मंदारचल – MANDAAR CHAL


देवी वाचमुपासते हि वहव: सारं तु सारस्वतं।
जानीते नित रामसौ गुरुकुल क्लिष्टो मुरारि: कवि।।
अब्धिर्लंघित एव वानर भटै:किंत्वस्य गंभीरतां।
आपाताल-निमग्न-पीवरतनुर्जानाति मंदराचल: ।।
~ आचार्य हेमचंद्रसुरि
अर्थ – थातूरमातूर पुस्तकी विद्येने आतापर्यंत अनेकांनी वाग्देवीची उपासना केली आहे परंतु सारस्वतसार फक्त गुरुकुल-वासात निवास करून कंटाळलेला मुरारी कवीच जाणतो. वानरसेनेने समुद्र तर ओलांडला परंतु तिला समुद्राची खोली जाणता आलीका ? – नाही. त्याची खोली तर पाताळापर्यंत बुडालेला मंदारचल पर्वतच जाणतो.
वरील काव्यपंक्ती वाचून मला ग़ज़लसागरात पूर्णपणे बुडून गेलेल्या कविवर्य इलाही जमादार यांचीच आठवण आली.
कवी इलाही जमादार म्हणजे ग़ज़लसागरातील पाताळापर्यंत पोचलेले बुडालेले जणू एक मंदारचल पर्वतच असे माझे एक वैयक्तिकमत आहे …
माझी आणि इलाहीजींची ओळख अंदाजे गेल्या १३/१४ वर्षांपासूनची.. २००४/२००५ साली चिंचवड गावातील चापेकर वाड्यात एका संध्याकाळी कवितांच्या एका कार्यक्रमात कवी इलाहींच्या काही ग़ज़ला ऐकण्याचा योग्य आला. त्यावेळी त्यांची “ग़ज़ल बोलते मी ग़ज़ल बोलते” ही ग़ज़ल त्यांच्याच तोंडून ऐकताना मी तर अगदी भारावूनच गेले.
त्यानंतर पिंपरी येथे ग़ज़लांजली संस्थेत त्यांच्या ग़ज़लांवर तरही ग़ज़ल लिहिण्याची संधी मिळाली. गझल क्षेत्रात त्यावेळी मी अगदी नवशिकी नवखीच होते. पण गझल लेखनाचे वेड मला तेव्हाच लागले. महिन्यातून एकदा गुरु इलाहींच्या ग़ज़ला ऐकण्याचा व त्यांच्या मार्गदर्शनाचा योग् त्यावेळी यायचा. अशाच एका कार्यक्रमानंतर इलाहींचे दोन तीन ग़ज़लसंग्रह विकत घेतले व वाचून काढले. ते वाचत असतानाच गझलेच्या तंत्राची भीती मनातून नाहीशी झाली.सहजपणे गुणगुणत गझलांचे शेर कागदावर उतरू लागले.
त्यांची माझी फक्त लांबूनच ओळख होती. पण जेव्हा मी त्यांना माझी एक गझल फोन करून ऐकवली तेव्हा त्यांच्याविषयी वाटणारी आदरयुक्त भीती काहीशी कमी झाली. सतत गझल लेखन करणे व त्यांना फोनवरून ऐकवणे यामुळे आमचे वारंवार फोनवरून बोलणे होऊ लागले. एकदा मग सुभाष नकाते यांच्या समवेत मी प्रथमच त्यांच्या येरवड्यातील कदम निवास मधील राहत्या घरी गेले होते. ते दुधगावचे..आमचे गाव त्यांच्या गावाजवळचेच, त्यामुळे मैत्री जमली. कुटूंबियांसमवेत मग त्यांच्या घरी जाणेयेणे होऊ लागले. मग फक्त माझ्याशीच नाही तर माझ्या पूर्ण कुटुंबाशी त्यांचे स्नेहाचे मैत्रीचे नाते निर्माण झाले. तेव्हापासून आजतागायत हे निखळ मैत्रीचे नाते अजूनही जिवंत आहे.
सुरुवातीला काहीसे अबोल वाटणारे इलाहीजी एकदा मैत्री झालीकी खूप मनमोकळे वागतात असा माझा अनुभव आहे… आजकाल आपण whatsapp, facebook वरून किंवा स्वतंत्रपणे आपल्या साईटवरही लेखन करतो. कारण आता काळ बदललाय. आपल्याला तेथे लाईक्स मिळतात, दाद देणाऱ्या कमेंटस मिळतात.. पण मलातर यापूर्वीच म्हणजे १३ वर्षांपूर्वीच आपल्या नवनवीन गझला रोजच्या रोज इलाहींसारख्या गुरूंना ऐकवण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजते.
मला आठवते त्याकाळात नित्याची कामे भराभर संपवून मी सकाळी सकाळीच त्यांना फोन करायचे. नुकत्याच लिहिलेल्या गझलेच्या तरल भावभावनांवर मन अगदी तरंगत असायचे. नवी गझल ऐकवण्यासाठी गझलतरंगांवर मनही अगदी धावतच असायचे.
असेच एकदा एक ताजी गझल ऐकवायला त्यांना मनाच्या घाईघाईतच फोन केला. “हॅलो, हा माझा शब्द ऐकताच ते म्हणाले, “काय हो तुम्ही नुकत्याच कोठून तरी चार पाच जिने चढून वर आलात की काय? …प्रश्न ऐकून मी जरा भांबावलेच.. पण नंतर माझे मलाच जाणवलेकी, खरंच आजकाल या गझल तरंगांवरून किती वेगात धावत असते मी! तर सांगायचा मुद्दा हा की इलाहींजींचा स्वभाव हा असा आहे… खेळकर आणि खोडकरपण !
आज मी गझल लेखनात स्थिरावले आहे. अजूनही नित्यनेमाने काहीतरी नवनवीन लिहीतच असते. पण आता पूर्वीची ती एकसाईटमेण्ट उरलेली नाही. वयोमानाप्रमाणे व अनुभवाने आपल्या चित्तवृत्ती हळूहळू शांत होत जातात हे खरेच..
पूर्वी इलाहींच्या वाढदिवसाला मी एखादे छानसे शुभेच्छा कार्ड व त्यासोबत एखादी गझल लिहून पाठवायचे. अलीकडे पाठवणे जमत नाही. पण त्यांचा वाढदिवस मात्र माझ्या नेहमीच लक्षात असतो. त्यादिवशी मी मनातल्या मनात का होईना पण त्यांना आनंदी, सुखी, निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देत असतेच.
अजूनही जेव्हा जमेल तेव्हा मधुरा किंवा शशांकला घेऊन मी त्यांना भेटायला त्यांच्या घरी जाते .. मनमोकळ्या गप्पांची मैफल जमते. इलाहीजी आम्हाला मस्तपैकी चहा पाजतात. त्यांच्या त्या टुमदार ग़ज़लकुटीत पुस्तकांच्या सान्निध्यात त्यांना मिळालेले पुरस्कार, बक्षिसे बघत अवती भवती गुरगुरणाऱ्या मांजरांसोबत इलाहींशी गप्पा मारणे हा एक सुखद अनुभव असतो. जुन्या आठवणीत रमताना मन भरून येते.
इलाहींच्या दोह्यांनी व त्यांचे ग़ज़लसंग्रह जखमा अशा सुगंधी, भावनांची वादळे,ओऍसिस, तुझे मौन, सखये व गुफ़तगू यांनी तर ग़ज़लक्षेत्रात एक वेगळाच ठसा उमटवला आहे. त्यांच्या ग़ज़लांवर भाष्य करायला मला नेहमीच आवडते. तनहाई ही त्यांची ग़ज़ल तर कुठल्याही भाषिक वाचकाला आवडेल अशीच आहे…
तनहाई (ग़ज़ल संग्रह गुफ़तगू )

देखा पेड़के साये में कोई धूप अकेली बैठी थी
बस शोर मचा था किरणोंका बाकी सब खामोशी थी

दूरदूरतक फैला सागर पानी ही बस पानी था
कोई किनारा कश्ती कोई नज़र न मुझको आयी थी

चाँद सितारोंका उतरा था अक्स अक्स इस धरतीपर
मासूम इस सहरा में शायद याद किसीकी आयी थी

भटक रहा था इक दीवाना इस सहराकी जन्नत में
लमहा लमहा फूल बना था साँस साँस पुरवाई थी

सूरजके साये में कोई छाँव अकेली बैठी थी
गौरसे मैंने देखा उसको वो मेरी तनहाई थी

टळटळीत दुपार प्रखर दुपार असावी…बहुतेक शिशिरातील तप्त दुपार असावी अश्या एका दुपारी एक झाड उभे आहे. झाड बहुधा निष्पर्णच आहे… आणि म्हणूनच भर दुपारचे कडकडीत ऊन या निष्पर्ण वृक्षाच्या सावलीत निवांतपणे बसले आहे . फक्त सूर्यकिरणांचाच काय तो दंगा धुडगूस अन कोलाहल आहे. पण त्याव्यतिरिक्त बाकी सर्व वातावरण आजुबाजूचा परिसरही अगदी शांत शांत नीरव आहे. मलातर असं वाटतयकी हे ऊन म्हणजे दुसरं तिसरं कोणीही नसून कवीच्या मनातलया लख्ख झळाळत्या आठवणी व कवीचा झळाळता वर्तमानच आहे.
कवी त्या ठिकाणीच बसून पाहतोय..त्याला दिसतोय दूरदूरपर्यंत पसरलेला समुद्र आणि त्यातलं अथांग पसरलेलं पाणी. किनारा तर कोठे दिसतच नाही आणि किनारा गाठावा म्हटलं तरी साधी नावही कोठे दिसत नाही. तप्त उन्हात दूरदूरवर पसरलेलं मृगजळच दिसत असावं कवीला बहुतेक…भविष्याचं मायावी मृगजळ!
पण या टळटळीत दुपारी कवीला धरतीवर मात्र खूप सुंदर छानसं काही दिसतंय. अगदी त्याच्या जवळपासच दिसतंय…भर दुपारी शांत शांत समयी आकाशातल्या चंद्र चांदण्यांचं तारकांच मनमोहक प्रतिबिंब या धरेवर उतरलेलं उमटलेलं आहे. कवीच्या दिव्य दृष्टीला साक्षात हे सर्व समोरच दिसत आहे. आणि मग कोण्या एका निरागस चेहऱ्याची आठवण या प्रतिबिंबातून वरवर येत आहे.
या आठवणीत आणखी कोणीतरी एक आहे.
कोणी एक दीवाना रम्य स्मृतींच्या स्वर्गात नंदनवनात भटकत आहे. असं दृश्य कवी पाहतोय. … म्हणूनच प्रत्येक लमहा लमहा फुलाप्रमाणे उमलून वर येतोय. आणि श्वास श्वास जणू पूर्वेकडून फुलांचा सुगंध उधळत येणारी शीतल वायूची झुळूक बनला आहे. .. किती सुंदर जिवंत सजीव काव्यचित्र केलंय कवीने आपल्यासमोर.. या काव्यचित्रात रसिक अगदी गुंगून रंगून गेलेलाय … आणि अगदी याचवेळी शेवटच्या कडव्यात ग़ज़लेला एक सुंदर कलाटणी मिळालेली आहे.
निष्पर्ण तरुतळी ऊन, साक्षात ऊन होऊन बसलेल्या कवीला सूर्याच्या सावलीत बसलेली एकुटवाणी एकाकी सुरकुतलेली छाया दिसत आहे. कोणाची असावी ही छाया? किंवा कोण असावी बरे ही छाया…. कवी तिच्याच कडे पाहत आहे. मग कवी जेव्हा निरखून अगदी निरखून तिच्याकडे पाहतो तेव्हा प्रथमच अगदी पहिल्या प्रथमच त्याला असं जाणवतयकी ..ही छाया दुसरी तिसरी कोणी नसून आपलं स्वतःचंच कपोलकल्पित दुःख आहे..
वाह !! काय वेलांटीदार कलाटणी दिलीय इलाहींनी शेवटच्या कडव्यात.. अश्या सर्वांगसुंदर ग़ज़ला लिहाव्यात तर इलाहींनीच.. येत्या १ मार्च २०१८ ला कवी इलाही ७२ वर्षांचे होतील. ग़ज़लांजली संस्थेतल्या एक कार्यशाळेत स्वतः इलाहींनी ७२ या अंकाचे अनेक संदर्भात महत्व समजावून सांगितले होते.. ते हे सर्व लिहिता लिहिताच आठवत चाललंय मला…
वयाची ७२ वर्षे पूर्ण करून ७३ व्या वर्षात पदार्पण करताना त्यांना काय भेट द्यावी याचाच मी विचार करतेय. ..मलातर वाटतेय कि त्यांना मी एक पदवीच द्यावी भेट म्हणून.. ग़ज़लर्षि ही पदवीच देते मी त्यांना भेट म्हणून !!!खरेच किती शोभून दिसेल ही पदवी त्यांना..
ग़ज़लर्षि इलाही…..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.