भरडलेले अश्रू आस्वादात्मक समीक्षा- BHARADALELE ASHROO


भरडलेले अश्रू ….ललित कथा आस्वादात्मक समीक्षा

ललित साहित्य ही एक कला आहे. यासाठीच मराठी जैन ललित साहित्याचा शोध बोध घेताना तो कलात्मक दृष्टीने करून घ्यायला हवा. त्यातल्या जैन या शब्दाचा म्हणजे जैनत्वाचा विचारसुद्धा कलात्मकतेनेच व्हायला हवा.
भारतीय परंपरेची मुळे जशी कृषी संस्कृतीत ग्रामोद्योगात आहेत तशीच ती भारतातल्या प्राचीन धर्मसंस्कृतीत देखील आहेत.
अलीकडच्या काळात ग्रामीण, दलित, स्त्रीवादी किंवा विशिष्ट धर्मीय किंवा पंथीय साहित्याच्या चळवळी सुरु झाल्या आहेत. त्यामुळे साहित्य समीक्षेचे निकषही बदलत गेले. त्यानुसार मग त्या वेगवेगळ्या साहित्यातून कोणता नवा वाङ्मयविचार मिळाला, कोणती नैतिक मूल्ये जपली गेली हे तर पहायलाच हवे पण त्याबरोबरच साहित्यातून साहित्य गुणांना हद्दपार तर केले जात नाहीना हे पाहणे गरजेचे आहे.
साहित्य हे समाजाचा संस्कृतीचा आरसाच असते. त्यामुळे या साहित्याचा सामाजिक सांस्कृतिक दृष्टीने चिकित्सक अभ्यास व्हायला हवा आणि साहित्यातला साहित्यपणाही जपायला हवा.
जे साहित्य निखळ सौंदर्याचा अनुभव देतं ते उपयुक्तच असतं.पण म्हणून उपयुक्ततावादाच्या निमित्ताने साहित्याला प्रचारासाठी राबविणे धोक्याचे असते.
साहित्यिक ग्रामीण, प्रादेशिक, अभिजनवादी कोणताही असो पण त्याची प्रतिभा जर अस्सल असेल तर त्यात प्रचंड नैसर्गिक ऊर्जा साठवलेली असते. त्याचा समतोल नीटस उपयोग करून घ्यायचा असेल तर ती वेड्यावाकड्या पद्धतीने बाहेर पडून किंवा स्फोटासारखी चालणार नाही. त्यातली सांस्कृतिक समृद्धता, सधनता, धर्मनिरपेक्ष सांप्रदायिकता, सौंदर्य गुलाबाच्या पाकळ्यांप्रमाणे हळुवारपणे उलगडायला हवं. त्या उलगडलेल्या पाकळ्यांचं वेगळेपणही जपायला हवं.
मराठी जैन ललित साहित्याचा देह म्हणजे त्याचं बाह्यस्वरूप स्त्रीवादी, ग्रामीण, विद्रोही कसेही असले तरी त्याचा आत्मा मात्र धर्मनिरपेक्ष ‘धर्म’ हाच आहे. यातल्या ‘धर्मनिरपेक्ष’ शब्दातही जो धर्म आहे त्या धर्माचा अर्थ हा संप्रदायाशी किंवा पंथाशी निगडित असला तरी ‘धर्म’ हा जो वेगळा शब्द आहे तो मात्र अहिंसेशी नाते सांगणारा आहे. मनाच्या कोमलतेशी नाते सांगणारा आहे.
मराठी जैन ललित साहित्य यातला ‘जैन’ हा शब्द जैनेतरांना जरी खटकणारा असला तरी जैन धर्मियांना मात्र आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे.
म्हणूनच जेव्हा जेव्हा आपण आपल्या साहित्याला जैन हे विशेषण लावतो तेव्हा ते विशेषण फक्त आपलं जैनत्व मिरवण्यासाठी लावलेलं नसतं. जैनत्वाची खरी दृष्टी आपल्यात निर्माण व्हावी यासाठी ते लावलेलं असतं.
त्यादृष्टीने पाहता जैन ललित साहित्याचं क्षितिज फार मोठं आहे. त्या क्षितीजाच्या जवळपास जाण्यासाठी खूप मोठी झेप आपल्याला घ्यावी लागणार आहे. त्यासाठी जैनत्वाला संकुचित करणाऱ्या सोवळेपणाला, अतिरेकी कर्मकांडाला जसा फाटा द्यायला हवा तसेच कर्मकांडातल्या वैश्विक भान जपणाऱ्या गोष्टींना आणखी जपायला हवं. ही जबाबदारी समाजातल्या साहित्यिकांची, कलावंतांची आहे.
साहित्यातून पडणारी प्रतिबिंबं किंवा साहित्यातून रेखाटलेली प्रतिरूपे वास्तवदर्शी प्रामाणिक तर असायला हवीतच पण ती रेखीव, घाटदारही असायला हवीत.
‘भरडलेले अश्रू’ ही प्राध्यापक डॉ. संतोष मुळावकर यांची कथा साहित्य धर्माचे पालन करणारी आहे. साहित्यिक कोणत्याही धर्मपंथाचा असला तरी त्याच्या साहित्यात मात्र त्याने साहित्य धर्माचे पालन करायलाच हवे. समजा ‘साहित्यात धर्म नसावा किंवा साहित्यात धर्म नसतोच’ असे एखादे वाक्य घेतले तर त्या वाक्यातील धर्म या शब्दाचा अर्थ विशिष्ट पंथ किंवा संप्रदायाशी (बौद्ध, हिंदू. जैन. ख्रिश्चन, मुस्लिम,पारशी वगैरे )निगडित असतो. पण जर आपण असे वाक्य घेतलेकी, ‘साहित्यात धर्म असावा किंवा साहित्यात धर्म असतोच.’ तर या वाक्यातील ‘धर्म ‘ शब्दाचा अर्थ ‘प्रयोजन’ असा घ्यावा लागेल.
इथे प्रयोजन या शब्दाचा अर्थ नेहमीच्या व्यवहारातला म्हणजे हेतू किंवा उद्देश (motive, purpose) असा न घेता अधिक व्यापक व खोल अर्थ घ्यावा लागेल.
नेहमीच्या व्यवहारात साहित्याचे प्रयोजन किंवा कलेचे प्रयोजन म्हणजे साहित्याचा हेतू किंवा उद्देश असा घेतला जातो. पण जैन धर्मात प्रयोजन या पारिभाषिक शब्दाचा अर्थ म्हणजे, ज्याद्वारे सुख उत्पन्न व्हावे तसेच दुःखाचा विनाश व्हावा असे कार्य होय. म्हणूनच असे म्हणावे वाटतेकी, साहित्याचा धर्म म्हणजे वरील प्रकारचे कार्य किंवा प्रयोजन होय.
जैन धर्मात जे चार योग आहेत त्यातला प्रथमानुयोग म्हणजे कथासाहित्य आहे. म्हणूनच जैन परिभाषेनुसार कथा साहित्य किंवा ललित साहित्य हेच एक प्रयोजन आहे. म्हणूनच ललित साहित्याद्वारे दुःखाचा विनाश होतो व सुख उत्पन्न होते या विधानाला पुष्टी मिळते.
आता पुन्हा नेहमीच्या व्यवहारातील साहित्याचे प्रयोजन याकडे बघितल्यास आणि प्रयोजन शब्दाचा अर्थ हेतू किंवा उद्देश घेतल्यास एक प्रश्न उपस्थित होतेकी, साहित्याचे प्रयोजन काय असावे ? तर या प्रश्नाचे निश्चित उत्तर म्हणजे साहित्याचे प्रयोजन आनंदनिर्मिती हेच असावे. म्हणूनच साहित्याचा धर्म काय असावा याचे धर्म आपोआपच मिळते.
साहित्यकृतीतील आनंददायक घटना, प्रसंग, शेवट यानेच फक्त आस्वादकाला आनंद लाभतो असे नाही तर त्यातले दुःख, वेदनांचे चित्रण, त्यातला शोकात्म शेवट यानेही आस्वादकाला आनंदच मिळतो. कारण त्या घटनांचे वर्णन वाचताना, त्याच्याशी तादात्म्य पावताना होणारे दुःख, येणारे अश्रू, व व्यक्तीने प्रत्यक्ष भोगलेले, अनुभवलेले दुःख यांची जात निराळी असते.
साहित्यकृतीतील विरहाचे, दुःखाचे चित्रणही मनाला आनंद देणारे असते कारण ते आत्मप्रत्यय घडवणारे असते. ‘ भरडलेले अश्रू ‘ ही अशीच एक आत्मप्रत्ययकारी कथा आहे.
यातला आत्मप्रत्यय म्हणजे स्वतः प्रत्यक्ष भोगलेला, अनुभवलेला अनुभव नव्हे, वेगवेगळ्या भावनांनी अंतरंगात उठवलेले तरंग किंवा खळबळही नव्हे, क्षणिक भावनांचा मनावर उमटलेला तात्कालिक ठसाही नव्हे तर तो कवी अनिल ( आ. रा. देशपांडे) यांनी म्हटल्याप्रमाणे ” आत्मप्रत्यय म्हणजे, एकेकटे अनुभव व आनुषंगिक ज्ञान यांना सूत्रबद्ध करणारी आत्मीयता होय.
‘भरडलेले अश्रू’ या कथेतील पात्रे जशी बाह्यरूपात दिसतात, बोलतात अगदी तसेच त्यांचे अंतरंगही आहे. उलट दृष्टीने असेही म्हणता येईलकी त्यांच्या अंतरंगाची बोली त्यांच्या वागण्यातून, चालण्या बोलण्यातून उमटलेली आहे.
कथेतील स्थळ प्रसंगांची वर्णने, पात्रांच्या तोंडची बोलीभाषा, त्या भाषेचे शैली विशेष, पात्रांचा स्वतःशीच चालणारा आत्मगत संवाद, स्वातंत्र्यपूर्वकालीन पार्श्वभूमी, त्या पार्श्वभूमीवर स्वतःचे अस्तित्व जपणारी जैन पाठशाळा, तिथले हेडमास्तर, गुरुजी, विद्यार्थी यांचे चित्रण इतके वास्तवदर्शी झाले आहेकी लेखक स्वतः तो काळ जगला आहे असे वाटायला लागते. याचाच अर्थ त्या घडलेल्या वास्तवाचे आकलन, मनं, चिंतन या सर्वांच्या एकत्रित परिणामातून एक एकसंध संघटन, एक नवीन चित्ररूप, एक कलात्मक साहित्यकृती घडलेली आहे.
या कथेतला मोतीराम हा आठवीत शिकणारा अत्यंत गरीब महाराष्ट्रीयन कुटुंबातला आहे. यातला महाराष्ट्रीयन जैन हा उल्लेख एवढ्याचसाठी केलाकी, अगदी प्राचीन काळापासून जैन धर्माचे अस्तित्व, त्याचे पालन करणारा जैन समाज, दक्षिणेतील केरळ, कन्याकुमारीपासून तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्रापासून बंगाल, बिहार, ओरिसा, मध्यप्रदेश या भागात आजही अल्प प्रमाणात का होईना पण टिकून आहे. डोंगराळ भागातील कित्येक आदिवासी जमातीचे आहार, विहार, आचरण, जैन जीवन पद्धतींशी जुळणारे आहे. जैनधर्म हा अल्पसंख्य असला तरी जगातल्या कानाकोपऱ्यातही कुठल्याना कुठल्या स्वरूपात त्याचे अस्तित्व टिकून राहिले आहे.
जैन समाज हा आर्थिक दृष्ट्या अत्यंत संपन्न समाज आहे हाही एक गैरसमजच. जैन समाजातली कित्येक कुटुंबे आजही अगदी हलाखीचे जीवन जगतात. जैन समाजाची बोलीभाषा फक्त मारवाडी गुजराथी नसून ती कन्नड, मराठी तेलगू सुद्धा आहे. अगदी महाराष्ट्रापुरतेच बोलायचे तर विविध मराठी बोली, जसेकी सातारी, पुणेरी,कोल्हापुरी, वर्हाडी, खान्देशी, अहिराणी, वैदर्भीय मराठी बोली बोलणारे त्याच भाषेतून लिहिणारे जैन कवी साहित्यिक आहेत.
भरडलेले अश्रू ही कथा विशिष्ट प्रादेशिक समाजाचेही चित्रण करते. अनसिंग, डोणगाव, वाशीम वगैरे विदर्भातील गावांची ग्रामीण पार्शवभूमी या कथेला लाभली आहे. या कथेचे मूळ किंवा विशेष तिथल्या सामाजिकतेचा शोध बोध घेण्याचा प्रयत्न करते. वेगवेगळ्या समाजाची जडणघडण तिथल्या भौगोलिक परिस्थितीनुसार, वेगवेगळ्या मूल्यानुसार झालेली असते. या मूल्यांबरोबरच समाजात विषमताही असतेच. विषमता रही, मानसिक, बौद्धिक, सांस्कृतिक सुद्धा असू शकते. अशा समाजाची जडणघडण लक्षात घेताना वरील सर्व मुद्दे लक्षात घ्यावे लागतात. त्यामुळे वेगवेगळ्या स्तरावरचे सामाजिक प्रश्न निर्माण होतात. त्या समाजाचे प्रश्न लक्षात घेऊन त्याचा साधक बाधक विचार करून जे वाङ्मय निर्माण होते त्याला सामाजिक जाणिवेचे वाङ्मय म्हणतात. यातून सामाजिक भान व्यक्त होते.
दलित साहित्यात सामाजिकतेचे हे भान ठळकपणे जाणवणारे आहे. पिढ्यानपिढ्या काही विशिष्ट वर्गांनी त्यांची आर्थिक , मानसिक, शारीरिक पिळवणूक केली. विशेष म्हणजे ही पिळवणूक त्यांनी धर्माच्या माध्यमातून केली. त्यांच्या अस्तित्वालाच वेठीस धरले.
याचाच परिणाम म्हणून अशा धर्मालाच दलितांनी नाकारले. त्या धर्मवचनांनाच त्यांनी हद्दपार केले. त्यामुळे साहित्यातून त्यांचा विद्रोह उफाळून वर आला. त्यामुळे दलित साहित्याची भाषा आक्रमक प्रचलित साहित्यसंकेतांना धाब्यावर बसवणारी, जोरदार प्रवाही आहे. ती तशी असणे हे स्वाभाविक आणि क्रमप्राप्तच होते. ती त्या समाजाची गरज होती. आणि तसेच घडलेही,
‘भरडलेले अश्रू’ या कथेतील कुटुंबाचे दारिद्रय गरिबी याला विशिष्ट वर्णियांची वर्णव्यवस्था जबाबदार नाही. पिढ्यानपिढ्या ते त्यांच्यावर लादलेले नाही. इथे फक्त आर्थिक दारिद्रय आहे आणि परिस्थितीने ते त्यांना प्राप्त झाले आहे. पण तरीही विशिष्ट वर्णियांच्या मते ज्या कामाला हलके समजले जाते अशी कामे करणे कुटुंबाला भाग पडते व त्यात त्यांना कसलाही कमीपणा वाटत नाही.
या कथेतील मरणही असेच गरिबाघरचे आहे. जैन श्रावकांच्या मरणाचा उत्सव येथे पाहायला मिळत नाही. कारण असा उत्सव साजरा करायला कोणाला उसंतच नाही. पोटासाठी आणि फक्त पोटासाठीच मरणाची यातायात या कुटुंबातील प्रत्येकाला करावी लागते. त्या मरणाचा उत्सव तर सोडाच पण दुःख करत बसणेही कोणाला परवडणारे नाही.
या कथेत डोणगावचा मोतीराम अनसिंगच्या पद्मप्रभ जैन पाठशाळेत शिकण्यासाठी आला आहे. घरी मरणाचे दारिद्रय आहे. घरचे जाते कधीमधी घरघरायचे कारण दळण्यासाठी घरात ज्वारीचे दाणेच नसायचे.
त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मोतिरामवर माय भडकायची. कारण मोतीरामने शाळेत न जाता म्हशी राखल्या तर जात्यातून रोज पीठ पडेल असे तिला वाटायचे. पण त्याच्या वडिलांना मात्र त्याने शाळेत जावे, खूप शिकावे, शिकून मोठे व्हावे असे वाटे. आपली गरिबी, आपले दारिद्रय आपल्या मुलांच्या, त्याच्या पुढच्या पिढ्यांच्या वाट्याला येऊ नये असे त्यांना वाटायचे. म्हणून ते दिवसभर मरमर काम करायचे तरीपण पोटभर भाकरी मिळण्याचीही मारामार असे. मोतीरामला स्वतःची पुस्तके नसायची. दुसऱ्यांची पुस्तके मिळतील तेव्हा वाचून तो पहिल्या नंबराने पास व्हायचा. शाळा सांभाळून मोतीराम हॉटेलात कपबशा विसळायचा. जातीची लोकं नाके मुरडायची. असे शिकण्यापेक्षा न शिकलेले बरे म्हणायची.
मोतीरामला पद्मप्रभ पाठशाळेचा पत्ता लागला. तो तेथे शिकायला आला. त्याच्यासारखेच अनेकजण दुरून दुरून इथे शिकण्यासाठी आले होते. पाठशाळेत बोर्डिंगची सोय आणि दिवस पोटाला भाकरी आणि रात्री अंथरायला पोते एवढे त्या गरीब मुलांना शिकण्यासाठी परवडणारे आहे.
इथल्या शाळेत शिकवणारे गुरुजी शिकविण्यात गढून जातात आणि विद्यार्थी शिकण्यात दंग होतात. म्हणूनच पाठशाळेची वेळ अकराची असली तरी सगळे विदयार्थी अकराच्या आधीच तास दीड तास हजर होतात. त्याचे कारण इथे गुरुजी वेळेचा हिशेब ठेऊन शिकवत नाहीत. कारण त्यांना उद्याचा स्वतंत्र देश सांभाळण्यासाठी धाडसी मुले तयार करायची आहेत.
वर्गात बसलेला मोतीराम फळ्यावरच्या शब्दा-शब्दांशी एकरूप झाला आहे. दुपारचे अडीच वाजले आहेत. पाठशाळेत डाक आली आहे. त्याच डाकेत ‘मोतीरामचे वडील मरण पावले’ हे सांगणारे घरचे पत्र आहे.
या पाठशाळेत मुलांना येणारी पत्रे हेडमास्तर वाचतात. हेतू हाच की मुलांच्या घरच्या अडीअडचणी कळाव्यात व त्यानुसार काही करता यावे. मोतीरामच्या घरचे पत्र वाचून त्यांना आश्चर्य वाटले. हा निरोप घेऊन कोणीतरी प्रत्यक्ष यायला हवे होते असे वाटून गेले. चपराश्याने मोतीरामला बोर्डिंगात बोलावल्याचा निरोप दिला.
तो सकाळी जेवला होता. तरीही त्याला पुन्हा एकदा गरमागरम जेवण वाढले. आज आपला वाढदिवसही नाही मग आज काय आहे? या संभ्रमात तो पडला. जेवण झाल्यावर पैठणकर गुरुजींनी त्याला सांगितलेकी त्याला डोणगावला जावे लागेल. हे ऐकून यावेळी मोतीरामला आपला आपला अभ्यास बुडेल, आपण मागे पडू याची चिंता वाटत आहे. पण मग गुरुजींनी त्याला सांगितलेकी त्याला जावेच लागेल कारण त्याचे वडील मरण पावले आहेत. मोतीरामच्या पोटातील अन्न फिरू लागले. परवा रात्रीच त्याचे वडील त्याच्या स्वप्नात आले होते. त्याने स्वप्नातच त्यांचे पायही चेपले होते.
ते थकलेले पाय चेपायचे राहूनच गेले या भावनेने मोतीरामच्या गळ्यात हुंदका दाटून आला. डोळ्यातून खळकन पाणी आले. त्याच्याकडे डोणगावला जाण्यासाठी तिकिटापुरतेही पैसे नव्हते. गुरुजींनी त्याला आठ आणे दिले.
त्याच्या मनाची अवस्था त्यावेळी अगदी फाटल्या आभाळासारखीच झाली असेल याचा अंदाज सुज्ञ वाचकाला आल्याशिवाय राहत नाही. पण खरेतर मनाच्या फाटलेल्या अवस्थेतही त्याचे डोके किती व्यवस्थित विचार करत होते याचा प्रत्यय देणारा कथेतला त्याचा स्वतःशीच चाललेला आत्मगत संवाद पाहण्यासारखा ऐकण्यासारखा आहे.
“अनसिंग ते वाशीम सहा आणे तिकीट, अन वाशीम ते डोणगाव आठ आणे तिकीट… आपले वय पंधरा वर्षे पण आपण ठेंगणे आणि हडकुळे असल्यामुळे अर्धे तिकीट काढले तरी चालून जाईल. तिकीट जाऊन शेवटी एक आणा उरणार, तेवढाच घरी कामा येणार. दुःखाचा थोडातरी भार एका आण्याने हलका होणार. ”
एकीकडे हृदयात वडिलांच्या मरणाचे दुःख आणि डोक्यात मात्र खचलेल्या कुटुंबाच्या पोटाची भूक भागवण्यासाठी चाललेला आण्यांचा हिशेब… हा हिशेब मग पुढे फक्त पैशांचा रहात नाही. त्या जेमतेम आठ आण्यातले आणखी थोडे आणे वाचवण्यासाठी त्या छोट्याश्या डोक्यात मग गावागावातील अंतराचा हिशेब चालू झाला.
किती अंतर पायी गेल्यास किती पैसे वाचतील? कच्च्या वाटेने गेल्यास अंतर कमी होईल पण अंधाऱ्या रात्री भीतीही वाटेल. सडकेने चालत राहिल्यास मागून पुसदहून येणारी मोटार हात दाखवून पकडता येईल… हे इतके सारे काटेकोर विचार त्याही अवस्थेत त्याचे डोके पेलू शकते.
व्यवहार आणि हृदयस्थ भावना यांचा इतका सुरेख ताळमेळ घालणारे हिशेब मोठे अजब असतात हेच खरे!
मग तो सडकेने निघाला आहे. खूप वेळ चालला तरी मागून मोटार आलीच नाही. पण तरीही आणखी एक आणा वाचल्याचे सुख आहेच. मग इथे थांबून मोटारीची वाट पाहण्यापेक्षा आणखी थोडे अंतर चालून आणखी अर्धा आणा वाचवावा या आशेने तो परत चालू लागला आहे.
संध्याकाळच्या छाया पसरत चालल्या आहेत. त्यांची सावलीही लांबत चालली आहे. त्यातच रातकिड्यांची किरकिर… भीतीने त्याच्या काळजावर काटा उभा राहिला आहे.
असेच चालत चालत तो पार्डीच्या माथ्यापर्यंत आला. त्यावेळी चोर तिथे अंधारात कसे लपून बसतात, वाटसरूला कसे लुबाडतात, याबद्दलच्या रंगवून रंगवून सांगितलेल्या गोष्टी त्याला आठवतात. मग आपले आठ आणे चोरांनी लुबाडले तर? या कल्पनेने तो जीव मुठीत धरून धावत सुटतो.
धावता धावता सातवा मैल आला,, अंगाला दरदरून घाम फुटला..घशाला कोरड पडली. पाणी प्यायची इच्छा झाली आणि त्याचवेळी सडकेच्या बाजूला असलेली विहीर त्याला दिसली. त्याच्या काळजात चर्रर्र झाले. ती विहीर पाहताच त्याला चकव्याची विहीर आठवली. रात्रीच्या वेळी बोर्डिंगात मेलेल्या माणसाच्या पुराव्याने भीतीने रंगणारी गोष्ट त्याला आठवू लागली.
ती चकव्याची गोष्ट वाचकांनी प्रत्यक्ष कथेतच वाचलेली बरी… चकव्याची ती गोष्ट म्हणजे आयुष्यात आपल्याला भेटणाऱ्या मोहाच्या, तृष्णेच्या चकव्यांची गोष्ट आहे. असे चकवे आपल्याला आयुष्याच्या प्रत्येक वळणावर भेटतच असतात. ते आपल्याला घुलवतात, सरळ वाटेवरून वाकड्या वाटेवर चालायला लावतात. क्षणिक सुखाची चव दाखवून मग त्याची चटक लावतात. त्यात बुडवून बुडवून आपल्याला मारायला बघतात. अश्या चकव्यांपासून दूर राहायला सांगणारी, लोकमानसात अजूनही टिकून राहिलेली ही गोष्ट आपल्याला खूप काही शिकवून जाते.
चकव्याची गोष्ट आठवून मोतीरामच्या भीतीने दुःखाची जागा घेतली. सारी हिम्मत एकवटून त्याने मनातल्या चकव्याला पिटाळून लावले. घशाची कोरड पिऊन टाकली. बाबजी महाराजांचे नाव घेत, मनातल्या मनात णमोकार मंत्र म्हणत तो चालू लागला… पण पाय गळून गेले होते. त्याला पुन्हा वडिलांच्या थकलेल्या पायांची आठवण आली. तेवढ्यात त्याला बैलांच्या गळ्यातील घुंगुरमाळांचा आवाज आला. छकड्यावरच्या माणसाने त्याला बोलावले. पण मोतीरामने त्याला नकार दिला.
चालता चालता त्याला सडकेच्या बाजूने असलेल्या शेतात आग दिसली. ते देवीचे ठाणे असावे असे त्याला वाटले. नंतर त्याला मोटारीचे दिवे दिसल्याचा भास झाला. मोटार पकडावी म्हणून तो शेतातून तिरप्या वाटेने धावत सुटला. पण पुढे गेल्यावर ते दिवेही दिसेनात आणि सडकही सापडेना.
शेवटी एकदाची त्याला सडक सापडली. धावत धावत तो कारंजा फाट्याला आला. तिथल्या डाकूंच्या विचाराने तो परत घाबरला. तेवढ्यात शेवटची मोटार आली.
फ्रंट सीटवर त्याच्या ओळखीचे जयकुमारसा बाबा होते. मोतीरामने हात दाखवताच मोटार थांबली. कंडक्टरने पैसे मागितले नाहीत. तेवढेच तीन आणे वाचल्याने त्याच्या दुखऱ्या जीवाला आधार वाटला. वाशीम आले तेव्हा बरीच रात्र झाली होती. त्यामुळे डोणगावला जाणे शक्य नव्हते. भूक लागली होती. पाय गळून गेले होते. गावात मामाचे घर होते. तो त्यांच्याकडे गेला.
घरातून हसण्या खिदळण्याचा आवाज येत होता. पण मोतीरामने हाका मारताच आवाज बंद झाला. बंद दार उघडलेच नाही. शेवटी सैतवाळ मंदिराजवळच्या माधवराव वाकळेंच्या दुकानाच्या ओसरीत तो झोपला.
पाय पोटाशी घेऊन धोतराचा सोगा पकडून तो जमिनीवरच निजला. भूक दबल्यासारखी झाली तरी थंडी, डास, ढेकूण त्याला झोपू देईनात. न राहवून त्याने माधवरावांना आवाज दिला. त्यांच्या घरात त्याला कशीबशी झोप लागली. पण सकाळी उठल्याबरोबर माधवराव म्हणालेच, “वडील मेल्यावर कोणाकडे जाऊ नये.” तरीही तो मामाकडे गेला पण मामीने त्याला हाकलून दिले.
उपाशी पोटी तो स्टॅण्डवर आला. डोणगावला जाणारी रॉयल मेल बाराला सुटणार होती. भूक सपाटून लागल्यावर त्याने अर्ध्या आण्याची गिल्ली मिसळ व अर्ध्या आण्याचा चहा घेतला. डोणगावचे तिकीट चार आणे पडले. उरलेले तीन आणे सांभाळत चार तासाने तो डोणगावला पोहोचला.
घरी गेल्यावर माय आणि बहिणी रडू लागल्या. वडील गेल्यानंतरचा तो चौथा दिवस होता. सारे काही आटोपले होते. घरात अन्नाचा कण नव्हता. मोतीरामने वाचवलेले तीन आणे कामाला आले. त्याने तीन आण्याची जवारी आणि तिखटमीठ आणले.
माय आणि धाकटी बहीण जात्यावर बसल्या. ज्वारीच्या दाण्यांसोबत जात्याच्या घासात दोघींचे अश्रू पडू लागले. ज्वारीबरोबर अश्रूही भरडले जाऊ लागले.
‘भरडलेले अश्रू’ हे कथेचे शीर्षक सार्थ करणारा हा कथेचा शेवट…
पोटाची भूक भागवण्यासाठी भावभावना उपयोगी पडत नाहीत. तिथे ज्वारीचे दाणेच लागतात. ती ज्वारी मिळवण्यासाठी भावभावनांना तिलांजली देऊन शरीराला यंत्रासारखे राबवावे लागते. त्या शरीराला जगवण्यासाठी शरीराच्या आत असलेलया मन, बुद्धी, भावना यांना दडपावे लागते. मग अश्रुरुपाने बाहेर पडलेल्या भावनांना ज्वारीच्या दाण्यांसोबत भरडावे लागते.
पण ज्वारीच्या दाण्यांइतकीच जगण्यासाठी भावभावनांचीही गरज असते. या भावना आपलं जगणं जिवंत ठेवतात. ज्वारीचे दाणे शरीराला ताकद देतात. पण भावभावना मनाला ताकद देतात.पण ही गरिबी मोठी वाईट असते. गरिबीच्या जात्यात भावना भरडल्या जातात. हे जरी दुःखदायक असले तरी ज्वारीसोबत भरडलेल्या अश्रूंच्या पिठाच्या भाकरीची गोडी ही ज्याची त्यानेच चाखायची असते. ती अनुभूती कोणाचे ऐकून पाहून घेता येत नाही. ती ज्याची त्यानेच घ्यायची असते. पण या अनुभूतीची गोष्ट आपण पाहू शकतो. ऐकू शकतो. तिला स्पर्शही करू शकतो. कलावंताची कलाकृती त्यासाठी माध्यम असते.
चित्र, शिल्प, संगीत, काव्य इ. ललित कला आनंदाचा प्रत्यय देणाऱ्या असतात. त्यालाच जैन परिभाषेत “प्रयोजन ” असे म्हणतात.
आणि अशाप्रकारे आतापर्यंत चर्चिलेल्या सर्व प्रयोजनाचं प्रयोजन म्हणजे पृथ्वीतलावरचा सर्वात मोठा आनंद मिळविणे हेच असते.
या कथेत ज्या पद्मप्रभ पाठशाळेचा उल्लेख आला आहे अशा अनेक संस्कारयुक्त शिक्षण देणाऱ्या जैन पाठशाळा विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात स्वातंत्र्यपूर्व काळातही होत्या. त्या शाळेत उत्तम धर्मशिक्षणाबरोबरच स्वावलंबनाचे धडेही आपोआपच मिळत. मुलांमध्ये उपजतच असलेली जाज्वल्य राष्ट्रभक्ती जोपासण्याचे काम केले जाई.
या कथेतले हेडमास्तर मुलांना येणारी पत्रे वाचतात. त्यामुळे त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी त्यांना कळते. त्यांच्या अडीअडचणी कळतात. मुलांना घडविण्यात जसे शिक्षण आवश्यक असते, तसेच अनुशासन आणि प्रेमही आवश्यक असते. विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर उपाययोजना करणे हे कार्य एखादी प्रेमळ व्यक्तीच करू शकते. मनाच्या निकोप वाढीसाठी संस्कारांबरोबरच प्रेम देण्याचे कार्यही या पाठशाळेत केले जायचे…
या कथेतल्या पाठशाळेतली मुले स्वातंत्र्याची स्वप्ने पाहतात. देश स्वतंत्र झाल्यावर बापूजींचे ऐकणारी, नेहरू मौलाना राजाजींसारखी हुशार, सुभाषबाबूंसारखी धाडसी शहाणी सुरती माणसे घडवण्याचे काम इथले गुरुजी करतात.
कथेतली भाषा, भाषाशैली, खास वैदर्भीय ढंगाची आहे. या कथेतल्या पात्रांचे व्यक्तिमत्व कधी वर्णनातून, कधी एकमेकांशी झालेल्या संवादातून, कधी पात्रांच्या स्वतःशीच चालणाऱ्या आत्मगत संवादातून उलगडत जाते.
उदा. मोतीरामचे वर्णन….
“आठवीतला मोतीराम डोणगाववरुन आलेला.. अंगात फाटके कमीज, चांगले टोंगळ्यापर्यंत येणारे.. अंगावरच्या फाटक्या धोतराला कपाशीला बोन्डे आल्यागत सतरा गाठी पडलेल्या.. पण मनात शिक्षणाचा ध्यास अन बिकट परिस्थितीतून काढणारा प्रचंड आत्मविश्वास…एवढीच त्याची धनमामलात !”
तर असा हा मोतीराम, वय वर्षे पंधरा, ना धड मोठा ना धड लहान… त्याचे स्वतःशीच चालणारे आत्मगत संवाद, त्याच्या मृदू स्वप्नाळू भाबड्या पण खंबीर मनोवृत्तीचे द्योतक आहेत.
उदा. पुढील आत्मगत संवाद पहा..
“हट, चकवा बिकवा काही नसतो अन तो आला तर मी सांगेन त्याला- माझे वडील मरण पावलेत. मला गेले पाहिजे. त्याने ऐकले नाही तर मात्र मीच लोटून देईल त्याला विहिरीत… पण तसे कशाला करायचे? मी सांगेन त्याला, कुणालाही चकवू नकोस.. फसवू नकोस.. अन पुन्हा आमच्या गोष्टीत येऊ नकोस.. माझे ऐक, मी हुशार विद्यार्थी आहे…हुशार विद्यार्थ्यांचे सगळेजण ऐकत असतात. पण हट! चकवा बिकवा नसतोच मुळी… ”
या कथेत आलेले अश्या प्रकारचे आत्मगत संवाद कथानकाची रंगत वाढवतात.
कथेतला छकडेवाला खेडूत व मोतीराम यांच्यातला संवाद खेडुताचे चित्र समोर उभे करतो…
उदा. ” ए बाबू रातरंचा कोठे चाल्ला? भेव नाही वाटत का?”
“वाशीमला जायचे आहे”
“पाह्यटं जाय वासमाले. आता चाल माह्यासंग दगड उमऱ्याले.”
या संवादात आलेले शब्द जसेकी, ए बाबू, चाल्ला, भेव, पाह्यटं, वासमाले, माह्यासंगं, दगड उमऱ्याले हे भाषेतल्या व्याकरणाचे वेगळेपण नमूद करतात.उच्चारांचे वेगळेपण जाणवून देतात.
कथेतली मामी, माधवराव वाकळे वगैरे व्यक्तींच्या तोंडचे एखाददुसरे वाक्यही त्यांच्या मूळ स्वभावाचे दर्शन घडवणारे आहे.
रात्री नाईलाजाने घरात घेणारे पण सकाळी उठल्याबरोबर “वडील मेल्यावर कोणाच्याही घरी जाऊ नये ” असे सुनावणारे माधवराव आणि ,”सुतक्या, लाज नाही वाटत, बाप मेला तरी दुसऱ्याच्या घरी जातो, मुडद्या चल निघ इथून..” असे म्हणणारी तर्कट मामी… यांच्या वागण्यावरून त्या काळातही दिखाऊ सोवळेपणातच धर्म शोधणारी, माणुसकीच्या धर्माला धाब्यावर बसवणारी माणसे अस्तित्वात होती हेच दिसून येते.
त्याचप्रमाणे अगदी कमीत कमी शब्दातून एखाद्या व्यक्तीचे जिवंत समर्थ व्यक्तिमत्व डोळ्यापुढे उभे करणारे हे कथेतल्या मायचे वर्णन पहा…
जात्यावर बसलेल्या मायला लेकराच्या वैभवाची ओवी सुचायची पण जात्यावरच्या ओवीत ओवायला ज्वारीचे दाणे नसलेकी माय भडकायची….यातून लेकराच्या वैभवाची स्वप्ने पाहणारी पण त्याच लेकरांचे पोट भरायला ज्वारीचे दाणे नसलेकी भडकणारी माय…अशी तिची दोन स्वाभाविक रूपे पाहायला मिळतात.
या कथेला अनेक चौकटी आहेत. त्यातली एक चौकट प्रादेशिकतेचीही आहे. विदर्भातील हिंदी मिश्रित प्रादेशिक बोलीचे काही नमुने यात दिसतात. जसेकी, गिल्ली मिसळ, घंटा, टोंगळा, भोपे, टेंभे, धडेलकन, आडसट्टा, घुलवणे, जागलकरी वगैरे… तिथल्या गावांचेही उल्लेख आहेत. जसे, वाशीम, पुसद, अनसिंग, डोणगाव, कारंजा फाटा, दगड उमरा, पार्डीचा माथा वगैरे.
ग्रामीणतेची चौकट आहेच शिवाय जैन समाजाची चौकट तर आहेच. त्यात बाबजी महाराज(भ. पार्श्वनाथ), णमोकार मंत्राचे उच्चारण, सैतवाळ जैन मंदिर वगैरे संदर्भ आहेत.
शिवाय हॉटेलात कपबश्या विसळणाऱ्या मोतीरामला नाके मुरडणारी जातीची माणसे, वाकळे व मामी यांच्या बोलण्यातून आलेला सुतक पाळण्याचा उल्लेख विशिष्ट जातीतील रीतिरिवाज दाखवून देतो.
याशिवाय या कथेला चाळीसच्या दशकातील भारतातील स्वातंत्र्यपूर्व काळाची चौकट आहे. आजही आपण रुपयाचे अवमूल्यन वगैरे चर्चा करत, ऐकत असतो, अनुभवत असतो. पण या कथेमधूनही त्या काळातल्या सोळा आण्यांचा मिळून बनलेल्या एक रुपयातल्या एका आण्यातील अर्ध्या आण्यातूनही काय काय मिळत असे, त्या आण्याचे मूल्य एखाद्याच्या जीवनात किती असायचे याची कल्पना येते.
उदा. ” त्याने अर्ध्या आण्याची गिल्ली मिसळ खाल्ली, कपभर चहा घेतला, अर्ध्या आण्याचाच. त्याचे डोणगावचे तिकीट चार आणे पडले व उरलेले तीन आणे सांभाळत तो डोणगावला येऊन पोहोचला.”
बापूजी, नेहरू,राजाजी, मौलाना यांचे उल्लेख स्वातंत्र्य लढ्याच्या संदर्भात आहेत.
कथेचे निवेदन अतिशय सरळ ओघवते असून भाषेमध्ये कुठलाही अभिनिवेश, आक्रमकपणा, कटुता जाणवत नाही. मूल्य जाणीव तर वाक्यावाक्यातून जाणवते पण ती कुठलाही आव न आणता नकळतपणे आलेली आहे. कारुण्य हा कथेचा स्थायीभाव आहे. सारेच प्रसंग हृदयाला भिडणारे आहेत.
घरची गरिबी, वडिलांचे मरण, नातेवाईकांची माणुसकीशून्य वागणूक या या साऱ्यांमुळे पौगंडावस्थेतल्या मुलाच्या मनातील विविध भावच्छटांचे दर्शन मोठे विलोभनीय उतरले आहे. निवेदनात प्रवाहीपणा असला तरी कुठेही पाल्हाळिकपणा जाणवत नाही.
दुःखाचं प्रदर्शन नाही, कोणाच्या सहानुभूतीची अपेक्षाही नाही पण जे वाट्याला आलंय ते मूकपणे स्वीकारून पुढे चालत राहणारा हा मोतीराम! त्याने भोगलेले वास्तव हे कल्पितापेक्षाही दाहक असूनही निवेदनात कुठेही तक्रारीचा सूर जाणवत नाही.
साधे सुटसुटीत संवाद, त्यातून होणारी भावगर्भ अभिव्यक्ती, काव्यात्मकतेचा आधार न घेताही फक्त अभिव्यक्तीतील संयमामुळे कथा सुबक घाटदार आटोपशीर झाली आहे.
या कथेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, एखाद दुसऱ्या वाक्यातूनही व्यक्त होणारा गोळीबंद आशय, प्रासादिकता, त्यातून व्यक्त होणारे आत्मभान यामुळे हि कथा विश्वात्मक भान व्यक्त करणारी, अनेक आयाम असणारी, अनेक फांद्या असणारी डेरेदार कथा आहे.
या कथेतील काही वाक्ये आवर्जून पुन्हा पुन्हा वाचावीत अशीच आहेत.
उदा. ” घरी मरणाचे दारिद्र्य, त्या दारिद्र्याला मरण नाही.”
“जात्यावरच्या ओवीत ओवायला ज्वारीचे दाणे नसलेकी माय भडकायची.”
“त्या घंटेसाठी का घन्टा वाया घालवायचा.”
“ही कसली आग, ना गाव ना शीव.”
“ते थकलेले पाय चेपायचे तसेच राहून गेले.”
“आतापर्यंत दारिद्र्य एकटेच होते, आता दारिद्र्याच्या सोबतीला पोरकेपण आहे.”
“आता आपणच आपले आकाश.”
“त्याच्या निराश मनाला अर्ध्या आण्याची आशा पुढे चालवू लागली. ”
“आकाशातल्या चांदण्यांचीही त्याला भीती वाटू लागली.”
“अनसिंगला निरोप घेऊन जाणारे कुणी भेटले नव्हते, मरण गरिबाघरचे होते.”
“हरवलीकी काय सडक?”
“संध्याकाळ रात्रीच्या काळोखात बुडून गेली. असेच असतेका मरण?”
वगैरे वगैरे…
तसेच या कथेत आलेली चकव्याची गोष्ट, माणसाच्या पुराव्याच्या भीतीने रंगणारी तर आहेच पण त्यात एक रंगतदार गोडवाही आहे. वाक्याच्या आरंभी येणारा ‘बाबू’ हा शब्द खास वैदर्भीय ढंगाचा आहे. तो ऐकायला गोड तर वाटतोच पण मनात कुतुहुलयुक्त भीतीही निर्माण करतो. उदा. ” मग चकवा येतो अन बाबू…गोड आवाजात विचारतो,”
“माणूस किनई बाबू, चकव्याच्या मागे मागे जात राहतो.”
“खोटं वाटतेका बाबू, आमच्या गावात एक माणूस असाच मेला.”
या कथेतूनही काही प्रश्न निर्माण होतात पण त्यातले एकदोन महत्वाचे प्रश्न मात्र समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहेत. ते असे,
हॉटेलात उष्ट्या कपबश्या विसळून शिकण्यापेक्षा न शिकलेले बरे असे म्हणणारी जातीची माणसे जर श्रीमंत पैसेवाली असतील तर ती माणसे असे एखाद्याला हिणवण्यापेक्षा त्याला शिकण्यासाठी मदत का करीत नाहीत?
जर ती माणसे परिस्थितीने गरीब असतील तर जे काम करून शिकण्याचे धाडस त्यांच्यात नाही तर त्याबद्दल शिकणाऱ्यांना हिणवण्याचा त्यांना काय अधिकार आहे?
खरेतर साहित्यातून असे प्रश्न निर्माण होणे गरजेचे असते. मगच त्यांची उत्तरे शोधण्यासाठी समाज अंतर्मुख होतो. क्रियाशील होतो.
अशी ही बहुआयामी कथा फक्त एका विशीष्ट समाजाची, धर्मियांची, विशिष्ट प्रदेशाची नाही. त्यामुळे एका विशिष्ट संकल्पनेत कोंबून त्यावर लिहिणे अशक्य आहे.
शेवटी साहित्य हे कुठलंही असो, ते आपल्याला विविधरंगी अनुभव देतेकी नाही हे त्यातल्या अस्सल गाभ्यावर अवलंबून असते. म्हणूनच या कथेतील गर्भस्थ दुःख एका विशिष्ट व्यक्तीचं, एखाद्या कुटुंबाचं, एखाद्या समाजाचं राहत नाही. ते विश्वात्मक बनतं. असे असल्यामुळेच मग ते दुःख कितीही गडद,कितीही काळं असलं तरी त्या दुःखाची पहाट मात्र सप्तरंगीच असते.
दलित साहित्यातला विद्रोह, ग्रामीण साहित्यातला अस्सल देशीपणा, स्त्रीवादी साहित्यातला संयम समंजसपणा, स्वच्छंदतावादी साहित्यातील मुक्त सौन्दर्य, प्रादेशिक साहित्यातल्या लाल पिवळ्या काळ्या मातीचा ओला गंध, धार्मिक साहित्यातले आर्जव सत्य शुचिता, संत साहित्यातला प्रांजळ परखडपणा ज्यात एकत्रितपणे उमलला आहे असं एक भारतीय आत्मा असलेलं साहित्य निर्माण होणे गरजेचे आहे.
अश्या साहित्यनिर्मितीसाठी जर एखादी चळवळ उभारली गेली तर प्रत्येकाच्या पहाटेचा रंग निळा, हिरवा, तांबडा, पिवळा, जांभळा असा वेगवेगळा असणार नाही. ती पहाट सप्तरंगी असेल, ती पहाट स्वतःची अस्मिता तर जपेलच पण त्याबरोबर दुसऱ्याच्या अस्मितेलाही तितक्याच प्रामाणिकपणे, हळुवारपणे जपेल….

भरडलेले अश्रू, मराठी जैन ललित कथा… लेखक- प्रा. डॉ. संतोष मुळावकर ,( पूर्वप्रसिद्धी समकालीन मराठी जैन कथासंग्रह भाग १, कथासंग्रह- पुनीत , संपादन-श्रेणिक अन्नदाते, पान क्र. १३८ ते १४४)
या कथेची आस्वादात्मक समीक्षा – लेखिका – सुनेत्रा नकाते


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.