मोक्षोपयोगी ध्यान – MOKSHOPAYOGI DHYAAN


This pravachan is  translation of a pravachan given by jain guru dhyansagarji maharaj. In this pravachan maharaj tells us about the things which are necessary for Mokshopayogi dhyaan.

अलीकडे समाजाच्या सर्वच स्तरातील लोकांना ध्यानाचे महत्व पटू लागले आहे. पॉन्डीचेरी येथे एक ध्यानकेंद्र निर्माण केले आहे. ध्यानकेंद्राची जागा वलयांकित आहे. मध्यभागी एक स्फटिक आहे. पण वास्तविक पाहता ध्यानाचा असा कोणताही विधी नसतो. वास्तविक ध्यान असे असतेकी त्याला स्पर्श करणारा जगातल्या दुसऱ्या कोणत्याही वस्तूला पसंत करत नाही.

जैन आचरणपद्धती अनुसरणारा सर्वच ठिकाणी सारखेच आचरण करतो. स्वत:च्या पवित्रतेसंबंधी त्याचे ध्यान फक्त मंदिरापुरते सीमित नसते. साधुत्वाला आवश्यक असणारा समताभाव निर्माण होण्यासाठी ध्यानाची आवश्यकता असते. यासाठी ध्यानाला साधक व बाधक गोष्टी विचारात घ्याव्या लागतील. ध्यानासाठी सुरभिमुद्रा फायदेशीर आहे. सुरभीमुद्रेने वात, पित्त व कफाचे संतुलन होते. सुरभी म्हणजे कामधेनू. याचे वर्णन जैन व अन्य ग्रंथातही सापडते.

 पाच पांडव जेव्हा परित्याग करून शत्रुंजय गिरीवर गेले तेव्हा त्यांनी तप:साधनेस प्रारंभ केला. यावेळी दुर्योधनाचा भाचा जो सूड भावनेने पेटला होता, त्याने लोखंडाचे दागिने तापवून ते पांडवांच्या अंगावर घातले. पण हा उपसर्ग या साधूंनी समतापूर्वक सहन केला. यावेळी तीन पांडव म्हणजे, युधिष्ठीर, भीम व अर्जुन सर्व कर्मांना भस्मसात करून निर्वाण पदास प्राप्त झाले. नकुल व सहदेव निर्वाणपदाच्या निकट स्थितीला जाऊन पोहोचले. समताभाव म्हणजे रागद्वेषरहित भाव; असा भाव की जर कोणी वाईट केले तरी राग नाही. कोणी भले केले  तरी लोभ नाही. जेव्हा आपल्या तीव्र पापांचा उदय होतो तेव्हा देवताही साहय करीत नाहीत.

 जग आणि संसार एक नाहीत. चारी गतीत भटकण्याचे नाव संसार आहे. प्रत्येकाचा संसार वेगळा असतो. छलकपट करणाऱ्यांना पशुगती प्राप्त होते. नामकर्माच्या उदयाने प्राण्याला आकार व रूप प्राप्त होते. ते कर्मोदयाचे फळ असते. आत्मकल्याण अंतिमसमयी साधायचे नसून त्या आधीच साधायचे असते. कारण अंतिमसमयी तर आपले शरीरही आपल्याला साथ देत नाही. मिळालेले अनमोल जीवन इंद्रियसुखात बरबाद करण्यासाठी नाही. त्यागाने आत्म्याला उज्वल करण्यासाठी आहे. क्षणभंगुर जीवनात सारयुक्त धर्मच आहे. प्रेम पावित्र्यावर करायचे असते. हाच विचार पांडवांनी केला व आपल्यावरील उपसर्ग समतापुर्वक सहन केला. जीव निश्चयाने एकटा असतो हे त्यांनी जाणले होते आणि म्हणूनच ते साधनेत शांतीपूर्वक स्थीर राहू शकले.

 मोक्षोपयोगी ध्यानाच्या उत्पत्तीसाठी वैराग्य,तत्वविज्ञान, निर्ग्रंथता, समचित्तता व कष्टसहिष्णुता या पाच गोष्टी आवश्यक आहेत, म्हणजेच साधक आहेत. त्याचप्रमाणे राग, तत्वासंबंधी अज्ञान, सग्रंथता किंवा परिग्रहसहितता, विषमचित्तता, आणि सुविधा म्हणजेच भोगीपण या गोष्टी बाधक आहेत.

 जर ध्यानाची आवड असेल तर गृहस्थ असो वा त्यागी, तो आपल्या लक्ष्याच्या निकट पोहोचू शकतो. काहीवेळा ध्यानाने एकाग्रता येते व शक्ती केंद्रीत झाल्यासारखी वाटते. पण फक्त एवढ्याच क्रियेला ध्यान म्हणता येत नाही. जसे भय किंवा प्रलोभनाने कोणी नतमस्तक झाले तर त्याला भक्ती म्हणता येणार नाही. गुणांच्या प्रती अनुराग निर्माण होऊन जर मस्तक झुकले तरच ती खरी भक्ती होय. अर्धवट ज्ञान पूर्ण अज्ञानापेक्षा धोकादायक असते. जसे वृक्षामध्ये मूळ महत्वपूर्ण असते तसे मानवात मस्तक महत्वपूर्ण असते. त्याचप्रमाणे तपश्चरणात ध्यान महत्वाचे असते.

 जर आपण जबरदस्तीने विचारांना थोपवण्याचा प्रयत्न केला तर ते विचार ज्या विकारांमुळे अंकुरीत झाले होते तो विकार मात्र शिल्लकच राहील. सामायिक ही एक विचाररहित अवस्था आहे. संसारी जीव चोवीस तास मन, वचन, कायेने काहीतरी करतच असतो. काही न करण्याच्या उद्देशाने जो पुढे होतो तोच मोक्षमार्गी होतो. खऱ्या मोक्षमार्गाचा इच्छुक  असे म्हणेलकी, मी आजपर्यंत जो काही होतो ती माझी ओळख मी मिटवून टाकेन. उदा. मला जडलेल्या उपाधी, जसेकी काळा-गोरा, तरुण-वृद्ध, बुद्धिमान-अल्पमती आणि त्याचप्रमाणे भारतीय, महाराष्ट्रीयन, पदवीधर वगैरे सर्व काही मी पुसून टाकेन.

 आत्म्यासंबंधी जाणणे व आत्मा जाणणे यात महदंतर आहे. आत्म्यासंबंधी परिचय वाचून, ऐकून होऊ शकतो पण आत्मा अगम्य आहे. आत्मा सांगण्याची, ऐकण्याची वस्तू नसून अनुभवण्याची गोष्ट आहे. बौद्धिक तर्क-वितर्कांनी संतुष्ट होणाऱ्यांना ध्यानाची आवश्यकता वाटत नाही. त्यांना फक्त भरपूर माहितीची गरज वाटते. त्यांना साधनेचा काही उपयोग आहे असे वाटत नाही. कुणालातरी प्रभावित करणे आणि प्रभावित होणे या दोन्ही कमजोरी आहेत. देव, शास्त्र, गुरूंवर श्रद्धा असेल तर कोणाला प्रभावित करायचे?

 सामान्यत: त्यागी व गृहस्थी हे संसारी जीवांचे दोन भेद मानले जातात. पण खरे पाहता रागी व विरागी हे संसारी जीवांचे दोन भेद आहेत. त्यागी हा रागी असू शकतो व गृहस्थी हा विरागी असू शकतो. आपली युवापिढी धर्मापासून एवढी अलिप्त का झाली? कारण त्यांना खरा धर्म कोणी समजावून सांगत नाही. बाहयपरिस्थितीने अंतरंग न हलणे याला साधना म्हणतात. व्रत म्हणजे काय? संधी मिळूनही पाप करण्याची इच्छा न करणे व्रत होय. जैनत्व साधनाप्रधान आहे. वैराग्यासाठी घरदार सोडण्याची गरज नाही.

 ध्यानात चित्ताला स्थीर ठेवण्यासाठी बारा दिवसांचा अभ्यास करून पहा. ध्यानमुद्रेत बसा आणि मग जर मन भटकत असेल तर त्याला भटकू द्या. ज्या ज्या वस्तुंची त्याला इच्छा आहे त्या त्या ठिकाणी त्याला हवे तेवढे मनसोक्त भटकू द्या. तुम्ही फक्त तटस्थपणे पहात रहा की आपल्या मनाला काय हवंय? मग मनालाही वाटेलकी आपलं भटकणं कोणीतरी पाहतंय. पण जेव्हा मन भटकते तेव्हा फक्त मनालाच भटकू द्या. शरीराला नको. शरीर जर आपली साथ मागत असेल तर त्याला सांगा, ‘हे मना, तू हवा तेवढा भटक पण शरीराची साथ नको मागूस कारण ते तर साधनेत मग्न आहे.’ बारा दिवस पहात रहा.  शरीराला मात्र साधनेत मग्न ठेवा. मनाला हवे तसे भटकू द्या. बारा दिवसानंतर मग मनाला विचारा, “भटकलास  हवे तेवढे? पाहिलेस हवे ते?” मग त्यानंतर मन हळूहळू स्थीर होऊ लागेल.

 धनुष्याची दोरी ताणलेली असेल तरच म्हणजे ते जेव्हा चढवलेले असेल तेव्हाच त्यातून सुटणारा बाण धोकादायक असतो. म्हणूनच मनाला जास्त ताणू नका. शरीराची ध्यानमुद्रा तशीच ठेवा. शरीर ध्यानमुद्रेत असेल तर मन काय करेल?

 आपण सर्वजणच पंथवादी आहोत. धर्मवादी नाही. कोणी जैन असतो तर कोणी ब्राम्हण! कोणी हिंदू तर कोणी मुसलमान! कोणी दिगंबर तर कोणी श्वेतांबर! पण कोणी केवळ मनुष्य का असू शकत नाही?

पंथाला कवटाळून बसणारा माणूस संकुचित असतो. अध्यात्माला स्पर्श करणारा माणूस पंथवादी असूच शकणार नाही. जैनत्व सांगते, सर्वांवर प्रेम करा, प्राणीमात्रांवर प्रेम करा पण आपण तर माणसांवरही प्रेम करू शकत नाही. आत्मस्तुतीसाठी  धडपडणारा फक्त माणूसच असतो. जो घोडा रेसकोर्सवर जिंकतो त्याला का आनंद होतो? आनंद होतो त्याच्या मालकाला! स्पर्धा फक्त माणसांचीच असते. तीच त्याला अशांत बनवते. केवळ माणसाचं मन असं असतकी जे पराकोटीचं शांतही होऊ शकतं आणि पराकोटीचं अशांतही!

 मनाला शांत ठेवायचं तर त्याला आधी स्थीर ठेवावं लागेल. त्यासाठीच ध्यानाची आवश्यकता असते. मात्र त्यासाठी मनातल्या संघर्षापासून दूर पळायचं नसून त्याला संपवायचं आहे. वाईट इच्छांना थोडावेळ टाळले अत्र त्या टळू शकतात. कोणी विचारतात, “वाईट इच्छा टाळल्या तरी त्या परत परत येतात. तेव्हा काय करायचे?” तर त्याचे उत्तर असे आहेकी, वाईट इच्छा परत परत आल्या तर त्यांना परत परत टाळा. टाळण्याचा सराव करा. हीच खरी तपस्या आहे. तीच तुम्हाला ध्यानात स्थीर करेल.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.