत्नीम्हणाली. त्यावेळी पंडितजींनी विचार केलाकी त्या अजैन दाम्पत्याला नक्कीच सम्यग्दर्शन झालेले असणार.   बाहय सम्यग्दर्शन केव्हा केव्हा होते याचीही जैनदर्शनात कारणे सांगितली आहेत. जेव्हा जिनबिंबाचे दर्शन होते तेव्हा किंवा एखाद्याला पूर्वभवातले जातीस्मरण होते तेव्हा त्याला सम्यग्दर्शन होते. जेव्हा नरक गतीत तीव्र वेदना होतात आणि पूर्वजन्मात ऐकलेला उपदेश आठवतो व तो उपदेश खरा होता हे जाणवते तेव्हापण सम्यग्दर्शन होते, तेव्हा त्यांना  आपल्यापेक्षा मोठ्या देवांचे वैभव पाहून असे वाटतेकी सगळ्यांनाच असे वैभव का मिळत नाही? तेव्हा त्यांना जाणवतेकी नक्कीच त्या देवांना रत्नत्रय प्राप्ती झालेली असणार.

एक व्यसनी माणूस होता. त्याने खूप हिंसाचार, अनाचार केले. स्वर्ग, नरक सगळं खोटं आहे. तो एकदा शिखरजीच्या वंदनेला गेला. तिथल्या चरणपादुकांचे दर्शन घेताच त्याच्या मनाला जी अपूर्व शांती लाभली ते जाणवून त्याला कबूल करावं लागलंकी स्वर्ग आहे आणि नरकपण आहे त्याला त्यावेळी जे जाणवलं ते सम्यग्दर्शन! पंडित जिनेन्द्रवर्णी हे मोठे शास्त्रज्ञ होते. स्वर्गनरकाची चर्चा करताना ते म्हणाले, “मनुष्यगती असो वा पशुगती असो त्यात माणसाला सर्वथा सुख किंवा सर्वथा दु:ख कधीच लाभत नाही. त्यांना सुख आणि दु:ख दोन्हीही भोगायला लागतात. पण नरकामध्ये माणसाला थोडंही सुख लाभत नाही. नरकगतीत जाणारा घोर पापी हिंसाचारी असतो. विज्ञान म्हणतेकी कोणत्याही क्रियेची प्रतिक्रिया असतेच. मग पाप केल्यावर त्याची प्रतिक्रिया होणारच. जो मनुष्य सतत चांगलं काम करतो, स्वत: कष्ट करून दुसऱ्यांचे हित साधतो त्यालाच स्वर्ग मिळतो. क्रिया चांगली असेल तर प्रतिक्रियाही चांगलीच असते. स्वर्गाची कल्पना आपल्याला पटत नाही म्हणून स्वर्ग नाहीच असं मानण, त्याला नकार देणं बुद्धीमंताला शोभत नाही. जोपर्यंत स्वर्ग नरक नाही असं तो सिद्ध करू शकत नाही तोपर्यंत हवे तर  त्याने आपला  निर्णय पेंडिंग ठेवावा. जिनबिंबाचे दर्शन होताच अपूर्व शांती लाभते. जिन मंदिरातील जिनबिंब म्हणजे चैत्यप्रतिमा असते. त्या प्रतिमेची प्राणप्रतिष्ठा करताना सूरीमंत्राचा उपयोग केला जातो. हा सूरीमंत्र आठ बीजाक्षरांचा आहे. सूरी याचा अर्थ निर्ग्रंथ आचार्य. सूरीमंत्र हा अदभूत मंत्र आहे. विधीवत, योग्य उच्चारणासहित, भावसहित खऱ्या साधूने सूरीमंत्राने प्रतिष्ठित केलेली प्रतिमा सप्राण बनू शकते. ती फक्त आकारमय रहात नाही. सत्यार्थप्रकाश या ग्रंथात स्वामी दयानंद सरस्वती म्हणतात, मूर्तीपूजा, दर्शन ही श्रमण म्हणजेच जैन परंपरा आहे. जिनेन्द्रप्रभूंच्या दर्शनाला येताना मनाच्या पूर्ण तयारीनिशी बाहेर पडावे. मंदिरात येताना चिंता, परिषह बाहेरच ठेवावेत. मी एकटा आहे असा भाव ठेवूनच प्रवेश करावा. भगवंताची भक्ती भय अथवा प्रलोभनाने केलेली असेल तर ती निष्काम नसते. निस्वार्थ भक्ती म्हणजे गुणानुराग! वादिराज मुनी म्हणतात, “जर कोणाजवळ शुद्ध ज्ञान आहे, आचरणसुद्धा पवित्र व शुद्ध आहे, पण त्याच्याजवळ भगवंताप्रती भक्ती नाही तर त्या भक्तीच्या किल्लीशिवाय मोक्षाच्या द्वारावर लावलेलं कुलूप उघडणारच नाही.” भक्तीलाच सम्यकत्व म्हटलेले आहे. जिनबिंबाप्रती भक्तीच नसेल तर दर्शनाची इच्छा कशी होणार? भक्तीमध्ये तर्कणा नाही, याचना नाही, भक्ती अर्पित आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.