कथा फुलांच्या हा सौ. सुनेत्रा नकाते यांचा बाल कुमारांसाठी लिहिलेला कथा संग्रह. या कथा फ्यानटसी या प्रकारात मोडतात.
पुष्प सुंदरी सदाफुली या कथेत फुलांच्या जगतातील सौंदर्य स्पर्धा नाट्यमय रित्या साकार झालेली आहे. काबाड कष्ट करूनही चेहऱ्यावरचे हास्य कधीही मावळू न देणारी सदाफुली शेवटी पुष्प सुंदरीचा मुकुट पटकावते.
प्राजक्ताच्या छत्र्या या कथेत आळशी कामचुकार पऱ्या व कष्टाळू मुंग्या आपल्याला भेटतात. पऱ्यांच्या छत्र्यांची शेवटी प्राजक्ताची फुले बनतात.
वीरबाला गुलमोहोर या कथेत अहिंसा प्रिय राजाची कोमल हृदयाची पण कणखर व खंबीर मनाची राजकन्या गुल आपल्याला भेटते.
मुग्ध-मधुर जुई या कथेत मंदिरातील पुजारी बाबांची सात्विक वृत्तीची पण स्वप्नाळू मुलगी जुई भेटते. मंदिरातले यक्ष- यक्षिणी तिला वृद्ध जोडप्याच्या रूपात भेटतात.
चंद्र तनया रातराणी या कथेत सौर मंडळातील सूर्य चंद्र व पृथ्वी भेटते. पृथ्वीच्या भावाच्या म्हणजेच चंद्राच्या मुली चांदण्या भेटतात. या चांदण्यांचीच शेवटी रातराणीची फुले बनतात. सदाबहार सदाफुली या कथेत आपल्या बागेवर अपत्यवत प्रेम करणारे माळी बाबा व त्यांच्या तीन मुली भेटतात. तृष्णेच्या किड्याने धाकट्या मुलीच्या मनात घडवून आणलेला बिघाड व सरतेशेवटी तिला गवसलेले सुखी समाधानी आयुष्याचे रहस्य आपल्यालाही गवसते.
शापित जलपऱ्या या कथेत जलपऱ्यांची राणी व तिच्या पद्मा व सोमा या दोन मुली भेटतात. क्षणैक मोहाला बळी पडल्याने त्यांचे कमलिनी व कुमुदिनी या फुलांत रुपांतर होते.
कुंपणावरची कोरांटी या कथेत वनपऱ्या जलपऱ्या व आकाशपऱ्या भेटतात. साध्या सरळ मनाच्या वनपऱ्या जलपरीच्या महालातले सरबताचे रिकामे चषक चोरतात आणि त्यामुळे त्यांचे रुपांतर कुंपणावरच्या कोरांटीमध्ये होते.
जपाकुसुमेचे कुंडल या कथेत बर्फाच्या घरात राहणाऱ्या एकाकी आजीबाई व त्यांची मानस कन्या जपा भेटते. तिचे रुपांतर शेवटी जास्वंदीच्या फुलात होते.
फुलराण्यांची गोष्ट या कथेत अग्निज्वाला, तिचा मुलगा अग्निपुत्र व त्याच्या दोन बायका सहस्त्रपंखी व गुलाबी भेटतात. दोघींच्या त्यागामुळे शेवटी सासू बाईंचा राग रुपी अग्नी शेवटी पश्चातापाच्या अश्रूत रुपांतरीत होतो.