आपले स्वरूप किंवा आपला स्वभाव जसा आहे तसा तो स्वीकारून भयमुक्त होऊन जर आपण त्यावर प्रेम केले तरच आपण आपल्याला लाभलेल्या मनुष्य जीवनाचा रसिकतेने आस्वाद किंवा उपभोग घेऊ शकतो.
यातला उपभोग हा शब्द काही तथाकथित सुसंस्कृत लोकांना कदाचित खटकू शकतो, पण खरे पाहता येथे उपभोग आपण आपल्याला सहजपणे लाभलेल्या प्राकृतिक जगण्याचा घ्यायचा आहे.
“कथानुयोग” हा समकालीन मराठी जैन कथासंग्रहांच्या मालिकेतील सातवा संग्रह आहे. त्यातल्या काही कथा म्हणजे,’हिट्ट हाक्करी’ ‘कर्मजनित’ आणि ‘कन्फेशन’
‘तीर्थंकर’च्या अंकातून पूर्वी वाचल्याच होत्या.
या संग्रहातील ‘जशास तसे ‘ ही कथा वाचताना जी excitement तीर्थंकर’च्या अंकातून वाचताना अनुभवली होती तितकीच excitement कथानुयोगात वाचतानाही अनुभवली… खरेतर अशी excitement असल्याशिवाय आपण त्या कथेचा किंवा गोष्टीचा पुरेपूर आस्वाद घेऊ शकत नाही.
जशास तसे ही कथा ‘वंदे जिनवरम’ मधून साभार घेतलेली आहे. ही कथा सन १९१२ च्या काळातली असून तात्या नेमिनाथ पांगळ यांनी लिहिलेली आहे. या कथेतला तो ‘आमचा तरुण’ अगदी पहिल्या वाचनातच आपण त्याच्या प्रेमात पडावे असाच आहे…. आणि खरेतर आवडत्या कथेतल्या आवडत्या पात्रांच्या प्रेमात आपण पडायलाच हवे.
जशास तसे या कथेतून भेटणारी पात्रे म्हणजे … सतत हातात पंचाचा दांडू घेऊन उभा तवनाप्पा, अस्थी व रक्ताचा संसर्ग असणारी वस्तू म्हणजे परदेशी वस्तू, असे ठणकावून सांगणारा जिनदास, पंचाच्या दंडेलीने हतबल झालेला उपाध्या, नोकराकरवी भल्या मोठ्या साखरेच्या पदकाचा हार मंदिरात आणवून तो उपाध्यायाकरवी देवीला घालावयाची इच्छा बाळगणारी श्रीमान गुर्जर महिला…या सर्व पात्रांमुळेच ही कथा अगदी जिवंत होऊन डोळ्यापुढे उभी राहते.
“घोड्यांच्या टापा” ही मोतिराम अंतिदास मुळावकर यांची कथा आहे. ही कथा म्हणजे गुजगोष्ट, लघुतम निबंध की निबंधात्म कथा? याचे उत्तर माझ्या मते विचारल्यास “गुजगोष्ट’ असेच आहे. आपल्याच मनातल्या एका ‘मी’ ने दुसऱ्या ‘मी’ शी केलेली ती एक गुजगोष्टच आहे.
अपरिहार्यता मग ती अनुभवाची असो वा तत्वज्ञानाची असो ; पण त्या अपरिहार्यतेतूनच आपण आपल्याशीच संवाद साधण्यास आतुर होतो. असे आत्मगत संवाद आपण एकातांत तर नित्यच करत असतो.
संग्रहाच्या प्रस्तावनेत म्हणजेच ‘कथानुयोगातल्या प्रेरणा’ यात मुळावकर म्हणतात त्याप्रमाणे बरंच काही सुंदर सुंदर निसटून गेलेलं आपल्या लेखनातून यायचं आहे. ते आतापर्यंत का आलं नाही याचं अगदी अचूक उत्तर डॉ. मुळावकरांनीच दिलेलं आहे.
ते म्हणतात, ” आपण कथालेखन परिग्रहप्रमाण किंवा कथालेखन अपरिग्रह हे व्रत तर घेतलं नाहीना?”
” घोडयांच्या टापा” या कथेतला भाविक ‘मी’ (भावनांचा परिग्रह करणारा) आपल्याला किती आवडून जातो. कारण ‘मी’ ने असं भावुक असणं, स्वप्नं पाहणं आपल्याला भावणारं असतं.
‘मी ‘ ने असा भावनिक परिग्रह वाढवणारा आत्मगत संवाद नाही केला तर ही गुजगोष्ट वाचायला मिळालीच नसती. आपण जर ‘लहानगा गण्या’ बनलो तरच त्या अबलख घोड्याच्या टापा ऐकायला मिळणार… आपल्या प्रौढत्वाचे ओझे घेऊन खूप खूप मोठे होण्यापेक्षा लहानगा गण्या व्हायला कोणाला नाही आवडणार? पण आजकाल आपण लहान व्हायला घाबरतो. आपल्याला वाटतं की जर आपण लहानगे झालो तर आपल्याला सर्वजण हसतील. हसणाऱ्यांचे भय न बाळगता भयमुक्त होऊन जर आपण लिहू तरंच आपण आपल्या चैतन्यमयी आत्म्याचे कल्लोळ अनुभवू शकू…
कथानुयोतल्या ‘जशास तसे’ व ‘घोड्यांच्या टापा’ या दोन कथांचा मी मनसोक्त आस्वाद घेतला. बाकीच्या कथाही खूप चांगल्या आहेतच पण त्यावर इतरांनी लिहावं म्हणून इथेच थांबते.
डॉ. संतोष मुळावकरांना भावलेल्या ‘कथानुयोगातल्या प्रेरणा’ हे प्रास्ताविक तर खूपच अभ्यासनीय झाले आहे. मुळावकरांची लेखनशैली वरवर पाहता तिरकस भासत असली तरी ती तिरकस म्हणण्यापेक्षा जास्त वळणदार आहे. त्यातली मोहक वळणे ओळखून त्या वळणांनी जाणाऱ्या कथा, लघुतम कथा, गुजगोष्टी आपण लिहायला हव्यात.
डॉ. कल्पना संतोष मुलावकार यांची निवड व त्या निवडक कथांची कथानुयोगातली क्रमवार मांडणी योग्यच आहे. कथांमधून सांगितली गेलेली जैन दर्शनातील मूल्ये त्यामुळे क्रमाक्रमाने आपल्यापुढे उलगडत जातात.
आगम म्हणजे शास्त्र आणि आगमाच्या भागाला अनुयोग म्हणतात अशी सरळ, सुबोध, नेमकी व्याख्या त्या करतात.
प्रथमानुयोगात धर्मतत्वज्ञान आणि लोकजीवनाची घातलेली सांगड कथानुयोगातल्या कथांतूनही घातली गेली आहे.
अधिकानुयोगात आलेल्या दोन कथा या पुढील कथासंग्रहाची झलक दाखवतात. एकंदरीत हा कथासंग्रह रसिकांना आवडेल असाच आहे…
कथानुयोग, कथासंग्रह(समकालीन मराठी जैन कथासंग्रह भाग ७)
संपादन – प्रा. डॉ. सौ. कल्पना संतोष मुळावकर , प्राचार्य डॉ. संतोष मोतीराम मुळावकर.
सुमेरू प्रकाशन डोंबिवली पूर्व
आस्वादक- लेखिका सौ. सुनेत्रा नकाते