दिगंबर जैनांचे पर्युषण पर्व भाद्रपद शुद्ध पंचमी पासून चालू होते. दिगंबर जैनांच्या पर्युषण पर्वामधला (दशलक्षण पर्व ) पहिला दिवस क्षमा धर्माचा असतो. येथे उत्तम क्षमा धर्माचे पालन दिगंबर मुनिराज करतात. गृहस्थांनी व गृहिणींनी या दिवशी भल्या पहाटे शुचिर्भूत होऊन शुद्ध मनाने दिगंबर जैन मंदिरात दर्शनासाठी जायचे असते. सोबत मुलाबाळांना नेता आले तर उत्तमच! दिगंबर मंदिरातील वेदीवर तीर्थंकरांची मूर्ती असते. मंदिरात मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर पद्मासनात बसून मनातल्या मनात णमोकार मंत्राचा पाच वेळा जाप करावा. त्यानंतर मलाही उत्तम क्षमाधर्माचे पालन करण्यासाठी आत्मबल लाभूदे अशी भगवंतांना प्रार्थना करावी. ज्यांना शक्य असेल त्यांनी आपापल्या शक्तीनुसार उपवास अथवा एकाशन करावे, किंवा एखाद्या साध्या पण आपल्याला व सर्वांनाच हितकर वाटेल अश्या एखाद्या नियमाचे दिवसभर पालन करावे.
दिगंबर जैन या दशलक्षण पर्वात दहा दिवस क्षमा धर्म, मार्दव धर्म, आर्जव धर्म, शौच किंवा शुचिता धर्म, सत्य धर्म, संयम धर्म, तप धर्म, त्याग धर्म, अकिंचन्य धर्म, ब्रम्हचर्य धर्माचे शक्तीनुसार पालन करतात. अनंत पौर्णिमेच्या दिवशी सकाळी उपवास केलेले लोक पारणे करतात. या दिवशी संध्याकाळी सर्व जैन बांधव आणि भगिनी मंदिरात जमून सामुहिक आरती करून भजने भक्तिगीते म्हणतात. त्यानंतर क्षमावणीचा कार्यक्रम असतो.सर्वजण एकमेकांची प्रेमळपणे विचारपूस करून एकमेकांची क्षमा मागतात आणि एकमेकांना क्षमा करतात.