साहित्य कोणतंही असो, हिंदू धर्मियांचं असो, ख्रिस्ती धर्मियांचं असो, बौद्ध धर्मियांचं असो, मुस्लिम धर्मियांचं असो, आदिवासींचं असो, वैदिकांचं असो, श्रमणांचं असो, स्त्रीवादी, पुरुषवादी, ग्रामीण, अभिजनवादी वा प्रादेशिक असो त्या सर्वातून दिसणारं धर्माचं स्वरूप सापेक्ष असतं. … याचं कारण धर्म म्हणजे ज्यानं त्यानं स्वतःच्या प्रवृत्तीनुसार, कुवतीनुसार प्रकृती किंवा निसर्गाच्या हाकेला दिलेली साद असते. Nurture to Nature हा प्रवास म्हणजे धर्ममार्ग असतो. निसर्ग आणि माणूस यांच्या संबंधांचा शोध घेणे म्हणजे म्हणजे धर्माच्या अंतरंगात शिरणे.
ललित साहित्यातूनही माणसाच्या अंतरंगाचा शोध घेतलेला असतो. निसर्गाशी माणसाचं असणारं नातं त्याच्या भावभावनातून साहित्यातून मांडता येतं, शोधता येतं. ललित साहित्याची भाषा लालित्यपूर्ण आनंददायक असते. ती सलील, म्हणजे वाहणारी सहजसुंदर असते. मानवी मनातल्या भावभावनांचे विरेचन करणारी असते. ललित साहित्य मानवी मनातल्या भावभावनाचं विरेचन करतं आणि मनाला एका उन्नत अनुभवापर्यंत आणून सोडतं.
जैन साहित्यिक हा प्रथम माणूस असतो आणि त्यानंतर तो जैन असतो. म्हणूनच आपल्या जीवनात माणूस म्हणून आलेले अनुभव तो जैनत्वाच्या नजरेतून कागदावर उतरवत असतो.
धर्म हा माणसांसाठीच असतो. त्यांच्या कल्याणासाठी असतो. म्हणूनच धर्माचे तत्वज्ञान कधीही माणूसघाणे नसते. ते कोणालाही तुच्छ लेखत नाही. जे तत्वज्ञान माणसाला हीन लेखते ते माणसांसाठी नसते. माणसांमध्ये विषमता निर्माण करणाऱ्या काही स्वार्थी माणसांनी ते तत्वज्ञान स्वतःच्या स्वार्थाकरिता बनवलेले असते.
ज्या साहित्याला आपण जुने म्हणतो ते त्यांच्या त्यांच्या काळात नवेच असते. साहित्य जेव्हा परंपरा बनते तेव्हा त्यात मूळ शाश्वत घटकांबरोबरच बदलत्या मानवीय वृत्ती प्रवृत्तीनुसार काही निरर्थक अनावश्यक गोष्टींची भर पडत जाते. जेव्हा त्याचा अतिरेक होतो,तेव्हा परंपरेतील बाधक हिंसक असणाऱ्या गोष्टी मोडून काढण्यासाठी तत्वज्ञ साहित्यिक जन्माला येतात. ते विद्रोही साहित्याची निर्मिती करतात. या साहित्याची भाषा नवे घडवण्याची असते. नवनिर्माणाची असते.
पण नवे घडवायचे म्हणजे जुने ते सर्व फेकूनच द्यायचे असे नसते. नवे घडवताना टाकाऊ, निरर्थक कचरा फेकायचा असतो, जुने मोडून परत नव्या भाषेत त्याची मांडणी करायची असते. पण ही मोडतोड करूनही त्यातली शाश्वत मूल्येच मूलघटक म्हणून वापरायची असतात.
जैन धर्मात धर्मतत्वांच्या पुनर्मांडणीचे काम तीर्थंकर करतात. तीर्थंकर म्हणजे अहिंसक बंडखोरच असतात. किंबहुना मूळ शाश्वत तत्वे जसेकी अहिंसा, अपरिग्रह, अनेकांतवाद, अचौर्य यांना अगदी सूक्ष्म, अणुइतकाही धक्का न लावता मोडतोड करणाऱ्या व पुन्हा जोडणाऱ्या व्यक्तीलाच जैन धर्मीय तीर्थंकर म्हणतात.
तीर्थंकरांचे समवशरण म्हणजे एक चालती बोलती प्रयोगशाळाच असते. जैनधर्मातील मुनीसंस्था या प्रयोगशाळेत तावून सुलाखून आलेल्या विचारांना जपण्याचे कार्य करते.
ज्या माणसाचा जन्म होतो त्याचा मृत्यूही अटळ असतो. जगण्याला सुंदर बनवण्यासाठी जीवनात धर्माचं अधिष्ठान लागतंच. सुंदर जगणं ही एक कला आहे.. तसेच अटळ अश्या मृत्यूलाही सुंदर बनवण्याची एक कला आहे. त्या कलेचं एक शास्त्र आहे आणि जैन धर्मियांनी या कलेचं शास्त्र आजतागायत अगदी जीवापाड जपलं आहे.
‘याचसाठी केला अट्टाहास ‘ ही व्रती या संग्रहातील शोभना शहा यांची कथा आहे. या कथेत एका वयोवृद्ध जैन धर्मीय श्रावकाची सल्लेखना म्हणजे त्याची सल्लेखनापूर्व व सल्लेखनेनंतरची भावस्थिती रेखाटली आहे.
पंच्याऐंशी वर्षाचे नानाजी आणि पंच्याहत्तर वर्षाच्या जमुनाबाई हे एक प्रेमळ दाम्पत्य आहे. संसारातल्या सुखदुःखात तावून सुलाखून निघालेल्या या जोडप्याची जैन धर्मावर अढळ श्रद्धा आहे.
कोवळ्या नातवाचे ऍक्सीडेन्टमध्ये मरण, नांदत्या लेकीचे कॅन्सरने मरण, धान्याची वखार जळणे , मोठ्या मुलाचे भांडून वेगळे होणे आणि या सर्वांवर कळस म्हणजे म्हणजे धाकट्या मुलाचे ऐन तारुण्यात दीक्षा घेऊन निघून जाणे. ही सारी दुःखे पचवताना जमुनाबाईंचे काळीज फाटून गेले. पण ही सारी दुःखे मनात कोंडून कोसळलेल्या जमुनाबाईंना नानाजींनी धीर दिला आहे… असे हे नानाजी !
आत्म्याचे रहस्य सांगणाऱ्या समयसाराची त्यांनी अनेक पारायणे केली आहेत. फक्त पारायणेच नाहीत तर ते समयसार मनापासून जगले आहेत.
अमलेशने दीक्षा घेतली तेव्हा जमुनाबाईंनी रडून रडून आकांत केला पण नानाजी मात्र शांत राहिले. अंतर्यामी धगधगता ज्वालामुखी लपवून त्यांनी जमुनाबाईंना धीर दिला. संयोग आहे तिथे वियोग हा असणारच हे जाणून त्यांनी आर्तध्यान टाळले आहे. कर्मबंध वाढवू नका असे ते जमुनाबाईंना सांगतात. पण… जमुनाबाईंचे हृदय एका स्त्रीचे आहे, मातेचे आहे. त्यांना वाटायचे नानाजींनी असा कोंडमारा करून घेण्यापेक्षा खूप रडावे, दुःख मोकळे करावे. नाहीतर कोंडलेल्या दुःखाचा विकृतपणे विस्फोट होईल अशी त्यांना भीती वाटायची.
नानाजी अमलेशला पूर्णपणे ओळखून होते. त्याचा निर्णय झाल्यावर त्यांनी त्याला समजावले होते. धोक्याचे कंदीलही दाखवले होते. पण तो पूर्ण विरक्त झाल्याने त्याला अडवण्यात अर्थ नाही हे त्यांना कळून चुकले होते.
हा मार्ग त्याने स्वपर कल्याणार्थच निवडला आहे. तेव्हा त्याला परावृत्त करण्यापेक्षा त्याला साजेल शोभेल असे वर्तन ठेवण्याचा ते प्रयत्न करतात.
दीक्षाविधीचा सोहळा विधीपूर्वक संपन्न झाला. दानधर्म पूजाविधाने शास्त्रदान केले. अमलेश पूज्य १०८ निर्मलसागरजी बनून दूर निघून गेला. सोळा-सतरा वर्षे झाली तरी तो या गावी परत आला नाही. स्वतःला मोह होईल म्हणून नाही तर आई-वडिलांना त्रास होईल म्हणून त्याने तिथे येणे टाळले आहे.
नानाजींचे शरीर हळूहळू वार्धक्याने आकसत चालले आहे. नखातही रोग नसला तरी शरीर वाळलेल्या खारकेसारखं झालं आहे. शरीरातील एक एक इंद्रिय रजा टाकण्याच्या बेतात आहे. आयुकर्म आहे तोपर्यंत यातून सुटका नाही हे नानाजी जाणतात. तरीपण इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी आपला जीव धरून ठेवलाय. देहाच्या पिंजऱ्याचे दार उघडले आहे पण आतला जीव मात्र बाहेर पडायला तयार नाही. आणि यास कारण म्हणजे फक्त अमलेश आहे. त्याच्याशी बोलावं, त्याला पाहावं आणि मग त्यानंतर प्राण गेले तरी चालतील असं त्यांना वाटतंय. पण तो आता लांब आहे, चालत यायचे तर महिनाभर लागणारच. तोपर्यंत हा जीव पिंजऱ्यात राहिलका? या विचारात नानाजी हरवले आहेत.
कथेच्या सुरुवातीलाच आलेलं हे वर्णन पहा….
अंथरुणावर अरिहंत म्हणत कण्हणारे नानाजी, नानाजींच्या किलकिल्या डोळ्यांना दिसणाऱ्या धुरकट गोष्ट, अवतीभवतीच वावरणाऱ्या जमुनाबाई, उतरणीला लागलेली उन्हं, नानाजींची क्षीण हाक, वार्धक्याने थकलेलं शरीर सांभाळत लगबगीने ती हाक टिपणाऱ्या जमुनाबाई… या वर्णनातून या दाम्पत्याच्या आयुष्यातील केलेले संध्याछायांचे धूसर चित्रण अगदी हुबेहूब उतरले आहे.
त्यानंतर कथेत आलेला संवाद त्या दोघांमधील उत्कट प्रेमाचे दर्शन तर घडवतोच पण त्यांच्या मुखातून ८०-८५ वर्षांच्या अनुभवातून उमगलेलं जीवनविषयक सत्य अगदी सहजपणे सांगून जातो. परावलंबी जिण्याला कंटाळलेले, थकलेल्या पत्नीला या वयातही आपले सारे करावे लागते म्हणून हळवे झालेले नानाजी अमलेशच्या भेटीसाठी आकुल-व्याकुल झाले आहेत.
जमुनाबाई तर आयुष्यभर नानाजींची सावली बनून राहिल्या आहेत. तरी त्यांनासुद्धा नानाजी आपली व्यथा उघडपणे सांगू शकत नाहीत. पण नानाजींचं अतिरेकी हळवेपण जमुनाबाईंना व्यथित करते आहे. जीवनातील कुठल्याही संकटांना निर्भीडपणे तोंड देणारा हा कणखर पुरुष शेवटच्या क्षणी मृत्यूच्या भयाने गलितगात्र होतोकी काय… मानस्तंभासारखे सदैव ताठ असलेले नानाजी असे मृत्यूपुढे वाकतीलकी काय… या भीतीने त्याही हळव्या झाल्या आहेत. म्हणूनच त्या जशी नानाजींच्या प्रकृतीची काळजी घेतात तशीच त्यांच्या मनाचीही काळजी घेतात. कारण त्यांच्या या अवस्थेत त्यांच्या मनाला जपणं जास्त आवश्यक आहे हे त्या जाणतात.
ज्या समयसाराची पारायणे नानाजींनी आयुष्यभर केली त्या समयसारावरची पं. टोडरमलजींची मोक्षमार्ग प्रकाशकवरची प्रवचने त्या त्यांच्यासाठी वाचून दाखवतात.
मिथ्याभावामुळे कर्मबंधन होते. कर्मबंधनामुळे आत्मा दुःखी होतो. योग्य उपायाशिवाय दुःख दूर होत नाही व सहनही होत नाही… म्हणून आकुलता निर्माण होते. कर्मबंधनाचा अभाव म्हणजे मोक्ष होय…. हे सारे ऐकता ऐकता नानाजी तनामनाच्या वेदना विसरतात. म्हणूनच त्यांचं शरीर हलकं हलकं होतं. डोळ्यासमोरचा अंधार नाहीसा होऊन तेथे अमलेशचा तेज:पुंज चेहरा दिसायला लागतो. त्याचे हलणारे ओठ दिसायला लागतात. त्या हलणाऱ्या ओठातून जणू समयसारातली वचनेच बाहेर पडताहेत असं त्यांना वाटायला लागतं. ध्यानी-मनी-स्वप्नी त्यांनी घेतलेला अमलेशचा ध्यास आणि तो उघडपणे व्यक्तही करता येत नसल्याने त्यांचं मन असं कल्पनेतलं सुख शोधत आहे. त्यांचं हट्टी मन अमलेशच्या मुखातून समयसाराची वचने अशा तऱ्हेने वदवून घेत आहे.
शरीर आणि आत्म्यामधला नित्य नैमित्तिक निकट संबंध ते जाणतात. मिथ्या दर्शनामुळेच पर्यायात आढळणारी अहंबुद्धी, पुत्र-धन-धान्य- हत्ती- घोडे-महाल यांच्याबद्दलची ममत्व बुद्धी आणि ते असतील तरच मी आहे असे वाटायला लावणारी भ्रमबुद्धी ते जाणून आहेत. हे सारं त्यांना कळतंय पण वळत मात्र नाही. कारण पुत्र मोहाने त्यांचं मन वेडं झालंय. हृदय आक्रंदन करतंय. इतके दिवस जे प्रेम मारून मुटकून दडवून ठेवलं ते दुप्पट वेगाने उफाळून वर येतंय. यात दोष कोणाचा? त्यांच्या दुबळ्या मनाचा हा निसर्गाविरुद्ध चाललेला संघर्ष त्यांना पेलवेनासा झालाय. याच निसर्गाला अमलेशने जिंकलंय.. पण नानाजींना मात्र निसर्गाला जिंकणं अशक्य झालंय.
हा संसार मिथ्या आहे, मायावी आहे पण तरीही तो सर्वजण गुण्यागोविंदाने नांदतात… ते कोणामुळे ? निसर्गामुळेच ! नानाजींच्या अंतर्मनात चाललेला हा झगडा त्यांच्या हृदयाला अशांत करतोय. हा तर दर्शन मोहनीय कर्माचा उदय आहे. आणि सध्यातरी यातून सुटका करून घेण्याचा एकच मार्ग नानाजींपुढे शिल्लक उरलाय… आणि तो म्हणजे अमलेशची भेट होणे. म्हणूनच समयसार ऐकता ऐकता ते हरवून गेले आहेत. त्यांचं हृदय अमलेशच्या हृदयाला साद घालताय. त्याला बोलवतंय. विचारांची आवर्तने आणि भावनांचे कल्लोळ यात ते गुरफटले जात आहेत. हळूहळू त्यांचं शरीर मूक झालय, कण्हणं थांबलंय. वाचता वाचता नवऱ्याच्या हालचालीवर बारीक लक्ष असणाऱ्या जमुनाबाईंच्या हे तात्काळ लक्षात आलंय.
म्हणूनच त्यांनी तात्काळ घरातल्या सगळ्यांना बोलावलंय. मुलांनी मग डॉक्टरांना बोलावून घेतलं आहे. त्यानंतर डॉक्टर मुलांना जे काही सांगतात ते नानाजीही ऐकतात. प्रयत्नपूर्वक कान टवकारून ऐकतात. कारण त्यांनाही शरीराची स्थिती जाणून घ्यायची आहे. शरीर त्यांना अजून किती काळ साथ देणार हे त्यांना जाणून घ्यायचं आहे. कारण जर शरीराची साथ नसेल तर तीव्र इच्छाशक्ती किती काळ साथ देणार? इच्छापूर्तीसाठी साधन म्हणून उपयोगी असणारं हे शरीर तर सांभाळलं पाहिजेचना?
डॉक्टरांचा शब्द न शब्द त्यांनी ऐकला आहे. नानाजी जास्तीत जास्त आठच दिवस काढू शकतील हेही त्यांनी ऐकलंय… पण डॉक्टरांचं हे मत नानाजींच्या मनानं केव्हाच फटकावून टाकलय. अमलेश आठ दिवसात इकडे येणे शक्यच नाही. या मिळालेल्या आठ दिवसांचा उपयोग करून निदान महिनाभर तरी त धरायचाच असा मग त्यांनी दृढनिश्चय केला आहे. जमुनाबाईंना मात्र यातले काहीच माहिती नाही. म्हणूनच तोंडाने अरिहंत- सिद्ध चा जप करणाऱ्या आपल्या नवऱ्याचे त्यांना कौतुक वाटते आहे.
मुले, सुना, शेजारी-पाजारी हितचिंतक स्नेही याना मात्र नानाजींनी आता सल्लेखना घेतलेली बरी असे वाटायला लागले आहे. म्हणूनच गावात आलेल्या भद्रसागर महाराजांना त्यांनी घरी बोलावून घेतलं आहे.
नानाजींच्या सध्याच्या स्थितीची कल्पना मुलांनी महाराजांना दिली आहे. नानाजी आणि महाराज यांच्यातला संवाद मोठा श्रवणीय आहे. महाराज नानाजींना ओळखतात. त्यांचे आयुष्यभराचे आचरण, धर्मपरायणता ते जाणतात. म्हणूनच शरीराच्या अशा अवस्थेत त्यांची बुद्धी कितपत काम देते हे त्यांना या संवादातून जाणून घ्यायचे आहे. त्यानंतर त्यांच्याशी झालेल्या बोलण्यातून त्यांची बुद्धी अजूनही छान काम देते आहे हे त्यांना कळलंय. म्हणूनच ते त्यांना सल्लेखनेबद्दल सुचवतात. ते म्हणतात,
” सल्लेखना हा आत्म्यावरील अंतिम अत्त्युत्तम संस्कार आहे. या अवस्थेत आपण सल्लेखना धारण केलेली श्रेयस्कर… हळूहळू अन्नपाणी, औषध यांचा त्याग करावा. आत्मस्वरूपाचे सतत चिंतन करावे. आपली इच्छा असेल तर आम्ही आपणास सल्लेखना देऊ इच्छितो.. ”
हे ऐकून जमुनाबाई अवाक झाल्या आहेत. नानाजी सावधचित्त झाले आहेत. घरातल्यांना हा विचार पटत असला तरी होकार देण्यास त्यांचे मन धजत नाही. जमुनाबाईंना मात्र काळजी वाटते आहे. त्या संदर्भात महाराजांशी बोलतात. त्यानंतर महाराज आणि जमुनाबाई यांच्यात बोलणे होते. त्या दोघांमधला संवाद काय दाखवतो? हा संवाद महाराजांचे समतोल विचार आणि सहृदयता दाखवतो, अश्या कसोटीच्या क्षणीही जमुनाबाईंच्या हृदयातील धारिष्ट्य दाखवतो. जमुनाबाईंची धर्मविषयक जाण किती सखोल आहे हे दाखवतो.
हे सारे ऐकून नानाजी मात्र सावधचित्त होतात. मनाच्या चलबिचलतेवर मात करून सर्व शक्ती एकवटून ते म्हणतात,
” क्षमा असावी महाराज ! पण मला सल्लेखना घ्यायची नाही. ”
आता मात्र सर्वजणच चकित झाले आहेत. या नंतर महाराज आणि नानाजी यांची प्रश्नोत्तरे होतात. त्यांच्यात झालेले बोलणे म्हणजे एक त्यागी व एक संसारी यांच्यातला युक्तिवाद आहे. त्या युक्तिवादातला खरेपणा, निरागसपणा, महाराजांची तळमळ आणि नानाजींचा वाट पाहण्याचा समंजस हट्टीपणा जाणणाऱ्या वाचकांना त्याही परिस्थितीत हसू आल्याशिवाय राहत नाही.
पण सारेचजण सारखे नसतात. स्वतःच आसक्तीत अडकलेले अज्ञानी नातेवाईक, शेजारीपाजारी आणि अगदी मुले-सुनासुद्धा नानाजींच्या जीवनाच्या आसक्तीबद्दल नाके मुरडतात. टीका टिप्पणी करतात.
पण आपल्या या हट्टी आणि दृढनिश्चयी नवऱ्याला अगदी जवळून ओळखणाऱ्या जमुनाबाई मात्र शांत असतात. त्यांच्या ठाम नकारामागे त्यांचा काहीतरी वेगळा हेतू आहे आणि तो हेतू ते साध्य करतील असा त्यांना विश्वास वाटतो आहे.
त्यानंतर आठ दिवस पार पडले आणि नानाजींना काहीही झाले नाही. उलट पेय पदार्थाचे दोन तीन चमचे जरा अधिकच जाऊ लागले. भक्तामर स्तोत्र, एकीभाव स्तोत्र, तत्त्वार्थ सूत्र, छहढाला वगैरे सर्व तोंडपाठ म्हणू लागले आणि नंतर यावर कडी म्हणजे जमुनाबाईंनाच समयसारावर प्रवचन देऊ लागले.
म्हणूनच त्यांच्या, “होय ना जमुना? केव्हा ना केव्हा तरी मला सिद्धदशा प्राप्त करायचीच आहे.” या प्रश्नावर उत्तरादाखल जमुनाबाई म्हणतात, “त्या भावी सर्वज्ञाला माझे प्रणाम !”
आजकालच्या काळातले केवळ भौतिक आकर्षणालाच प्रेम समजणारे काही तरुण-तरुणी, तसलं प्रेम सिद्ध करण्यासाठी करण्यात येणारा निरर्थक खटाटोप, दिखाऊपणा, अज्ञान पाहिलकी, या वयातलं नानाजी आणि जमुनाबाई यांच्यातलं अप्रदर्शनीय प्रेम, प्रेमातला विश्वास, प्रिय व्यक्तीसाठी मनापासून झिजण्याची तयारी, प्रसंगी अपमान सहन करण्याची तयारी काय दर्शवते? प्रेमाची उथळ संकल्पना ती पार मोडीत काढते. एकमेकांसाठी केलेली मूक तडजोड, प्रसंगी मनाला घातलेली मुरड यातूनच प्रेम फुलत जातं. विश्वासाच्या श्रद्धेच्या भक्कम पायावर ते टिकून राहतं. मग फक्त भावी सिद्धांनाच नाही तर अशा प्रेमालाही प्रणाम करावा वाटतो. त्या दृष्टीने पाहिल्यास दाम्पत्य जीवनातील अव्यक्त प्रेमाचे दर्शन घडवणारी ही कथा एक उत्कृष्ट प्रेमकथाही आहेच.
पण इच्छा, प्रेम हे सारे खरे असले तरी काळ कोणासाठी थांबत नाही हेच खरे. त्यानंतर महिन्याभराने जमुनाबाईंच्या लक्षात आले आहेकी, नानाजींच्या कानाच्या पाळ्या वाकड्या झाल्या आहेत. म्हणून त्यांनी नानाजींना सांगूनच महाराजांना दर्शनासाठी बोलावून घेतले आहे.
मग महाराजांनी त्यांना एकदम यमसललेखना न देता तासा-तासांची नियम सल्लेखना दिली आहे. म्हणजे काहीही खाल्ल्यानंतर किंवा पिल्यानंतर तासभर काहीही खायचे प्यायचे नाही… अगदी औषधपाणी सुद्धा !
नियम सल्लेखना घेतल्यानंतर जमुनाबाईंनी समयसार हाती घेतला आहे. त्या वाचतात आणि नानाजी ते लक्षपूर्वक ऐकत आहेत.
“समयसारातील शुद्ध आत्म्याचे आ. कुंदकुंदांनी घडवलेले दर्शन, जीव व पुद्गल यांचे स्वतंत्र परिणमन, वस्तुमात्राच्या स्वातंत्र्याचा उद्घोष… पण अज्ञानामुळे या दोहोंमध्ये मानलेला कर्ता-कर्म-भाव, परद्रव्यातील कर्ता-कर्म-बुद्धी हेच संसार परिभ्रमणाचे कारण आहे.”
नानाजी एकाग्र होऊन ऐकत आहेत आणि ऐकता ऐकता पुन्हा वाचनाच्या ध्वनीत झालेला बदल त्यांना जाणवतो आहे….
… खोल गाभाऱ्यातून यावा तसा घनगंभीर मृदू मुलायम ध्वनी, वाढत जाणारे प्रकाशाचे वलय, आणि ओम चा घनगंभीर स्वर, पिसासारखं हलकं भासणारं शरीर…. नानाजींना बाह्यजगाचा विसर पडलाय. हृदयस्थ आत्म्याशी संवाद साधण्यास ते उत्सुक झाले आहेत. आणि परत तेवढ्यात मेंदूतील कुठलीशी तार झणझणली… आणि नानाजींच्या मनातली अमलेशच्या भेटीची इच्छा पुन्हा उसळून वर आली. त्या इच्छेपायी नानाजी समोर दिसणाऱ्या स्वर्गीय सृष्टीचा मोह टाळताहेत…. पुन्हा एकदा शरीर जड झालंय. वेदनांनी नसा ठणकू लागल्या आहेत. जीवघेण्या कळा सुरु झाल्या आहेत आणि नानाजींनी जीवाच्या आकांताने अमलेशला साद घातली,” अमलेश, अमलेश ….” आणि यावेळी मात्र त्यांचे स्वप्न सत्यात उतरले आहे…. पित्याची सल्लेखना साधण्यासाठी महिन्याभराचा प्रवास करून अमलेश आला आहे.
स्वप्नवत वाटणारी ती अमलेशची नग्न दिगंबर तेज;पुंज मूर्ती खरीच आहे. नानाजींचं शरीर गदगदतय, स्वर ओला झालाय… नानाजींनी अमलेशच्या… निर्मलसागरजींच्या चरणावर मस्तक ठेवलं आहे. महाराज आपल्या पूर्वाश्रमीच्या पित्याचं पारदर्शक अंतःकरण जाणतात.
आता सल्लेखना,यम सल्लेखना देण्याची वेळ आली आहे हे ते दोघेही जाणून आहेत. महाराज नानाजींना प्रश्न विचारताहेत. त्यात फक्त औपचारिकता आहे.. प्रश्नांच्या पाठोपाठ नानाजींची उत्तरं अगदी सहजपणे येत आहेत. जे काही हवं होतं, ज्यासाठी गेला महिनाभर स्वतःच्या जीवाला त्यांनी तिष्ठत ठेवलं होतं ते त्यांना आता मिळालंय… त्यांचं मन भरून पावलंय…
चारी प्रकारचा आहार, औषधे, अंतरंग व बाह्यपरिग्रहाचा त्याग करून आता फक्त ध्रुवतत्वाचाच ध्यास लागला आहे. नानाजींनी णमोकाराचा जप सुरु केला आहे. त्यात कित्येकांचे आवाज मिसळले आहेत. त्यातला जमुनाबाईंचा स्वर त्यांना ओळखू येतोय. त्यानंतर मात्र आसमंतातून फक्त णमोकाराचेच साद-पडसाद उमटू लागले आहेत. णमोकाराचीच आवर्तने उठताहेत. दुःख , वेदना, आसक्ती यांच्या पलीकडे जाऊन नानाजींच्या सर्व शारीरसंवेदनाही नाहीश्या झाल्या आहेत. स्वर्गीय संगीताचे सूर, सुगंधाचे लोट आणि घंटेचा मंगल निनाद… सप्तरंगी प्रकाशाने उजळलेल्या एका सृष्टीकडे नानाजी निघाले आहेत…..
पूज्य निर्मलसागरजींच्या समोर हात जोडून बसलेल्या जमुनाबाई, पुत्राच्या भेटीसाठी पित्याने केलेला अट्टाहास आणि पित्याची सल्लेखना साधून पुत्राने फेडलेले पांग… हे सारे अद्भुत आणि स्वर्गीयच नाही काय…..
जैन धर्मातील चमत्कार हे असेच असतात. जैन लोक त्यांना ‘अतिशय ‘ असे म्हणतात.ते अध्यात्माच्या भक्कम पायावर उभे असतात… आणि विज्ञानाच्या कसोटीवरही उतरणारे असतात.
या कथेत शेवटच्या प्रसंगात नानाजींना ऐकू आलेल्या घंटेचा मंगल निनाद याला आपण अनाहत नाद म्हणू शकतो. संत तुकारामांच्या अभंगातही त्यांनी ‘अनाहत झल्लरी ‘ या नादाचा उल्लेख केला आहे. मराठी जैन साहित्यातील गीतकृष्ण, देवसमन्वय स्तुती, चैतन्यफाग इ. काव्य रचनात अनाहत नादाचे उल्लेख आहेत. धवलगान या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे (संपादन- डॉ. सुभाषचंद्र अक्कोळे)
“जैन योगशास्त्रानुसार, योग् धारण केल्यानंतर अष्टदल कमलात जागृत झालेली शक्ती ऊर्ध्वगामी होऊन मस्तकात कर्णेन्द्रियांच्या मूलभागात गेल्यावर या नादाचे श्रवण होते. उन्मत्त कोकिळ-रवासारखा, वर्षाकालीन मेघनादासारखा, वेगाने वाहणाऱ्या नदीच्या नादासारखा, समुद्रघोषासारखा असे चार प्रकारचे नाद ऐकू येऊशकतात. या नादाचे उल्लेख गीतकृष्ण(६४) व बहुतरी(५६) गीतात ‘ नाद बिंदे स्वरू ‘ असे आले आहेत. जैनयोगशास्त्रात ही संज्ञा येते. (अमृताशीति, योगिन्दुदेव ४६) ”
या कथेतले नानाजी व जमुनाबाई यांच्यातले संवाद, महाराज व नानाजी यांच्यातले संवाद, महाराज व जमुनाबाई यांच्यातला संवाद, अखेरचा पिता-पुत्रातला संवाद.. चढत्या गतीने चढत जाणाऱ्या मानवी मनाची ऊर्ध्वगती दाखवणारे तर आहेतच, पण मानवीय भावनांची सुरेख सरमिसळ दाखवणारेही आहेत.
लेखिकेचे जैनधर्मग्रंथांचे वाचन, आकलन, त्यानुसार आचरण किती पारदर्शक असेल याची झलक लेखिकेच्या सहजसुंदर भाषाशैलीतून जाणवल्याशिवाय रहात नाही. लेखिकेच्या भाषेतून समयसारातील अनेक संदर्भांचे समृद्ध दर्शन घडते. संदर्भ संपृक्तता हा या कथेतील भाषेचा एक विशेष म्हणावा लागेल. घरगुती संवादातही हे संदर्भ अगदी सहजतेने येतात. म्हणूनच डोक्याला फारसे न शिणवता ते हृदयात उतरतात.
लेखिकेचे जैन धर्मग्रंथांचे वाचन विपुल असल्याने आणि कथेची गरज असल्याने या कथेत अनेक जैन पारिभाषिक शब्द व संज्ञा अगदी विपुल आल्या आहेत. हे पारिभाषिक शब्द अनेक जैन श्रावकांच्या अगदी अल्पशिक्षित श्रावकांच्या बोलीभाषेतूनही अगदी सहज सहज येत असतात.
असे अनेक शब्द, शब्दगट, उदा. आर्तध्यान, शाश्वत ध्रुवतत्व , संयोग वियोग, आकुलता, पर्यायस्वभाव, मिथ्यादर्शन, ममत्व बुद्धी, कर्तृत्व बुद्धी, सद्धर्मवृद्धीरस्तु, जीव-पुद्गल, यमसल्लेखना, नियमसल्लेखना, क्षमापणा, चरण प्रक्षाल, परिणाम बिघडणे… वगैरे या कथेतल्या बोलीतून सहज उमटले आहेत. हे सर्वच शब्द, शब्दप्रयोग शब्दांचे अर्थ, त्यामागचे भाव, आणि तशीच कृती करण्याचे उपजत संस्कार खऱ्या जैन श्रावकाच्या लेखनातून नकळतपणे प्रकट होतात. त्यामुळे त्यांची ही शैली जैनी भाषाशैली म्हणून नक्कीच वेगळी दिसते. पण तशी ती दिसल्यास कोणी हरकत घेण्याचे काहीच कारण नाही… कारण लेखनातून अशाच वेगवेगळ्या भाषाशैलीचे नमुने उदा. स्त्रीवादी, ग्रामीण, विद्रोही वगैरे आपण बघतच असतो.
जैनसाहित्यकृतीतून त्यात ललित लेखकांनी मांडलेल्या विचारातून कोणाचा कोणाबद्दल द्वेष उत्पन्न होणार नाही याची आपोआपच काळजी घेतली जाते… त्यामुळे या साहित्यकृतींचा आस्वाद घेताना, समीक्षात्मक मते मांडतानाही स्यादवादाचा आधार घेऊन, कोणाबद्दल द्वेष उत्पन्न होणार नाही, गैरसमज किंवा चुकीच्या कल्पना निर्माण होणार नाहीत याचीही काळजी घ्यावी लागते.
मम्मटाने आपल्या काव्यशास्त्रात म्हटले आहेकी, ललित साहित्यातून येणारा उपदेश हा कांतासम्मित असायला हवा. त्याचप्रमाणे माझे मत असे आहेकी, ललित साहित्यकृतीची समीक्षा मीमांसा हीसुद्धा कांतासम्मितच असायला हवी.
‘लेकी बोले सुने लागे’, या म्हणीतल्या सासूची भाषा व्यंगार्थी असते. चलाख सुनेलाही ती बरोबर कळते आणि लेकीला तर कळतेच कळते. पण त्रयस्थाला ती कळत नाही…… पण आईची भाषाशैली वेगळी असते. कधी ती साधी सरळ असते पण कधी व्यंगार्थीही असू शकते. आई जेव्हा मुलाशी बोलते तेव्हा ते फक्त मुलालाच उद्देशून असते. ती जरी व्यंगार्थी बोलली तरी ते मुलालाच उद्देशून असते व त्यामागचा खरा भाव मुलालाच कळतो.
जिनवाणीची भाषाशैली ही ‘लेकी बोले सुने लागे’ या म्हणीतल्या सासूची भाषा नसून फक्त आईचीच भाषा असते. ही ज्याने त्याने आपापल्या कुवतीप्रमाणे आपल्यापुरतीच समजून घ्यायची असते. त्यातून जे काही उमजते त्याचा अर्थ, भाव इतर व्यक्तींशी ताडून माडून बघण्याआधी स्वतःच्या संदर्भात ताडून माडून बघायचा असतो. मगच त्यातून आत्महित साधले जाते… आणि आत्महित साधणाराच परहितही साधू शकतो.
या ललितकथेची भाषा शैलीही जैन आगमाचेच संस्कार घेऊन आलेली आहे, म्हणूनच ती मनाला भावते, न सलता न खुपता सरळ अंतःकरणात उतरते. पण जर कोणी कुतर्क करून असे म्हणेलकी ही कथा जैन तत्त्वज्ञानाच्या फक्त प्रसारासाठी लिहिली आहे तर त्याला या सुंदर कथेमागचा भावच कळला नाही असे म्हणावे लागेल.
मराठीतील लोकप्रिय कथालेखिका आशा बगे यांच्या अनेक कथांमधून येणारे संदर्भ… जसे मोरोपंतांच्या आर्या, गोपालकृष्ण, पंढरीचा पांडुरंग, कर्मांची शिदोरी, चातुर्मास, रुक्मिणी सुभद्रा द्रौपदी यांची आख्याने, श्रावण सोमवारचा शिधा, कुमारिका सांगणे, लग्नात पुजला जाणारा गौरीहर, वैकुंठ चतुर्दशी, महादेवाच्या मंदिरावरचा त्रिपुर, प्रक्षाळपूजा, सगुणभक्ती वगैरे … त्या कथांची रंगत वाढवतात. कथेतल्या पात्रांची आणि वाचकांची जवळीक वाढवतात.
त्याचप्रमाणे ही कथा वाचतानाही समयसारातल्या निश्चय आणि व्यवहाराची शैली आपल्याला समजून घ्यावीशी वाटते. कथेतल्या पात्रांशी आत्मगत संवाद साधावासा वाटतो … नकळत तो साधलाच जातो.
या कथेतून काय सांगितले आहे? या प्रश्नाचे स्थूल दृष्टीने असे देता येईलकी यात जैन धर्मातील सल्लेखनेविषयी सांगितले आहे. सल्लेखना कधी घेतली जाते? ती कोण देऊ शकते? सल्लेखना घेण्यामागे घेणाऱ्याचा, देण्यामागे देणाऱ्याचा, कुटुंबीयांचा हेतू काय असतो? वगैरे गोष्टींचेही आकलन होते. पण सूक्ष्म दृष्टीने कथेचे अवलोकन, आस्वादन करत गेल्यास या कथेला असलेले विविध वादांचे , जाणिवांचे पदरही उलगडत जातात. यासाठी समीक्षकाची किंवा आस्वादकाची दृष्टी सूक्ष्म व अनेकांतात्मक असायला हवी.
या कथेत सल्लेखना घेणारी व्यक्ती आणि त्या व्यक्तीशी आयुष्यभराचे नाते समरसतेने पेलणारी गृहिणी या दोघातल्या सरळ भावबंधांचे, कितीही गुंतायचे नाही म्हटले तरीही गुंतवणाऱ्या नात्याचे, मोहाच्या धाग्यांचे, मानवी मनात दडी मारून बसलेल्या सुप्त इच्छांचे उत्कट चित्रण आढळते. असे चित्रण हे उस्फुर्त नसून उत्कटच असावे लागते. काही चित्रणे उस्फुर्तही असतातच आणि ती त्या कथानकाची गरज असते.
या कथेतही संघर्ष आहेच. कथेतला संघर्ष फक्त त्यातल्या पात्रांच्या परस्पर विरोधी मतातून किंवा समाजातली एखादी रुढीपरंपरा किंवा अन्यायाविरुद्ध केलेल्या बंडातूनच व्यक्त होतो असे नसते. कथेतला संघर्ष मानवी मनातल्या परस्परविरोधी भाव-भावनांचा, कषायांविरुद्धचा, अंतर्गत आसक्तींचा व कर्तव्याचाही असतो.
या संघर्षातून फक्त त्या पात्रांपुरतीच व्यक्तिगत जाणीव व्यक्त होते असे नाही. त्यातल्या व्यक्तीला आलेल्या भानातून विश्वात्मक भानही व्यक्त होतच असते… पण व्यक्तीला आलेल्या आत्मभानातून विश्वात्मक भान व्यक्त होण्यासाठी कथेचं कलात्मक रूप जपणं तितकंच गरजेचं असतं. नाहीतर मग त्या कथेला कधी वैयक्तिकतेचा गंध येतो किंवा प्रचारकी रंग चढतो.
आपल्याला जे तत्वज्ञान भावलं, जे आपण अनुभवलं, ते मांडताना विशेषतः ग्रंथातली मोठमोठी अवतरणे, प्रवचनातले उतारे, श्लोकांची निरुपणे किंवा सूत्रांची स्पष्टीकरणे मांडताना ती सामान्य वाचकाला रुक्ष कंटाळवाणी वाटता कामा नये. कधीकधी आपल्या वैयक्तिक आवडीनिवडीप्रमाणे त्यांची लांबी अकारण वाढलेली असते. तो मोह आपण टाळायला हवा.
उत्तमोत्तम ललित कथांच्या वाचनातून, स्वतःच्याच कथेचं वारंवार पुनर्वाचन करून सरावाने आपला कलानुभव गोळीबंद (compact) करता येतो. तत्वज्ञानाची जरा जादा मात्रा (overdose) तर होत नाहीना हेही पहायला हवे. नाहीतर मग इतकं सुंदर तत्वज्ञान असणाऱ्या कथांवर प्रचारकीपणाचा आरोप होण्याची शक्यता असते.
खरंतर जैन तत्वज्ञान इतकं सरळ, स्पष्ट आणि तरीही रसाळ आहे, जैन इतिहास इतका अहिंसात्मक, सर्वसमावेशक आणि अभिमानास्पद आहे; आणि म्हणूनच त्यातले संदर्भ आपल्याला ललित साहित्यातून म्हणजे कथा, कवितांमधून सहजपणे नेमक्या ठिकाणी पेरता यायला हवेत. तरच सामान्य संसारी जीवांच्या भावनिक गरजा पूर्ण करणाऱ्या ललित साहित्याचे उदंड पीक (माल नव्हे) आपल्याला घेता येईल.
ज्या चुका आपण इतिहासात केल्या त्याचीच फळे आज आपण भोगत आहोत. आपण सर्वजणच मुनी बनलो तर आपल्याला आहार कोण देणार? म्हणूनच आता इतिहासाची पुनरावृत्ती होता कामा नये. ……. अन्यथा दहाव्या शतकात होऊन गेलेला जैन कवी पुष्पदंत याची लोककल्याण भावना ज्ञानेश्वरांच्या पसायदानाइतकीच रसाळ, मधुर, व प्रासादिक गुणांची आहे ही गोष्ट आम्हा जैन साहित्यिकांमधील किंवा काही मोजक्या इतिहासप्रेमी व संशोधकांमधलं फक्त गुपित म्हणूणच शिल्लक राहील. संदर्भ-( महाकवी पुष्पदंताने सन ९६५ मध्ये आपल्या महापुराण ग्रंथाची समाप्ती करताना लोक-कल्याणाची उत्कट भावना काव्यरुपाने व्यक्त केली आहे. ही रचना महाराष्ट्री अपभ्रंश भाषेतील आहे. या भाषेला राष्ट्रकूटकालीन मराठी असेही म्हटले जाते – धवलगान, संपादन डॉ. सुभाषचंद्र अक्कोळे)
‘याचसाठी केला अट्टाहास’, ललित कथा, लेखिका – सौ. शोभना शहा, कथासंग्रह व्रती, समकालीन मराठी जैन कथासंग्रह भाग ४, पृष्ठ क्र. २१५ ते २१९
संपादन- श्रेणिक अन्नदाते, सुमेरू प्रकाशन
आस्वादात्मक समीक्षा – लेखिका सौ. सुनेत्रा नकाते