This pravachan is translation of pravachan given by Jain Guru Dhyansagaraji maharaj included in Marathi book Kaivalya chandane.
In this pravachan maharaj tells us about true independence.
स्वातंत्र्य दिन नव्वद वर्षे स्वातंत्र्यासाठी लढा देऊन भारत स्वतंत्र झाला. पण आजही प्रत्येक भारतवासी कशाचा तरी गुलामच आहे. सुखोपभोगांचा, वासनांचा तो गुलामच आहे. विख्यात सरोदवादक उस्ताद अमजद अली खान स्वातंत्र्याच्या सुवर्णजयंती प्रसंगी म्हणाले होते, “स्वातंत्र्य मिळून पन्नास वर्षे झाली पण स्वतंत्र भारतात जे पाहण्याची इच्छा होती ते कधीच पहायला मिळाले नाही.” भारताची एवढी दुर्दशा कशामुळे झाली हे सांगताना एक विद्वान म्हणाले होते, ‘भारताच्या आजच्या दुर्दशेचे कारण म्हणजे सध्याची शिक्षण पद्धती आणि न्याय व्यवस्था. जर यात सुधारणा झाली तरच देश सुधारेल.” भारताचे राष्ट्रपती अब्दुल कलाम म्हणाले होते की मुलांना घरातूनच चांगले संस्कार मिळाले पाहिजेत. शाळेतून मुले सुसंस्कारीत होऊन बाहेर पडली पाहिजेत. ते मुलांच्याच विषयी असे का म्हणाले? कारण वय वाढलेल्या व्यक्तीवर पूर्व संस्कार असतात. त्यांच्यावर नवीन संस्कार करणे अवघड असते.
महाभारतातील एक घटना आहे. युधिष्ठीर, अर्जुन, दुर्योधन यांना गुरु द्रोणाचार्यांनी एक पाठ शिकविला. क्रोध आल्यास क्रोधीत न होता क्षमा करावी. पाठ शिकविल्यानंतर त्यांनी सगळ्यांना विचारले, “पाठ सगळ्यांच्या लक्षात आलाका?” त्यावेळी युधिष्ठीर सोडून बाकीचे सर्वजण म्हणाले, ” हो पाठ लक्षात आला. त्यानंतर गुरूंनी दोन-तीन वेळा सांगितल्यानंतरही युधिष्ठीर मात्र पाठ लक्षात आला नाही असेच म्हणत राहिला. तेव्हा गुरू द्रोणाचार्यांनी त्यांना शिक्षा केली व परत विचारले, “आतातरी पाठ लक्षात आला का?” यावर युधिष्ठीर शांतपणे म्हणाला, “हो, आता मला पाठ चांगलाच समजला.” अशा रीतीने ‘क्रोध आल्यास क्रोधीत न होता क्षमा करावी.’ हा गुरूने शिकवलेला पाठ युधिष्ठिराने फक्त कानाने ऐकून लक्षात ठेवला नाही तर तो प्रत्यक्ष आचरणातही आणला. गुरूने शिक्षा केल्यानंतरही आपण शांत राहू शकतोका हे त्याने पाहिले आणि मगच पाठ लक्षात आला असे सांगितले.
जीवांप्रती स्नेहभाव, करुणाभाव हा बालकांचा उपजत स्वभाव असतो. ते त्यांना वेगळे शिकवावे लागत नाही. परंतु क्रूरता मात्र शिकविल्यानेच निर्माण होते. आज क्रूरतेच्या शिक्षणाची व्यवस्था जास्त झालेली आहे. ३ वर्षापासून २१ वर्षापर्यंत दूरदर्शन पाहणारा मुलगा जवळजवळ ७२०० खून पाहतो. मग त्याच्यातली उपजत करूणा का बदलणार नाही?
आचार्यश्री विद्यानंद महाराज म्हणाले होतेकी, “कुठलाही क्रूर प्राणी हा पूर्णपणे क्रूर नसतो. मांजर स्पर्शाला कोमल मुलायम असते पण त्याची शिकारीतील क्रूरता भयानक असते. उंदराला खाल्ल्यानंतर ते रक्ताचे थेंबही चाटते. मांजराच्या पिलाला हिंसेचे शिक्षण आईकडूनच मिळते. असे हिंस्त्र मांजर पण त्याला आपल्या पिलांप्रती स्नेह असतो. आपल्या पिलाला दातात पकडून जेव्हा ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेते तेव्हा ते पिलू थोडाही आवाज करीत नाही. कारण मांजर आपल्या पिलाला ममतेने पकडते. पिलाच्या कोमल त्वचेवर जराही ओरखडा उमटू देत नाही. कारण मांजरा सारख्या हिंस्त्र प्राण्यातही थोडीतरी दया भावना असतेच.
जीवनभर आरोग्यदायी राहण्यासाठी रॉकफेलरने तीन आवश्यक गोष्टी सांगितल्या आहेत. निश्चिन्त रहावे. प्रतिदिन स्वच्छ हवेचे सेवन करावे. नेहमी भुकेपेक्षा थोडे कमी खावे.
जे कृष्णमूर्ती यांच्यामते श्रीमंत लोक धनवान लोक एवढे चिंतातूर असतातकी खुलून हसणे-रडणेही त्यांना जमत नाही. असे चिंतातूर जीवन जगणाऱ्यांना काय स्वतंत्र म्हणायचे? आपल्याबाबत जे काही घडतं त्याला आपणच जबाबदार असतो. आपलं जीवन आनंदी की दु:खी हे ही आपल्यावरच अवलंबून असतं. यासाठी स्वत:मधली करूणा सतत जागृत ठेवली पाहिजे.
जन-गण-मन हे भारतीय राष्ट्रगीत आहे. ते रवींद्रनाथ टागोरांनी रचले. वंदे मातरम हे संस्कृत भाषेतील देशभक्तीपर गीत आहे. बंकिमचंद्र चटर्जी यांनी ते रचले.
जीवनात स्वस्थता हवी असेल तर रोजचा काही वेळ मनापासून धर्मासाठी द्या. रात्री झोपताना चिंतामुक्त होऊन झोपा. झोपताना स्वस्थ संगीत ऐका. असे संगीत की ज्यापासून मनात विकार उत्पन्न होणार नाहीत. संगीतमय भक्तामरस्तोत्र ऐकले तर भक्तीरस उत्पन्न होईल. जैन संस्कृती ही संगीतानेही समृद्ध आहे. शेवटी चौथी गोष्ट म्हणजे चांगले पाहण्याची सवय लावून घ्यावी. एवढ्या चार गोष्टी लक्षात ठेवल्या तर स्वतंत्रता दिवस साजरा केल्यासारखे होईल.