The story “pushp sundary sadafuli “tells us that beauty lies in our true and hearty presentation of emotions. Our confidence presents nice look to our personality.
सकाळची वेळ म्हणजे किती घाई गडबडीची! आनंदवनातल्या सगळ्या पशुपक्ष्यांची कोण धांदल उडाली होती. थांबायला बोलायला कोणाला पाच मिनिटंही सवड न्हवती.
मुंग्यांनी वारुळाबाहेर रांगा लावल्या होत्या. त्या माल आणायला निघाल्या होत्या. वारुळातल्या साखरेचा आणि गुळाचा साठा संपत आला होता. पावसाळ्यासाठी त्यांना पुरेश्या खाद्यपदार्थांची साठवण करायची होती.
मधमाश्याही कामाला जुंपल्या होत्या. फुलाफुलांवरून उडत होत्या.मधाचे कण गोळा करून पोळ्यात आणून साठवीत होत्या.काळेशार भुंगेही मधाच्या शोधार्थ फुलांवरून भूं भूं आवाज करीत उडत होते.
चारपाच माकडे मात्र या झाडांवरून त्या झाडांवर हुंदडत होती.मनमौजी टोळ हिरवागार, नीटनेटका पोशाख करून गळ्यातली गिटार वाजवत मजेत फिरत होता.त्याला काहीच काम न्हवते.कोवळ्या उन्हात कोणाबरोबर तरी बसून गप्पा टप्पा कराव्यात असे त्याला वाटत होते…
पण माकडांशिवाय त्याच्याशी बोलायला कोणीच रिकामे न्हवते.शिवाय माकडांशी बोलताना त्याला फार संकोचल्यासारखं वाटे;कारण तो काहीजरी बोलला तरी माकडे फिस्सदिशी हसत आणि त्याची टवाळी करीत.
गळ्यातली गिटार वाजवत टोळ झेंडूच्या वाफ्यांपाशी आला.पिवळी धमक गोलमटोल झेंडूची बाळे वाऱ्यावर डोलत होती. नुकतीच उमललेली एक गुलाब कळी उत्सुकतेने आजुबाजूला पहात होती.सकाळच्या छान सुगंधी हवेत तिने भरभरून मोकळा श्वास घेतला…आणि ती झेंडूच्या बाळांकडे पाहून खुदकन हसली.
तिथेच थांबलेल्या काहीसा विचित्र पोशाख घातलेल्या तोलाकडे पाहून तिला नवल वाटलं. ती त्याला म्हणाली,
“हिरवा सदरावाले आपलं नाव काय?” टोळाला वाटलं, बरी भेटली बोलायला! तो मग खुषीत येऊन म्हणाला,
“मी टोळदादा! गाणं खूप छान म्हणतो. एखादं छानसं
प्रभात गीत म्हणून दाखवुका तुला?”
“नको नको! आधीच तुझ्या त्या वाद्याच्या आवाजानं डोकं दुखायला लागलं माझं.”
“बरं बरं गाणं राहूदेत. गप्पाच मारुयात थोडावेळ. कसं काय वाटलं तुला हे आनंदवन?”
“खूपच छान! खूपच सुंदर! आजुबाजूची ही मोहक ,रंगीबेरंगी, सुगंधी फुलं पाहून मनाला प्रश्न पडलाय.”
“कसला एवढा प्रश्न पडलाय तुला?” टोळाने विचारले तेव्हा गुलाबकळी गालांना खळ्या पाडीत म्हणाली,
“इथल्या सर्व फुलात कोण सर्वात सुंदर आणि देखणं आहे?”
“ठरवणं अवघड आहे, “टोळ म्हणाला, त्यासाठी स्पर्धा घेतली पाहिजे.”
“स्पर्धा? ती आणखी कशी असते?”
माणसे भरवतात ना स्पर्धा, जगतसुंदरी आणि विश्वसुंदरीच्या, तशी एखादी स्पर्धा घेतली पाहिजे. मगच कळेल की पुष्पसुंदरी कोण आहे?”
“व्वा! कल्पना छान आहे बरं टोळभैरवा!” टोळाच्या डोक्यावर जांभळाचे बी टाणकन मारीत माकड म्हणाले, आणि फिस्सदिशी हसले.
माकडाची फिस्कारलेली बत्तिशी पाहून गुलाब कळीच्या अंगावर तर शहारेच आले.
जवळच्याच झुडपा आड कोवळे ऊन अंगावर घेत ससेबुवा गाजराचे कंद चवीने चघळत होता. या तिघांच्या गप्पात मग तोही सामील झाला. तो म्हणाला, “खरेतर या रोजच्या कामाच्या धावपळीत काहीतरी बदल हवाच.”
रोजच या पोटापाण्यासाठी किती धावपळ करायची?
तसा टोळ म्हणाला, “पुष्पसुंदरी स्पर्धा आपण नक्की भरवायची. तेवढीच एखादा दिवस करमणूकही होईल.”
उनाड माकडांनी ही वार्ता मग आनंदवनात सगळीकडे पसरवली. टोळाने मग एक दिवस तळ्याजवळच्या हिरवळीवर सभा घेतली.बरेचसे पशुपक्षी जसे माकड हरीण ,ससा, हत्ती, जिराफ ,मैना भारद्वाज पोपट वगैरे आले होते.
सर्वानुमते बरोबर एक महिन्याने पुष्पसुंदरी स्पर्धा घेण्याचे ठरले. पोपटाने मग टोळाला आनंदवार्ता नावाचे वृत्तपत्र चालू करण्याची सूचना केली. त्यात आनंद वनातल्या सर्व विशेष बातम्या छापायचे ठरले. पोपटाने वार्ताहराचे काम स्वीकारले.
टोळाला आता दिवस पुरेना. सगळ्या फुलांना त्याने स्पर्धेत सामील होण्याचे आवाहन केले.
पुष्पसुंदरी स्पर्धेचे परीक्षक म्हणून अनतार्तिका वरील पेंग्विन पक्ष्याला निमंत्रण धाडले. बघता बघता एक महिना संपला .बर्फाच्या गाडीतून पेंग्विन साहेबांचे आगमन झाले. पांढरा सदरा आणि काळा कोट घातलेले पेंग्विन साहेब मोठया समतोल विचारांचे भासत होते.
स्पर्धेचा दिवस उजाडला. हळूहळू सगळी फुले हिरवळीवर जमली. पशुपक्षीही आले. पांढरा सदरा आणि काळा कोट घातलेले पेंग्विन साहेब परीक्षकांच्या आसनावर जाऊन बसले.
पहिल्या फेरीत सोनचाफा, कमळ, जास्वंद, कण्हेर, गुलबक्षी, जाईजुई, झेंडू, गुलाब, मोगरा ,सदाफुली, बकुळ, शेवंती, चमेली, निशिगंध अशी फुले सामील झाली.
या सर्वांतून पेंग्विन साहेबांनी सोनचाफा,कमळ, मोगरा, बकुळ आणि सदाफुलीची अंतिम फेरीसाठी निवड केली .
या निवडीवर बरीच टीका टिप्पणी झाली. जास्वंदी मान वेळावत म्हणाली, “सदाफुलीने पेंग्विन साहेबांजवळ वशिला लावलेला दिसतोय ,नाहीतर तिची निवड अशक्यच आहे.ना रंगरूप,ना वास! आहे काय तिच्यात?”
“आणि त्या बकुळीत तरी काय एवढ विशेष आहे?” गरगर फिरत झेंडूचे फुल म्हणाले. तशी शेवंती आपल्या पिवळ्या पिवळ्या पापण्या फडकवीत म्हणाली,
या महिन्याभरात खाण्या पिण्यावर थोडं नियंत्रण ठेवायला हवं होतंस तू! म्हणजे तुझा हा वाटोळा गरगरीत बांधा थोडं तरी सडपातळ झाला असता आणि त्या बकुळी ने एवढा तोरा मिरवला नसता.”
मग गुलबक्षी आपल्या नाजुक मानेला हिसका देत म्हणाली,
“ती मोगरी तरी काय ? पांढरीफटक आहे फक्त…आणि सुवास तेवढा वेड लावणारा आहे. मूर्ख लोक फसतात असल्या सुगंधाला.”
गोबऱ्या गुलाबी गालांची गुलाब कळीही थोडी नाराजच होती. आपलं अपरं नाक उडवीत ती म्हणाली, ते कमळाच फुल नुसतं रंगरुपाने देखणं! थोडातरी स्मार्टनेस आहेका तिच्यात? काकूबाई आहे झालं!
फुलांची ही बडबड ऐकून पोपटाची मात्र छान करमणूक झाली. शेवटी अंतिम फेरीची वेळ झाली.सोनचाफा ,कमळ ,मोगरा, बकुळी आणि सदाफुली सर्व तयारीनिशी आल्या होत्या.
पेंग्विनसाहेब त्यांना मंचावर बोलावून त्यांचे विचार ऐकणार होते. मग त्यातील एका फुलाची पुष्प सुंदरी म्हणून निवड करणार होते.
सर्व प्रथम कमळाच फुल मंचावर आलं,कमळाच्या फुलाने सर्वांना वाकून अभिवादन केले; आणि ते म्हणाले,
“कर्तृत्व हे पुरुषाचं सौंदर्य आणि सौंदर्य हे स्त्रीचं कर्तृत्व असते असं कुणीसं म्हटलंय. म्हणूनच आजची ही स्पर्धा केवळ सौंदर्य स्पर्धा नसून आमच्या दृष्टीने कर्तृत्वस्पर्धाही आहे.”
त्यानंतर सोनचाफ्याचे फुल अगदी तोऱ्यात आले. त्याची झळाळणारी सुवर्णकांती आणि सुगंधाच्या घमघमाटाने सगळ्यांचे देहभान हरपले. ते म्हणाले,
“पुष्प सुंदरी ही तीच ठरेल की जिच्या सुगंधाने जग वेडं होतं आणि जिच्या सौंदर्याने डोळे दिपतात.”
त्यानंतर डौलदार पावले टाकीत मोगऱ्याच फुल आलं. त्याच्या मंद सुगंधाने सगळ्यांची मने तरल झाली.मोगऱ्याचं फुल म्हणालं,
“अलीकडे जे स्त्री मुक्तीच खूळ आलं आहे ते म्हणजे निव्वळ थोतांड आहे. आपलं जीवन दुसऱ्यासाठी समर्पित केल्याने मिळणारा आनंद हा सर्वात मोठा आनंद आहे.”
त्यानंतर थोडंसं लाजत पण गोड हसत बकुळीच फुल आलं. ते म्हणालं,
“आपण कितीही लहान असलो तरी आपण एवढं महान कार्य करावं की त्यामुळे आपल्या मृत्यूनंतरही आपल्या अस्तित्वाचा सुगंध सगळीकडे दरवळत रहावा.
सगळ्यात शेवटी हसऱ्या चेहऱ्याची तरतरीत सदाफुली आत्मविश्वासाने पावले टाकीत आली.त्यासरशी प्रेक्षकात बसलेल्या कण्हेर आणि कोरांटी कुजबुजल्या,
“तसं पाहिलं तर आम्ही हिच्यापेक्षा कितीतरी उजव्या आहोत, पण पेंग्विन साहेबांनी अंतिम फेरीसाठी हिला कसं निवडलं देव जाणे!”
सदाफुली सुहास्य वदनाने सर्वांना अभिवादन करीत म्हणाली,
“अंतिम फेरीसाठी माझी निवड नक्की होईल याची मला पूर्ण खात्री होती.मी एवढंच सांगेन की, सर्वांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आत्मविश्वासानं पुढे जावं.परिस्थितीवर न कुरकुरता, दुसऱ्याचा आनंद हिरावून न घेता, सदोदित आनंदी रहाण हाच आजच्या ताणतणावाच्या काळातील उत्तम धर्म आहे.”
सदाफुलीच हे मनोगत ऐकून सगळ्यांचीच मने भारावली.
शेवटी पेंग्विनसाहेब उभे राहिले.पुष्पसुंदरीचा मुकुट कोण पटकावणार याबद्दल सर्वजणच उत्सुक होते.पेंग्विन साहेबांनी घसा खाकरला आणि ते म्हणाले,
“आपली उत्सुकता मी जाणतो.म्हणूनच आपला फार वेळ न घेता मी जाहीर करतो की,पुष्पसुंदरी म्हणून निवड झालेलं फुल आहे सदाफुली!
त्याबरोबर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.सदाफुलीला आपले आनंदाश्रू आवरता आले नाहीत.पेंग्विनसाहेब थोडं थांबून पुढे म्हणाले,
“दगड धोंड्यात खडकाळ माळावरही सदाफुली आनंदाने पाय रोऊन उभी असते.थंडी, वारा, ऊन, पाऊस यांना तोंड देत ती सदैव आनंदाने फुललेली असते.जगण्यावर न कुरकुरता सदैव हसणारी सदाफुली हीच खरी पुष्पसुंदरी आहे. बाह्यसौंदर्य, रंगरूप, सुगंध याहीपेक्षा तिच्या अंतरंगातला आत्मविश्वास हेच जीवन जगण्याचं खरखुरं बळ आहे.”
एवढं बोलून पेंग्विनसाहेब थांबले. फुल पाखरांनी दवबिंदूंचा मुकुट आणला. पेंग्विनसाहेबांनी तो सदाफुलीच्या डोक्यावर घातला.
दुसऱ्या दिवशी आनंदवार्ताच्या पहिल्याच पानावर पुष्पसुंदरी सदाफुलीचे छायाचित्र झळकले.
त्यानंतर दोन- चार दिवसांनी,पाहुणचार घेऊन पेंग्विन साहेब आपल्या बर्फाच्या गाडीतून मायदेशी परत गेले. पण या स्पर्धेच्या निमित्ताने आळशी कामचुकार टोळ मात्र कामाला लागला.आनंद वार्ता हे वृत्त पत्र नेमाने चालवू लागला.
सह संपादिका म्हणून चटपटीत गुलाबकळीची नेमणूक झाली. ती मग फुलांच्या मुलाखती घेऊ लागली.आनंदवार्ताच्या पुष्प-पुरवणीत नियमितपणे एका एका फुलाची जन्मकथा छापून येऊ लागली