एक नाकपाक गाव होतं. त्या गावातल्या एका ऐसपैस दूमजली हवेशीर घरात एक अनाथ मुलगी रहायची. त्या घराच्या मागील बाजूच्या सज्ज्यातून बर्फाच्छादित पर्वतांची शिखरे दिसायची.
ती अनाथ मुलगी गेले कित्येक दिवस त्या घरात बसून एकटीच काहीतरी लिहीत बसायची. काहीतरी म्हणजे …फुलांच्या, पाखरांच्या, नद्यांच्या, पर्वतांच्या आणि मंदिरांच्या गोष्टी व गाणी ती लिहीत बसे.
ती अनाथ असल्याने गावातले लोक तिला अना म्हणायचे.
जसजशी शिशिर ऋतुस निरोप देण्याची वेळ जवळजवळ येऊ लागली तसतसे पर्वतांवरचे बर्फ वितळून खाली येऊ लागले. त्यामुळे पर्वतांवर उगम पावणार्या नद्या वेगेवेगे वाहू लागल्या. दुथडी भरून वाहू लागल्या. गावातल्या सर्वच विहिरींच्या खोल खडकांमधले झरे मधुर पाण्याने झरू लागले. त्या स्वच्छ गोड्या जलाने विहिरी काठोकाठ भरल्या. अनाच्या घरामागची विहीरही अशीच काठोकाठ भरली.
सकाळच्या कोवळ्या उन्हात अना त्या विहीरीच्या पाण्यात आपल्या कोमल स्वच्छ पायांचे तळवे बुडवून तासंतास बसून राहू लागली.
ती अशी निवांत बसलेली असताना विहीरीच्या पाण्यावर एक जबर्दस्त जाडी मासोळी तरंगताना तिला दिसली.
ती अनाला म्हणाली, ” वॉट रे अना, वॉटारयू डुइंग?”
ते ऐकून अनाने आपले हरिणासारखे डोळे आश्चर्याने विस्फारले आणि ती म्हणाली, ” ओहो! मासोळीबाई, हाउ डु यू नो माय नेम?”
त्यावर ती मासोळी म्हणाली, ” मी बाई नाही, मुलगी आहे.”
“ओहो!”…अना उदगारली व म्हणाली, “तू मुलगी आहेसका? या पाण्यात तू अशी एकटीच का फिरत आहेस? माझ्यासारखीच तू पण अनाथ आहेसका?”
यावर ती मासोळी विलक्षण फणकार्याने म्हणाली, ” मी नाहीच अनाथ,मी मत्स्येंद्र व मस्येंद्राणी यांची मुलगी आहे. या विहीरीच्या तळातून एक भुयारी मार्ग आहे. त्यातून वाहत वाहत पुढे गेलंकी आमचा जलमहाल आहे. खूप भव्य दिव्य आणि चकाकणारा मयमहाल आहे आमचा.”
“वा! मस्तच!! माझे घरपण खूप छान आहे आणि मला ते खूप खूप आवडते.” अना हसून म्हणाली……
” पण अना, तू तुझ्या घरात एकटीच कशी राहतेस? तुला कंटाळा नाही येत? तुझे मित्र-मैत्रीणी कोण आहेत?” मासोळीने अनाला विचारले. त्यावर अना म्हणाली, ” मी नेहमी गाणी आणि गोष्टी लिहीत बसते. त्यात पाखरे असतात, भुंगे असतात, मधमाश्या असतात आणि कधीकधी तुझ्यासारख्या मासोळ्यापण असतात.लिहीता लिहीता मी त्यांच्याशी गप्पा मारत बसते. वेळ कसा चुटकीसरशी संपतो ते कळत दिखील नाही.”
अनाचे उत्तर ऐकून ती मूर्ख आणि मठ्ठ मासोळी खदखदा खिदळू लागली व म्हणाली,
“तू किती मठ्ठ आणि शत्मूर्ख आहेस हे तुझ्या बाष्कळ बडबडीवरून मला आत्ताच कळलंय..अगो वेडे, गोष्टीतल्या पाखरांबरोबर आणि मासोळ्यांबरोबर गप्पा मारत बसायला त्या काही जिवंत थोड्याच असतात का?..मलातर अजिबात असल्या गोष्टीबिष्टी वाचायला आवडत नाहीत…कधीमधी चोरून चोरून वाचत असते मी पाणीदार कथा..पण गोष्टी नाही आवडत मजला…आणि लिहायचा मला भारी कंटाळा येतो..”
त्यावर अना म्हणाली, ” गोष्टी लिहिणे सगळ्यांना नाही जमत. तुलातर ते मुळीच नाही जमणार..”
यावर मासोळी रडकुंडीला येऊन म्हणाली,
” मी आणि माझे आई बाबा नेहमीच गप्पा आणी गोष्टी करत असतो. आमच्याकडे एक खूप मोठा पियानो पण आहे. माझा भाऊ मस्याडेंद्र पियानो वाजवायला लागलाकी आम्ही सगळे बडबडगीते म्हणत म्हणत नाचतो.”
पियानो हा शब्द ऐकताच अनाचे डोळे हसायला लागले. ती म्हणाली,
” पियानो!!!! कित्ती मस्त!! मलापण पियानोवर गाणी वाजवायला खूप आवडते. पण माझ्याकडे पियानो नाही.”
यावर ती मासोळी काही वेगळीशी हसत बोलली, ” नसणारच तुझ्याकडे पियानो….कारण तू अनाथ आणि गरीब घरातली मुलगी आहेस. आमच्याकडे एकच नाहीतर अनेक पियानो आहेत. कारण आम्ही श्रीमंत आहोत. आमच्याकडे दास दासी नोकर चाकर आहेत…आम्ही फक्त गप्पा आणि गोष्टी करतो, खिदळतो, पियानो वाजवतो आणि आयते जेवतो. म्हणूणच आम्ही इतके जाडे जाडे आहोत.”
मासोळीचे बोलणे अना शांतपणे ऐकत होती..मग मासोळीला आणखीनच चेव चढला. ती परत हसायला लागली…
हसता हसता म्हणली,
“अना, पण जरी तुझ्याकडे पियानो असता तरी त्याचा तुला काय उपयोग? तू अशी किरकोळ प्रकृतीची, तुला जमणारच नाही पियानो वाजवायला…तू सारखी चहा पितेस व ब्रेड जाम बटर खातेस …तू कुठे माझ्यासारखे आयते बसून पोळी भाजी खातेस? असे म्हणून मासोळी दात लपवून हसायला लागली..
तिचे हे बोलणे ऐकून अना मुळीच चिडली नाही. किंचित रुष्ट होत म्हणाली,
” तुला जरी मी नाजुकसाजुक वाटत असले तरी मी पण होइनच कधीतरी तुझ्याप्रमाणे लठ्ठम फॅटम…हा!!हा!!”
एवढे बोलून अना विहीरीजवळून उठली आणि तरातरा घरात शिरली. वर खाली वरखाली फिरत राहिली. तिला अजिबात करमेना. मग अडगळ खोलीतल्या लाकडी फडताळातली फुले गोळा करायची परडी घेऊन ती घराबाहेर पडली. तिच्या घरासमोरून जाणारी पायवाट एका मंदिराकडे जायची. त्या वाटेने हातातली परडी मजेत फिरवत ती चालू लागली.
मंदिराच्याआवारात आल्यावर तिला खूप प्रसन्न वाटले.
मंदिराजवळ्च्या कातळातून वाहणारा एक स्वच्छ पाण्याचा झरा होता. अना हातपाय धूवून मंदिरात गेली. घंटा वाजवून गाभार्यात शिरली.
गाभार्यात मातकट पिवळ्या रंगाच्या पाषाणात कोरलेली ध्यानस्थ मूर्ती होती.मूर्तीपूढे माथा टेकवून अना पण ध्यान करू लागली.
अना जेव्हा ध्यानमुद्रेत लीन झाली तेव्हा तिल एक रमणीय जलमंदिर दिसले. जलमंदिराच्या गर्भगृहातही शुभ्र संगमरवरी ध्यानस्थ मूर्ती होती. त्या मूर्तीच्या चरणतली एक सिंह शांतपणे बसलेला होता. त्या सिंहाच्या मुखावरचे भाव एखाद्या संत योग्याप्रमाणे होते. अनाच्या हृदयात ओंकाराचा अनाहत नाद घुमू लागला. हळूहळू विरत गेला.
अना जेव्हा ध्यानमुद्रेतून बाहेर आली तेव्हा तिच्या लक्षात आलेकी मंदिराच्या पायरीवर आपण परडी विसरून आलो आहोत. ती झटकन बाहेर आली.परडी घेऊन मंदिराच्या बगिच्यातल्या मोगर्याच्या झाडाजवळ आली. टपोर्या पांढर्या शुभ्र फुलांनी मोगर्याचे झाड भरगच्च फुलले होते. परडी गच्च भरल्यावर अना घरी आली.
सूर्य त्यावेळी पश्चिम क्षितिजावर येऊन टेकला होता. आकाशात लाल पिवळ्या केशरी रंगांची उधळण झाली होती.
अना पाकगृहात गेली. पण खाण्यासाठी काहीच शिल्लक नव्हते. ती परत लिहिण्याच्या खोलीत आली. मेजावर फुलांनी ओसंडणारी परडी ठेवून तिने लिखाणासाठीचे ताव व पेन बाहेर काढले. खिडकीतून वार्याची झुळूक येताच मोगर्याचा सुगंध खोलीभर दरवळू लागला. प्रसन्नचित्ताने अनाने लिहायला सुरुवात केली.
तिला आज त्या मासोळीवरच काहीतरी लिहावेसे वाटत होते. म्हणून लिहित लिहितच ती पुन्हा विहिरीपशी आली. पाण्यात पाय बुडवून तिने मोठ्याने हाक मारली, ” मासोळी!! मासोळी!! ” तिची हाक तोंडतून बाहेर पडतेन पडते तोच सुंदर वस्त्रे व आभुषणे लेऊन नटलेली ती मासोळी पाण्यावर आली. ती एखाद्या देवीप्रमाणे भासत होती. तिच्याबरोबर एक मोठ्ठा मासा होता. तो मासोळीचा भाऊ मत्स्याडेंद्र होता.
त्या दोघांनीही क्षणाचाही विलंब न लावता अनाचे दोन्ही हात पकडून तिला पाण्यात ओढले. मग तेथून ते त्वरीत जलमहालात पोहोचले.
जलमहालात सिंहासनावर मत्स्येंद्र व मत्स्येंद्रीण बसले होते.
अनाला पकडून आणल्याने मत्स्य दरबार हर्षभरित झाला.
मत्स्य दरबारात काही देखणे राजबिंडे मत्स्यायक पियानो वाजवत होते…सारे वातावरण सुरांनी भारून गेले होते. अना मंत्रमुग्ध होऊन पियानो वादकांचे वादन ऐकत होती.
पण थोड्याच वेळात अनाच्या लक्षात आलेकी तिच्या कमरेभोवती एक जलसर्पाचा विळखा बसू लागला आहे. विळखा जसजसा आवळला जाऊ लागला तसे अनाने हातपाय मारून पोहायला सुरुवात केली. त्या भयंकर विळ्ख्याने तिचा जीव गुदमरू लागला होता. डोळ्यापुढे अंधारी येऊ लागली. अंधारातच तिने डोळे फाडफाडून पहाण्याचा प्रयत्न केला…तेव्हा तिला ती मासोळी दिसली. पण ती यावेळी ती खूप कुरूप दिसत होती व अत्यंत हिडिसपणे हसत होती.
तिचे ते विदृप रूप बघून अना जोराजोरात किंचाळू लागली…जलसर्पाचा विळखा हळूहळू सैलावत गेला. …
अना जेव्हा जागी झाली तेव्हा तिने पाहिलेकी तिचा भाऊ अनन्य तिच्याजवळ उभा होता. ती मेजावर डोके टेकवूनच गाढ झोपी गेलेली होती…तिचा भाऊ अनन्य तिला हलवून हलवून जागे करण्याचा प्रयत्न करत होता…
तिने डोळे उघडताच अनन्य तिला म्हणाला, ” अना जागी हो, पूर्ण शुद्धीवर ये.”
पण त्याच्याकडे संशयाने पहात अना म्हणाली, ” कोण आहेस तू? इथे माझ्या मेजाजळ का उभा आहेस? तू माझ्या घरात कुठून शिरलास? ”
तिचे हे बोलणे ऐकून अनन्य शांतपणे म्हणाला, “मी तुझा भाऊ अनन्य आहे.”
“नाही, तू माझा भाऊ नाहीस ..मला भाऊ बहिण आई वडील कोणीही नाहीत..मी अनाथ आहे ..अनाथ अना आहे मी..”अना ओरडायला लागली.
यावर अनन्य तिला म्हणाला, ” अना, मूर्खासारखे काहीपण बरळू नकोस.
सकाळपासून या खोलीत दार बंद करून तू काय करते आहेस? मी खिडक्यांचे गज काढून तुझ्या खोलीत तुला जागे करण्यासाठी आलो आहे. ”
यावर अनाकडे काहीच उत्तर नव्हते.
“अना, चल आता खाली, मॉम आणि डॅड डायनिंग टेबलावर संध्याकाळच्या जेवणासाठी आपली वाट पहात आहेत. तोंड धू आणि जेवायला चल…” एवढे सांगून अनन्य खाली गेला.
अना जेव्हा जेवायला खाली आली तेव्हा अनन्य, डॅड आणि मॉम आपापल्या खुर्च्यांवर बसून तिचीच वाट पहात होते.
जेवणाचे टेबल मॉमने आज खूपच खास सजवले होते.
आज मॉमने अनन्यच्या आवडीची कढी खिचडी आणि अनाच्या आवडीचे मेथी पराठे बनवले होते. काचेच्या मोठ्या वाडग्यात दही पूर्ण भरले होते. अनाने आपल्या बाउलमध्ये दही वाढून घेतले आणि खुषीत येऊन ती म्हणाली, ” मॉम, तू तर खूप चांगली आहेसच पण अनन्य आणि डॅड पण खूप चांगले आहेत. मी मुळीच अनाथ नाही. ”
तिचे हे बोलणे ऐकून सगळेच मोठमोठ्याने हसू लागले.
अनाचे मांजर खिडकीत बसून तिच्याचकडे पहात होते. अनाने हात उंचावून तिला हाई केले.
डॅड तिला म्हणाले, ” अना आजपर्यंत तू ज्या मासिकाला गाणी आणि गोष्टी पाठवित होतीस त्यांच्याकडून आज दुपारच्या डाकेने मानधनाचा चेक आला आहे. मला वाटतेकी, ” आता तू निश्चितच स्वत: मिळविलेल्या पैशातून पियानो विकत घेऊ शकशील.”
डॅड चे बोलणे ऐकून अनाला काही म्हणजे काहीच सुचेना.
तेव्हा अनन्य म्हणाला, ” डॅड म्हणताहेत ते खरे आहे अना, हा चेक एवढ्या मोठ्या रकमेचा आहेकी तू त्यातून स्वत:साठी एक छोटीशी घोडागाडीच काय पण भलामोठा सात अश्वांचा रथही विकत घेऊ शकशील.”
हे सारे खरेच आहेकीकाय..याची शंका येऊन अनाने स्वत:ला चिमटा काढून पाहिल.
अनाच्या मनाची ही आश्चर्य विभोर अवस्था मॉमच्या लक्षात आल्याने ती म्हणाली, ” तू ऐकलेले सर्व काही अगदी खरे आहे अना!!
तुला हे माहितच असेलकी गुलाबनगरीत गुलाब पुष्पांचे प्रदर्शन आहे…त्यासाठी आपल्याला आयोजकांनी खास महत्वाच्या व्यक्तींसाठी असणारे चार पास पाठविले आहेत. गुलाबनगरीत हस्तकला विभागात हातांनी बनवलेल्या खेळण्यांची खूप दुकाने आहेत आणि शिवाय एक मोठे दुकान पियानोचे सुद्धा आहे….आपण चौघे पहाटेच गुलाबनगरीला जाऊत..व तुझ्या आवडीचा मोठ्ठा पियानो खरेदी करूत..कलमी व रानटी गुलाबांच्या कुंड्यांची एक गाडीच खरेदी करूत..”
हे सर्व ऐकून अनाने अत्यंत खुषीत जेवण केले. जेवणानंतर डुलत डुलत ती तिच्या खोलीत आली. तिच्या खोलीतल्या भिंतीवर अनन्य ने स्वत: रेखाटलेले पियानोचे चित्र आता प्रत्यक्ष रूपाने तिला मिळणार याची तिला मनोमन खात्री पटली.
त्या चित्राकडे पहात ..ते डोळ्यात साठवून घेत ती शांतपणे निद्रेच्या कुशीत शिरली..पहाटेच्या गुलाबी गोड थंडीत तिला पियानो खरेदीसाठी गुलाब नगरीत जायचे होते ना!!!!
समाप्त ….
लेखिका – सुनेत्रा नकाते..