This article is translation of pravachan given by Jain Guru Dhyansagaraji maharaj. In this pravachan maharaj tells us about art of dying. In jain philosophy art of dying is as important as art of living.
सल्लेखना प्रवचन- कैवल्य चांदणे -जिव्हाळा प्रकाशन पहिली आवृती – ९ .४.२००५
मूळ हिंदी प्रवचने – क्षु . १०५ श्री. ध्यानसागरजी महाराज
शब्दांकन व मराठी अनुवाद- सौ.सुनेत्रा नकाते
मनुष्य जन्माच्या अंतापर्यंत जो तप करीत नाही ती संसार भ्रमणातून मुक्त होऊ शकत नाही. जगण्याची कला शिकवणारे खूप होऊन गेले, पण मरण्याची कला शिकवणारे एकमात्र जिनेंद्र प्रभू होत. ज्याने जीवनाच्या प्रत्येक क्षणात मरण्याची कला आत्मसात केली तो जीवनाचा प्रत्येक क्षण जगला. सल्लेखना म्हणजे सत+लेखना. लेखना म्हणजे कमी करणे. सतलेखना म्हणजे सम्यक प्रकारे समिचीन विधीने कमी करणे. अंतरंग सल्लेखना व बहिरंग सल्लेखना हे सल्लेखनेचे दोन प्रकार आहेत. ज्यात विकारी भावांना कमी केले जाते ती अंतरंग सल्लेखना अथवा कषाय सल्लेखना होय. रागांना सोडण्यासाठी विरागतापूर्वक शरीराला कृश करणे म्हणजे बहिरंग सल्लेखना होय. शरीराला कृश का करावे? सर्वार्थसिद्धी ग्रंथात आचार्य पूज्यपाद स्वामी म्हणतात, मरणरुपी अंत उपस्थित झाल्यावर सल्लेखनेचे प्रीतिपूर्वक सेवन करायला हवे. तिचा उत्साहपूर्वक अंगीकार करायला हवा.
सल्लेखना आत्महत्या का नाही? आत्महत्या करणारा आवेशपूर्ण असतो. सल्लेखनाधारी शांत असतो. तो कषाय भाव धारण करीत नाही. जसे आपण आग लागल्यावर प्रथम आग विझवण्याचा प्रयत्न करतो. पण जर ते अवघड, अशक्य असेल तर सर्व प्रथम आपण त्यातील मौल्यवान वस्तू वाचवण्याचा प्रयत्न करतो. अशाच प्रकारे खरा व्रती मृत्यूची इच्छा करत नाही. पण जेव्हा त्याला कलतेकी मरण निकट आहे, अटळ आहे तर उपचारात ध्यान लाऊन कर्मबंध करणे ठीक नाही. अशावेळी व्रती सल्लेखना व्रताचा अंगीकार करतो. मरण अटळ आहे हे जाणून शांतीपूर्वक गमन करण्यासाठी तो सल्लेखना घेतो. अशावेळी शरीराला वाचवण्यापेक्षा तो व्रतांना वाचवणे योग्य समजतो. क्षपक म्हणजेच सल्लेखना धारकाने अंतिम समयी सतर्क आणि सावधान राहिले पाहिजे. मनुष्य पर्याय परत परत मिळत नाही. मृत्यूसमयी सद्बुद्धी व्हावी यासाठी जीवनभर तयारी करावी लागते. सल्लेखना हि जीवनातील अंतिम परीक्षा असते. आचरणाशिवाय असलेले निव्वळ ज्ञान व्यर्थ आहे. ज्या शरीराला रागपूर्वक पुष्ट केलेले असते त्याला विरागतापूर्वक कृश करायला हवे. आपले शरीर आपला यथार्थ जीवनसाथी आहे.
आचार्य विनोबा भावे यांच्या प्रेरणेने जैन धर्मियांमधील विविध पंथांच्या आचार्यांनी सर्व जैन धर्मियांना उपयुक्त ठरेल अशा ‘समणसुत्तम’ या ग्रंथाची रचना केली. त्याला सूत्रबद्ध केले. त्यातील सल्लेखना सूत्र वाचून आ. विनोबांनी अंतिम साधना हा लेख लिहिला. त्यात आ. विनोबा म्हणतात, “मी सहजतेने प्राण त्यागू इच्छितो. सर्वांप्रती क्षमा इच्छितो. माझा सगळ्यांप्रती मैत्रीभाव आहे.” आचार्य विनोबांनी अंतिम समयी सल्लेखनेचा अंगीकार केला. त्यावेळी त्यांच्या भेटीसाठी पंतप्रधान इंदिरा गांधी गेल्या होत्या. साधनेच्या विशुद्धीने मरणाचा पूर्वाभास होऊ शकतो. आचार्य शांतीसागर महाराजांना ब्रम्हचर्याची दीक्षा देणारे श्री सिद्धाप्पा स्वामी यांनी आपली मरणतिथी आणि मरणवेळ निश्चित सांगितली होती.
आत्महत्या व सल्लेखना हे दोन्ही मृत्यूच; पण दोन्हीत खूप अंतर आहे. मरणाच्या वेळी जी भावना असते त्यामुळे मरण्यामरण्यातही फरक असतो. युद्धात मरणे ही आत्महत्या नसून वीरमरण आहे. आत्महत्या हे भ्याडाचे मरण आहे. जीवनातल्या संकटांना घाबरून भ्याड माणूस आत्महत्या करतो. तो जीवनाप्रती निराश होतो. मृत्यूला बोलावतो. सल्लेखनाधारी जीवनाप्रती वैराग्य धारण करतो. तो शांत राहण्याची तयारी करतो. त्याला मृत्यू निकट आहे हे माहित झाल्यावर तो मरणाचे स्वागत करतो. तटस्थ राहतो. अंतिम समयीसुद्धा त्याच्या मुखावर प्रसन्नता असते. आत्महत्या आवेशाने केली जाते. सल्लेखना मात्र आवेशाच्या अभावातच होऊ शकते. कृतीत आवेश असेल तर ती हिंसा असते. आवेश नसेल तर ती अहिंसा असते. आत्महत्येत असणारा आवेश, तीव्रता हा जीवाचा स्वभाव नाही. सल्लेखना हा आवेश सोडण्याचा सतपरिणाम असतो. सल्लेखनाधारी वीर असतो. तो सल्लेखनेला आपल्या यात्रेचा पडाव समजतो. उपसंहार नाही. अंत नाही. मोक्षमार्गावर तो असाच पुढे चालत राहील असे मानतो. आत्महत्या करणारा स्वत:चा सर्वनाश इच्छितो पण सल्लेखनाधारी असे मानतोकी मृत्यू हे तर द्वार आहे. तो नवजीवन इच्छितो. आत्महत्या ही दुर्घटना आहे तर सल्लेखना ही दुर्लभ घटना आहे.
णमोकर महामंत्र पवित्र आहे. पवित्र मंत्र पवित्र मुखानेच बाहेर येतो. जीवनभर अपशब्द बोलणारा अंतिमसमयी णमोकर कसे बोलणार? जिव्हेच्या स्वादासाठी ज्या मुखाने अभक्ष्य खाल्ले त्या मुखातून णमोकार कसा बाहेर येईल? ज्या मुखाने गुरूंची निंदा केली त्या मुखातून गुरुवंदना अंतर्भूत असणारा णमोकार कसा बाहेर येईल? पुण्याची नशा पापाच्या उदयापेक्षाही वाईट असते. ज्याने कोणालाही छळले नाही त्याला मृत्यू तरी कसा छळेल? सरळ मनुष्याचा अंत सरळ सुखद असतो तर कपटी मनुष्याचा अंत दु:खद असतो. समाधी म्हणजे धर्मध्यान अथवा शुक्ल ध्यान. शुक्लध्यान करीत साधलेले मरण म्हणजे समाधी मरण. च्यूत मरण, चावित मरण व व्यक्त मरण हे मरणाचे प्रकार आहेत. च्यूतमरण म्हणजे मरण आलेकी मरणे. चावित मरण म्हणजे जाणूनबुजून मरणे. व्यक्त मरण म्हणजे त्यागपूर्वक मरणे. यात आणखी उपभेदही आहेत. बालबाल मरण, बालमरण, बालपंडित मरण, पंडितमरण आणि पंडितपंडित मरण असे ते आहेत. पंडितपंडित मरण म्हणजे महानिर्वाण अथवा मोक्षपद होय.
रत्नकरंडक श्रावकाचारातील एका प्रकरणातील १२२ व्या काव्याचा काव्यार्थ असा, ‘उपसर्ग झाल्यावर, देव मनुष्य तीर्यंच यांच्याद्वारे पीडीत झाल्यावर त्या उपद्रवसमयी आपल्या चारित्र्य रक्षणासाठी, शरीर रक्षण गौण समजून शरीर विसर्जित करणे म्हणजे सल्लेखना होय. उदा. दुष्काळ वगैरे नैसर्गिक आपत्तीत, शरीराच्या जराजर्जर अवस्थेत, वृद्धापकाळात, असाध्य व्याधी झाल्यावर, धर्म रक्षणासाठी, व्रते सुरक्षित ठेवण्यासाठी व्रती सल्लेखना धारण करतो.
अंतिम क्रियेतील क्रियारुपी आधाराला तपस्येचे फल सांगितले आहे. अष्टपाहूड ग्रंथात आचार्य कुंद्कुंददेव म्हणतात, ‘जोपर्यंत शरीर कुटीत वृद्धत्व आले नाही, बुद्धी व्यवस्थित आहे तोपर्यंत म्हणजे त्याआधीच आत्म्याचे कल्याण करा.’ आग लागल्यावर पाण्यासाठी विहीर खोदणे व्यर्थ आहे. समाधीमरण प्रक्रिया कशी साधावी? सल्लेखना धारण करण्यासाठी सर्व प्रथम मन:शुद्धी करावी. पहिल्या पायरीत ज्यांच्या प्रती स्नेहभाव आहे त्या स्नेहालाही सोडावे. वैरसुद्धा सोडावे. कारण मनुष्य वैर स्नेह या दोन्हीतही जगात असतो. साथी-सोबती यांनाही सोडावे. ज्यांच्याबरोबर जीवन घालवले त्यांच्यापासून दूर व्हावे. गुरुसान्निध्यात अथवा तीर्थक्षेत्री जावे. या साऱ्याने मनाची शुद्धी होईल. शुद्ध मनाने जमीन, स्थावर मालमत्ता, पशूधन, सोने-चांदी आदी बहिरंग परिग्रहाचा त्याग करावा. क्रोध, मान, माया, लोभ या अंतरंग कषायांचाही त्याग करावा. कारण हेच तर खरे शत्रू आहेत.
दुसऱ्या पायरीत स्वजनांना व परिजनांना क्षमा करावी. मधुर वचनांनी क्षमा करावी. गुरूंची निवड करताना निर्यापक गुरूंची निवड करावी. गुरु चरणांजवळ जाऊन, निश्चल होऊन, काहीही न लपवता बालकांप्रमाणे सर्व दुष्प्रवृतींचे निवेदन करावे. अश्रू आले तर येऊदेत. पाप प्रकटीकरणासाठी अश्रूविमोचन आवश्यक आहे. आपले अपराध प्रकट करणे हा प्रायश्चित्त करण्याचा एक चतुर्थांश हिस्सा आहे. दृष्टी, वाणी, मन यांनी कुठली पापे केली, दुसऱ्यांकडून कुठली पापे करवली, दुसऱ्यांनी पापे केली तेव्हा मी कधी खूष झालो त्यासंबंधी आलोचना प्रकट करावी. गुरूंना म्हणावे, “मला पाच पापांचा आजीवन त्याग करायचा आहे. आशीर्वाद द्या.”
आचार्य म्हणतात, ‘जिनवाणीरुपी अमृताने मनाला आनंदीत ठेवा. शोक नष्ट करा. इष्टजनांना सोडताना शोक होतोच. खूप आधारात सुरक्षेचा भ्रम होतो. मृत्यूसमयी त्या सुरक्षिततेच्या सवयीला धक्का पोहोचतो.’ आपले आत्मस्वरूप अभय आहे. त्याला कोणी क्षती पोहोचवू शकत नाही. त्याला कोणाच्याही सहयोगाची आवश्यकता नाही. स्वत:ला हीन, दीन, असहाय्य समजणे सोडावे. जिनवाणी सांगते, ‘ज्या परिस्थितीने मनस्थिती बिघडते त्या परिस्थितीचा त्याग करावा. बाह्य प्रतिकुलतेला आत न येऊ देण्यासाठी साधना करावी. वियोग समयी रागांची प्रचीती येते. मनातील कलूषीतता काढून टाकावी. सत्व, बल व उत्साह प्रकट करावा.
आनंदीत होऊन, बल प्रकट करून क्रमाने आहार कमी कमी करावा. प्रथम घन आहार हळूहळू कमी करावा. हा एक अभ्यास आहे. अभ्यासाने शरीर मोडणार नाही. स्निग्ध पदार्थ थोडे थोडे वाढवावेत. पेय पदार्थाची मात्रा पहिल्यापेक्षा अधिक करावी. त्यानंतर हळूहळू स्निग्ध पदार्थही कमी करावेत. स्निग्धांश नसलेले पेय जसे लोणी काढलेले ताक, परवलाचे पाणी घ्यावे. त्यानंतर उपवासाच्या माध्यमातून हळूहळू खरपानही ही सोडावे. उपवास-खरपान-उपवास-खरपान……. असा क्रम ठेवावा. अंतिमसमयी उपवासपूर्वक पंचनमस्काराचे पान करावे. प्रयत्नपूर्वक सावधानीपूर्वक शरीराला साधनेत सहाय्यक झाल्याबद्दल धन्यवाद द्यावेत. मन णमोकारात लीन ठेवावे. मुखात बोलण्याची शक्ती नसेल तर ऐकता ऐकता मनाने णमोकारात लीन होऊन शरीर त्याग करावा.
आचार्य पूज्यपाद स्वामी म्हणतात, प्रार्थना अशी करावी; ‘हे जिनेंद्र प्रभू, मी लहानपणापासून आपल्याशिवाय मनाला अन्यथा भटकू दिले नाही. आजपर्यंत या भक्तीबद्दल मी काही मागितले नाही. पण आता मी या भक्तीचे फल मागत आहे. जेव्हा माझा अखेरचा श्वास निघून जाईल तेव्हा माझा कंठ अकुंठीत रहावा. कंठातून तुमचेच नाव बाहेर पडावे. आवाज थांबला तरी मन त्यातच रहावे.
सल्लेखनेचे अतिचार खालीलप्रमाणे आहेत, १-जास्त जगण्याची इच्छा २-लवकर मरण्याची इच्छा ३-माझे काय होईल अशा प्रकारचे भय ४-मित्र-स्मृती, मित्र परिवारास अखेरचे भेटण्याची इच्छा ५-देवपद, सांसारिक सुखे इ. भविष्यसुखांची इच्छा.