कुंकू हळदी, नेसुन शालू, झाले वरमाई!
गुंजत आहे, कानामध्ये, मंजुळ शहनाई!
मांडव दारी, तोरणात बघ, आंब्याची पाने!
प्राजक्ताला, सांगत आहे, सुगंध फुलजाई!
पिता वराचा, स्वागत करण्या, फेटा बांधुन उभा!
दिल्या घेतल्या, आनंदाची, करण्या भरपाई!
लेक करवली, घेउन चाले, दीपज्योत हाती!
राजस सुंदर, लेक हासरा, हसते हिरवाई!
वधू सुंदरी, गुणी लाजरी, करात वरमाला!
ऐक अंबरा, उधळ मौक्तिका, आता कर घाई!