प्राक्तन दैव नशीब असे शब्द फक्त आपली हतबलता व्यक्त करायला ठीक असतात. खरेतर प्राक्तन म्हणजे दुसरे तिसरे काही नसून आपण स्वतःच भूतकाळात केलेली कर्मे किंवा बांधलेली कर्मेच असतात.ज्याचा भूतकाळ चांगला त्याचा वर्तमानही चांगलाच असतो आणि वर्तमानात जर आपण आपल्याला ओळखून आपल्याला काय हवे आहे हे ओळखून तशीच कर्मे केली तर निश्चितपणे आपला भविष्यकाळही आपल्याला हवा तसाच असणार.. काहीजण भूतकाळातल्या स्वतःच्याच चुकांना प्राक्तन असे नाव देऊन वर्तमानातील आपल्या सद्य स्थितीचे खापर स्वतःवर न फोडता प्राक्तनावर फोडतात. थोडक्यात काय तर आपले प्राक्तन चांगले असो वा वाईट ते आपण स्वतःच घडवीत असतो. बाह्य परिस्थिती त्यास फक्त निमित्य मात्र असते.
मुहूर्त कर्मकांड याना अवास्तव महत्व दिल्याने माणूस पराधीन होतो. जुन्या नव्याचा समतोल साधत जगता आले तरच आपण येथे टिकू शकतो. पण हे सर्व अहिंसा, सत्य अचौर्य स्याद्वाद इत्यादी धर्मांचे पालन करूनच साधले पाहिजे. आपल्याला मुहूर्त किंवा चांगली वेळ तीच की जी आपल्याला सर्व दृष्टीने सोयीस्कर असते. मग हा मुहूर्त आपण स्वतःच काढणे व त्यानुसार कामे करणे योग्य नाही काय…आपल्याला स्वतःची कुवत ओळखता आली पाहिजे. तरच आपण मोक्षमार्गावर शांततेने मार्गक्रमण करू शकू. आपले आत्मस्वरूप अधिकाधिक विशुद्ध व्हावे यासाठी आपण स्वतःशी प्रामाणिक रहायला हवे. आपल्याला हे कळले पाहिजे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या गोष्टी मी दुसर्यांबाबत करू नये. आपण आपल्या मतांचा आदर करावा तरच इतरही आपल्या मताचा आदर करतील. काही गोष्टी अश्याही असतात की आपल्याला त्या करणे योग्य वाटते पण जर इतरांना त्याचा त्रास होत असेल तर त्या गोष्टी आपण वैयक्तिक जीवनात जरूर कराव्यात … पण आपण दुसऱ्यांवर त्या लादू नयेत.
आज अनेक माध्यमांच्या सहज उपलब्धतेने अनेक जण त्याचा उपयोग करत आहेत. माध्यमांचा उपयोग आपण कसा करतो यावर त्या माध्यमांचे आपल्या आयुष्यात स्थान ठरत असते. माध्यमांच्या स्वैर उपयोगाने बाह्य परिस्थितीत अनेक दोष निर्माण झाले तरी आपण निराश न होता आशावादीच राहायला हवे. हंसाप्रमाणे नीरक्षीर विवेक बुद्धी वापरून त्यातून आपल्याला हवे तेच आपण घेतले तर माध्यमांवर खापर फोडण्यात व्यर्थ शक्ती खर्च न होता ती स्वतःच्या विकासासाठी कारणी लागेल. या जगात अनेक माणसे येत असतात जात असतात. काही समाजकारणी, राजकारणी, गृहस्थ, सामान्यजन, स्त्री-पुरुष दुष्कृत्ये करत असतीलही… पण त्यामुळे आपण का घाबरावे? कोणीतरी दुसरा चूक करतो व आपण त्याची फळे भोगतो असे त्रिकालातही शक्य नाही. काळ कितीही बदलला, कुठल्याही पक्षाचे शासन आले तरी ज्याचा स्वतःवर विश्वास आहे व जो स्वतःशी प्रामाणिक आहे त्याला कशाचेच भय नाहीय. काळ बदलतो, शासन बदलते, कायदेकानू बदलतात, देश बदलतो, वेष बदलतो घरे बदलतात, मंदिरांच्या रचनाही बदलतात पण धर्म कधीच बदलत नाही. कारण धर्म म्हणजे पंथ नाही तर तो आत्म्याचा स्वभाव आहे. आणि आत्म्याचा स्वभाव तर चैतन्यस्वभाव आहे, अहिंसा आहे, सत्य आहे… म्हणून हृदयातला धर्म कधीच बदलत नाही. जगण्यावर प्रेम करणे हा धर्म आहे, इतरांना जगण्यासाठी सहाय्य्यभूत होणे हा धर्म आहे. सृष्टीवरच्या ज्या जीवाला जगावेसे वाटत असते त्याला जगण्यासाठी मदत करता नाही आली तरी त्याला मारण्यासाठी आपण कोणालाही मदत का करावी…
स्वतःच्या आत्मस्वरुपावर त्यातल्या देवत्वावर आपली सम्यक श्रद्धा असली तर विषम परिस्थितीही आपण धर्म पालन करू शकतो. महावीर जैन धर्माचे चोविसावे तीर्थंकर… त्यांनी निरर्थक कर्मकांडे, बोकाळलेल्या पंथप्रवृत्तीवर कडाडून हल्ले केले. ते एक अहिंसक बंडखोर होते.
शाकाहार हा जैन धर्मात सर्वात महत्वाचा मानला जातो. ज्या जैन कुटुंबात मांसाहार होऊ लागेल ते घर घर राहणार नाही.. तो कत्तलखाना होईल. खाण्यापिण्यात अशुद्धता शिरली की स्वयंपाकघर दूषित होते. स्वयंपाक घराची शुद्धी राखणे हे घरातल्या सर्व सदस्यांचे कर्तव्य आहे. ती जबाबदारी एकट्या स्त्रीचीही नाही आणि एकट्या पुरुषाचीही नाही. संपूर्ण कुटुंबाची ती जबाबदारी आहे. म्हणून शाकाहारी कुटुंब टिकले पाहिजे कारण कुटुंब टिकले तर गाव टिकेल, देश टिकेल, आपली संस्कृती टिकेल आणि हे विश्वही टिकेल. भगवान महावीरांच्या मोक्षमार्गावरून जाण्यासाठी आपण प्रथम स्वतःवर प्रेम केले पाहिजे तरच आपण दुसऱ्यावरही प्रेम करू शकू…