We use umbrellas from olden times. An umbrella saves us from rain and hot sun. But in heavy rain umbrella can’t save us from getting wet. In olden times umbrellas were black. But as time changed not only blue, red, yellow, but also colourful umbrellas were made for kids.
The story of an umbrella-shaped flower the coral jasmine or “Tree of sorrow” is told in interesting way. In the Marathi language, this flower is referred to as prajakt or parijatak. Its Latin name is Nikthansas arbortristis. This flower has eight soft & white petals and an orange coloured stalk. Fairies in this story use these flowers as umbrella.
श्रावणातली ती एक सुरेख सोनेरी सायंकाळ होती.हिरव्या हिरव्या कुरणांवर सूर्याचा लडिवाळ सोनेरी प्रकाश पसरला होता. आकाशात मजेत फिरणारे तुरळक काळे -निळे ढग मधून मधून पावसाची गुलाबदाणी शिंपीत होते. पाखरांची बाळे आईचा डोळा चुकवून मुद्दामच त्यात भिजत होती.झाडांच्या फांदयांवर झोके घेऊन आपले पंख सुकवीत होती. आकाशात सप्तरंगी इंद्रधनुष्य फुललं होतं.
अशा या छान छान हवेत फेरफटका मारायची पऱ्यांच्या राणीला इच्छा झाली.गुलाबपाकळ्यांच्या आपल्या घरातून ती बाहेर आली. मग सर्वच पऱ्या आपापल्या गुलाबपाकळ्यांच्या घरातून बाहेर आल्या. घरांचे कमळांच्या पानांचे लांबट गोल दरवाजे त्यांनी बंद केले. मोकळ्या सोडलेल्या सोनेरी केसात त्यांनी बकुळीची फुले माळली.जास्वंदीच्या पाकळ्यांचे झगे घातले.पाठीला फुलपाखरांचे पंख अडकवले.
निळ्या डोळ्यांच्या त्या अंगठयाएवढया नाजुक पऱ्या मग हातात केशरी दांड्यांच्या पांढऱ्याशुभ्र छत्र्या घेऊन निघाल्या.कारण… श्रावणातला तो लहरी रिमझिमता पाऊस… वेडयासारखा कधीही येईल आणि भिजवून टाकेलना!
सगळ्या पऱ्या मग उडत उडत नदीच्या काठावर आल्या. काठावरच्या वाळूची त्यांनी छान छान घरे बांधली.मग त्या लपंडावाचा डाव खेळू लागल्या. त्यानंतर त्यांनी वाळुतल्या शिंपल्यांच्या छोटया छोटया होडया बनवल्या. होडीत बसून नदीच्या सोनेरी पात्रात त्यांनी फेरफटका मारला.
नदीच्या काठी उभे राहून बगळेबुवांचे ध्यान चालू होते. पऱ्या मग बगळेबुवांच्या पाठीवर बसून त्यांच्या लबाडपणाची मस्करी करू लागल्या. हसून हसून त्या बेजार झाल्या. हसण्याचाही त्यांना कंटाळा आला.मग त्या नदीच्या चकाकत्या पाण्यावर उतरल्या.पाण्यावरून अलगद चालू लागल्या. त्याचा मग पकडा पकडीचा खेळ चालू झाला.पऱ्यांच्या राणीवर जेव्हा राज्य आलं तेव्हा ती म्हणाली, “पुरे झाला बाई आता हा कंटाळवाणा खेळ!”
दूरवर नदीच्या पात्रात पऱ्यांना राजहंसाच पिल्लू दिसलं,देखणं आणि डौलदार! त्या पिलाला बदकाची काही काटकुळी पिलं आपल्या क्व्यक क्व्यक आवाजात चिडवीत होती हसत होती; खिदळत होती. पऱ्या तेथे गेल्या.त्यांनी बदकाच्या पिलांना दूर हाकलून लावलं.राजहंसाच्या पिलाचा गालगुच्चा घेतला. आकाशात सप्तरंगी इंद्रधनुष्य डोलत होतं.पऱ्यांना वाटलं त्या सप्तरंगी इंद्रधनुष्यावर बसून झोके घ्यावेत.उडत उडत मग सगळ्याजणी इंद्रधनुष्यावर जाऊन बसल्या. तिथले रंग एकमेकींवर उडवू लागल्या.
त्या रंगांच्या उधळणीन आकाश रंगीबेरंगी झालं.पऱ्या तेथे बसून जोरजोरात झोके घेऊ लागल्या.तेव्हा इंद्रधनुष्य म्हणालं, “द्वाड कार्ट्यांनो फक्त हुंदडायचं माहिती आहे वाटतं तुम्हाला ?काही चांगल्या गोष्टी तुम्हाला कोणी शिकवल्या आहेत की नाही?” तेव्हा पऱ्या हसत हसत म्हणाल्या, “हो तर, आम्हाला नृत्य किती छान करता येतं! तेवढयात परत पावसाची रिमझिम चालू झाली. पऱ्या भिजायला लागल्या. त्यांनी मग आपल्या केशरी दांड्यांच्या पांढऱ्या छत्र्या उघडल्या. त्या नृत्य करू लागल्या.किती छान दृश्य दिसत होते ते! त्याचे तालबद्ध पदन्यास, हातांच्या कमनीय हालचाली ,मानेची ऐटदार हालचाल आणि वाऱ्याच्या शिळे बरोबर होणारी डोळ्यांची मोहक उघडझाप! अहाहा !जणू स्वर्गातल्या रंभा, उर्वशी, मेनका अवतरल्या आहेत असंच वाटत होतं.
समोरच एक घर होते. घराच्या भिंती मातीच्या होत्या.घरावर लाल कौलांचे छप्पर होते. पऱ्यांच्या राणीला सपाटून भूक लागली होती. ती म्हणाली, “चला या घरात जाऊन पाहूयात खायला काही मिळतेका?” सगळ्याजणींनी मग आपल्या छत्र्या अंगणातल्या एका झाडावर उघडून ठेवल्या;पाणी निथळण्यासाठी…
हलकेच मग त्या आत गेल्या. स्वयंपाकघरात चुलीवर बदामाची खीर शिजत होती. वेलदोड्याचा सुवास सगळीकडे दरवळत होता. पऱ्यानी मग बागेतल्या पळसाच्या पानांचे द्रोण तयार केले. त्यात खीर वाढून घेतली.एवढी चवदार खीर त्या प्रथमच खात होत्या. त्यांना खीर खूप खूप आवडली.म्हणून त्यांनी चुलीवरची सगळी खीर वाढून घेतली. संपवली. खीर कोणी बनवली ?कशासाठी बनवली? याचा त्यांनी विचारही केला नाही. खाणे पिणे झाल्यावर खिरीचे उष्टे द्रोण त्यांनी तेथेच फेकले… आणि जाईच्या मांडवावर ताणून दिली.
पहाटे पहाटे त्यांना जाग आली.दारात सडा शिंपून कोणीतरी सुरेख रांगोळी काढली होती. रांगोळीत तऱ्हेतऱ्हेचे रंग भरले होते. कोणीतरी मधुर आवाजात भजन म्हणत होते, आणि… स्वयंपाकघराच्या मागील दारातून खिरीचा दरवळ सुटला होता. त्या वासाने पऱ्यांच्या राणीची भूक खवळली. ती झटकन उठली, आणि म्हणाली, “अरे व्वा ! आजपण खीर तयार आहे वाटतं?” सगळ्या पऱ्या मग मांडवावरून खाली उतरल्या.पळसाच्या पानांचे द्रोण घेऊन त्या चुलीसमोर आल्या.द्रोणात खीर वाढून घेतली,चवही घेतली. त्या सुरेख चवीने सगळ्याजणी अगदी हुरळून गेल्या. आता त्या खिरीचा फडशा पाडणारच होत्या तेवढयात असंख्य मुंग्या जमावाने आत आल्या.
त्यांच्या अग्रभागी असलेली मुंग्यांची राणी म्हणाली, “काल न विचारता ह्यांनीच खीर संपवली तर? आम्हाला काल ह्यांच्यामुळे उपवास घडला. आज तर अगदी कहरच झाला. उठल्याउठल्याच खीर उष्टावली. आता देवाला नैवेद्य कसा दाखवायचा?”
“आम्ही एवढे कष्ट करून साखर जमवली. बदामाचे कणही जमवले. ह्यांना मात्र सगळं आयतं हवं,” मुंग्या म्हणाल्या आणि सगळ्या मुंग्यांनी पऱ्यांच्या पायांना कडकडून चावे घेतले. मुंग्यांची राणी म्हणाली, “आता व्हा येथून चालत्या!” तश्या मग सगळ्या पऱ्या खिरीचे द्रोण हातात घेऊन पळत सुटल्या. मुंग्या त्यांच्या मागे लागल्या. तेव्हा पऱ्यांनी तेथून पोबारा केला… पण त्यांच्या केशरी दांड्यांच्या पांढऱ्या छत्र्या मात्र झाडांवरच राहिल्या.
मुंग्यांनी पाहीले, झाडांवर पऱ्यांच्या नाजुक छत्र्या लटकत होत्या. तेवढयात वाऱ्याचा झोत आला. झाड सळसळलं, आणि केशरी दांड्यांच्या पांढऱ्या छत्र्यांचा भोवताली सडाच पडला. ती प्राजक्ताची फुलं होती. मुंग्यांच्या राणीने ती पटापट उचलली आणि देवाला अर्पण केली.