वॉटसप वरचा एक तास –
लिहिणारा – बाजीराव दांडगे
इयत्ता – चवथी
तुकडी – ड
काल माय बाजारात मासळी इकाया गेलती. तवा ती तिचा मवाइल इसरून गेलि. मी मंग चान्स घेतलाच. गेलो लगीच वाटसापावरी. तितं मायंदाळ गटबाजी व्हति.
एक गट व्हता, म्हायारची मानसं . दुसरा गट व्हता, साळंतली दोस्त मंडळी. तिसरा गट व्हता, सासारचा वाडा. चवथा गट व्हता, मासळी बाजारातलं गिऱ्हाइक. आणि मंग असंच कायबाय चार-पाच गट व्हते.
टिंग टिंग घंटी वाजल्यान की हिरवा रंग दिसयचं. मंग मीबी तसा लई हुश्शार! लगीच मी तत बोट दाबायचो. मग आसं व्हायाचकी, तेनी लिवलेलं मला दिसाया लागायचं. मलाबी येतं आता वाचाय म्हनुनशान बरं झालं .
मायच्या म्हायारची मानसं तिला आक्के म्हणत्यात. आक्कीला मंग तितं लई सांगावे व्हते. जसंकी …आक्कॆ, तुज्याकडे सोन्याच्या बुगड्या करायला वळेसर दिल्याला चार म्हैने झाले. सोनं बी तिकडंच आन बुगड्याबी! काय केलंस ग मह्या सोन्याचं ? मोडून खाल्ल्यास की काय?
मामानं इचारलं व्हतं की, आक्की, मासळी इकून काय संसार करतीस गं? हकडे ये. तुज्या नावावर अर्दा गुंठा जिमीन करतू . कायबाय भाजीपाला पिकीव आन कर सन्सर. दाजीलाबी घिवून ये संगट. त्या तुज्या बाज्याला मातुर आनू नगंस. लई खोडील पोर हये. तेला ततच कुटतर होस्टेलात ठीव.
च्यायला त्या मामाची! मज तर टाळकंच उठलं भौ…
पर तेवड्यात परत टिंग टिंग वाजलंकी राव! मंग गेलो मी थेट मासळी बाजारात. एकजन आबाजी म्हणत हुताकी, सुंद्राक्का… ताजी ताजी मासळी आण गं बयो आज. लेक आलीय म्हायेरपनाला. दुसरी एक तानिबाय म्हणत हुती, सुंदे, काल त्यो सोनार अलता आमच्या दारूच्या गुत्त्यात! मला म्हणला, सुंदीच्या बुगड्या तयार हयति.मजुरी नगं पन माशाचं कालवण डब्यात भरून आनाया सांगीतलय तेनी. परत आनी एक त्यो कोण सांताजी व्हता. त्यो आसं म्हनत व्हताकी, सुंदे…. बाजारला आलीस तर ती बैंगन रंगाची पैठण नेसून ये गं बयो! लैच झ्याक दिसती बग तुला!!
मंग आनिक एकदा वाजल्यान की परत टिंग टिंग… सासारच्या वाड्यातं ! ततली एक सोना म्हतारी म्हणत व्हती की ,सुंदरा, सासारला सासारला यवुन किती दिस झालंगं? जी गेलीस ती तकडच उलथलीस… इकडला पाऊस पानी न्हाय. हिरीतला गाळ काडायला तुजा आज्जेसासरा मजुरीवर चाललाय. आन तू तिकड मासळी इकूनशान मोटी गबर झालीस गं… हकड यीवून हितलं हालहवाल बगून जा, असं म्या तुला सांगती हाय . याचं का न्हाय ते तुजं तू ठरीव.
मंग आनी परत यकदा टिंग फिंग वाजलंच किवो राव… आन मंग दिसलीकी साळंतली दोस्त मंडळी!! एक दोस्त हनमू म्हणत व्हताकी, सुंद्रा, तू म्हायारला कंदी यनार हैस? मासळी बाजारात तुजा लई वट हाये असं सगळीजण बोलत्यात . मलाबी तत एक टपरी मिळतीका ते बग. तुज्या धन्याचा कुटे वशिला लावता इतोका ते बग. आपण दोगे शाळेतले मैतर . तू मला निबंद लिवून द्याचीस आन मी तुला हिशेब शिकवायचो.. ध्येनात हाये न्हवं? म्हनून तर आता मासळी बाजारात दुकान चालावतीस…
मंग एक दुसरी मैतरिन मैना! ती मनत व्हती की, सुन्दा, तू यकलीच गं माजी जिवाभावाची मैतरीन! सुकदुक तुलाच सांगायचे मी समदा. पुडच्या म्हैन्यत गावाची जत्रा हाय. येशिल का सुन्दा तू ? तुजी लै मंजी लैच सय यती बग मला. तू आलीस की मंग पुन्यांदा जत्रेत फिरू. पाळण्यात बसू. गारेगार खाऊ. बांगड्या माळा आंगठ्या खरीदी करू. हिते जास्त काय बोलता येत न्हाय. तू प्रेत्यक्शच येगं.
परत तेवड्यात परत टिंग फिंग … मला तर लैच मज्जा येत व्हती राव…कोन व्हता बर त्यो… काय तर नाव व्हतं… विंग्लिशमंदी! ते मला काय नीट कळलाच न्हाय. आन तेवड्यात मायचा आवाज आला. माय आली व्हती बाजारातन… ती आरडत व्हती, ये बाज्या, माजा मवाइल कुटे ठिवलास रे? माज्या मवाइल बरुबर तू काल खेळत बसला व्हतास! देतोस का न्हाय?
मंग मी घाबारलोकी राव! पटकिन मवाइल बंद केला आन बसलो तोंडाम्होर अबयासाचं पुस्तक घिवून…