Koranti is a type of flower which has no attractive smell. But God or nature has given various attractive colours to this flower. Flowers of Koranti have colours like blue, violet, orange, yellow, white. Buds of Koranti flower are also very attractive. Flowers of koranti are used in making medicines. Women and girls make chaplet(gajara) of koranti flowers.
‘Kumpanavarachi Koranti’ is a type of fantasy story. In this story message given is, ‘We should be happy in what God has given us. We should try our best to be healthy, wealthy and happy. We should not steal anything from others’.
जलपऱ्यांच्या राणीच्या वाढदिवसाचं निमंत्रण चपळ चटपटीत मासोळ्याकडून तळ्याकाठच्या गवतफुलांना, वेलींना आणि झाडांनाही मिळालं. झाडावर गाणी गात बसलेल्या पाखरांच्यामार्फत ते आकाशात फिरणाऱ्या ढगांना मिळालं. ढगाच्यामार्फत ते निमंत्रण इंद्रधनुवर झोके घेणाऱ्या आकाशपऱ्यांना मिळालं. कमळावर गुंजारव करणाऱ्या भुंग्याच्यामार्फत ते निमंत्रण रानावनातल्या सुगंधी फुलांना मिळालं.
आकाशपऱ्या मग तयारीला लागल्या. रुपेरी पंखांवर त्यांनी चमचमणाऱ्या चांदण्या लावल्या. गळ्यात नक्षत्रांच्या माळा घातल्या. निळसर पांढऱ्या झग्यांवर इंद्रधनुष्यातल्या रंगांची शिंपण केली. आकाशातून त्या तळ्याच्या काठावर उतरल्या. वनपऱ्याही देवमाशाची वाट पहात उभ्या होत्या. वनपऱ्यांनी हिरव्या पानांचे झगे घातले होते. कानात बकुळीची कर्णफुले आणि गळ्यात दवबिंदुंच्या माळा घातल्या होत्या. गालावर गुलाबपाकळ्यांचा रंग लावून, जास्वंदीच्या पाकळ्यांनी रंगवलेल्या लालचुटुक ओठांनी हळुवार हसत होत्या. कित्ती कित्ती छान दिसत होत्या वनपऱ्या! जणू खऱ्याखुऱ्या निसर्गकन्याच! त्यांच्या त्या साधेपणातील सौंदर्याचा आकाशपऱ्यांनाही क्षणभर हेवा वाटला.
तेवढयात देवमासा आला. त्याने सगळ्यांना पाठीवर बसायचा इशारा केला. सगळ्याजणी मग त्याच्या पाठीवर स्वार झाल्या. जलपऱ्यांच्या राणीच्या महालाकडे जाणारा रस्ता स्वच्छ चमकदार आणि स्फटिकासारखा होता. वाटेत पऱ्यांना कितीतरी रंगीबेरंगी मासोळ्या व पाणकमळे भेटली. महालाच्या दाराशी मत्स्यकन्या उभ्या होत्या. येणाऱ्या पाहुण्यांचं त्या स्वागत करीत होत्या. त्यांच्या अंगावर सुगंधी पाण्याचे हलके फवारे शिंपित होत्या. नोकरचाकर, दासदासी यांची अगदी धावपळ चालली होती. छोट्या छोट्या मासोळ्या उगीचच त्यांच्या पायात लुडबुड करीत होत्या. महालाच्या दारावर रंगीत बुडबुड्याचं तोरण लावलं होतं. कमळकळ्या छानसं हसून सर्वांचं स्वागत करीत होत्या. त्यांनी वनपऱ्या आणि आकाशपऱ्यांना शिंपल्यांच्या खुर्च्यांवर नेऊन बसवलं.
रंगीत प्रवाळखडकांच्या सिंहासनावर जलपऱ्यांची राणी बसली होती. शंखशिंपल्यांच्या वाद्यांसहित बदकांचा वाद्यवृंद वादन करीत होता. शुभ्र पोशाखातले डौलदार हंसपक्षी तालबद्ध पद्न्यास करीत नृत्य करीत होते. काही जलपऱ्याही तेथे नाचत होत्या. लयबद्ध सुरावटीवर सगळेच भान हरपून नाचत होते. आकाशपऱ्याही मग नकळत उठल्या. जलपऱ्यांच्या हातात हात घालून नाचू लागल्या. वनपऱ्यांच्या पावलांनीही बसल्या जागीच ठेका धरला होता. त्यांनाही वाटत होतं, उठावं आणि नृत्यात सामील व्हावं, पण त्या उठल्या नाहीत. आकाशपऱ्यांच्या आणि वनपऱ्यांच्या वस्त्रांचा झगमगाट पाहून त्यांना वाईट वाटलं.
जलपरीचा आरसेमहाल पाहून त्यांना जमिनीवरच्या त्यांच्या वनराईची लाज वाटू लागली. तिथले दगडधोंडे, काटेकुटे, त्यांच्या डोळ्यात बोचू लागले. वनराईतल्या झाडाझुडपांचा शीतल गारवा, तिथल्या रंगीबेरंगी फुलांचे वेड लावणारे सुवास, प्रेमाची ऊब देणारी हिरवळ, चवदार फळं, पक्ष्यांची मधुर गाणी या साऱ्यांचा त्यांना विसर पडला. वनपऱ्या असूनही त्याही शेवटी वरवरच्या झगमगाटाला भुलल्याच. साधेपणातल्या सौंदर्याचा त्यांना विसर पडला. दिखाऊ चमचमाटाने त्यांच्या मनाचा ताबा घेतला.
जेवणासाठी खास पाणकोबीचे पराठे व पाणकणसांच्या दाण्यांची खीर बनवली होती. कमळाच्या थाळीसारख्या पानात खीर वाढली होती. सर्व पऱ्यांनी खिरीचा मनसोक्त आस्वाद घेतला. त्यानंतर पिवळसर केशरी रंगांच्या काचेच्या चषकात सरबत घेऊन रंगीबेरंगी मासोळ्या आल्या. पाच पाकळ्यांच्या फुलांच्या आकाराचे पिवळसर चषक! जणू नाजुक नाजुक देठांची नाजुक फुलेच! अहाहा! वनपऱ्या पहातच राहिल्या. इतके सुंदर चषक त्या पहिल्यांदाच पहात होत्या. त्यातलं सरबत प्यायचं तर त्या प्रथम विसरूनच गेल्या. मासोळ्या सरबताचे चषक तत्परतेने भरत होत्या. चषक रिकामे होत होते … परत परत भरले जात होते.
शेवटी समारंभ संपला. जलपऱ्यांच्या राणीने आठवण म्हणून सर्वांना पाणीदार मोत्यांचे कंठे दिले. सर्वांनी एकमेकांचे निरोप घेतले. आकाशपऱ्या पुढे निघाल्या. वनपऱ्या मात्र मागे मागे रेंगाळत होत्या. कदाचित त्यांना त्या सरबताची नशा तर चढली नव्हती? टेबलावरचे रिकामे सरबताचे चषक त्यांना खुणावत होते. त्यांना त्या चषकांचा मोह पडला होता. खऱ्या खुऱ्या निसर्गकन्यांना त्या चकाकणाऱ्या रिकाम्या चषकांचा मोह का बरे पडावा? ‘विनाश काले विपरीत बुद्धी’ म्हणतात ना तसंच काहीतरी असावं.
सगळ्यांच्या नजरा चुकवून मागे रेंगाळणाऱ्या वनपऱ्यांनी बरेचसे रिकामे चषक आपापल्या झग्यात लपवले. मग मात्र त्या अगदी झपाटयाने निघाल्या. आकाशपऱ्यांच्या समवेत देवमाशाच्या पाठीवर स्वार झाल्या. काठावर येऊन उतरल्या. आकाशपऱ्यांनी मग वनपर्यांचा निरोप घेतला. उडत उडत त्या ढगांवर जाऊन बसल्या. निरोपाचे हात हलवत दिसेनाश्या झाल्या. वनपऱ्या दबकत दबकत निघाल्या.
वनराईच्या भोवती काटेरी कुंपण होते. मुख्य फाटकापाशी द्वारपाल यक्ष उभा होता. त्याला पाहून वनपऱ्या घाबरल्या. त्यांना धडकीच भरली. त्यांना वाटलं, यक्षाने हे लपवलेले चषक पाहिले तर तो ते फेकून देईल किंवा परत नेऊन द्यायला सांगेल. एवढंच नाहीतर चोरी केल्याबद्दल महिनाभर मौन व्रत पाळावे लागेल. वनदेवीचा तसा नियमच होता. त्या नाजुक चषकांच्या मोहाने वनपऱ्यांना अगदी वेडं बनवलं होतं. मोहाचा एक क्षणही जन्मभराच्या संस्कारांना पुसून टाकण्यास पुरेसा असतो. खरी कसोटी त्या क्षणावर विजय मिळवण्यातच असते. त्या काचेच्या चषकांच्या मोहात वनपऱ्या अगदी पुरेपूर गुंतल्या होत्या. यक्षाची नजर चुकवून त्या कुंपणाच्या मागच्या बाजूने आत शिरू लागल्या. पण तेथून त्या ना आत शिरू शकल्या ना बाहेर पडू शकल्या. त्यांचे पंख फाटून तुटून गेले. हात, तोंड रक्तबंबाळ झाले. त्यांच्या शरीरात कुंपणाचे काटे खोलवर घुसले. त्यांचे पानापानांचे हिरवे झगे कुंपणावर अडकून बसले. असहाय्य होऊन त्या रडू लागल्या.
पण आता त्यांना कधीच क्षमा केली जाणार नव्हती. क्षमेची संधी त्यांनी घालवली होती. चोरी करणाऱ्या त्या वनपऱ्यांना आता त्या वनराईत जागा नव्हती. त्यांचं शरीर कणाकणाने खिरत गेलं… व काटेरी कुंपणावर उरले त्यांचे हिरव्या पानांचे झगे! त्यांनाच आपण म्हणतो कुंपणावरची कोरांटी. झग्यात लपवलेल्या चषकांची बनली नाजुक नाजुक पिवळी फुलं. कुंपणावरची ही कोरांटीची फुले आजही आपल्याला सांगत असतात, चोरी कधी करू नका. आपल्या मोहावर संयमाचं कुंपण घाला. नाहीतर मग ही कुंपणावरची काटेरी कोरांटी तुमची चोरी उघडी पाडेल.