मराठी काव्यामध्ये केशवसुतांनी रोमँटिसिझम (स्वच्छंदतावाद) आणला आणि आपल्या एकूणच साहित्यात रोमँटिसिझम हळूहळू मूळ धरू लागला.
ललित वाङ्मयाचे प्रमुख ध्येय आनंद निर्मिती हेच असल्याने हा स्वच्छंदतावाद ; अविष्कार स्वातंत्र्य म्हणून ललित वाङ्मयाच्या अगदी हृदयस्थानी जाऊन बसला.
माणूस वयाने ज्ञानाने कितीही वाढला तरी त्याला कल्पनेत रमायला आवडते. माणसातली निरागसता, शैशव त्याला कल्पनेत रमायला भाग पाडते. मग त्याच्या लेखनात त्याची निरागसता, त्याच्या कल्पना जेव्हा उतरायला लागतात तेव्हा ते लेखन हृदयाला भिडते. आपल्या मनाचा ताबा घेते.ललित गद्य किंवा कथा सुद्धा काव्याशी जवळीक साधणाऱ्या असतात. काव्यातील मुक्तछंद हे एक छोटेखानी ललित काव्यच असते.
ललित कथांमधला आत्मविष्कार म्हणजे मनातल्या उत्कट चिंतनाचा उस्फुर्त अविष्कार असतो. यात डोके जास्त चालवण्यापेक्षा हृदयस्थ भावनांनाच चालना दिलेली असते. याचा अर्थ डोके पूर्ण गहाणच ठेवलेले असते असे नाही. काही विशिष्ट प्रसंगी मनाला सरळ सरळ जाणवलेल्या गोष्टींप्रमाणेच काही गोष्टी नकळतपणे नेणिवेतही साठत गेलेल्या असतात. निमित्त मिळताच त्या उफाळून वर येतात. यावेळी कल्पनेला केंद्रस्थानी ठेवले तरी तिचा वापरही बुद्धिपूर्वकच केलेला असतो.
फँटसी या प्रकारात मोडणाऱ्या कथा, बालकथा, जेव्हा आपण लिहितो वाचतो तेव्हा विशेष काळजी घ्यावी लागते. यात सत्याचा आभास निर्माण करून काही गूढ अद्भुतरम्य गोष्टीतले सत्यच उकलून दाखवायचा प्रयत्न केलेला असतो. वाचकाला यात ही फँटसी सत्याच्या कितपत जवळ जाते हेच पाहायचे असते.
यंत्रमानव मानवाची जागा कधीच घेऊ शकणार नाही कारण माणसाला डोक्याप्रमाणे हृदयही असते. त्याचप्रमाणे ठोकळेबाज तत्वज्ञान सांगणाऱ्या कथा ललित साहित्याची जागा कधीच घेऊ शकणार नाहीत … कारण ललित साहित्यात हृदयस्थ भावभावनांना जास्त प्राधान्य असते. ललित वाङ्मय हे सामान्य संसारी माणसांसाठी असते. म्हणूनच त्यातून मानवीय भावभावना, त्याच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे रंग उस्फुर्तपणे व्यक्त होणे गरजेचे असते. ते जेवढ्या समर्थपणे त्यात व्यक्त झालेले असेल तेवढी त्या विशिष्ट साहित्य प्रकाराची उपयुक्तता वाढते.
‘दर्शन’ ही पुनीत या कथासंग्रहातील श्रेणिक अन्नदाते यांची कथा आहे. ही कथा फँटसी या कथाप्रकारात मोडणारी आहे. ही कथा बहुतेक त्यांच्या सुरुवातीच्या कथालेखन काळातील असावी.
दर्शन या कथेचा नायक एक तरुण आकर्षक व्यक्तीमत्वाचा, स्वतंत्र बुद्धीचा उच्चपदस्थ अधिकारी आहे. विशेष म्हणजे तो अविवाहित आहे. यात विशेष त्याच्या अविवाहित असण्यात नसून त्याच्या अविवाहित असण्याच्या कारणात आहे. विवाह त्याने टाळला म्हणण्यापेक्षा विवाहाची उत्कटतेने त्याला गरजच भासली नाही.
त्याचे सडाफटींग व्यक्तिमत्व त्याने जाणीवपूर्वकच जपले असावे. याचा अर्थ तो चारित्र्यहीन किंवा माणूसघाणा होता असेही नाही.
उलट शहरातील मोकळ्या वातावरणात राहिल्यामुळे किंवा विविध ग्रंथांचा व्यासंग असल्याने मित्रांइतकीच मैत्रिणींशी असणारी असणारी त्याची मैत्री मनमोकळी आणि विशुद्ध आहे. मित्र-मैत्रिणींमध्ये तो जसा रमतो तसाच तो त्यांच्या कुटुंबीयांमध्ये रमणारा व प्रियच आहे. कारण तो सर्वांच्या भावभावना जपणारा आहे.
ही कथा पात्रमुखी आहे. म्हणजे कथेतल्या ‘ मी ‘ ने सांगितलेली आहे. कथेची अभिव्यक्ती ही दोन प्रकारांनी होत असते. निवेदन पद्धती व अविष्कार पद्धती हे ते दोन प्रकार होत. कधी कधी या दोन्ही प्रकारांचे मिश्रणही अनुभवायला मिळते.
सुरुवातीला आणि मध्यापर्यंत या कथेची अभिव्यक्ती बऱ्यापैकी निवेदनशील म्हणता येईल अशीच आहे. पण कथेचा शेवटचा भाग ज्यात फँटसी आलेली आहे तो भाग अविष्कार पद्धतीचा वाटतो. कथेतल्या ‘मी ‘ ला आलेला तो विशिष्ट अनुभव व्यक्त करताना अविष्कारशीलता येणे अपरिहार्य आहे असे वाटते.
अनुभव(वस्तुस्थिती) जेव्हा स्पष्ट केलेला असतो किंवा सर्वाना समजेल अश्या भाषेत व्यक्त केलेला असतो तेव्हा त्या अभिव्यक्तीला निवेदनशील म्हणता येते. अनुभव जेव्हा उचंबळून आल्याप्रमाणे व्यक्त होतो तेव्हा त्या भाषेस अविष्कारशील भाषा म्हटले जाते.
म्हणूनच अभिव्यक्तीतील निवेदन पद्धतीची भाषा अलिप्त व तटस्थ असते. तो अनुभव अगदी समतोलपणे सरळ सरळ व्यक्त झालेला असतो. तेथे भावनांचे उसळणे, विलय पावणे अनुभवावयास मिळत नाही. तो अनुभव बऱ्यापैकी वस्तुनिष्ठ असतो.
पण जेव्हा अभिव्यक्ती अविष्कारशील बनते तेव्हा कथेतल्या ‘मी’ बरोबरच आपण त्या अनुभवापर्यंत पोहोचू शकतो. आपली मनोप्रकृती ‘मी ‘च्या मनोप्रकृतीशी मिळती जुळती असेल तर आपणही ‘मी’ प्रमाणेच अनुभव घेऊ शकतो. पण यासाठी ‘मी ‘ च्या हृदयस्थ भावना जितक्या प्रामाणिक असणे गरजेचे आहे तितकेच त्याचे भाषिक कौशल्य, वर्णनसुक्ष्मता पकड घेणारी असायला हवी.
या कथेचा नायक व्यवसायाने सिव्हिल इंजिनियर आहे.पण त्याने जे ज्ञान मिळवले आहे ते फक्त त्याच्या बांधकाम क्षेत्रापुरतेच मर्यादित नाही. त्यात तर तो निष्णात आहेच पण त्याचे इतर बाबतीतले ज्ञानही अद्ययावत आहे. त्याचे वाचन अफाट असल्याने इंजिनीयरिंगमधील अत्याधुनिक संशोधन, त्या क्षेत्रातले वेगवेगळे प्रयोग याशिवाय कॉस्मॉलॉजी,ऍस्ट्रोलॉजी, स्पेस सायन्स, कॉम्प्युटर सायन्स या सर्वच शाखांमधील ज्ञान त्याने मिळवले आहे.
याशिवाय तत्वज्ञानाचाही त्याचा व्यासंग आहे. जे कृष्णमूर्ती, आ. रजनीश, लोणावळ्याचे स्वामी विज्ञानानंद, स्वामी चिन्मयानंद यांचे साहित्य त्याने वाचले आहे.
सर्वसामान्यांना आवडणाऱ्या साहित्य, चित्रपट, राजकारण, नाटक, आरोग्य, योगशास्त्र वगैरे विषयातले ज्ञानही अद्ययावत आहे. सर्वानाच त्याचा सहवास हवाहवासा आहे. ऑफिसमध्ये हाताखाली काम करणाऱ्या महिलांच्या घरीही तो आढेवेढे न घेता जेवायला जाई. गप्पात रस नसेल तर तिच्या मिस्टरांबरोबर रमीचे चार डाव टाकी, तिच्या मुलांशी बुद्धिबळ खेळे.
एवढे सर्व असूनही कुठल्याच बाबतीत तो जास्त आग्रही नव्हता किंवा त्याला फारसा ऍटिट्यूडही नव्हता. जीवनातल्या आनंददायक गोष्टींना तो नाकारीतही नव्हता आणि त्यात फारसा गुंततही नव्हता.
अशा तऱ्हेने या सर्वाना हव्याहव्याश्या वाटणाऱ्या ‘मी ‘ च्या बदलीने ऑफिसातले सर्वच अस्वस्थ झाले आहेत. याचाच अर्थ असाकी कथानायक फक्त ज्ञानपिपासू नसून त्याने मिळवलेले ज्ञान त्याच्या जगण्यातही उतरले आहे.
आनंदाने जगणे व दुसऱ्यांनाही आनंद देणे यासाठी गप्पाटप्पांमधून वेळ फुकट जातो असे त्याला मुळीच वाटत नाही पण तरीही कधीतरी आयुष्यात त्याला विलक्षण पोकळी जाणवते आहे. गप्पाटप्पांमधून मिळणारे समाधान शाश्वत वाटत नाही. कारण त्याचे मन कलावंताचे आहे. अशावेळी या कथेतील आणखी एक सहाय्यक पात्र त्याच्या मनाची पोकळी भरून काढण्यास सहाय्यक ठरते आहे. कथेतील हे पात्र जास्त महत्वाचे आहे. कारण त्यांची मैत्री त्याला जास्त आनंद जास्त समाधान देणारी आहे. हे पात्र म्हणजे त्याचे ज्येष्ठ प्राध्यापक मित्र आहेत. वयाने अनुभवाने ज्ञानाने ते त्याच्याहून ज्येष्ठ आहेत. ते पुरातत्व शास्त्राचे प्राध्यापक आहेत. दोन तीन महिन्यानंतर त्यांच्याशी होणाऱ्या भेटी, गप्पाटप्पा यातून कथानायकाला आनंद व समाधान लाभत असे. तो आनंद शब्दात सांगण्यायोग्य नसून फक्त अनुभवण्यायोग्यच असे. त्यांच्या निमित्ताने पुरातत्व शास्त्राचे अनेक ग्रंथ त्याच्या संग्रही होते.
याबाबत ‘मी ‘ ला असणारे ज्ञान फक्त पुस्तकी नसावे कारण अनुभवाचा आनंद घेण्यासाठी तो त्यांच्याबरोबर एकदोन वेळा उत्खननाच्या जागी बाहेरगावीही जाऊन आला आहे.
अश्या या प्राध्यापक मित्राचा सहवास, त्यामुळे मिळणारा आनंद, समाधान याना बदलीमुळे मुकावे लागणार यामुळे तो व्यथित झाला आहे. या जाणिवेने त्याला पोकळी जाणवत आहे. त्याच्या बदलीचे ठिकाणही दूर कोठेतरी ऐराणात आहे. याचा अर्थ कुठल्यातरी निर्मनुष्य, पाण्याचे दुर्भिक्ष्य असणाऱ्या प्रदेशात त्याची बदली झाली आहे. तो भाग खडकाळ अविकसित माळ आहे
त्याठिकाणी भावी उद्योगप्रकल्प व पर्यायाने त्यास आवश्यक असणारा विमानतळ उभारण्यासाठी शासनाने प्राथमिक टप्प्याच्या कामासाठी या विनापाश अभियंत्याची निवड केली आहे. कामात अतिशय हुशार मनमिळावू व यापेक्षा अनेक कौशल्यपूर्ण कामे हाताळणाऱ्या या कुशल अभियंत्याची निवड अश्या प्राथमिक कामासाठी का केली हाही एक प्रश्नच आहे …. पण जसजसे आपण कथेत शिरू लागतो तसतसे हा प्रश्न आपल्याला पडूच नये अशी सूत्रबद्ध कथामाण्डणी,पात्र रेखाटन लेखकाने केलेले आहे .
एवढ्या लांब ऐराणात जाऊन राहणे एखाद्या विवाहीत किंवा मुलाबाळांच्या कुटुंब कर्त्याला कधीही सोईचे होणार नाही. शिवाय तिथले जे वातावरण आहे त्या वातावरणात राहण्यास व्यक्तीही तितकीच ऍडजेस्टेबल, समाधानी वृत्तीची, न कुरकुरणारी हवी. येईल त्या परिस्थितीशी सहज सामना करणारी तर हवीच पण त्यातूनही काहीतरी नव्याचा शोध घेणारीही हवी. म्हणूनच कथानायकाची या कामासाठी केलेली निवड योग्य वाटते.
वाचक खरोखरच त्या कथानायकाच्या मनोवृत्तीशी, त्याच्या अवतीभवतीच्या वातावरणाशी, त्याच्या सहवासातील मित्र-मैत्रिणींशी त्याने आत्मसात केलेल्या तत्वविचारांशी हळूहळू तादात्म्य पावू लागतो. यात लेखकाची लालित्यपूर्ण भाषाशैली जशी काम बजावते तसेच कथेतले वातावरण जसे न तसे आपल्यापुढे उभे करण्यात लेखकाचे स्थूलाबरोबरच सूक्ष्म वर्णन कौशल्यही जाणवते. लेखकाने केलेले त्या ऐराणाचे वर्णनही इतके चित्तवेधक आहेकी क्षणभर आपणही त्या ऐराणातल्या मृगजळावर तरंगू लागतो.
खरेतर तो एक ओसाड माळ आहे. आजूबाजूच्या पंधरा-वीस मैलांपर्यंत निर्मनुष्य आहे. त्याला राहण्यासाठी पत्र्याची शेड उभारली आहे. मजुरांसाठी तट्ट्याच्या झोपड्या आहेत. जीप, ट्रक, डंपर, सुरुंगाचे साहित्य व पंचवीस तीस माणसे एवढाच काय तो गोतावळा आहे.
हिरवेगार डोंगर, खळाळणारे झरे, दरवळणारी फुले तेथे नाहीत. हिरव्यागार कुरणात गळ्यातल्या घंटा वाजवत फिरणाऱ्या गाई-म्हशी, बासरी वाजवत फिरणारे गाणारे गुराखी तेथे नाहीत. पण… या साऱ्यांची उणीव मात्र रात्रीच्या चांदणभरल्या आकाशाने भरून काढली आहे.
शहरी वातावरणातून, आजुबाजुच्या सुविद्य माणसांच्या गोतावळ्यातून, कानांना, जिभेला सुखावणाऱ्या साऱ्या गोष्टीपासून कथानायक फक्त शरीरानेच नाही तर मनानेही खूप दूर पोहोचला आहे. त्यामुळे वरवर बहिर्मुख वाटणारे त्याचे मूळचे अंतर्मुख व्यक्तिमत्व जास्तच अंतर्मुख झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काम प्राथमिक टप्प्याचे म्हणजे जोखमीचे असले तरी त्यासाठी त्याला फारसा वेळ दयावा लागत नाही. म्हणून भरपूर निवांत वेळ दिवस आणि रात्रीचाही त्याला इथे मिळतो आहे.
त्यामुळे दिवसा मित्र-मैत्रिणींनी भेट म्हणून दिलेली फिलॉसॉफी,आर्कियॉलॉजी वरची पुस्तके वाचणे, संध्याकाळी तेथून तीन-चार मैलांवर असणाऱ्या टेकडीवर जाऊन आकाशाची शोभा पाहणे , रात्रीच्या वेळी निरभ्र आकाशातल्या चांदण्याची शोभा पाहत स्वतःच्या कल्पनाविश्वात आणि आठवणीत रंगून जाणे हा त्याचा नित्याचा दिनक्रम बनला आहे. वीज नसल्याने रात्रीचे जागरण करून पुस्तके वाचणेही नाही त्यामुळे मन आणि डोके शांत झाल्यास नवल कसले …
म्हणूनच त्या शांत नीरव वातावरणात त्याच्या मनात उठणारे तरंग खळबळ माजवणारे नसून मनाला हळुवारपणे धक्के देणारे आहेत.
अशावेळी सहवासात आलेल्या मित्रांप्रमाणेच मैत्रिणींचेही चेहरे त्याच्या नजरेसमोर येत. त्यांचे बोलणे, गप्पा, चर्चा, हास्यविनोद यांची आठवण होऊन त्यावेळी न जाणवलेले बरेच काही जाणवत असे.
त्यावेळी स्वतःच्याच विश्वात व्यस्त किंवा मस्त असल्यामुळे जी एक प्रकारची कलंदर वृत्ती त्याच्या वागण्यात आलेली होती, त्यामुळे सुंदर आणि बुद्धिमान स्त्रियांच्या सहवासात राहूनही कधीतरी त्यांच्या अंतःकरणात शिरावे, त्यांच्या वागण्या बोलण्यामागची कारणे, भाव जाणून घ्यावेत असे कधी त्याला जाणवलेच नसावे.
बदलीच्या ठिकाणी येण्यापूर्वी त्याची मैत्रीण सुमन हिने अनपेक्षितपणे व्यक्त केलेल्या भावना त्याच्या मनाला अशाच हळुवार धक्का देणाऱ्या आहेत. या सुमनप्रमाणेच नायकाला विचारप्रवृत्त करणारे आणखीन एक स्त्रीपात्र या कथेत आहे. कामावरच्या मुकादमाची ही मुलगी आहे
नाव रुक्मिणी, सुंदर आकर्षक व्यक्तिमत्वाची, व्यवस्थित आणि स्वच्छ राहणारी, चुणचुणीत, फटकळ बोलणारी, वागण्या-बोलण्यात चतुर पण गावरान निरागसता असणारी ही मुलगी आहे. त्याची नित्याची धुण्याभांड्याची कामे ती अतिशय नेटकेपणाने करते. कधीकधी त्याच्यासाठी भात शिजवण्याचे कामही ती करते.
वास्तविक पाहता ज्या बुद्धिमान आणि सुसंस्कृत स्त्रियांच्या सहवासात तो वावरला आहे त्यामानाने ह्या रुक्मिणीत विशेष असे काहीच नाही. पण या वैराण भागात, एकटेपणात, पाठीमागे दुसरी कुठलीही व्यवधाने नसल्याने, तिचे दर्शन त्याला सुखावते आहे. तिचे वागणे, बोलणे, चालणे यांची कधीकधी का होईना पण नायकाच्या मनावर भुरळ पडते आहे. या सर्वांची त्याला जाणीवही आहे.
स्त्रीचा निकट सहवास ही त्याची निकड नसली तरी स्त्रीविषयक प्रेमभावना किंवा तिच्याविषयी निर्माण झालेली क्षणिक आकर्षण भावनाही मानवी मनातील भावना चक्राला कशी गती देत असते याचा त्याला या काळात प्रत्ययही आला आहे. पण तरीही त्याचे मूळचे व्यक्तिमत्व अत्यंत सुसंस्कृत, संयमी असल्याने याही काळात त्याला त्याने कमावलेली आत्मशक्तीच (ब्रह्मचर्य) वैराणातही तटस्थतेने जगण्याचे बळ देत आहे.
यात नायकाचे हे प्रामाणिक आणि आंतरिक सौंदर्य जसे आपल्याला आकर्षून घेते तसेच काहीसे रुक्मिणीच्याही बाबतीत घडते. आजकाल सिनेमे पाहून व्यसनांच्या आहारी गेलेली, त्यातल्या नको त्या गोष्टींचे अनुकरण करणारी सुशिक्षित तरुण मुले-मुली पाहता सिनेमा पाहून त्यातल्या स्त्रीपात्राची टापटीप, स्वच्छता, नीटनेटकेपणा आत्मसात करणारी रुक्मिणी खरोखरच वेगळी वाटते. मनाला आकर्षून घेते.
शहरात येणाऱ्या अनुभवांपेक्षा कथानायकाला इथे येणारे अनुभव वेगळे आहेत. कधीकधी या वेगळ्या अनुभवांकडे तटस्थतेने बघताना त्याला काहीतरी वेगळी जाणीव होऊ लागली आहे. मग यातच ऑर्कियॉलॉजीवरील ग्रंथ वाचताना, त्यातले उतारे आणि त्यावरील निष्कर्ष वाचताना, अनेकदा पाहिलेले नकाशे पुन्हापुन्हा पाहताना त्याच्या बुद्धीच्या प्रांगणात कोठेतरी एक ठिणगी पडलेली आहे; आणि मग त्याच्या अंतर्मनाने असा स्वच्छ कौल दिला आहेकी, रनवेच्या टोकाच्या एका बाजूला असलेली ती टेकडी म्हणजेच ते “स्थान” असावे.
बाहेरच्या टळटळीत उन्हात उभे राहून ती टेकडी जेव्हा तो न्याहाळतो तेव्हा त्याच्या मनात प्रश्न उठला आहे की या टेकडीखालीच ते पुरातन मंदिर असावे काय की जेथे महावीरांच्या परंपरेतील आचार्यांनी विहार केला होता… उपदेश दिला होता … ग्रंथरचना केली होती… तत्कालीन बोलीभाषेत …?
आणि मग या विचारात असतानाच …” त्या टेकडीखालच्या मंदिराचे अवशेष शोधण्यासाठी त्या टेकडीच्या चारी बाजुंनी सुरुंग लावून टेकडीच उडवून दिली तर..” असा एक फँटॅस्टिक विचार त्याच्या मनात चमकून गेला आहे. आणि मग मनात चमकलेल्या, तरळलेल्या या फँटॅस्टिक कल्पनेनेच कथेतली पुढची फँटसी घडली आहे.
ही “फँटसी” म्हणजेच या कथेचा आत्मा आहे.कथेतली ही पुढची फँटसी, तिची अभिव्यक्ती म्हणजे नायकाचा जणू आत्मविष्कार आहे. क्वचितच कुठेतरी निवेदनाची सूक्ष्म झलक जाणवते … पण ते मानवी मनाच्या सजगतेला स्वाभाविक असेच आहे.
त्या रात्री गप्पाटप्पा करून मजूर झोपायला गेले आहेत. सर्वत्र सामसूम झाली आहे. कंदिलाचा मिणमिणता उजेड आणि त्या उजेडात पुराणवस्तूंच्या आर्टप्लेटस, शिलालेखांची छायाचित्रे न्याहाळता न्याहाळताच झोपेने त्याच्या शरीराचा पुरता ताबा घेतला आहे … त्यामुळे शेडची फट पत्रा ओढून घेऊन बंद करण्याचेही तसेच राहून गेले आहे … आणि त्यानंतर….
इतक्या दिवसाच्या चिंतनातून, वाचनातून, व्यवहारातून आणि बालपणीच्या संस्कारातून मनाला जे जे सरळपणे जाणवले आहे… नकळतपणे जे जे नेणिवेतही साठवले गेले आहे ते सर्व त्या रात्रीच्या विलक्षण अनुभवातून उचंबळून वर आले आहे ….
देहाप्रमाणेच झोपेने मनाचाही ताबा… पुरता ताबा घेतल्यावर की पुरता ताबा घ्यायच्या आधी कोण जाणे केव्हा, पण त्याला कसल्याश्या आवाजाने अचानक जाग आली आहे. अर्धवट झोपेत, अर्धवट जाणिवेत भानरहित असा तो पायात चपला अडकवून निघाला आहे. चपलेची अंगठ्याजवळची एक पट्टी तुटल्यामुळे चालताना अडथळा येत आहे. इतक्या बारीकसारीक देहाच्या हालचाली त्याला स्वतःलाही जाणवत आहेत पण कुठल्यातरी एका वेगळ्या वातावरणात तो ओढला जात आहे.
कानावर आरतीचे सूर पडत आहेत. त्या आवाजाच्या रोखाने तो एका मंदिराच्या प्रवेशद्वाराशी येऊन पोहोचला आहे… तो त्याच्या स्वतःच्याच मनातल्या एखाद्या अंधाऱ्या खोलीच्या प्रवेशद्वाराशी तर आला नसेल ?
पायऱ्या चढून तो आत गेला आहे … मनाच्या उन्नत अवस्था त्याने पार केल्या असाव्यात का?
हे सर्व वर्णन वाचत असताना प्रत्येक वाक्यागणिक आपल्या मनातही असे कितीतरी प्रश्न दाटून येतात.
पायऱ्या दगडी आहेत… द्वारही दगडीच आहे .. मजबूत आहे.. असणारच ! मंदिराचे प्रवेशद्वार मजबूत असायलाच हवे .
द्वार ओलांडताना डाव्या हाताला विहीर लागली. तेथे पोहरा अडकवलेला रहाट, जवळच पाण्याचे पात्र, त्यात असणारा तांब्याचा गडवा… मंदिराचे हे वर्णन पुराणकालीन थोडे इतिहासकालीन, कुठेतरी आजही कधीतरी पाहिलेले… किंवा वाचून नुसते अनुभवलेलेही असेलका? मनात पुन्हा प्रश्न उठतो… अर्थातच वाचकांच्या मनात !
चपला काढून हातपाय तोंड धुवून मग त्याने मंदिरात प्रवेश केला आहे. आणि मग… आरतीचा आवाज थांबला आहे … मनातली संभ्रमावस्था, मनातला कोलाहल थांबला असेलका?
समोरच पंधरा-वीस फुटांच्या अंतरावर गाभाऱ्यात एक काळ्या कभिन्न पाषाणाची पार्श्वनाथ भगवंताची मूर्ती आहे. मूर्तीच्या समोर तेवणाऱ्या निरांजनाचा प्रकाश त्या मूर्तीच्या चेहऱ्यावर पसरला आहे….. नायकाच्या मनातला तो अंधारा कोपरा पूर्णपणे उजळला असेलका? मनात उठलेल्या कित्येक प्रश्नांची उत्तरे त्या प्रकाशात त्याला गवसली असतीलका?
सगळ्याच प्रश्नांची उत्तरे त्याला गवसली नसतीलही पण… आतून कुठला तरी अनामिक नाद नक्कीच जाणवला असेलका?
त्या नादाची स्पंदने कदाचित त्याच्या साऱ्या देहातून पसरत गेली असतील आणि मग नकळत त्याचे हात जोडले गेले असतील. उत्तर रात्रीच्या त्या शांत प्रहरी असेल किंवा नुकतेच कुठे झुंजूमुंजू झाले असेल … त्याच्या ओठातून नकळत णमोकार बाहेर पडला आहे . स्वतःच्याच हृदयात दडलेल्या एका ओंकारमय ज्योतीचे स्वरुप त्याच्या मिटल्या डोळ्यापुढे असेल आणि मग… दर्शनं देवदेवस्य… म्हणत त्याने दर्शन घेतले असेल ….!
त्यानंतर त्याने मग त्या मंदिराच्या सभागृहात नजर फिरवली आहे. …. गाभाऱ्यातून … अगदी हृदयाच्या तळाशी जाऊन तो आता बाहेर आला आहे . इथल्या वर्णनात आता थोडी संमिश्र अभिव्यक्ती वाचकाला जाणवते. कल्पनेच्या आकाशात केलेली रंगांची उधळण जाणवते.
त्या मंदिरातले स्त्रीपुरुष मऱ्हाटमोळा वेष परिधान केलेले आहेत. स्त्रिया अलंकारांनी नटलेल्या आहेत. एकमेकींना कुंकू लावत आहेत. पुरुषांच्या गळ्यात जानवे आहे . त्यातल्या कोणीतरी त्याच्या कपाळावर केशरी गंध लावून अक्षता टाकल्या आहेत.
हळूहळू मंदिर रिकामे होत चालले आहे….मनादेहाला जणू परत वास्तवाची जाग येत आहे. पुनश्च हात जोडून तो मंदिराबाहेर पडला आहे. …. आणि मग त्याचक्षणी ….
माणसांचे आवाज, स्फोटांचे आवाज त्याला जाणवू लागले आहेत. मग त्यानंतरच्या घटना, संवाद यातून आपल्याला कळतेकी पहाटेच्याही आधीपासून ते सकाळच्या दहा-अकरा वाजेपर्यंत कथानायक त्या टेकडीच्या आसपास भटकत असावा.
पहाटेपासूनच तो नाहीसा झाल्याने त्यानंतर सगळ्यांनी शोधाशोध सुरु केली आहे. त्यानंतर मग दहा-अकराच्या सुमारास कुठेकुठे खरचटलेले, धुळीने भरलेले अनवाणी पाय घेऊन चालत येताना मजुरांना, मुकादमाला तो दिसला आहे… कदाचित ती टेकडी चढून परत उतरूनही तो आला असेल.
पण नशिबाने सुरुंगाच्या स्फोटातून तो वाचला आहे. पहाटेपासून आपण जे काही अनुभवत आणि जगत आहोत ते झोपेत, जागेपणी की अर्धवट जागेपणीच्या स्वप्नात? या विचारांनी तोही संभ्रमित झाला आहे.
ते त्याला झोपेत पडलेलं स्वप्न नसून अर्धवट जागेपणी त्याच्या देहाने अनुभवलेली मनाची एक स्वप्नवत अवस्था आहे. म्हणूनच त्या अवस्थेत तो त्या टेकडीच्या आसपास त्याच्या कल्पनेने रंगवलेल्या जगात रंगून चिंबचिंब होऊन आला आहे.
स्फोटाच्या आवाजाने त्याला खाड्कन जाग आली आहे आणि मग हळूहळू तो भानावरही आला आहे.
ग्रंथात वर्णिल्याप्रमाणे माणसे, मंदिर, वेशभूषा, भाषा यांचा त्याने उत्कट अनुभव घेतला आहे . पण फक्त ग्रंथात वर्णन केल्याप्रमाणे किंवा ताम्रपट किंवा शिलालेखात असलेल्या माहितीप्रमाणे असे ते वर्णन वाटत नाही. त्याला आणखी कशाची तरी जोड आहे .
कथानायकाचा धर्म कोणता हे त्याच्या दैनंदिनीवरून किंवा जनसंपर्कावरुन , त्याच्या बोलण्यातून आपल्या लक्षात येत नाही. तो अविवाहित आहे, उच्चशिक्षित आहे आणि त्याला कोणत्याही विषयावर गप्पा मारायला आवडते… पण तरीही त्याच्या गप्पांमधूनही असा कुठलाच धागा सापडत नाहीकी ज्यावरून त्याचा धर्म कळावा. पण त्याच्या गप्पांवरुन, आवडींवरून त्याच्या मनाची संवेदनशीलता जरूर कळते. विशिष्ट प्रकारच्या संशोधनात त्याला असलेला रस जाणवतो.
त्या रात्री त्याने ज्या मंदिरात प्रवेश केला त्या मंदिराचे वर्णन करताना आजूबाजूच्या परिसराचेही सूक्ष्म वर्णन केले आहे. डाव्या बाजूची विहीर, रहाट, पोहरा, पाण्याचे पात्र, तांब्याचा गडवा आणि मग पायातल्या चपला काढून त्याने धुतलेले हात पाय … यावरून कधीकाळी अगदी बालपणी का असेना पण त्याच्यावर जैन मंदिर प्रवेशाचे, दर्शनाचे योग्य संस्कार झाले असावेत असे वाटते.
काळ्या कभिन्न पाषाणातील पार्श्वनाथाच्या मूर्तीच्या चेहऱ्यावरचा आत्मानंद आणि ते पाहून नकळत जोडले गेलेले त्याचे हात, ओठातून बाहेर पडलेला णमोकार… आणि त्यानंतर दर्शनं देवदेवस्य … पाहता नक्कीच त्याच्यावर जैन धर्माचे संस्कार झाले असावेत असे वाटते. कारण आजकाल,
रामरक्षा, मारुतीस्तोत्र म्हणणारी… श्रद्धेने संकष्टी चतुर्थीचा किंवा आषाढी एकादशीचा, महाशिवरात्रीचा उपवास धरणारी उच्चशिक्षित किंवा अल्पशिक्षित जैन धर्मीय मंडळी कुठे कुठे पाहायला मिळतात पण मनाच्या एका भारलेल्या अवस्थेत उस्फुर्तपणे णमोकार किंवा दर्शनपाठ म्हणणारी अजैन मंडळी निदान माझ्यातरी पाहण्यात नाहीत.
कथानायकाची ती अर्धवट जागृतीची अवस्था मग आपल्याला संभ्रमात टाकत नाही. काही गोष्टींचा उलगडा आपण आपल्या दृष्टीने करत राहतो.
त्याच्या पायातल्या वहाणा त्या टेकडीजवळच्या काल्पनिक मंदिरात जाताना त्याने खरोखरच काढून ठेवल्या असाव्यात. पहाटेच्या दवाने ओलसर झालेली माती… कदाचित लाल मातीही असेल , ती त्याने श्रद्धेने आपल्या कपाळी लावली असेल, तिथल्या धुलिकणांच्या अक्षता आपल्या माथ्यावर घेतल्या असतील.
अगदी त्याच्याही नकळत हे सारे यांत्रिकपणेही त्याच्या हातून घडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
म्हणूनच जेव्हा तो आपल्या पत्र्याच्या शेडमध्ये परत येतो तेव्हा त्याच्या चपला तेथे नसतात. कपाळावरच्या शेंदरी टिळ्यावरून आणि केसातल्या अक्षतांवरून रुक्मिणी जेव्हा त्याची मस्करी करते तेव्हा क्षणभर तोही भांबावतो. कपाळावरून हात फिरवताच सुकलेला केशरी गंध त्याच्या हाताला जाणवतो…. आणि झटकलेल्या केसांतून दहा-बारा अक्षतांचे कण खाली पडतात.
आजकाल आपल्या कथांमधून आणि बालकथांमधून फँटसी या प्रकारातल्या कथा खूप कमी झाल्या आहेत. “फँटसी” मध्येही वेगवेगळे प्रकार असू शकतात. रशियन परीकथांमधली फँटसी जशी वेगळी आहे तशी भारतीय पंचतंत्रातली फँटसी वेगळी आहे. लोककथांमधून येणारी फँटसी, जैन पुराणातील सम्यक्त्व कौमुदीतून येणारी फँटसी, गौतम बुद्धाच्या जातककथांमधून येणारी फँटसी ही सारी फॅंटसीचीच रूपे आहेत. त्याचप्रमाणे ललित कथांतून येणारी फँटसी हीसुद्धा फॅंटसीचा एक उदबोधक प्रकारच आहे.
आपल्या मनातल्या रमणीय कल्पना निदान काही अंशांनी तरी सत्यात उतरवायच्या असतील तर त्या कल्पनेत आपण रमायला तरी नको का? कल्पनेत रमणाऱ्या आणि विशिष्ट वेडाने झपाटलेल्या लोकांना कधीकधी समाज खरोखरच वेडे ठरवितो. मग तो समाज वेडा की ते लोक वेडे हे सुज्ञास सांगावे लागत नाही. दर्शन या कथेतून आलेली “फँटसी” आपल्याला जशी विचारप्रवृत्त करते तशीच कल्पनेच्या मनोराज्यातही हिंडवून आणते.
दर्शन या कथेच्या शीर्षकातच या फॅंटसीचा गाभा दडला आहे. एका गप्पिष्ट, उच्चशिक्षित, सुसंस्कारित, आकर्षक व्यक्तिमत्वाच्या मनातील अंतर्विश्वाचा शोध घेता घेता आपण त्याच्या मनातल्या अंधाऱ्या कोपऱ्यात … अगदी हृदयाच्या तळाशी जाऊन पोहोचतो आणि मग आपल्याला त्याचे जे दर्शन होते तसेच काहीसे आपलेही आत्मस्वरूप आपण अनुभवतो, त्या दर्शनाने स्तिमित, अचंबित होऊन बाहेर पडतो. अंतरीच्या श्रद्धेने हे सारे आपण अनुभवतो.
अश्या सम्यकश्रद्धेचं झाड रुजवायचं असेल, जगवायचं असेल तर त्याला सम्यकज्ञानाचं जल घालावं लागेल. मगच सम्यक आचरणाची सुगंधी फुले त्यावर दरवळायला लागतील. पण त्यासाठी अंद्धश्रद्धेचं तण उपटावं लागेल आणि कृत्रिम रासायनिक खतांचा वापर कमी करावा लागेल. अंधश्रद्धांचे तण उपटताना श्रद्धेच्या मुळांना धक्का लागणार नाही याचीही काळजी घ्यावी लागेल.
दर्शन ही कथा माणसाच्या मनातील सुप्त-गुप्त भावनांचा मानसशास्त्रीय दृष्टीनेही वेध घेण्यास प्रवृत्त करते. पण त्यासाठी या शास्त्राचे अर्धवट ज्ञान असून उपयोग नसतो. अन्यथा माकडाच्या हाती कोलीत दिल्यासारखे होईल आणि ते माकड गावेच्या गावे जाळत सुटेल आणि विकृतीला जाळण्याऐवजी सत् प्रवृत्तीला जाळण्याचा प्रयत्न करेल…
फ्रॉइड किंवा अन्य काही मनोगाहनवादी मानवीय प्रतिभेचे मूळ नेणिवेतल्या अंधाराशी किंवा सुप्त-गुप्त गोष्टींशी जोडतात. ते कितपत खरे याबद्दल आज जरी आपण कुठल्याही ठाम निष्कर्षाप्रत येऊ शकत नसलो तरी ते पूर्णपणे खोटेही आहे असे आपण म्हणू शकत नाही. कारण जे अंधारातलेच आहे ते ठामपणाने जसे खरे नाही तसेच ठामपणाने खोटेही असू शकत नाही.
कथेतले मंदिर, मूर्ती, रंगीबेरंगी वस्त्रे नेसलेले स्त्रीपुरूष यांचे वर्णन करताना लेखकाची लेखणी मनातल्या विविध भावच्छटांची, कल्पनेची रंगीबेरंगी उधळण करीत आहे असे वाटते. उदा.” मऱ्हाटमोळ्या संस्कृतीच्या वाटाव्यात अश्या स्त्रिया, भरजरी तलम रंगीत पातळे नेसलेल्या, अलंकारांनी नटलेल्या, कुणी एकमेकींना कुंकू लावत, कुणी दर्शन घेत, कुणी एकमेकींशी सदभावाने बोलत होत्या. पुरुषही धोतर नेसलेले, अंगात काहीच नाही, प्रत्येकाच्या गळ्यात जानवे, कोणाकोणाचे नेसूचे वस्त्र जांभळे, पिवळेही आढळले. बहुतेकांच्या चेहऱ्यावर सात्त्विक भाव, भक्तीची अपूर्व आभा, त्यातील एकजण माझ्याजवळ आला. त्याने माझ्या भालप्रदेशी केशरी गंध लावला. अक्षता लावल्या. डोक्यावरही टाकल्या. पुन्हा काही संस्कृत मंत्रोच्चार कानी पडले. सर्वानी भगवान पार्श्वनाथांचा जयजयकार केला. ”
हे वर्णन एका संपन्न, समृद्ध मऱ्हाटमोळ्या संस्कृतीचे, भाषेचे, परंपरेचे दर्शन घडवणारे आहे.
खरेतर आज महाराष्ट्रीयन जैन माणूस, मराठी मायबोली असणारा जैन माणूस म्हटलेकी बऱ्याच जणांना (पुणे मुंबईसारख्या कॉस्मोपॉलिटिन शहरांमधून) आश्चर्य वाटते. मग असे असताना आपल्या महाराष्ट्राची भाषा… मराठी भाषा… ही ज्या महाराष्ट्री अपभ्रंश भाषेतून उत्पन्न झाली तिचे ज्ञान त्यांना तर नसणारच. मग त्याच्याही पुढे जाऊन या महाराष्ट्रीय अपभ्रंश भाषेतील बहुतेक उपलब्ध वाङ्मय हे जैन धर्मीय साहित्यिकांचे आहे हे त्यांना माहित असावे अशी अपेक्षा आपण तरी का करावी? पण त्यासाठी आपण काही प्रयत्न जरुर करु शकतो.
शेवटी “दर्शन” या कथेचा मी काढलेला आशय म्हणजे कथेतल्या नायकाला घडलेले त्याच्या आत्मस्वरुपाचे दर्शन व त्यातून वाचकांना घडवलेले आत्मदर्शन असाच आहे. ते दर्शन कुठल्या दृष्टिकोनातून झाले आहे, त्या दृष्टीशी मिळती जुळती दृष्टी समग्र वाचकांना मिळावी हाच माझा स्पष्ट हेतू या रसास्वाद घडवण्यामागे आहे.
प्रत्येक वाचकाचे व्यक्तिमत्व, त्याचा संवेदन स्वभाव वेगवेगळा असू शकतो. त्यामुळे कदाचित कोणा वाचकाला या कथेचे माझ्यापेक्षाही वेगळ्या स्वरुपात दर्शन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाल्यास तसेही अभिव्यक्त होण्याचे स्वातंत्र्य त्यांनाही आहेच !
‘दर्शन’ कथा, कथासंग्रह ‘पुनीत’ लेखक – श्री श्रेणिक अन्नदाते
(समकालीन मराठी जैन कथासंग्रह भाग १) पृष्ठ क्र. १६१ ते १६९, संपादन – श्रेणिक अन्नदाते
आस्वादात्मक समीक्षा – लेखिका सौ. सुनेत्रा नकाते