कळस … आस्वादात्मक समीक्षा – KALAS


पुनीत या समकालीन मराठी जैन कथासंग्रहातील ‘ कळस ‘ या कथेचा काळ पाऊणशे ते शंभर वर्षांपूर्वीचा आहे. म्हणजे अगदी विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा हा काळ असावा.
कथेला त्या वेळच्या महाराष्ट्रातील नांदणी, फलटण, नातेपुते, वाल्हे, दहिगाव या गावांची पार्श्वभूमी लाभलेली आहे.
श्रेणिक अन्नदाते हे कथालेखक असले तरी त्यांचा मूळ पिंड पत्रकारितेचा आहे. त्यांच्या लेखनाच्या प्रारंभीच्या काळात विविध जैनेतर मासिकांतूनही त्यांनी कथालेखन केलेले आहे.
म्हणूनच ‘ समकालीन मराठी जैन कथा ‘ या नावावरून त्यांनी चालू केलेली ललित कथालेखनाची चळवळ जरी विशिष्ट संप्रदायाची वाटत असली तरी मुळात ही चळवळ साहित्य धर्मियांची आहे.

कुठलेही साहित्य मग ते कथा, चरित्र, कादंबरी, काव्य, आत्मचरित्र काहीही असो त्याची गुणवत्ता त्याच्या प्रामाणिकतेवर, उस्फुर्ततेवर, चिंतनात्मक भाष्यावर जितकी अवलंबून असते तितकीच ती कलाकृती त्या विशिष्ट साहित्य प्रकाराचा घाट, तोल कितपत सांभाळते यावरही अवलंबून असते.
श्रेणिक अन्नदाते यांनी संपादित केलेल्या पुनीत या कथासंग्रहातील कथा त्यादृष्टीने पाहता कथानकाचा घाट सुव्यवस्थितपणे सांभाळणाऱ्या आहेत.
अलीकडच्या काळातील पिढीला म्हणजे अगदी जन्मापासूनच ज्यांच्यावर दूरदर्शन, संगणक आदि माध्यमांचा पगडा आहे अश्या पिढीच्या वाचकांना कदाचित या कथा थोड्या जास्तच तपशीलवार नोंदी देणाऱ्या वाटतीलही पण … लेखक हा जेव्हा पत्रकार असतो आणि एका विशिष्ट कल्याणकारक ध्येयाने प्रेरित होऊन कथा लेखन करत असतो तेव्हा तेव्हा कथालेखनातही त्याचा सावधपणा, चौकसपणा दिसून येतो. नव्या पिढीला कदाचित कथेत येणारी तपशिलांची परिपूर्णता अनावश्यक वाटतही असेल पण एकंदर कथालेखनाकडेही सांस्कृतिक, ऐतिहासिक,सामाजिक लोकजीवनाचा ठेवा म्हणून पाहणाऱ्यांना हे तपशील आवश्यक ठरतात. अश्या नोंदी तपशीलवार देण्यात लेखकाची बहुश्रुतता जशी दिसून येते तसाच दूरदर्शीपणाही दिसून येतो.

एका छोट्याश्या कथेतून त्या काळातील धार्मिक, ऐतिहासिक, भौगोलिक परिस्थिती, त्यावेळचे लोकजीवन, लोकांचा धर्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन, कुठल्याही काळात मानवी मनाला असलेले कल्पनियाचे वेड, गुरूंबद्दल वाटणारा आदर, धर्ममंदिरांचे, धर्मस्थळांचे जनमानसात असणारे अढळ स्थान याबद्दलची चतुरस्त्र माहिती कशी सहजपणे मिळते हे ‘कळस ‘ ही कथा वाचल्यानंतर जाणवते.

कळस या कथेचा नायक ब्रम्हचारी पुष्पदंत आहे. मायदेशाहून येताना गुरूंनी त्याला आपल्याबरोबर आणले आहे. नुकताच तारुण्यात पदार्पण केलेला तसा हुशार पण फारसा चलाख नसलेला, श्रद्धाळू, आज्ञाधारक, सावलीप्रमाणे गुरुंची पाठराखण करणारा असे त्याचे वर्णन कथेत येते.
गुरुंनी मंदिराच्या शिखराचे आणि त्यावरील सोनेरी कळसाचे बरेचसे आणि अर्धवट राहिलेले काम आपल्या या कोवळ्या शिष्यावर सोपवून समाधी घेतली आहे. ब्रह्मचारी पुष्पदंत जीवापाड मेहनत करून मंदिराचे काम पुढे रेटीत नेत आहेत. समाजाची साथ तर त्यांना आहेच पण अंतर्मनात वसलेल्या गुरुंच्या चिंतनाने मनाला सामर्थ्यही प्राप्त झाले आहे.

थोडक्यात कळस ही कथा म्हणजे ब्रम्हचारी पुष्पदंतांनी अनुभवलेले गुरुंच्या प्रभावाचे परिणाम, त्यांच्या अभावाने म्हणजे नसण्याने जाणवणारी हुरहूर, त्याबरोबरच इतर श्रद्धाळू श्रावक श्राविका, सामान्य कष्टकरी माणसे यांच्या गुरुंबद्दलच्या लोकविलक्षण श्रद्धा, त्या श्रद्धेतून निर्माण झालेल्या कपोलकल्पित किंवा चमत्कृतीपूर्ण गोष्टी, या गोष्टी कर्णोपकर्णी पुढे पुढे जाताना त्यात पडलेली स्वाभाविक भर यांची एक सुंदर कहाणी आहे.

गुरु ब्रह्ममतिसागर यांचे व्यक्तिचित्रण त्या काळातील जैन गुरुंचे आचरण, आहार, विहार, दिनचर्या यांचे वर्णन करणारे आहे.
त्यांचे तपाचरण मुनींसारखेच कडक असले तरी ते धर्मकार्याबरोबरच जनकल्याणाचे आणि लोकशिक्षणाचे कार्यही करतात. याशिवाय ते रसिक व कविमनाचे आहेत. म्हणूनच त्यांनी रचलेली भजने, अभंग, ओव्या लोक भक्तीने गातात. त्यामधून सर्वसामान्य जनतेला जीवन सदाचरणाने, विवेकाने, जागरुकतेने जगण्याची प्रेरणा मिळत असे. यावरून गुरु ब्रम्हमतिसागर हे णमोकार मंत्रातील ‘साहू ‘ या पदाला सार्थ असे व्यक्तिमत्व होते . कारण जनमाणसात राहूनही आत्मकल्याणाचा क्षणभरही विसर न पडू देणारे हे व्यक्तिमत्व होते असे कथेतल्या त्यांच्या वर्णनावरून दिसून येते.

कथेत येणाऱ्या काही वर्णनावरून असे लक्षात येतेकी त्या काळात मंदिरे, मूर्ती, लेणी यांना परकीय आक्रमणाचा धोका असल्याकारणाने त्यांचे रक्षण करण्याच्या हेतूने भुयारी मंदिरे, ग्रंथालये असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कथेतल्या काही वाक्यांवरून हे ध्यानात येते. उदा.

” ब्रम्हमतिसागर हे अनुभवी व दूरदृष्टी होते. आक्रमणाची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी भुयारातही भव्य दगडी तेवढेच प्रशस्त सुंदर मजबूत मंदिर बांधण्याची योजना आखली होती. ”
किंवा कथेच्या सुरुवातीलाच ब्रम्हमतिसागरांच्या संदर्भात खेडुतांकडून सांगितली जाणारी ही गोष्ट पहा,
… एकदा म्हणे ग्रंथलेखनासाठी संदर्भासाठी काही पोथ्या त्यांना हव्या होत्या. त्या तर राहिल्या दूर विदर्भात… मग… ब्रम्हमतिसागरांनी एक खड्डा खणला. मुहूर्त पाहून आणि मंत्र जपत त्यात स्वतः बसले. खड्ड्यावर एक धवल वस्त्र ठेऊन त्यावर चारी बाजुंनी दगड ठेऊन खड्डा बंद करायला(झाकायला) सांगितले. रात्र होऊ लागली. भोवताली लोक रक्षणासाठी होतेच. हळूहळू रात्र पुढे सरकत होती. पहाटे पहाटे तांबडं फुटताच ब्रम्हमतिसागरांनी ठरलेली खूण केली. लोकांनी वस्त्र दूर केले. काहीही जवळ न घेता खड्ड्यात उतरलेले ब्रम्हमतिसागर हातात पोथ्या घेऊन बाहेर आले. ”

या गोष्टीवरून त्या काळातही लोककल्याणासाठी झटणारे लोक काही वेळा लोकांच्या भाबड्या श्रद्धांचा उपयोग चांगल्या कामासाठी कसा कुशलतेने करून घेत हे लक्षात येते.
कदाचित ब्रम्हमतिसागरांनी जेथे खड्डा खणला तेथून आत जाणारा एखादा भुयारी मार्गही असू शकतो. तेथे एखादे सुसज्ज व सर्व सुविधांनी युक्त असे एखादे ग्रंथभांडार ज्यात वर्षानुवर्षे ग्रंथ सुरक्षित राहू शकतील … असे असण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
याचबरोबर ही घटना प्रत्यक्ष न पाहिलेला पण स्वप्नाळू वयाच्या वळणावरच अश्या विशुद्ध गुरुंचा सहवास लाभलेल्या व त्यांचे शिष्यत्व पत्करलेल्या पुष्पदंताला याबद्दल कसलीही शंका घ्यावीशी न वाटणे हेही स्वाभाविकच वाटते. कारण ब्रम्हमतिसागर व पुष्पदंत यांच्यातले भावबंध वात्सल्याचे होते. विद्येच्या आराधनेच्या काळात कठोरपणे अनुशासनबद्ध वागणारे महाराज अन्यवेळी शिष्याशी माऊलीच्या आस्थेने वागत असा उल्लेख कथेत आहे.

धनजी खेमचंद हे फलटणमधील एक सराफही या कथेत आहेत. त्याकाळी लोक मंदिरात दान म्हणून जशी रोकड रक्कम देत तशीच चारसहा एकर जमीनही मंदिराच्या रोजच्या उत्पन्नासाठी दानात देत. स्त्रिया त्यांच्याजवळ असलेले स्त्रीधनही दानात देत.
त्या काळात स्त्रीधन म्हणजे लग्नात मुलीला तिच्या माहेराकडून मिळणारे दागिने असत. हे दागिने ठेवण्यासाठी बसक्या आकाराचा विशिष्ट घडणीचा पितळी डबा वापरला जाई. जुन्या मराठी कृष्ण धवल सिनेमातून असे डबे आजही आपण बघत असतो.

गुरु ब्रह्ममतिसागरांनी त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या काळात त्यांना मिळणाऱ्या नैसर्गिक संकेतांचा अर्थ जाणून अचानक समाधी घेतल्याने मंदिर बांधणीतील महत्वाच्या शिखराचे व त्यावरील सोनेरी कळसाचे काम पूर्ण करताना ब्रम्हचारी पुष्पदंतांस जीवापाड मेहनत करून काम रेटावे लागत होते. महाराज ब्रह्ममतिसागरांच्या उपस्थितीत ज्या आस्थेने व तत्परतेने देणग्या मिळत तो ओघ आता मंदावला होता. म्हणूनच मंदिराच्या बांधकामासाठी जेव्हा रोकड कमी पडे तेव्हा दानात आलेल्या पितळी बसक्या डब्यातील दागिने ते मोडत असत व रक्कम आणीत असत.

जेव्हा असे एक एक करून दानात आलेल्या डब्यातील दागिने संपत आले तेव्हा सराफ धनजी खेमचंद यांनी ब्रम्हचारी पुष्पदंतांस एक सल्ला दिला. त्याप्रमाणे प्रत्येक वेळी दागिने न मोडता डबा जसा न तसा त्यांच्याकडे ठेऊन त्याबदल्यात रक्कम नेण्याची सूचना त्यांनी केली. पण आता बराच उशीर झाला होता. दागिन्यांचा दानात आलेला शेवटचा डबाही आता रिकामा झाला होता.

कारागिरांचे व मजुरांचे पगार, त्यांच्या रोजच्या मीठ मिरचीची काळजी पुष्पदंतांना सुटलेली नव्हती. म्हणूनच स्वतःच्या मनाने ते शेवटी एक निर्णय घेतात. रिकाम्या पितळी बसक्या डब्यात कपड्यात बांधून काही वजनदार खडे(दगड) ते ठेवतात. तो डबा खेमजींकडे ठेऊन ते रक्कम आणतात. हे सर्व करत असताना ब्रह्मचारी पुष्पदंतांच्या मनास झालेल्या यातना वाचक नक्कीच जाणू शकतात. हे कार्य ब्रम्हचारींनी मनावर दगड ठेऊनच केले असावे हे जाणवते.

धनजी खेमचंद हे या कथेतले पात्र जसे आर्थिक दृष्ट्या संपन्न आहे तसेच मनानेही संपन्न समृद्ध आहे. सराफीच्या व्यापारातील त्यांचा अनुभव, रत्नपारखी नजर आणि केवळ स्पर्शानेसुद्धा वस्तूचे फक्त वजनच नाही तर आतल्या धातूची शुद्धता ते सहज जाणणारे आहेत. म्हणूणच पुष्पदंतांच्या या कृतीमागील विशुद्ध व उदात्त हेतू जाणून ते मौन बाळगतात.

गुरु ब्रह्ममतिसागर, ब्रम्हचारी पुष्पदंत व सराफ धनजी खेमचंद यांच्याशिवाय या कथेत आणखी दोन महत्वाची स्त्रीपात्रे आहेत. पहिली स्त्री म्हणजे गुणवंती…जी कोल्हाट्याची पोर आहे. ही पोर नांदणीच्या भट्टारकांच्या मठाच्या परिसरात वाढलेली आहे. तिथले संस्कार झालेली मनाने विशुद्ध अशी ही मुलगी आहे.
ती पारसनाथाची भक्त आहे.
दुसरी स्त्री म्हणजे धनजी खेमचंदांची पत्नी रतनबाई आहे … जी पतीविना कधी श्वासही न घेऊ शकणारी त्यांच्यात पूर्णपणे एकरूप झालेली स्त्री आहे.

खरेतर स्त्रीपात्राविना कुठलीही खरी कथा पूर्णच होऊ शकत नाही. ज्या कथेत स्त्रीपात्र नसेल किंवा स्त्रीविषयक चर्चा नसेल त्या कथेत रंगत येतच नाही. खरेतर जैन ललितकथा असोत किंवा प्रथमानुयोगातल्या पुराणकथा असोत त्या डोळसपणे वाचल्या तर स्त्री ही मुक्तीच्या मार्गातली धोंड असे कोणी म्हणूच शकणार नाही. फारच झाले तर तिला मुक्तीच्या मार्गावरील फुलबाग असे आपण म्हणू शकतो. तसेच कथेतल्या पुरुषपात्रांनाही आपण मुक्तीच्या मार्गावरील धोंडे म्हणूच शकत नाही.

फुलबागेत अनेक फुले असतात. फुलं आपल्याला आवडतात. फुलांना तुडवायचं की कुस्करायचं की दुरूनच त्यांचा गंध घ्यायचा, त्यांना दुरूनच पहायचं हे स्वतःच्या क्षमतेनुसार इच्छेनुसार आणि फुलांच्याही इच्छेनुसार ठरवायचं असतं. फुलांच्या इच्छा विशुद्ध हृदयाला सहज जाणवतात.

धनजी खेमचंदांची पत्नी गृहकृत्यदक्ष आणि पारंपरिक रीतभात सांभाळणारी आहे. त्याचप्रमाणे तिची नजरही तीक्ष्ण आहे हे तिच्यात व गुणवंतीच्यात झालेल्या संवादावरून सहज जाणवते. उदा.

” मी गुणवंती…महिगावच्या मंदिराच्या कामावर असणाऱ्या कमळाबाईंची लेक ! तुमच्याकडं तिथले ब्रह्मचारी येऊन गेले आत्ताच, व्हय ना !
” हो ! थांबलेच नाहीत ! काही घेतलही नाही ! फार मेहनत करतात बिचारे, पण का गं ? तुझं त्यांच्याशी काय काम ? ”
” बाई, एक नाजूक गोष्ट आहे … ” गुणवंती असे म्हणताच रतन बाई थबकल्या. नजर रोखून पाहू लागल्या.
एक तरुण मुलगी ब्रह्मचाऱ्याविषयी नाजूक गोष्ट सांगतेय….. त्यांच्या नजरेत या कथेत … वेगळेच भाव उतरलेत. ते ओळखून गुणवंती म्हणाली, ” नाही, नाही… बाईजी, तसलं काही वाईट साईट नाही … पण… त्यांनी तो डबा ठेवलायना … असं म्हणत गुणवंतीने सगळी हकीकत सांगितली.

कथेतली ही गुणवंती अशिक्षित असली तरी मोठी प्रगल्भ, चतुर व तितकीच सतेज व टवटवीत असणार हे कथेतल्या पुढील वर्णनावरून सहज जाणवते. उदा.
… ब्रह्मचारीजींच्या जणू मागावर असलेल्या गुणवंतीला पुष्पदंत आल्याचं कळालं… आणि तिच्या अंगांगातून लहर निघाली. तिला त्यांच्याशी बोलावं, भेटावसं वाटत होतं … पण बहाणा काय करायचा? आणि तो मुकादम, तो तर जणू पहारेकरीच….

कथेतल्या अश्या मोजक्याच वाक्यांवरून, संवादामधून गुणवंतीची त्या ब्रह्मचारी पुष्पदंतावर प्रीत जडल्याचे जाणवते. कारण तिचे वयच असे कोणावर तरी प्रीत जडण्याचे आहे. पण तरीही त्या दोघांमधले सर्वच बाबतीत असलेले अंतर ती जाणते. म्हणूनच तिच्या प्रीतीत आकर्षण असले तरी त्यापेक्षा जास्त आदर व प्रिय व्यक्तीच्या प्रतिष्ठेला जपण्याची धडपड कळते. म्हणूनच तिची ही प्रीत त्यांच्यावरील प्रेमात सहज रूपांतरित होऊ शकते.

प्रीत आणि प्रेम हे दोन शब्द आणि त्या दोन शब्दातला, त्यांच्या अर्थातला सूक्ष्म फरक फक्त अतिसंवेदनशील माणसेच जाणू शकतात. प्रीत या शब्दातून सूक्ष्म आकर्षण जाणवते व प्रेम या शब्दातून त्या आकर्षणावर जाणूनबुजून सोडलेले उदक जाणवते. प्रेम हे एकतर्फी असो वा दुतर्फी पण व्यक्तीच्या मनातल्या सुप्त इच्छेतूनच निर्माण होते.

समकालीन मराठी जैन ललित कथांमधून येणारा शुंगार म्हणूनच असा सावधपणेच व्यक्त झाला आहे. कारण त्यामागील हेतू प्रेम करणाऱ्या व्यक्तींमधील प्रेमाला उत्तान रुप येऊ नये असाच आहे

समकालीन मराठी जैन कथासंग्रहातील सातही भागातील कथा वाचल्यास हे लक्षात येते की या संग्रहांमधील काही कथांतून प्रियकर व प्रेयसी किंवा पती-पत्नींमधील शृंगार वर्णने आहेत पण त्यामुळे मनाला उबग येत नाही, घृणा वाटत नाही किंवा हा शृंगार मनाला विकृत पद्धतीने चळवितही नाही. तो मनाला सुगंधित करतो. प्रेम असफल झाले तरी तो मनाला नैराश्याच्या खाईत लोटत नाही. उलट हळूहळू तो मनाला एका उच्चतम पातळीवर जाण्यास मदत करतो.

कळस या कथेतले ब्रह्मचारी पुष्पदंत कुमारावस्थेतून नुकतेच तारुण्यात पदार्पण केलेले युवक आहेत. त्यामुळे या तरुण व स्वच्छ मनाच्या गुणवंतीबद्दल त्यांच्या मनात काही क्षण किंवा काही काळ आकर्षण निर्माण होणे स्वाभाविक आहे. पण तरीही ते तिच्याशी कमीत कमी बोलण्याचा प्रयत्न करतात. तिला टाळतात. पण स्वतःच्याही नकळत मनातली चिंता ते तिच्यापुढेच मोकळेपणाने बोलून दाखवतात. म्हणूनच गुणवंतीला त्यांच्या मनातली चिंता कळते. ती चिंता दूर करण्यासाठी तिला शक्य असेल तेवढी सर्व धडपड ती करते.

जैन ललित कथांची ही चळवळ एका उदात्त मूल्यावर आधारलेली आहे. ते मूल्य म्हणजे अहिंसा ! येथे अहिंसा याचा अर्थ मनाची कोमलता जपणे. स्वतःच्या मनाच्या बरोबरच दुसऱ्याच्या मनाची कोमलताही जपणे. अहिंसा हे मानवी मनाच्या कोमलतेचेच एक रूप आहे . जैन धर्मियांच्या या कथांतून लेखकांच्या किंवा लेखिकांच्या संवेदनशीलतेनुसार ही अहिंसाच व्यक्त झालेली आहे.

जे जे अमूल्य सुंदर व सुगंधी आहे त्यातलं सौंदर्य मूल्य परिमल मानवी मनाला इंद्रियांना जाणवल्याशिवाय रहात नाही. इंद्रिये म्हणजे मनाचे जणू झरोकेच असतात. साहित्यिकाला जी प्रतिभा लाभलेली असते त्या प्रतिभेमुळे हे सौंदर्य, हा परिमल त्याच्या साहित्यालाही लाभतो.

या कथेतली लेखकाची लेखनशैली प्रवाही आहे. मानवी मनाची तरलता, त्यातला भावनांचा ओलावा पात्रांच्या देहबोलीतूनही टिपणारी आहे. उदा. पुढील काही वाक्ये पाहिल्यास हे लक्षात येईल.
… त्यांनी रतन बाईंच्या तब्येतीची चौकशी केली…उलटी चार बोटे त्यांच्या कपाळाला लावून पहिली. किंचित गरम लागलं खरं ! पण ताप म्हणता येणार नाही.
किंवा
” नाही …नाही…बाई, असं म्हणू नका .. मी कुठेच बोलणार नाही.. असं म्हणत तिने रतन बाईंना नमस्कार केला. दोघींच्याही डोळ्यात पाणी तरळलं होतं.
किंवा
… दागिन्यांची पुरचुंडी आणि पातळ- खण- नारळ घेऊन ती महिगावला जाणाऱ्या एखाद्या गाडीच्या शोधात जड पावलांनी गाडी तळाकडं निघाली….

अश्या प्रकारे लेखनशैलीत त्या काळाचे वेगळेपण जपणारी, लोक जीवनात येणाऱ्या अडीअडचणी कथन करणारी, त्या काळातल्या वेगवेगळ्या सामाजिक सांस्कृतिक धार्मिक चालीरीती सांगणारी, कधीकधी संभ्रमातून व गैरसमजातून निर्माण होणाऱ्या रहस्यकथांच्या रहस्यांचा उलगडा फक्त मनमोकळ्या संवादातूनच होऊ शकतो हे सांगणारी ही कथा हळुवारपणे मानवी मनाचे पदर उलगडत जाते.

या कथेत गुरु व शिष्य यांच्यातले वात्सल्यपूर्ण संबंध लेखकाने हृद्य रेखाटले आहेत. म्हणूनच गुरु व शिष्य यांच्यातले वेगळ्या पातळीवरचे संबंध, त्यांच्यातली आत्मीयता, त्या काळात शिष्याला गुरुंबद्दल वाटणारा आदर, गुरुंबद्दलच्या आख्यायिका ऐकताना शिष्याला होणारा आनंद, शिष्य म्हणून जगत असताना जवळ असावा लागणारा भाबडा पण सावध स्वभाव, लोकमानसात गुरुंबद्दलचा आदर प्रेम टिकवून ठेवण्यासाठी शिष्याला करावी लागणारी कसरत हे दाखवणारी ही कथा विशिष्ट धर्मियांची आहे असे म्हणण्यापेक्षा धर्मनिरपेक्षता दाखवणारी आहे असे म्हणणे जास्त योग्य ठरेल.

धर्मनिरपेक्षता ही कुठल्याही धर्माच्या विरोधात असूच शकत नाही. धर्मनिरपेक्ष साहित्यातून म्हणजे कथा काव्य किंवा कादंबऱ्यांतून धार्मिक कल्पना, प्रतिमा, प्रतीके काही रूढ संकेत, स्वर्ग मोक्ष इत्यादी कल्पनांचा वापर केलेला असू शकतो.

या कथेत एके ठिकाणी असा उल्लेख आलेला आहेकी, ब्रम्हमतिसागर जे लेखन करीत ते बोरूने करीत. त्यासाठी लागणारी शाई ते स्वतः तयार करीत. शाईसाठी लागणारे पाणी चारचारदा वस्त्रगाळ करीत. या वस्त्रगाळ पाण्यासंदर्भात अहिंसा हे तत्व तर येतेच पण असे गाळरहित पाणी अतिशय प्रवाही तर असणार हे ही खरेच …असे पाणी वापरुन बनवलेली शाई लेखणीतून सहज सहज झरणारी, लेखणीची धार टिकवणारी, लिखाणाचा वेग वाढवणारी, अक्षरांना टिकावू स्वरूप देणारी असेल. म्हणूनच आजही आपण जुन्या काळातल्या विशिष्ट आणि वेगवेगळ्या धर्मियांच्या मंदिरातील शिल्पकलेचा आस्वाद व आनंद घेऊ शकतो, ग्रंथभांडारातील ओव्या अभंग ललित कथा, पुराणे यांना वाचू शकतो, त्यांचा अभ्यास करू शकतो, कलात्मक दृष्टीने त्यांचा आस्वाद घेऊ शकतो. असे करत असताना त्यात दडलेल्या लोकसंस्कृतीची बीजे आपल्याला सापडू शकतात.

म्हणूनच विशिष्ट धर्मप्रतीकांचा व पूजा पद्धतींचा तौलनिक व प्रमाणबद्ध वापर करणाऱ्या, अंतरीच्या देवत्वाला साद घालणाऱ्या, रसिक मनातील प्रेमभावना हळुवारपणे उमलवणाऱ्या या कथांवर आपण संप्रदायिकतेचा आरोप करूच शकत नाही.

” कळस ” हे या कथेचे शीर्षक कथेला साजेसेच आहे. मंदिराच्या शिखरावर सोन्याचा कळस चढवण्यासाठी गुरूने तश्याच योग्यतेचा शिष्य निवडला आहे. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस … या उक्तीप्रमाणे गुरूंनी भक्कम पाया रचून दिला आहे. तो पाया फक्त दगडी मंदिराचाच नाही आहे तर गुरु ब्रम्हमतिसागर तिथल्या आजूबाजूच्या शतक्रोशीतल्या माणसांच्या मनातही धर्मतत्वांचा भक्कम पाया रचून गेले आहेत. त्यावर कळस चढवण्यासाठी गुणवंतीसारखी कोल्हाट्याची पोर जशी धडपडते आहे तशीच रतन बाईंसारखी शेठाणीही धडपडत आहे.

रतन बाईंनी ब्रम्हचारी पुष्पदंतांची प्रतिष्ठा टिकून राहावी म्हणून दागिन्यांच्या डब्यातले खडे काढून तेथे स्वतःचे दागिने ठेवले आहेत. या सर्व घटनांमुळे एखादी आख्यायिका जन्माला येईल असे वाटून कथेच्या शेवटी रतन बाई म्हणतात,
“ब्रम्हचारीजी डब्यात दागिने पाहून चकित होतील… आणि कदाचित लोकांना सांगायला सुरुवात करतील की ब्रम्हमतीसागरांच्या पुण्यप्रभावाने दगडाचंही सोनं झालं. पण या घटनेकडे व्यवहार आणि निश्चय या दोन्ही नयाने पाहणारे धनजी खेमचंद म्हणतात,
” होय, एका अर्थाने ते खरंही आहे.” ….
धनजी खेमचंद असे का म्हणतात? कारण ते नक्कीच जाणून असणार की ब्रम्हचारी अश्या आख्यायिका कोणालाही सांगणाऱ्यातले नाहीत पण या घटनेकडे भाबडेपणाने पाहणारे लोक मात्र अश्या आख्यायिका सांगून नक्कीच कल्पना विश्वात रमून जातील.

या ललित जैन कथा साहित्यातून प्रामुख्याने येणारे रस हे प्रामुख्याने शृंगाररस, वीररस व शांतरस हे आहेत… क्वचित कोणी हास्यरसाचा वापर केला आहे. पण शृंगार, वीर व शांत हे रस ही जैन साहित्याला रसपूर्ण बनवण्यास पुरेसे आहेत. पण तरीही या आधीच्या म्हणजे मध्ययुगीन काळात बदलत्या परिस्थितीत धर्मतत्वे टिकवण्यासाठी जैन संतांनी जास्तीत जास्त शांत रसाचाच उपयोग केलेला आहे. साहित्यात सर्व रस समतोलपणे यावेत म्हणून समाजातील विचारवंतांनी जैन ललित साहित्याकडे गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे.
ही कथा वाचताना कथेत असे अनेक संदर्भ आले आहेतकी त्या संदर्भांचा उपयोग करून त्यांचा यथायोग्य अर्थ लावण्यासाठी समाजातील साहित्यिकांनी समीक्षकांनी अनेकांतवादाचा उपयोग करणे अपेक्षित आहे. वैज्ञानिक कसोट्यांचा वापर करणे अपेक्षित आहे. आणि असे करून साहित्य वाचणे जगणे म्हणजे साहित्याचे मूल्य वाढवणे होय.
साहित्याचे मूल्य जर असेच आपण वाढवीत गेलो तर एखाद्याला त्यातून जगण्याचे मूल्यही नक्कीच सापडू शकते….

कळस – लेखक श्रेणिक अन्नदाते, कथासंग्रह – पुनीत (समकालीन मराठी जैन कथासंग्रह भाग १),पृष्ठ क्र. १७० ते १८५…
संपादन- श्रेणिक अन्नदाते
आस्वादात्मक समीक्षा – लेखिका सुनेत्रा नकाते


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.