कवी मनाला सौंदर्याचे वेड असते. म्हणजे फक्त एखाद्या वस्तूचे, स्थळाचे, किंवा व्यक्तीचे बाह्यरुपच नाही तर त्यातील अंतरंगाच्या सौंदर्याचा शोध घेण्यासाठीही कवी मन धडपडत असते. निसर्गातले गूढरम्य चमत्कार, घटना यांचा तळागाळापर्यंत जाऊन शोध घेण्यासाठी कवी, कलाकार, शास्त्रज्ञ, संशोधक स्वतःच्या पद्धतीने सतत प्रयत्न करत असतात.
कवीच्या सुप्त मनाला सतत अपूर्णातून पूर्णाकडे जाण्याची ओढ असते. सृष्टीतील गूढत्वाचे कवी मनाला आकर्षण असते, ध्वनी, शब्द, रस, रंग, रूप, गंध, तेज यांनी शिगोशीग भरून वाहणाऱ्या जीव-अजीव सृष्टीतील वनस्पती व प्राणिमात्रांबद्दल त्याला प्रेमही वाटत असते. सौंदर्य हे तर खरे पाहणाऱ्याच्या दृष्टीत मनात असते हे तर खरेच पण ज्याला आपण पाहतो, ऐकतो, स्पर्श करतो, अनुभवतो तेसुद्धा जर तितकेच सुंदर असेल तर समसमा संयोगाच! म्हणूनच कवितेचे सौंदर्य तिला जन्म देणाऱ्या कवीच्या आंतरिक सौंदर्यावर जसे अवलंबून असते त्याचप्रमाणे ते कवितेला निमित्य ठरलेल्या घटनेवर, स्थळावर, व्यक्तीवरही अवलंबून असते.
प्राचीन काली सुद्धा महाकाव्य खंडकाव्य याप्रमाणे स्फुट रचना, भावगीतात्मक रचना बुद्धिमान, सुसंस्कृत, सुशिक्षित, अधिकारी व्यक्तींकडून जश्या निर्माण व्हायच्या तश्या त्या सामान्य कष्टकरी, शेतकरी, मजूर, गरीब स्त्रिया थोडक्यात या गटातला संवेदनशील भावनाप्रधान वर्ग यांच्याकडून होतच असणार. पण या वर्गातल्या लोकांना हे सर्व साहित्य हस्तलिखित स्वरूपात, मुद्रण स्वरूपात नीटसपणे संकलित करून ठेवण्याचे ज्ञान किंवा आर्थिक परिस्थिती त्यांना अनुकूल नसल्याने त्यांचे साहित्य लिखित स्वरूपात उपलब्ध होऊ शकत नाही. मग या विशिष्ट वर्गातले लोक आपल्या रचना मौखिक स्वरूपात पाठांतर करून एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यन्त प्रवाहित करीत असावाहे होत असताना वर्षानुवर्षे हे घडत राहिल्याने दर पिढीगणिक बदलत जाणारी सामाजिक,आर्थिक भौगोलिक परिस्थिती ज्ञानभाषा,बोलीभाषा, प्रमाणभाषा, व्यक्त होण्याच्या विविध पद्धती यामुळे या मौखिक रचनांमध्ये हळूहळू नकळतपणे बदल होत गेले. पण मूळ गाभा काही जाणत्या लोकांनी प्राणपणाने जतन केला तर काही वेळा अनावधानामुळे काही महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष्य झाले. कुठल्यातरी दबावामुळे वा ऐकण्यातलया, उच्चरणातील गफलतीमुळे काही बदल अपरिहार्यपणे घडत गेले. (काहीवेळा हस्तलिखित प्रति किंवा मुद्रण प्रती किंवा संगणकीय प्रतीत सुद्धा मुद्रणातील दोष किंवा अक्षरे लिहिण्याच्या वेगळ्या शैलीमुळे घाई गडबडीमुळे नकळतपणे हे बदल होत असतात.जाणकारांचे याकडे लक्ष असायला हवे.) सध्याचा काळ हा संगणकांचा, आंतरजालाच्या उपलबध्दतेचा काळ आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य व सर्वच माध्यमांची सहज उपलब्धता सर्व स्तरातील लोकांना असल्याने माणसे व्यक्त होण्यासाठी, ज्ञानार्जनासाठी धडपडत असतात आणि हे स्वाभाविकच आहे.
व्यक्त होण्यासाठी रेखाटन, चित्रकला, पेंटिंग, शिल्पकला या कला आहेतच. या सर्व ललितकलांप्रमाणे काव्य रचना, स्फुट रचना, कथा, ललित लेख यातून व्यक्त होणे आज सहज शक्य झाले आहे. अगदी शालेय वयापासूनच काही मुले मुले, स्त्री पुरुष आजकाल ब्लॉग लेखन करतात. फेसबुक, व्हाट्स ऍप्प वर वेगवेगळे ग्रुपस तयार करून काव्यातून निबंधरूपातून व्यक्त होतात.
अनेक जुन्या नव्या कवींच्या रचना पुस्तके आंतरजालावर शोध घेतलयास सहज उपलब्ध होतात. भावगीतातील अनेक प्रकार जसे नाट्यगीत, भक्तीगीत, गजल,गझल सुनीत, दशपदी, रुबाई, हायकू, चारोळ्या असे वाचून त्याप्रमाणे लिहिण्याचा प्रयत्न कवी मनाची लहानथोर स्त्रीपुरुष मंडळी करत असतात.
व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने भावकाव्याच्याही विविध प्रकृती असतात.
भावगीतात कवीच्या किंवा कवी कल्पित व्यक्तीच्या भावनांचा अविष्कार असतो. कोणाच्या भावना अनेक वाटांनी वाहतात तर कोणी त्यातली एखाददुसरी वाट पकडून व्यक्त होतो. भा. रा. तांबे, कवी बी, केशवसुत, बालकवी, माधव ज्युलियन, कवी अनिल, बोरकर, कुसुमाग्रज, वसंत बापट, मंगेश पाडगांवकर, विंदा करंदीकर, सुरेश भट, निकुंब, ग्रेस, गदिमा,इंदिरा संत, शांता शेळके, बहिणाबाई चौधरी, ना. घ. देशपांडे यांची व अश्या अनेक कवींची,कवयित्रींची भावगीते आजही आपण ऐकतो वाचतो. भा. रा. तांबे, यांनी नाट्यगीत लिहिले, केशवसुतांनी इंग्रजी काव्यातील सॉनेट या काव्यावरून सुनीत हा काव्यप्रकार मराठी आणला. मोरोपंतापासून प्रचलित असलेला गज्जल हा काव्यप्रकार माधव ज्युलियन यांनीहि समर्थपणे हाताळला. त्यात नवीन प्रयोग करून रचना केल्या. प्र. के. अत्रे उर्फ केशवकुमार यांनी विपुल विडंबने लिहून लोकप्रिय केली.कवी अनिलांनी भावरम्य दशपदी लिहिल्या. गझल, गजल हे रचनाप्रकार सुरेशचंद्र नाडकर्णी, सुरेश भट, इलाही जमादार,प्रदीप निफाडकर,डी.एन.गांगण,सतीश देवपूरकर,विनोद अग्रवाल, राज पठाण,निशिकांत देशपांडे या व इतर अनेक नामवंत गुणवंत कवी, त्याचबरोबर काही मोजक्या कवयित्रींनीही समर्थपणे हाताळून लोकप्रियही केले.
गझल किंवा गजल हा काव्यप्रकार गज्जलचाच सुधारित प्रकार आहे. हा फक्त वृत्तबद्ध काव्याचा प्रकार नसून कवी मनाची उत्कट व उस्फुर्त भावस्पंदने यात हृदयाला भिडणाऱ्या पद्धतीने उमटत असतात. गझल हा आत्मनिष्ठ काव्यप्रकार म्हणून परिचित असला तरी गझल हे एक उत्कृष्ट नाट्यगीत ही असू शकते.
गझल हे जसे एक भावकाव्य आहे तसेच ते नाट्यगीतही आहेच कारण त्यातली अभिव्यक्ती ही कवीची भूमिका कुठलीही असली तरी त्या भूमिकेला जिवंत करणारी असते. कधी कधी ती उस्फुर्तपणे उफाळून बाहेर आलेली असली असली तरी अनेक दिवसाच्या उत्कट चिंतनाचे, मनातल्या मनात चाललेल्या विचार मंथनाचे, अनेक भूमिका वठविणाऱ्या मानवी मनाचे ते कागदावर उतरलेले काव्यशिल्प, प्रतिबिंब असते.
गझलेच्या अभिव्यक्तीसाठी त्या त्या भूमिकेची, भूमिकेतील व्यक्तीच्या भावनांची लय पकडणे जमायला हवे. या लयीमुळेच त्या भावात्मक भूमिकेला गेयत्व प्राप्त होते. एकदा गेयत्व आले कि भावना जिवंत होऊन प्रवाही होतात. विशिष्ट लयीत शब्द प्रसवू लागतात..
या सुबक बांधीव पण तालासुरात उतरलेल्या रचनेत कवीचे आत्मस्वरूप तर व्यक्त किंवा प्रतिबिंबित होतेच पण ज्या भूमिकेशी कवी एकरूप झालेला असतो त्याचेही प्रतिबिंब एकमेकात मिसळून एक वेगळेच रम्य प्रतिरूप तयार होते. कवी प्रकृतीशी ज्यांची ज्यांची तरंगलांबी जुळते त्या सर्व जीव अजीव सृष्टीचेही त्यात प्रतिबिंब वा प्रतिरूप दिसू लागते.
ज्या कवीवर उत्कृष्ट वाङ्मय संस्कार झालेले असतात व जो कवी सृष्टीतल्या जीव अजीव सृष्टीशी तादात्म्य पावू शकतो त्याचे काव्य अभिजात तरीही समजण्यास सरल सुगम असते.
प्रमाण भाषेबरोबरच बोलीभाषाही यात यात सहजपणे एकरूप होऊन एक उत्कृष्ट सेंद्रिय रसायन तयार होते. ते कधी वाचकांच्या इंद्रियजन्य इच्छांना आवाहन करते तर कधी क्रांतीसाठी बंडासाठी स्फुरण देते, कधी उदास बनवते तर कधी प्रसन्न करते. कधी मनाला संयत करते, कधी भक्तीच्या रसात चिंब भिजविते.
गझलेत कवीची व कधी कवीकल्पित व्यक्तीच्या भावनांची स्पंदनेही आत्मनिष्ठतेने, आत्यंतिक उमाळ्याने जिव्हाळ्याने प्रकट होतात. उत्कृष्ट गझलेत आत्मनिष्ठ भावना व वस्तुनिष्ठ भावना यांचा सुंदर व अचूक मिलाफही साधला जातो.
विशिष्ट मात्रा,अक्षरगण वृत्तांचे व सोबत रदीफ काफिया आणि कधी सारवानाचेही बंधन स्वीकारून गझल जेव्हा लयीत पदन्यास करू लागते तेव्हा तिचे सौंदर्य विजेच्या कडकडाडात अन ढगांच्या गडगडाडात पृथ्वीवर वेगाने कोसळणाऱ्या जलधारांच्या नृत्यापेक्षाका का कमी सुंदर असते…
गझल कुठल्याही वृत्तात अगदी आनंदकंदापासून शार्दूलविक्रीडितात ही लिहिता येते. हे वृत्तबन्धन तिने स्वखुशीने स्वीकारलेले असते. कवी स्वयंभूपणे स्वतःच एखादे नवीन वृत्त बनवून त्यातही गझल लिहू शकतो. गझल गायन व गझल सादरीकरण या द्वारे गझल रसिकांपर्यंत जशी पोहोचते तशीच गझल एकांतात वाचूनही अंतःकरणाला तेवढीच भिडणारी असते.
थोडक्यात गझल एक वृत्तबद्ध पण रमणीय कविमनाचे किन्वा कविकल्पित गोष्टीचे व्यक्तीचे मनोज्ञ काव्यशिल्प असते.