इच्छापत्र – संवादातून व्यक्तिचित्रण घडवणारी कथा
इच्छापत्र ही ‘व्रती'(समकालीन मराठी जैन कथासंग्रह भाग ४) या संग्रहातील प्राचार्य डी.डी. मगदूम यांची कथा आहे.
या कथेत भीमू ऐनापुरे या व्यक्तीच्या व इतर संबंधित व्यक्तींच्या आयुष्यातील १०-१२ वर्षाच्या कालावधीतील घटनापट पाहायला मिळतो. कथा जसजशी पुढे जाते तसतसे भीमू ऐनापुरेच्या व्यक्तिचित्रणात भरत जाणारे रंग पहावयास मिळतात.
या कथेचा नायक भीमू ऐनापुरे हा सांगली जिल्ह्यातील कृष्णाकाठच्या एका गावात राहणारा शेतकरी व सामाजिक कार्यकर्ता आहे. लेखकाने किंवा कथेतल्या निवेदकाने तटस्थपणे या कथेचे निवेदन केले आहे.
या कथेत भीमू ऐनापुरे, कथेचा निवेदक आणि आण्णाप्पा या तिघांची शेती शेजारी शेजारी आहे.
भीमू हा त्या खेडेवजा गावात राहणारा व अल्पशिक्षित असला तरी मोठा कल्पक, व्यवहारचतुर व बुद्धिमानही असावा. स्वतःच्या शेतात विहीर बांधून, बोअर काढून त्याने त्याची शेती पाण्याखाली आणली आहे. शेजारच्या आण्णाप्पालाही वर्षाला एकरी चारशे रुपये घेऊन तो पाणी देई. त्याने स्वतःच्या शेतात पाईपलाईनही टाकली आहे. त्याद्वारे तो ओढ्यापलीकडील वसाहतीतल्या कारखान्यालाही महिना सहा हजार रुपये पाणीपट्टी घेऊन पाणी देत असे. या सर्वातून मिळणाऱ्या पैशातून तो स्वतःची शेती तर उत्तमपणे पिकवत असेच पण अडीनडीला लोकांनाही पैसे देत असे. पैसे लवकर परत नाही आले तर तो त्यांच्या जमिनी ताब्यात घेई. ताब्यात घेतलेल्या जमिनी खुरप्याच्या वाटणीने मूळ मालकालाच कसायला देऊन स्वार्थ व परमार्थ दोन्हीही साधत असे.
याउलट आण्णाप्पा हा साधा भाबडा, कुटुंबवत्सल व कष्टाळू शेतकरी आहे. त्याच्याकडे भीमूसारखे व्यवहारचातुर्य नसले तरी आहे ती शेती तो कष्टाने कसतो.त्याची बायकामुलेही काटकसरी आहेत, त्याचे खाऊन पिऊन उत्तम चाललेअसले तरी बायकोच्या आजारपणात त्याने भीमूकडून त्याने पंधरा हजार रुपये उसने घेतलेले आहेत.
आण्णाप्पाची मुलगी सुनीता दिसायला देखणी, शालीन, मर्यादशील आहे. म्हणूनच आपली ही रूपगुणसंपन्न मुलगी सुस्थळी पडावी अशी त्याची इच्छा असणे रास्तच आहे. भीमूलाही सुनीता ही मुलीसारखीच असल्याने तो तिच्यासाठी उत्तम स्थळ काढतो. मुलगी दाखवणे, वाटाघाटी, यात स्वतः पुढाकार घेतो. तिच्या लग्नासाठीचा खर्च, लग्नानंतर सासरच्या गावी लाडू चिवडा वाटण्याचा खर्च, तिजोरी सोफासेट अंथरुण पांघरुण यांचा खर्च यासाठी भीमू आण्णाप्पाला हवे तेवढे पैसे न मागता सढळ हाताने देऊ करतो.
यात लहानपणापासून नजरेखाली वाढलेल्या मुलीचे भले व्हावे ही त्याच्या अंतरीची इच्छा जाणवते.
यापूर्वीही अशाच प्रकारे त्याने गावातल्या आनंदाच्या पोराला शिक्षणासाठी पैसे देऊन त्याला शिकून सवरुन मार्गी लावण्यासाठी मदत केलेली आहे. यातही तरुण पिढीचे भले व्हावे, आईवडिलांसारखे राबराब राबण्यात त्यांचे आयुष्य जाऊ नये असाच त्याचा उद्देश असावा.
पण… जेव्हा दिलेले पैसे वेळेवर परत येत नाहीत किंवा येण्यास फार विलंब होऊ लागतो तेव्हा तो, ” घरच्या मंडळींनी फारच वणवा लावला आहे.” या कारणाने त्यांची एखादा एकर जमीन स्वतःच्या नावावर करून घेतो. तेही अत्यंत पद्धतशीर आणि गोडीगुलाबीनेच. त्या कुटुंबाशी तो सलोख्याचे संबंध ठेवतो. त्यांच्याशी तो कधी उर्मटपणे किंवा माजोरीपणाने वागत नाही.आपल्या मारुती गाडीतून मैत्रीच्या नात्याने तो त्यांना वेळप्रसंगी फिरवतही असतो. त्यांच्याशी अदबीने प्रेमाने वागतो. घरगुती संबंध जिव्हाळ्याने जपतो. त्यामुळे वरवर किंवा थोडे खोलवर गेले तरी त्यात कुणाला गैर वाटत नाही.
याशिवाय मूळ मालकाला लागवड बियाणेही वेळच्या वेळी पुरवत असतो. त्यामुळे कथेतले काहीजण त्याच्याबद्दल काहीही बोलत असले तरी वाचकालाही त्याचे वागणे फारसे गैर वाटत नाही.
भीमूशिवाय बापूसाहेब हेसुद्धा या कथेतील महत्वाचे पात्र आहे. खरेतर बापूसाहेबांना सून म्हणून सुनीता मनापासून पसंत पडली आहे. ते स्वतःच नंतर याबद्दल आण्णाप्पालाही सांगतातकी, ” हुंडा दिला नसतात तरी मुलगी नारळ घेऊनही आम्ही तुमच्याच मुलीला सून करून घेतले असते. तिच्या अस्तित्वातच लक्ष्मी आहे. ती समाधानात राहिलीकी तुमच्या घरीही बरकत येईल.”
यावरून बापूसाहेब हेसुद्धा प्रामाणिक व श्रद्धाळू गृहस्थ आहेत. पण तरीही ते, भीमूनेच त्यांच्या घरी येऊन दाबून घ्यायला सांगितलयाने आम्ही घरच्या लोकांनी केलेल्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले असा खुलासा शेवटी देतात.
सुनीता व तिची सासू यांचे व्यक्तिचित्रणही थोडक्या शब्दातून अगदी नेमकेपणाने केले आहे. लग्नानंतर पाच दिवस राहून माहेरी निघालेल्या नव्या नवरीला(सुनेला) साग्रसंगीत अंथरुण-पांघरुणाच्या मागणीसाठी, सासू अगदी सहजपणे सांगतेकी, “कवातर आणणारच आहेस, आत्ताच आणलं तर सगळ्या कार्यक्रमाला शोभा येईल.”
त्यानंतर सासूच्या या मागण्या बिनबोभाट पूर्ण झाल्यामुळे तिचे मन आणखीनच लालचावले नाही तर नवलच म्हणायचे..
एकदा अशीच दुपारी जोंधळे नीट करता करता सासू , सदऱ्याची तुटलेली बटणे लावणाऱ्या सुनीताला म्हणते, ” सुनीता, तुझ्या बाप्पांना राहुलसाठी एक फटफट तर घ्यायला सांगकी.” या मागणीने सुनीता सर्दच होते. आईवडिलांच्या आर्थिक परिस्थितीची जाण असणारी ती एक समंजस मुलगी आहे. खेड्यात राहणारी, फारसे शिक्षण न घेतलेली आहे. ती असहाय्य्य नसली तरी काही बाबतीत परिस्थितीने दबलेली आहे. पण असे जरी असले तरी कोणत्या वेळी कसे, कुठे काय बोलावे याची तिला जाण आहे.
सासूने केलेली फटफटीची मागणी ती आपल्या वडिलांसमोरच सासर्यांच्या कानावर घालते… आणि मग तिथून पुढे तिचे सारेच प्रश्न सहजपणे सुटत जातात.
यातील सुनीताचा नवरा राहुल हा ७०-८०- ९० च्या दशकातला गावातल्या सुशिक्षित पिढीचे प्रतिनिधित्व करणारा वाटतो.बायको रूपाने देखणी, गृहकृत्यदक्ष, सासू-सासऱ्यांच्या आज्ञेत राहणारी तर हवीच पण स्वतःलाही फारशी डोईजड होणारी नसावी. एवढे असूनही तिने हुंडा, दागदागिने, आपणहून आणले तर घेण्यात काय गैर? अश्या मनोवृत्तीचे प्रतीक भासतो.
देसाई काकू या गावातल्या ज्येष्ठ धर्मानुरागी भगिनी आहेत.
त्या धार्मिक कार्यासाठी दानधर्म करणाऱ्या, नवऱ्यानंतरही त्याची श्रद्धाळू परंपरा जपणाऱ्या आहेत.
या कथेतल्या वातावरणावर रीतिरिवाज परंपरा यावर, त्या विशिष्ट भौगोलिक परिसराचा विशिष्ट भाषेचा अमीट ठसा उमटलेला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, शिरोळ आणि कर्नाटकातील निपाणी, बेळगाव, कागवाड, कागल अश्या या पट्ट्यात शेती करणाऱ्या जैन समाजाचे प्राबल्य आढळते. या पट्ट्यातील अनेक तालुके,गावे, खेडी यामध्ये इतर समाजातील लोकांबरोबरच त्या समाजातील एक भाग म्हणून जैन समाज वास्तव्य करून राहिला आहे.
कृष्णा, वारणा, पंचगंगा या नदीकाठच्या सुपीक भागात राहणारे हे लोक शेती किंवा शेतीवर आधारित व्यापार उद्योग करणारे आहेत,
वाट्याला असलेल्या शेतीत राबणाऱ्या किंवा शेतीमधून येणाऱ्या उत्पन्नावर म्हणजे गूळ, साखर, तंबाखू, हळद यांचा व्यापार करणाऱ्या छोटया मोठ्या अडत व्यापाऱ्यांचाही हा भाग आहे.
या भागात विविध जातीधर्मांचे लोक जसे मराठा, जैन, ब्राम्हण, मुसलमान, लिंगायत, किंवा विविध प्रकारचा उद्यम करणारे जसेकी कोळी, कुणबी, वाणी, पुजारी, कासार, बोगार, लोहार, सुतार, शिंपी, धनगर असे लोकही गुण्यागोविंदाने एकत्र राहतात.
पंचकल्याणिकांसाठी देणगी देणारे जैनेतर लोक जसे या गावात भेटतात तसेच नोकरी धंद्यामुळे पुण्यामुंबईला स्थायिक झालेली कित्येक जैन कुटुंबेही भेटतात. गावाकडच्या पीर बाबाच्या उरुसाला किंवा ग्रामदैवताच्या जत्रेला ती आवर्जून गावी येतात. जाताना मलिद्याचा किंवा चुरमुरे बत्ताशांचा प्रसाद घेऊन जातात. यात जितका भाग श्रद्धेचा आहे तितकाच आपुलकीचा एकोप्याचाही आहे.
या गावात या सर्व लोकांच्या एकत्रित नांदण्याला, सणसमारंभ साजरे करण्याला, आपआपली संस्कृती जपण्याला त्यांचा धर्म, त्यांची दैवते, कधीही आड येत नाहीत. ग्रामीण भागात आढळणारे भयगंड, अहंगंड, व्यसने काही विशिष्ट वेगळे रीतिरिवाज, हे तिथल्या लोकांच्या अज्ञानामुळे, गरिबीमुळे असतात. शिक्षण फारसे नसल्याने अनेक साध्या साध्या गोष्टींचेही ज्ञान नसते. याचाच फायदा काही धूर्त व्यवहारचतुर लोक सहजपणे करून घेतात.
त्यामुळे या कथेतून व्यक्त झालेला जीवनानुभव हा फक्त जैन समाजाचा रहात नाही. हा अनुभव तिथल्या एकसंध, एकरूप समाजाचा ठरतो.
म्हणूनच या कथेला जैन कथा फक्त एवढ्याचसाठी म्हणावे लागेलकी, ही कथा काही जैन धर्मीय कुटुंबातील माणसांच्या घरात, परिसरात घडलेली आहे. त्यांचे रोजचे जगणे, व्यवहार व्यक्त होत असताना त्यात व्हासा करणे, पंचकल्याणिक पूजा, बस्ती, मानस्तंभ, महाराजांचे प्रवचन वगैरे संदर्भ आलेले आहेत. पण एवढे वगळता ही कथा त्या विशिष्ट प्रादेशिक ग्रामीण वर्गाची आहे. एका विशिष्ट प्रदेशातील विशिष्ट भाषेचे, वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक जाणिवेचे, भावनिक बंधांचे दर्शन घडवणारी आहे.
या कथेतलं गाव धर्माचं अवडंबर न माजवता आपलं गावपण जपणारं आहे. हे दाखवणारे अनेक संवाद गावातल्या साध्यासुध्या पात्रांच्या तोंडीही आलेले आहेत. हे संवाद बस्तीतल्या लोकांचे आहेत, मुलगी पाहायला येणाऱ्या पाहुण्यांच्यातले आहेत, तरुण मुलांचे आहेत, आणि सासू-सुनेमधलेही आहेत.
सांगली-कोल्हापूर-जयसिंगपूर भागातल्या ग्रामीण मराठी बोलीवरच नाही तर शहरी बोलीवरही कन्नड भाषेचा प्रभाव आहे. ही भाषा अगदी सहजपणे कथेत आली आहे. या भाषेमुळे व लेखकाच्या सूक्ष्म वर्णनशक्तीमुळे पात्रांचे स्वभावदर्शन जास्त विश्लेषणात्मक न करताही सहजपणे घडते.
गावातल्या लोकांना असणारी पान तंबाखूची व्यसने, त्यातूनच कोणा एकाला जडलेला कॅन्सर, त्याच्यावरून बोध घेऊन शहाणपण आलेले काही गावकरी… अश्या प्रसंगांचा उल्लेख अगदी सहजपणे येतो.
विशेष म्हणजे व्यसनांचा केलेला त्याग दाखवण्यासाठी कुठल्याही धार्मिक व्रतांचा आधार(तशी संधी असूनही) घेतलेला नाही. बस्तीच्या बांधकामासाठी जैनांबरोबरच जैनेतरांनीही सढळ हाताने मदत केली आहे. याचे कारण टोमॅटोला अपेक्षेपेक्षा जास्त भाव मिळून सर्वच गावकऱ्यांच्या हातात पैसा खेळलेला आहे.
कथेच्या शेवटी भीमूच्या वागण्यात झालेला बदल पाहता हा बदल त्याच्यात कसा काय घडला?कदाचित घडलेल्या काही घटनांमुळे तो आपोआपच त्याच्यात झाला की महाराजांच्या प्रवचनाने झाला? याचा कुठेच पुसटसा उल्लेख कथेत आलेला नाही.
त्यामुळे असे वाटतेकी, बस्तीतले नेहमीचे येणेजाणे, देसाई काकूंबरोबरचे सलोख्याचे संबंध, पंचकल्याणिकसारखा महोत्सव पार पाडण्यासाठी जवळ असलेले कुशल नेतृत्वगुण, सामाजिक धार्मिक कार्यात अग्रेसर राहून मोठेपणा किंवा आदर मिळवण्याची सुप्त मानवी वृत्ती या सर्वांचा एकत्रित परिपाक म्हणजे कथेच्या शेवटी इच्छापत्राद्वारे भीमू ऐनापुरेने व्यक्त केलेल्या भावना असाव्यात.
मध्यंतरीच्या काळात जमिनी मिळवण्यासाठी, मानमरातब आदर मिळवण्यासाठी भीमूने जी काही कृत्ये केली त्या गोष्टी आमदारांना समजून आल्या. त्यावेळी भीमूची जी काही मनःस्थिती झाली असेल ती लेखकाने अव्यक्त ठेवली आहे.
त्यामुळेच भीमू ऐनापुरेच्या स्वभावाचा, व्यक्तिमत्वाचा अंदाज येण्यासाठी वाचकाला आपल्या विवेकबुद्धीचा, तर्कशक्तीचा व कल्पनाशक्तीचाही उपयोग करावा लागतो.
साहित्य हे जीवननिष्ठ असावे हा उपयुक्ततावाद शेवटच्या प्रसंगात जाणीवपूर्वक जपला आहे. त्यामुळेच कथासाहित्याचा धर्म आणि त्यात आलेल्या जीवनाचा धर्म एकच असावा असे ठामपणे म्हणता येणार नाही.
घडलेले वास्तव किंवा जीवनानुभव साहित्यात सरधोपटपणे जसे न तसे येत नसतात. कदाचित भीमू ऐनापुरेचे हे व्यक्तिचित्रण म्हणजे, त्या विशिष्ट प्रदेशातील एक दोन किंवा अनेक वृत्ती प्रवृत्तींचा संगमही असेल.
सुरुवातीला किंवा अगदी मध्यंतरापर्यंत तटस्थपणे सत्यदर्शन घडवणाऱ्या या कथेचा शेवट मात्र अत्यंत सजग व सावध वाटतो. उपयुक्ततेच्या निकषांमुळे त्यात थोडी संकुचितता आल्याची जाणवते.
जैन ललित कथांच्या सुरुवातीच्या काळातले स्वरूप थोडे जाणीवपूर्वक जास्तच प्रचारकी ठेवल्यामुळंकी काय पण भीमूचे इच्छापत्र थोडे जास्तच प्रचारकी झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. पण असे असले तरी ही कथा विशिष्ट प्रादेशिक क्षेत्रातल्या लोकांचे जगणे, त्यांची भाषा, यांचे सहजसुंदर दर्शन घडविते.
त्याचप्रमाणे नागरी किंवा महानगरीय लोकांच्या मानाने छोट्या गावातही लोक सांस्कृतिक एकोपा कसा टिकवून ठेवतात, किंवा स्वतःच्या धार्मिक परंपरा जपण्यासाठी, दिखावूपणाची, संधिसाधूपणाची गरज नसते हेच यातून दिसून येते.
जगण्यासाठी अन्न, पाणी, निवारा देणारी भूमीच असते आणि या भूमीशी, मातीशी इमान राखणारी माणसेच एकमेकांना एकत्रित बांधून ठेवत असतात.
शेवटी या कथेच्या निमित्ताने जे काही लिहून झाले त्याचा विचार करता जैन ललित साहित्याच्या वर्धनासाठी पुढील काही गोष्टींचा विचार व्हावा असे वाटते.
साहित्यात जीवनाचेच प्रतिबिंब असते. जीवनातील एखाद्या किंवा अनेक अनुभवांचे एकत्रित दर्शन घडवलेले असते. त्यातून जे काही वास्तव किंवा सत्य दर्शन होते त्याचा जीवनावर काही परिणाम होत असला तरी त्यातून फक्त मार्गदर्शनपर किंवा उपदेशपर गोष्टीच दाखवाव्यात असा आग्रह असू नये.
कथेसारख्या ललित साहित्यातून जर काही बोध मिळवायचाच असेल तर सुजाण वाचकाला तो आपोआपच मिळतो. पण त्यातून काही विपरीत भलते सलते काढणाऱ्याला तो मिळणारच नाही.
शेवटी जैन ललित साहित्य जगवायचे असेल तर फक्त स्वतः जैन तत्वाने जगून चालणार नाही. इतरांना सुद्धा त्यानुसार जगण्यासाठी सहकार्य, तशी परिस्थिती निर्माण करावी लागेल.
साहित्यात जीवनाचे दर्शन असले तरी ती एक स्वतंत्र कला आहे… आणि अतिरेकी उपयुक्ततावाद हा कलेच्या स्वातंत्र्याला बाधक असतो हे निदान आत्मस्वातंत्र्याचे गोडवे गाणाऱ्या जैन साहित्यप्रेमींनी तरी लक्षात घ्यायलाच हवे….
इच्छापत्र,लेखक-प्राचार्य डी. डी. मगदूम, कथासंग्रह, व्रती (समकालीन मराठी जैन कथासंग्रह भाग ४), पान क्र. ५ ते ३७
सुमेरू प्रकाशन, संपादन- श्रेणिक अन्नदाते
आस्वादात्मक समीक्षा – लेखिका सुनेत्रा नकाते