अनूची बहीण – ANUCHI BAHIN (Anu’s Sister)


This story is about two sisters from a Jain family. The sisters love each other deeply. Although they belong to the same family their outlook towards life is quite different. In the end of the story, one of the sisters becomes a Jain sadhvi. The story appeared in the ‘Diwali’ edition (year 2004) of ‘Taraka’ magazine.

तारका – दिवाळी २००४

रात्रीचे नऊ वाजून गेले होते. पपांचं अस्वस्थपणे आत बाहेर फेऱ्या मारणं सुरु होतं. ममा हातात पेपर घेऊन बसली होती खरी पण तिचं सगळं लक्ष बाहेरच होतं. अनूने तिसऱ्यांदा श्वेताच्या घरी फोन लावला होता.
तेवढ्यात… खाडकन फाटक उघडल्याचा आवाज आला. “आली वाटतं!” म्हणत ममा उठून उभी राहिली. अनूने गडबडीने फोन ठेऊन दिला.
“कुठे होतीस इतका वेळ?” पपांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत कृष्णा आल्या आल्या सोफ्यावर आदळली. ढगळ कुरत्याच्या  खिशातून च्युइंगम काढून चघळू लागली. मग मात्र पपांचा पारा चढला. “ही काय  घरी यायची वेळ झाली?” ते म्हणाले.
“श्वेताकडून तर दुपारीच निघाली होतीस ना?”
“येताना मला रोझी भेटली.” टी व्ही चं बटन ऑन करत कृष्णा म्हणाली, “ती निघाली होती चर्चमध्ये! उद्यापासून परीक्षा सुरु होतेयना! ती म्हणाली, चल माझ्या बरोबर! मग गेले तिच्याबरोबर. काही बिघडलका  त्यात ?”

“चर्चमध्ये गेल्याने काही बिघडलं नाही … पण इतका वेळ काय करित होतीस? रात्रीची वेळ! जीव टांगणीला लागतो आमचा.” ममाच्या या बोलण्यावर कृष्णा  म्हणाली, “त्यानंतर  मी पार्लरमध्ये गेले होते. मजा बघायचीय का  तुला?” असं म्हणत डोक्याभोवती गुंडाळलेला रुमाल तिने सोडला आणि मग सगळेच अवाक झाले. कृष्णाचा

तो अवतार पाहून अनुला तर मोठयाने रडावसं वाटलं. पण तसं करायला ती काय कृष्णा थोडीच होती? चेहरा रडवेला करून ती एवढंच म्हणाली, “केस कापलेस? इतके छोटे कशासाठी केलेस?”
घरी-दारी सर्वांच्याच कौतुकाचा विषय असणारे कृष्णाचे केस! लांबसडक, कुरळे कुरळे आणि घनदाट. ते कापून तिने इतके तोकडे केले होते की तिला मुलगी म्हणणं अशक्य वाटत होतं.

“कृष्णा वय वाढलं तुझं पण अक्कल कशी ती वाढली नाही. दिवसभर बाहेर हिंडतेस. वर हे असले उद्योग! उद्या पासून परीक्षा आहे. अभ्यासाची तर काळजीच नाही.” पपांचा स्वर चढला.
“काळजी कशी नाही? त्यासाठीच तर केस कापलेना मी? वेणी घालायला वेळ कुठून आणू?”
“दिवसभर भटकायला वेळ असतो तुला? पण वेणी घालायला तेवढा वेळ नसतो. आणि एवढंच जर होतं तर मी घातली असतीना तुझी वेणी?” ममा वैतागून म्हणाली.

“तू जरी घातली असतीस ना वेणी, तरी तुझ्या वेळेत तुझ्यापुढे बसावच लागलं असताना मला? मला नकोय असला परावलंबीपणा! अशानं स्वातंत्र्य नाहीसं होतं आपलं.”
कृष्णाचं हे बेफिकीर उत्तर ऐकून पपांचा संयम सुटला. ते जवळ जवळ ओरडलेच, “कसलं स्वातंत्र्य आणि कसलं काय? अर्थ कळतो का स्वातंत्र्याचा? आधी बारावी पास हो आणि मग स्वातंत्र्याच्या गोष्टी कर.”

“ही काय पास होणार? शिकली सवरली तर कोणी लग्न तरी करेल! वागणं हे असं! केसांमुळे तरी थोडी बरी दिसायची. पण आता काय? सगळाच  बट्ट्याबोळ!” बोलता बोलता ममाला रडू कोसळलं. तशी कृष्णा ताडकन उठून उभी राहिली.
“इनफ ममा इनफ! खूप ऐकून घेतलं. माझ्या लग्नाची तू नको काळजी करूस. कुणालाही भार होणार नाही मी. ” असं म्हणून दाणदाण पावलं टाकत कृष्णा खोलीत निघून गेली. पाठोपाठ अनूही धावली.

“आल्या आल्या डोकं खाल्लं माझं सगळ्यांनी!” तोकड्या केसातून बोटे फिरवीत कृष्णा म्हणाली.
“पण कृष्णा एवढे सुंदर केस तुझे? तुला कापावेसे वाटलेच कसे?”
“तू म्हणजे ना अगदी वेडी आहेस बघ अनू! या केसांचं काय एवढं घेऊन बसलीस? छान जरी असले तरी मला खूप कटकट व्हायची त्यांची. आता किती मोकळं मोकळं वाटतंय मला!
अनुला वाटलं किती मूर्ख आहे ही कृष्णा! आणि वर मलाच वेडी म्हणते. ती मग थोडीशी चिडूनच म्हणाली,
“स्वत:च्या केसांची कसली आली गं कटकट? आणि त्यामुळे तू खरेच छान दिसायचीस. छान दिसण्यासाठी काही कटकटी सहन केल्या तर काय बिघडलं?”
“हे बघ अनू,फक्त छान दिसण्यापेक्षा स्वत:ला छान वाटणं जास्ती महत्वाचं नाही काय?” मग टेबलावर ठेवलेल्या तिच्या आवडत्या गोमटेश्वराच्या फोटोकडे पहात ती म्हणाली, “अनू, आपल्या गावाकडल्या बस्तीत गेल्या वर्षी मुनीमहाराज आले होते बघ! ते आठवतात का तुला?” “हो, आठवतात की. किती छान प्रवचन द्यायचे ते!”
“ते प्रवचन वगैरे सोडून दे. मला त्यातलं फारसं  कळलं नाही काही! पण त्यांच्याकडे पाहिलं ना, की मला आकाशात विहार करणारे मुक्त पक्षीच आठवतात. वाटतं की हे खरे बंधमुक्त!” बोलता बोलता कृष्णाने कॉटवर पडलेले स्वत:चे कपडे तसेच उचलून कपाटात कोंबले, आणि ती कॉटवर पडली. पाचच मिनिटात घोरायलाही लागली.

 अनू  तशीच बसून राहिली. तिला वाटलं, अशी कशी वागते ही कृष्णा? हवं तसं मनमानी! दिवसभर भटकत राहते. शेजारच्या लहान मुलांबरोबर क्रिकेट खेळते. एकेका रनसाठी त्यांच्याबरोबर तावातावाने भांडते. घरी आलेल्या कुठल्याही वयाच्या व्यक्तीबरोबर, हव्या त्या विषयावर हवा तेवढा  वेळ बोलत बसते; तेही पपांच्या वटारलेल्या डोळ्यांना न जुमानता! कसं जमतं तिला हे सगळं?  पण ममाच्या दृष्टीनेकृष्णाचे हे सारे दुर्गुण अनूला मात्र अगदी हवे हवेसे वाटायचे.

कृष्णाने बारावीची परीक्षा दिली. रिझल्टही लागला. ती नापास झाली नाही पण काठावर पास झाली. एका प्रायव्हेट संस्थेमधून तिने कॉम्प्युटर सायन्समधला डिप्लोमा केला. तीनच वर्षात एका सोफ्टवेअर कंपनीत ती नोकरीला लागली. स्वत:चे सगळे निर्णय ती स्वत:च घ्यायची. अनू तिची मोठी बहिण! पण ती एम.एस्सी. होईपर्यंत ही नोकरीत पर्मनंट ही झाली. महिना सात-आठ हजार मिळवायला लागली. आणखीनच ऐटीत राहू लागली.

अनू एम.एस्सी. झाली आणि त्याचवर्षी तिच्या आत्याने तिच्यासाठी स्थळ आणलं. मुलगा एम.डी. झालेला. देखणा आणि रुबाबदार! अगदी अनूला शोभण्यासारखा! गावात मोठं हॉस्पिटल होतं. घरातलं वातावरण धार्मिक आणि बाळबोध होतं पण घरची गडगंज श्रीमंती होती.

गावाकडून आत्या आली होती. दाखवण्याचा कार्यक्रम झाला. दोन्हीकडची पसंतीही  झाली. मुलीकड्च्यांनी पंचवीस तोळे सोने घालून रुखवतासह लग्न करून द्यायचे ठरले. मंडळी आनंदात निघून गेली.

त्यादिवशी सर्वजणच आनंदात होते. अनूही आनंदात होती. कृष्णा मात्र म्हणाली,
“पण त्या तसल्या गावात तुला करमणार आहे का अनू?”
“न करमायला काय झालं? चांगलं नगरपालिकेचं गाव आहे म्हटलं!” खांद्यावरून पदर ओढून घेत आत्या म्हणाली.
“पण काय तो दाखवण्याचा प्रकार? काय ते नवऱ्यामुलापुढे  नटून सजून बसणं? Really I hate such orthodox methods!” कृष्णा तणतणली. “हातापायांची  बोटंसुद्धा पारखून घेतात ही लोकं!
लग्नाचासुद्धा बाजार मांडतात. गाई-म्हशींचा सौदा केल्याप्रमाणे मुलींचाही सौदा करतात आणि मुलीही तो करवून घेतात. ”
तिच्या या बोलण्याने फुलून आलेला अनुच चेहरा एकदम उतरला. तशी न राहवून ममाच म्हणाली,
“मग दुसरा कुठला मार्ग सुचवणार आहेस तू? आणि त्यात एवढं काय बिघडलं म्हणते मी ?
एवढा गडगंज श्रीमंत, देखणा, डॉक्टर नवरा मिळवलाय तिने त्या बदल्यात!” यावर मग न बोलेल ती आत्या कसली? ती लगेचच म्हणाली, “तरी बरं, तिच्या रूपागुणांनी पहिल्याच स्थळाला पसंत पडली ती! पण तुझं मात्र अवघड आहे बाई!
पोतंभर  पोहे  संपतील आमचे तुझं लग्न जमवता जमवता!” त्यावर कृष्णा एकदम उसळली. म्हणाली,
“ए आत्या असले क्षुद्र विचार काढून टाक आधी डोक्यातून. माझं लग्न तू कशाला जमवतेस? ती वेळ तुझ्यावर तरी नाही येणार.”

त्यानंतर थाटामाटात अनूचं लग्न झालं. अनू सासरी गेली. आपल्या गुणांनी सर्वांचीच लाडकी झाली. लग्नानंतर तब्बल तीन महिन्यांनी ती माहेरी आली होती. दुपारची वेळ! पुस्तकांच्या शेल्फमधून अनूने वि. स. खांडेकरांची ‘ययाती’ कादंबरी काढली. तशी ययाती दोन-तीन वेळा वाचलेली. पण परत परत वाचावीशी वाटणारी. तीन-चार पानं वाचून होत नाहीत तोवर धाडदिशी दर उघडून अनू आत आली.
आल्या आल्या तिने अनूच्या हातातले पुस्तक ओढून घेतले आणि ती जोरजोरात हसायला लागली. तशी अनू रागाने म्हणाली,
“कृष्णा, किती जोरात हसतेस? आणि ते पुस्तक दे बघू इकडे.”
“नाही देणार! आधी ओळख बघू मी का हसतेय?”
“तुझ्या हसण्याला काही कारण लागतका?
“हो तर! प्रत्येक गोष्टीमागे काही कारण असतं असं तूच तर म्हणतेस.”

“मला नाही वेळ असल्या फालतू गोष्टींची कारणं शोधायला.” असं म्हणून अनूने परत तिच्या हातातले पुस्तक ओढून घेतले. ती म्हणाली, “अनू आणखी कितीवेळा वाचणार आहेस ही कादंबरी? आणि यातल्या प्रश्नांचा डोक्यात गुंता करून घेण्यपेक्षा तू माझ्यासारखी हसत रहा मग बघ तुला कसं हलकं हलकं तरंगल्यासारखं वाटेल.” असं म्हणून कृष्णा परत जोरजोरात हसायला लागली. तेव्हा मात्र अनूलाही हसू आवरेना. तरीही ती म्हणालीच, “पूर्वी तू सुद्धा वाचतच होतीस की या  कादंबऱ्या! आणि वाचताना रडून रडून डोळे लाल करून घ्यायचीस. आठवतयना?”

“न आठवायला काय झालं? तशी आताही मी वाचतेच  की असलं काहीतरी, पण ते फक्त  टाइमपाससाठी! आणि रडण्याचं म्हणशीलना तर मला फक्त तेवढया वेळेपुरतं रडू येतं. तेवढया वेळेपुरती मी त्यात गुंतलेली असते. पण… देवयानी अशी का वागली? कचदेव असा का वागला? असले  प्रश्न मला पडत नाहीत. देवयानी तशीवागली कारण ती देवयानी होती, शर्मिष्ठा नव्हती. कचदेव तसा वागला कारण तो कचदेव होता, ययाती नव्हता! प्रत्येकजण वेगळा असतो म्हणून तो वेगळा दिसतो, वेगळा वागतो, वेगळा जगतो  आणि वेगळा मरतोही!” असं म्हणून कृष्णा परत जोरजोरात हसायला लागली.

हसता हसता पोट धरून लोळायला लागली. लोळता लोळता म्हणाली, “मला तुझ्याप्रमाणे प्रश्न पडत नाहीत कारण मी कृष्णा आहे आणि तुला प्रश्न पडतात कारण तू अनू आहेस.”
कशी हसते ही? केव्हा अक्कल यायची हिला? लहान का आहे आता? नवऱ्याला पुढे  सळो की पळो करून सोडेल ही! अनूला वाटलं. ती वैतागून म्हणाली, “हात टेकले बाई तुझ्या या हसण्यापुढे!

घे बाई हसून हवंत तेवढं ! पण मला तरी यात हसण्यासारखं काही वाटत नाही.”
“थांब! हसण्याचं अगदी पोटातलं कारण सांगूनच टाकते तुला.”
कृष्णा म्हणाली, “असं बेमालूम नाटक केलं मी आज जी.एम. पुढे! आजारी असल्याचं! त्याने मग मला लगेच हाफ  डे दिला. काय मजा आली म्हणून सांगू?” स्वतः भोवती गिरक्या घेत कृष्णाने अनूला  विचारलं,
“तुला खरेदीला जायचं होतं ना? चल मग आत्ताच्या आत्ता!”
कृष्णाच्या बाईक वरून दोघी खूप हिंडल्या. खरेदी झाली. कॉफी हाउस मधून बसून कटलेट आणि नुडल्स वर ताव मारताना अनूला खूप मोकळं मोकळं वाटत होतं.

“अनू, तुमच्या गावात आहे का गं इथल्या सारखी हॉटेल्स, पिझ्झा हट्स?”
कृष्णाने विचारलं, “तू जात असशील ना नवऱ्याबरोबर?”
“अजून तरी कधी नाही गेले बाई!”
“का गं?”
अगं, आमच्याकडे ना सर्वजण अंधार पडायच्या आतच जेवतात. म्हणजे व्हासा करतात…फक्त काम करणारे पुरुष सोडून!”
काम करणारे पुरुष? म्हणजे काय गं?  आणखी तुमच्याकडे फक्त पुरुषच काम करतात? बायका काय दिवसभर लोळत राहतात?”
असं म्हणून कृष्ण परत जोरजोरात हसायला लागली. “गप्प बस कृष्णा! सारखी हसतेस? कामासाठी घराबाहेर पडणारे पुरुष असं म्हणायचं होतं मला. आमच्याकडे सगळेजण असंच म्हणतात.”
“म्हणून तुही म्हणायला लागलीस? म्हण बाई म्हण! पण अनू तुला कंटाळा नाही येत घरातल्या कामाचा?”
“तसा कंटाळा येतो कधी कधी! पण खरं तर घरातली काही कामं मला आवडतातही. इथंसुद्धा नाहीका  मी ममाला किती मदत करायचे?” अनू उत्साहाने म्हणाली.

“ते सगळं खरं गं! पण तू एवढी एम. एस्सी. झालीस आणि घरातल्या कामातच अडकून पडलीस? तर …याचा मोबदला काय मिळतो तुला?” कृष्णाचा हा रोखठोक प्रश्न ऐकून अनू चकितच झाली.
“मोबदला? म्हणजे पगार म्हणायचंय  का तुला?”
“हं हं तेच ते! तसंच म्हणायचं आहे मला!” कृष्णा सरळच म्हणाली.
“प्रत्येक गोष्टीचं, कुटुंबातल्या माणसांसाठी प्रेमानं केलेल्या कामाचं मोल काय पैशातून करायचं असतं काय कृष्णा? आणि मला जेव्हा हवे असतील तेव्हा माझा नवरा देतोचकी मला पैसे!”

बोलता बोलता अनूला ठसका लागला. तेव्हा गडबडीने तिच्या हातात पाण्याचा ग्लास देत कृष्णाने मनगटावरच्या घडयाळाकडे पाहिले आणि ती जवळ जवळ ओरडलीच,
“अनू सात वाजले! जायलाच हवं आता! घरी जाऊन मला परत निरंजनच्या वाढदिवसाच्या पार्टीला जायचय.
“हा निरंजन कोण?”
“अगं, मार्केटिंग ऑफिसर आहे. कामानिमित्त आमच्या कंपनीत येतो कधी कधी. A young and dynamic person!” बोलता  बोलता कृष्णाचे डोळे एकदम चमकले. हॉटेलबाहेर पडून कृष्णाने बाईक चालू केली. संध्याकाळ गडद होत चालली होती.

माणसांनी वाहनांनी फुललेल्या रस्त्यावरून कृष्णा सुसाट वेगाने निघाली होती. पाठीमागे बसलेल्या अनूच्या हृदयात मात्र अनामिक खळबळ माजली होती. हा कोण निरंजन?  याच्याशी कृष्णाची फक्त मैत्री आहे की आणखीन काही?

आठवड्याचा मुक्काम संपवून अनू परत सासरी आली. संसारात रमून गेली. ती आनंदात होती. माहेरी अधूनमधून जायची पण त्या फक्त धावत्या भेटीच असायच्या. कृष्णाला प्रमोशन मिळालं होतं. ती तशी बिझीच असायची. त्यामुळे तिच्याशी फारसं बोलणं होताच नसे. एकदा ममानं अनूला फोनवरून सांगितलं, “अनू कृष्णा साठी एखादा चांगला मुलगा पाहायला सांगना तुझ्या सासरच्यांना ” त्यानंतर जेमतेम पंधरा दिवसच गेले असतील.

सकाळी मंदिरात गेलेल्या सासूबाई घरी आली त्या ओरडतच. म्हणाल्या, ”
अगं अनू, तुझ्या बहिणीने लग्न केलं म्हणे! बंगाली माणसाशी! मंडप्यांच्या मंगलचा दीर असतोना तिकडे, तुझ्या पपांच्या कंपनीत तो आलाय मंगलकडे! मंगलच सांगत होती.” हे ऐकून अनुच्या पोटात गोळाच उठला. ती कशीबशी म्हणाली,
“पण मला कसं कळवलं नाही कुणी?”
“कळवण्यासारखं वाटलं नसेल त्यांना काही! बाकी तुझ्या बहिणीची हद्द झाली बाई! आपल्या जातीत काय मुलं नव्हती की काय?” अष्टकाचे ताट टेबलावर आदळत सासूबाई म्हणाल्या. तसे अनूचे  सासरे आत आले. डोळे मोठे करीत म्हणाले, “आता जास्तीचा तमाशा नका करू! झालं ते झालं! जावा आता कामाला.”
यावर सासूबाईंनी तोंड वाकडं केलं. पण हळू आवाजात त्या म्हणाल्याच,

“मी कशाला तमाशा करू? आज बस्तीभर हेच बोलणं चाललं होतं. चर्चा आता गावभर होणारच की?” सासऱ्यांच्या धाकाने  घरात तोंडावर अनूला कोणी काही बोलले नाही. पण माघारी कुजबूज चालूच होती.
गावातली नणंद संध्याकाळी घरी आली. सासरे घरात नव्हते ते पाहून आई व लेकीने पोटभर बोलून घेतलं. आडून आडून अनूलाही टोमणे मारलेच. रात्री तिचा उतरलेला चेहरा पाहून नवरा म्हणाला,

“जाऊ दे तू कशाला एवढं मनाला लाऊन घेतेस? तशी तुझी बहिण जरा ओव्हरस्मार्टच होती. पण आजकाल कोण पाहतं जातपात? मुलगा चांगला असलाना तर प्रश्न नाही.”

दुसऱ्या दिवशी अनूने ममाला फोन लावला. “शेवटी  कळलं वाटतं तुला?” ममीने शांतपणे विचारलं. “अगं पण असं अचानक कसं काय झालं?” “कसं आणि काय? मलाच काही कळेनासं झालंय.” “तुला थोडीही शंका आली नव्हती कधी?” अनूने विचारलं.
“तशी कामानिमित्त त्याच्याबरोबर  फिरायची ती. पण एकदम लग्न वगैरे करेल असं वाटलं नव्हतं! त्यादिवशी कोर्टात लग्न करून दोघे एकदमच घरी आले. आमचा आशीर्वाद घ्यायला. “

“मग?”
“मग काय?” तुझ्या पपांनी घालवून दिलं त्यांना बाहेरच्या बाहेर. ”
“पपा असं वागले?” अनूने आश्चर्याने विचारले.
“मग काय करतील? मुलगा आपल्या धर्माचा नाहीच पण निदान आम्हाला कल्पना तरी द्यायला नको होतीका तिने? घरदार, मुलाचं चारित्र्य, चौकशी तरी केली असतीना?”

खरंच, निदान लग्नासारखा महत्वाचा निर्णय तरी पपा-ममीच्या विचाराने घ्यायला नको होताका? मुलं कशीही वागली तरी आई-वडील शेवटी त्यांचं हितच पाहतातना? अनुला वाटलं, पण शेवटी तिने लहानपणापासून कोणता निर्णय सगळ्यांच्या विचाराने घेतला होता?

पाहता पाहता दिवस संपले. महिने संपले. वर्षही संपलं. कृष्णाच्या लग्नाची गोष्ट आता जुनी झाली. त्यातलं नाविन्य संपलं. विरोधाची धार बोथट झाली. घरीदारी सगळ्यांच्याच ती गोष्ट अंगवळणी पडून गेली. ममी-पपा एक-दोन वेळा तिच्या घरीही जाऊन आले म्हणे. पण कृष्णाने अनूला साधा फोनही कधी केला नाही. का बरं? अनूला नेहमी वाटत राही, कसा चालला असेल कृष्णाचा संसार? कशी वागत असेल ती आता? म्हणूनच माहेरी गेल्यावर किती उत्सुकतेने ती कृष्णाच्या घरी गेली. थोडीशी घाबरतच. भोवतालचा निसर्गरम्य परिसर आणि त्यात चॉकलेटच्या बंगल्याप्रमाणे भासणारा सुरेख बंगला! पोर्चमध्ये उभी असणारी आलिशान चारचाकी कृष्णाच्या सुखवस्तू स्थितीची जाणीव करून देत होती.
दरवाजावरची बेल दाबताच बंगाली पद्धतीची साडी नेसलेल्या एका साठीच्या आसपासच्या वृद्धेने दार उघडलं.
“मी अनू… अनुपमा! कृष्णाची मोठी बहिण!” अनूने सांगितलं. तशी. “हां  हां! असं म्हणून ती तोंडभरून हसली. अनूला बसायला सांगून गडबडीने आत गेली.
गुबगुबीत मखमली सोफ्यावर बसून अनूच निरीक्षण चाललं होतं. चकाकणारी फरशी, झुळझुळणारे पडदे, मंद वाऱ्याच्या झुळकीने किणकिणणाऱ्या झुंबरघंटा!
तेवढयात लुंगी गुंडाळलेला एक सावल्या रंगाचा ताडमाड तरुण बाहेर आला. बहुतेक कृष्णाचा निरंजन हाच असावा. अनूने ओळखलं. तो छानपैकी हसून म्हणाला,
“तुम्ही थोडावेळ बसून घ्या. कृष्णा मंदिरामधी गेली हाय! ”
“मंदिरात? कुठल्या?” अनूने विस्मयाने विचारलं.
“तुमचा तो मंदिर आहेना तिकडे, स्टेशनपाशी, तिकडे रोज प्रवचन असतो. तिकडेच गेली ती. येईल तासामधी! पण तुम्ही काय घेणार? चाय-कॉफी?”
त्यासरशी अनू गडबडीने उठली. घाईघाईने म्हणाली,
“नको, नको, मी मंदिरातच भेटते तिला.”
कृष्णाला प्रवचन केव्हापासून आवडायला लागलं? खूपच बदललेली दिसते कृष्णा! अनूला आश्चर्यच वाटलं. तिने तडक मंदिर गाठलं. मंदिरातला प्रवचन हॉल अर्धा अधिक भरलेला  होता.  शुभ्र वस्त्रातल्या
तरुण माताजी प्रवचन देत होत्या. दुसऱ्या दोन पोरसवदा माताजी जवळच्याच आसनांवर बसल्या होत्या. आणि…पहिल्याच रांगेत पांढऱ्या रंगाचा सलवार-कमीज घातलेली कृष्णा बसली होती. मन लावून प्रवचन ऐकत होती.
दहाच मिनिटात प्रवचन संपलं. जिनवाणी- स्तवन संपताच अनूने गडबडीने कृष्णाला गाठले. कृष्णाने अनूकडे पाहिलं पण तिच्या अपेक्षेप्रमाणे काहीच घडलं नाही. तिने फक्त तिचा हात प्रेमभराने दाबला.
नेहमीप्रमाणे ती अत्यानंदाने ओरडली नाही की गळ्यात पडली नाही. “आलेच मी पाच मिनिटात!” असं म्हणून गडबडीने ती माताजींच्या खोलीत गेली. तिच्याबरोबर तिची शाळेतली मैत्रीण श्वेतापण होती. पाच-दहा मिनिटात कृष्णा बाहेर आली. मंदिराबाहेरच्या प्रशस्त हिरवळीवर दोघी जाऊन बसल्या. मग कृष्णा शांतपणे म्हणाली, “बोल आता! काय म्हणतेस?” “काय बोलू? अगदी धक्क्यावर धक्के देते आहेस तू? तुझा हा वेष, वागण्यातला हा बदल?” अनू तिला आपादमस्तक न्याहाळत म्हणाली. “का गं? माझ्यातला हा बदल आवडला नाही तुला?” “आवडला तर! मी तुझ्या घरीसुद्धा जाऊन आले. तुझं घर, तुझा नवरा, तुझी सासूसुद्धा खूप आवडली मला!” “बरं झालं तू आलीस. बऱ्याच गोष्टी बोलायच्या आहेत तुझ्याशी. लग्नाच्या वेळी कुणाला काही सांगण्याइतका  वेळच नाही मिळाला.”

“सांगना मग! तुझ्या लग्नाची सगळी गोष्ट मला पहिल्यापासून ऐकव!” अनू उत्साहाने म्हणाली.
“अनू आता काय सांगू तुला? अगं, माझ्या लग्नाच्या गोष्टीनं जेवढी खळबळ माजवली नसेलना त्यापेक्षा जास्त खळबळ त्या गोष्टीचा शेवट ऐकल्यावर होईल असं वाटतंय मला!”
कृष्णाच हे बोलणं ऐकून अनू थोडी घाबरलीच. वाक्यावाक्याला खळखळून हसणाऱ्या कृष्णाचं हे शांत संथ रूप, बोलणं तिला कुठेतरी खटकतच होतं. पण तरीही उसनं अवसान आणून  ती म्हणाली,

“आता कुठे सुरुवात झालीये आणि शेवट बरा होईल इतक्यात! त्यावर कृष्णा म्हणाली, “अनू तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी बदलले आहे. ममी-पपाही बदलले असावेत, कारण त्यांना आता निरंजन आवडू लागला आहे. तसा तो सगळ्यांनाच आवडण्यासारखा आहे. मलाही आवडला.”

मग थोडं थांबून एकेका शब्दावर जोर देत कृष्णा म्हणाली, “पण .. पण मी आता त्याच्यापासून घटस्फोट घ्यायचं ठरवलय.” काय? तू घटस्फोट घेणार?” अनु जवळ जवळ किंचाळलीच. “म्हणजे मला तुझ्याबाबतीत जे वाटलं ते सर्व फसवं होतं तर? ” “काय वाटलं होतं तुला माझ्याबाबतीत” हेच की तुझं लग्न यशस्वी झालंय. तुझं संसार छान चाललाय. तू शांत समंजस झाली आहेस. तुझ्या स्वातंत्र्याच्या कल्पना बदलल्या आहेत.””त्या तर थोड्याफार बदलल्या आहेतच! ” कृष्णा स्मित करीत म्हणाली.”मग हा घटस्फोट कशासाठी?”कारण… कारण मला निरंजन बरोबर मांडलेला संसार सोडायचाय…आणि…” “आणि काय? दुसऱ्या कोणाबरोबर तरी नवा डाव मांडायचाय? लग्न म्हणजे पोरखेळ वाटलं तुला? भातुकलीतला डाव! मांडायचा, मोडायचा आणि परत मांडायचा. स्वत:च्या मनाचे हवे तसे लाड करीत आलीस तू?  आता कोणाबरोबर नवा संसार मांडणार आहेस? आणि मग हा मंदिरात येण्याचा फार्स कशासाठी? पण एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्या धर्मातला कुठलाही मुलगा आता सहजासहजी तुझ्याशी लग्न करायला तयार होणार नाही.” अनू अगदी कोसळल्यासारखी बोलत होती.
“झालं तुझं बोलून? मग आता मलाही थोडं बोलूदे.” कृष्णा कमालीच्या संयमाने म्हणाली.
“मी कोणाशीही नवा संसार मांडणार नाही. चातुर्मास संपलाकी मी माताजींबरोबर जाणार आहे. आणि…त्यानंतर त्या माझे आचरण पाहून वर्षभराने मला दीक्षा देणार आहेत. ”
काय? काय म्हणालीस कृष्णा?” अंगावर बॉम्बगोळा पडल्यासारखी अनू हादरली आणि म्हणाली,
“तू…तू दीक्षा घेणार? दीक्षा एवढी सोपी वाटली तुला? सकाळी उठण्याच्या, झोपण्याच्या, खाण्यापिण्याच्या वेळाही सांभाळता येत नाहीत  तुला? कुठलंही बंधन नको असणारी तू? दीक्षेचं बंधन पेलणार आहे तुला?”
“दीक्षा म्हणजे बंधन नाही अनू! बंधनं आपल्यावर कुटुंब लादतं. समाज लादतो.दीक्षा तर आपल्याला या सर्व बंधनातून मुक्त करते!”
“बस! बस कर आता! एक शब्दही बोलू नकोस! प्रवचनातली वाक्यं पोपटासारखी बोलून मला नको फसवूस.” अनूचा आवाज नकळत चढला.
खरंच, किती मूर्ख मुलगी आहे ही? स्वत:लाच फसवायला निघाली आहे. साध्वी होणं एवढं सोपं का आहे? किती कठीण असते साधूंची चर्या! दिवसातून एकदाच नीरस आहार आणि जल! तोही मौनपणे!
सारे मोहाचे पाश तोडायचे. दिवसभर ध्यानधारणा, सामायिक आणि पदविहार! जमणार आहेका हिच्यासारखीला?
प्रश्नांच्या कल्लोळाने अनूच्या मेंदूला झिणझिण्या आल्या. ती म्हणाली,
“कृष्णा, साधुंच्या चर्येची कल्पना आहेका तुला?”
“गेले दोन महिने मी माताजींच्या निकट सहवासात आहे. मला त्याची  पूर्ण कल्पना आहे.”
“पण मग तू या संसाराच्या बंधनात अडकलीसच कशाला?”
“तेच तर तुला सांगणार आहे मी. पण तू किती फाटे फोडते आहेस त्याला?” कृष्णा म्हणाली,
“निरंजनचे  आणि माझे विचार जुळले. एकमेकावर कसलीही बंधनं घालायची नाहीत या अटीवर आम्ही लग्न केले.
लग्नानंतर त्याने माझ्यावर सुखाचा वर्षाव केला. म्हणूनच  मी  त्याच्यात खूप खूप गुंतत गेले., अगदी नको इतकी! आणि हे गुंतणंच माझ्यासाठी बंधन ठरलं.” बोलता बोलता
कृष्णाचा स्वर कातर झाला. “कृष्णा या गुंतण्यालाच प्रेम म्हणतात. त्याला तू बंधन म्हणतेस? हे प्रेम तुला का नकोसं वाटतंय कृष्णा?”

“चुकतेस तू अनू. मला प्रेम कधीच नकोसं होणार नाही. पण इथे गोष्टच थोडी वेगळी आहे. मी नात्याशी जेवढी प्रामाणिक राहिले, तेवढा तो नाही राहिला. त्याच्या कंपनीतल्या चेन्नई ब्रांचमधल्या एका मुलीशी त्याचे संबंध नको इतके पुढे गेलेत.” “पण तू त्याला विरोध नाही केलास?”
“त्याला विचारलं मी.” पण तो म्हणाला, “हा फक्त टाईमपास आहे. काही वेळेपुरती Enjoyment! हे संबंध तुला त्रासदायक होणार नाहीत. आपल्या घराची स्वामिनी तूच आहेस. माझ्या हृदयाची स्वामिनी तूच आहेस. तू तुला हवं ते कर. मी मला हवं ते करेन.”
अनू खरं सांगते मी तुला, मी पहिल्यापासूनच स्वच्छंदी  आहे, मनाने मोकळी आहे पण…मी लक्ष्मणरेषा कधीच ओलांडली नाही. असल्या अनैतिक गोष्टींचा मला पहिल्यापासूनच तिटकारा वाटतो. आणि.. त्याने माझी ही मर्यादा ओळखलीय! म्हणूनच तो मला जुमानत नाही. आणि आतातर मला कशाचंच काही नाही वाटून घ्यायचय! तो तसाच वागणार. वागू दे  त्याला हवं तसं.” बोलून बोलून कृष्णा दमली.

तिचा तो शुष्क आवाज, थरथरणारे ओठ, अनूला अगदी भरून भरून आलं. ती रडायला लागली…पण कृष्णा एकदम उठून उभी राहिली. अंगावरचे कपडे झटकीत म्हणाली,

“मी येईन उदया घरी! पपांना, ममाला हे सर्व मला सांगायलाच हवं! इथून पुढे त्यांना माझा त्रास होणार नाही. वेडया स्वातंत्र्याच्या हट्टापायी मी त्यांना खूप त्रास दिला. वाट्टेल तशी वागले; पण त्यांनी केलेल्या सुप्त संस्कारामुळेच स्वातंत्र्य  आणि स्वैराचार यातली सीमा रेषा मी ओळखू शकले.”

दुसऱ्या दिवशी ती आली.  तिचा निर्णय बदलावा म्हणून सगळ्यांनी तिला खूप समजावलं. हवं तर तू इकडेच ये, पण हे दीक्षेचं खूळ डोक्यातून काढून टाक; असंही पपांनी समजावलं.

एखादं मूल झालं की निरंजन आपोआप बदलेल; तसा तो मनाने खूप चांगला आहे असं ममा वारंवार सांगत होती. पण कृष्णाचा निर्णय ठाम होता. तसे पूर्वीपासूनच तिचे सगळे  निर्णय ठामच  असायचे ती एवढंच म्हणाली, “एखादं मूल झालं की मग या गुंत्यातून मी कधी सुटणारच नाही. मला आता हा असला जुगार नाही खेळायचा.” यावर कोण काय बोलणार!

संध्याकाळी ममाने तिच्या आवडीचा स्वयंपाक केला; पण ती जेवली नाही. अष्टमी आहे म्हणाली. अनूच्या आग्रहाखातर रात्री तिथेच राहिली. दोघी बागेतल्या झोपाळ्यावर बसल्या होत्या. अष्टमीचा  चंद्र आकाशात आपली मृदू मुलायम किरणे विखरीत होता. रातराणीचा, जुईचा, निशिगंधाचा सुगंध हवेत दरवळत होता. झोपाळा हळूवार झुलत होता. आणि झुलता झुलता अचानकपणे कृष्णा म्हणाली,

“तुला आपली गावाकडची आजी आठवते अनू? शांत, सोशीक, सतत काम करणारी! आजोबांचं वसवसणं सहजपणे अंगावर झेलणारी, मंदिरात जाऊन अष्टद्रव्याचा अर्घ्य वाहणारी! धर्माचं शाब्दिक ज्ञान नसलेली, पण साक्षात धर्ममूर्तीच होतीनागं ती? बोलता बोलता कृष्णाने डोळे मिटले आणि ती म्हणाली,

“अनू, मी आजीसारखी नाही. ममासारखीपण नाही, आणि तुझ्यासारखीसुद्धा  नाही! कारण मी… मी आहे. मी अशी का आहे? हा प्रश्न मला पूर्वीही कधी पडला नव्हता आणि आजही नाही. कारण मी जशी आहे तशी मी मला प्रिय आहे. मी घेतलेला निर्णय माझा स्वत:चा आहे.

 बोलता ती उठली. जाई-जुईच्या मांडवाजवळ जाऊन उभी राहिली. जाई-जुईचा गंध तिला पूर्वीपासूनच खूप आवडायचा. अनूच्या मनात परत प्रश्नांनी गर्दी केली.
हिचं तरुण वय, हिचा स्वच्छंदी स्वभाव कधी उसळी मारून वर आला तर? तिला मग निरंजन आठवेल. त्याच्याबरोबरचे सुखाचे क्षण आठवतील. गोजिरवाण्या गोंडस बाळांना पाहून हिला कधी त्यांना कुशीत घ्यावंसं वाटेल. मग काय करेल ही? झोपाळा सोडून अनू उठली. कृष्णाजवळ जाऊन म्हणाली, “कृष्णा फुलांचं हे वेड, हा गंध, हे सारं आता तुला विसरावं लागेल.

कृष्णाच्या डोळ्यात पूर्वीचच खट्याळ हसू चमकलं, पण चेहरा मात्र शांत होता.
ती म्हणाली, “अनू, तुझ्या मनात उठणाऱ्या प्रश्नांची मला पूर्ण कल्पना आहे. पूर्वी तुला सतत पडणाऱ्या प्रश्नांचं मला खूप हसू येई; कारण जीवनाकडे एवढया गंभीरतेने मी कधी पाहिलंच नव्हतं. पण जेव्हा पहायची वेळ आली तेव्हा  मी पूर्णपणे उध्वस्त झाले होते. पण सुदैवाने त्याचवेळी मला  श्वेता भेटली. तिने मला माताजींकडे नेलं. त्यानंतर मात्र मी पूर्णपणे बदलून गेले. तुला कदाचित माहित नसेल पण या मोठया माताजी आहेतना; त्या एम. डी. झालेल्या आहेत. न्यूरो स्पेशालिस्ट! त्यांनी तर लग्नही नाही केलं!”

कृष्णाचं बोलणं, तिची स्वच्छ दृष्टी, शांत चेहरा, अनू कौतुकानं न्याहाळत होती. एखादयाला जर भोगांची इच्छाच नसेल आणि जरी असलीच तरी त्यावर विजय मिळवण्यातच त्याला आनंद वाटत असेल तर याला काय म्हणायचं? याला विकृती म्हणायचं की प्रकृती? आणि आयुष्यभर भोग भोगूनही ज्याची भोगलालसा नष्ट होत नसेल तर त्याला काय म्हणायचं? अनू विचारात पडली होती.
उगमापासूनच खळाळत, उसळत वाहणारी कृष्णा एवढया लवकर एवढी शांत, संथ कशी झाली? का झाली? कारण तीच तिची प्रकृती होतीका? संसारात फासे मनाप्रमाणे पडले नाहीत म्हणून प्रत्येकजणच असं करू लागला तर कसं  होणार? पण प्रत्येकजण असं करेलच कसं?
अनुला तिच्या ममाची मावसबहिण आठवली. लहानपणीच कोड फुटलेली! कोणीतरी तिला सल्ला दिला होता,
“मागच्या जन्मीच्या पापाचे भोग आहेत हे! आता दीक्षा घे आणि आत्मकल्याण कर!” पण तिने तो सल्ला मानला नाही. ती जिद्दीने शिकली. डॉक्टर झाली. त्वचारोगतज्ञ झाली आणि तिने कोडावर उपचार करण्यासाठी सर्व सोयींनी युक्त हॉस्पिटल बांधलं. रुग्णसेवेला वाहून घेतलं.

संसार म्हणजे सुखदु:खाचा खेळच! समस्या प्रत्येकालाच असतात. पण त्यावर मात करण्याचे प्रत्येकाचे उपाय वेगळे असतात. उपजत स्वभावाबरोबरच आजूबाजूचं वातावरण, आर्थिक सामाजिक भौगोलिक
स्थिती, बदलणारा काळाचा प्रवाह यावरही ते अवलंबून असतात; नाहीका? प्रश्नोत्तरांच्या आंदोलनावर अनू झुलत होती. झोपाळा रिकामाच झुलत होता. कुरकुरत होता.

चातुर्मास संपला. संसाराचे सारे पाश तोडून कृष्णा माताजींबरोबर निघून गेली. दिवसामागून दिवस गेले. कृष्णाने दीक्षा घेतली. एका छोटयाशा गावात तिचा दीक्षेनंतरचा पहिलाच चातुर्मास होता. ममी-पपांबरोबर तिला भेटायला… नव्हे , तिच्या दर्शनाला गेली. मोठया माताजींच्या जवळच्या आसनावर कृष्णा बसली होती.  प्रवचनसभेत कृष्णा; नाही…कृष्णा नाही, विशुद्धमती माताजी बोलत होत्या.

“या संसारात एवढी विषमता का आहे? कोणी धनवान तर कोणी दरिद्री, कोणी रूप संपन्न तर कोणी कुरूप, कोणी संयमी तर कोणी क्रोधिष्ट! कोणी एकेंद्रिय जीव तर कोणी पंचेंद्रिय जीव! या विविधतेचं कारण काय? प्रत्येक जीव जन्माला येतो तो आधीच्या अनेक जन्मामधले पूर्वसंस्कार घेऊनच! हे पूर्वसंस्कार म्हणजेच आत्म्याभोवती असलेलं अतिसूक्ष्म असं कार्माण शरीर! कार्माण शरीराच्या भिन्नतेमुळे प्रत्येकजण वेगळा असतो, वेगळा वागतो, आणि वेगळा दिसतोही!”

पूर्वाश्रमीची कृष्णापण हेच सांगायची. पण त्यावेळचं सांगणं आणि आताचं सांगणं यात केवढं महदंतर होतं. विशुद्धमती माताजी तन्मयतेने बोलत होत्या, “आठ प्रकारचे  कर्मपरमाणू मिळून जे कार्माण शरीर बनतं, त्या कार्माण शरीराचा नाश तपाने करता येतो. आस्त्रव व बंध ही तत्वे संसारभ्रमणास कारणीभूत असतात, आणि संवर व निर्जरा ही तत्वे मुक्तीला कारणीभूत असतात.”

अनू एकटक पाहत होती. शुभ्र वस्त्रे ल्यायलेली, कानामागून पदर घेतलेली, चेहऱ्यावर अपूर्व तेज! मयूर पिसांची पिंछी आणि कमंडलू! जणू एखादी श्वेतपरीच! ती कृष्णा नव्हती. साध्वी विशुद्धमती होती. लहानपणी ती पपांच्याजवळ हट्ट करायची, ‘मला परीचे पंख आणून दया! मला उंच उंच जायचय, आकाशाच्यापण वर जायचय!’ ते आठवलं आणि अनूच्या काळजाचं पाणी पाणी झालं. तिने पपांकडे पाहिलं. ते एकटक तिच्याचकडे पाहत होते. ममाच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. प्रवचन अर्ध्यावर टाकून अनू उठली. मंदिराच्या आत गेली. वेदीवरच्या शांतीनाथ प्रभूंच्या समोर तिने माथा टेकला; आणि ती भरल्या आवाजात म्हणाली,

“हे भगवंता, तू कोणाला काही देत नाहीस, कोणाकडून काही घेत नाहीस, हे मला ठाऊक आहे. पण तरीही एक मागणं मागते, साध्वीधर्माचे पंख लेऊन, लोकाकाशाला  पार करण्यासाठी मुक्तीच्या पथावर टिकून राहण्यासाठी माझ्या वेड्या बहिणीला बळ दे!”


One response to “अनूची बहीण – ANUCHI BAHIN (Anu’s Sister)”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.