अंतरंगाची सुंदरता – ANTARANGACHI SUNDARTA


 In this article(translation of pravachan) one story is told. In this story readers are get introduced with a Muni(monk) and Apasara(woman who leaves in the heavan). At last a monk get caught in the trap thrown by Apasara.

कैवल्य चांदणे- क्षु. ध्यानसागर महाराज यांच्या हिंदी प्रवचनांचा मराठी अनुवाद
अनुवादक-सुनेत्रा नकाते

अंतरंगाची सुंदरता लाभलेल्यांना बाह्य सौंदर्याचे आकर्षण नसते. रत्नत्रयाने  मंडित  झालेले सुंदरता जाणतात पण तरीसुद्धा सुंदरतेने आकर्षित होत नाहीत. एखादा सुंदरता जाणूच शकत नसेल आणि मग तो आकर्षित नाही झाला तर त्यात काय नवल? सामान्य संसारी जीवांची भरत चक्रवर्तींशी तुलना करणे हास्यास्पद आहे. कारण ते संसारात असूनही विरक्त होते, विदेही होते याला कारण त्यांनी पूर्वभवात कठीण तपस्या केली होती. त्यांची कोणाशी कशी तुलना होऊ शकेल?

गुरुवर्य आचार्यश्री विद्यासागरजी असे सांगतातकी इंद्रियांना जिंकले असे तेव्हाच म्हणा की जेव्हा साखरेने पूर्ण भरलेला चमचा तोंडात घातल्यानंतरपण जसा न तसा बाहेर येईल. रसना-इंद्रिय पूर्ण ताब्यात असेल तर लाळ रसाची निर्मिती कशी होईल?

एक मुनिराज होते. ते तप करीत होते. त्यांचे तप एवढे कठोर होतेकी त्यामुळे इंद्र चिंतीत झाला. त्या मुनिराजांचा तपोभंग करण्यासाठी इंद्राने एका अप्सरेला पाठवले. अप्सरेने त्यांचा तपोभंग करण्याचा खूप प्रयत्न केला पण मुनिराज बधले नाहीत. मग अप्सरा विचारात पडलीकी, मी का बरे मुनिराजांची तपस्या भंग करू शकत नाही? ती त्यांचे निरीक्षण करू लागली. एक दिवस, दोन दिवस असे महिनाभर ती त्यांचे निरीक्षण करू लागली. तिने पाहिलेकी महिन्याभराने मुनी दुसऱ्या स्थानी गेले. तेथे एक वृक्ष होता. त्यांनी त्या वृक्षाच्या मुळाजवळची माती दूर केली आणि त्या मुळाला एकवार जिभेने चाटले. त्यानंतर ते परत पूर्वस्थानी गेले. परत पहिल्याप्रमाणेच साधनेत लीन  झाले. परत महिनाभर खाणे नाही, पिणे नाही, काहीच नाही. तपात परत पूर्वीप्रमाणेच लीन झाले. अशी त्यांची कठोर तप:साधना होती. अप्सरेला वाटलेकी एवढे कठोर तप करणाऱ्याला विचलित करण्याचा काही उपाय असू शकतोका? ती विचारात पडली. तिने मग ठरवलेकी यांच्या रसना इंद्रियाला वश केले तर काही काम होऊ शकेल.

मग ती कामाला लागली. तिने त्या वृक्षाच्या मुळाला अमृत लावले. महिन्याभराने परत मुनिराज तेथे आले. नेहमीप्रमाणेच त्यांनी मुळाला चाटले, पण काहीतरी वेगळे वाटले. तो स्वाद त्यांना पूर्वीपेक्षा खूप निराळा वाटला. त्यानंतर परत पूर्वस्थानी जाऊन त्यांनी तपास प्रारंभ केला. पण तपात व्यग्र असतानाही त्या मुलाचा तो वेगळा स्वाद वारंवार त्यांच्या स्मृतीपटलावर येऊ लागला. मग महिनाभर काही ते थांबू शकले नाहीत.

महिन्याभराच्या आधीच ते परत त्या वृक्षाजवळ आले. त्या मुळाचा त्यांनी स्वाद घेतला. मुळाचा स्वाद खरोखरच खूप वेगळा होता. परत मनात तोच विचार आला. आतातर ते मूळ त्यांना पूर्वीपेक्षाही मधुर वाटले. मग ते त्या वृक्षाजवळ आणखीनच लवकर गेले. मुळाचा स्वाद आणखीनच मधुर वाटला. त्यांचे मग तपस्येत लक्ष लागेना. ते वारंवार त्या वृक्षाजवळ जाऊ लागले. एकदा तर दुसऱ्यादिवशीच ते परत

गेले. मात्र त्यावेळी त्या अप्सरेने मुळावरचे अमृत काढून टाकले होते. मग ते वारंवार त्या मुळाला चाटत राहिले. पण पूर्वीचा तो मधुर स्वाद त्यांना मिळालाच नाही. ते संभ्रमित झाले. तेवढयात आकाशवाणी झाली, “संध्याकाळी ये!”

त्या मधुर स्वादाच्या वेडापायी मुनिराज संध्याकाळी परत आले. पाहतात तर तेथे कोणीच नाही. मग अप्सरा प्रकट झाली. म्हणाली, “त्या वृक्षाच्या मुळापाशी तुम्हाला जे हवं ते नाही मिळणार. ते तर माझ्यापाशी मिळेल.” मुनिराज एवढे कठोर तप करणारे पण रसना-इंद्रियाच्या आहारी गेल्याने मनावर ताबा नाही ठेऊ शकले.

रसना-इंद्रिय आणि स्पर्शना-इंद्रिय यात घनिष्ट संबंध असतो. रसना-इंद्रियाचा भोगी इंद्रियाला ताब्यात ठेऊ शकत नाही. आपल्या आत्म्यात अपार शक्ती असते. पण बरीचशी शक्ती झाकलेली असते. त्यावर आवरण असते. काहीवेळा बाल्यावस्थेत शक्ती प्रकट होते. पण जसजसे वय वाढत जाते तसतसे मन विकारयुक्त होत जाते. त्यावर आवरण पडत जाते. जोपर्यंत मुलाजवळ छल-कपट, राजनीती नसते तोपर्यंत त्याचे मन विशुद्ध असते.

स्वामी विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण परमहंस होते. वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी त्यांनी सांगितलेकी आता माझ्यात ती गोष्ट (सरलता) आली जी माझ्यात बाल्यावस्थेत होती. मनाची अशी विशुद्ध अवस्था प्राप्त होण्यासाठी, सरलता प्राप्त होण्यासाठी आपण सहज होण्याचा अभ्यास केला पाहिजे.

मनाची सहजता प्राप्त होण्यासाठी शरीरानेही प्रयत्न करायला हवेत. जसे चालणे, उपवास, एकाशन, व्रते वगैरे वगैरे. दुसऱ्यांच्या विचाराने आपले कल्याण होत नाही. आपला उद्धार तेव्हाच होतो जेव्हा आपण आपल्या मनातल्या विचारांचे अध्ययन करतो. माझ्यात कोणते विकार आहेत हे जाणण्याचा प्रयत्न करतो. दुसऱ्यांना उपदेश देणे खूप सुलभ असते. त्यात सगळेच पंडित असतात. पण तो उपदेश स्वत: आचरणात आणणारे खूप कमी असतात.

जे विचार, जे भाव आपल्या मनात निर्माण होतात ते भाव म्हणजेच आपली खरी ओळख असते. ते आपले परिचयपत्र असते. मी दु:खी आहेकी सुखी आहे यापेक्षा माझ्या मनात कोणते विकार आहेत हे जाणून घ्यायला हवे. मनाला शुद्ध बनवायचे तर मनातल्या पापांना ओळखा व जिनवाणीच्या मधुर शब्दांनी त्यावर उपाय करा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.