फुलराण्यांची गोष्ट – FULRANYANNCHI GOSHTA


This story is Fantasy type story. In this story indirectly a message is given that we should protect our earth and enviornment of earth. We must love Nature and natural things and animals, human beings. Love gives energy to live happily.

सहस्त्रपंखी नाव होतं तिचं! तिची काया स्फटिकजलासारखी नितळ होती. तिचा वर्ण लाल-गुलाबी होता. याशिवाय तिच्या पाठीवर पंख होते. पंख तरी किती?  दोन?  चार?  दहा?  छे! छे! अगदी सहस्त्रपंख होते तिच्या पाठीवर! सहस्त्र पाकळ्यांचे तिचे हे रेशीमस्पर्शी पंख म्हणजे जणू तिच्या सौंदर्यावर चढवलेला मुकुटमणीच होता.

खळाळत्या पाण्यात धावावं, नितळ जलाशयात डुंबावं, धबधब्यांच्या धारात मनसोक्त भिजावं आणि श्रावणातल्या श्यामल मेघमालेबरोबर आकाशात झिम्मा खेळावा असं स्वच्छंदी मुक्त जगणं होतं तिचं. कारण ती जलपरीची कन्या होती. सहस्त्रपंखांची जलपरी होती. पण जेव्हा  तिने घरच्यांचा विरोध पत्करून अग्नीपुत्राशी लग्न केलं तेव्हा मात्र तिचं स्वच्छंदी जीवन संपूनच गेलं.

अग्निपुत्र सोन्यासारख्या झळाळत्या कांतीचा अन किती उमदा होता. त्याच्या महालाचे खांब सोन्याचे होते आणि त्याच्या सोनेरी रथाला जोडलेले अश्वही सोनेरी होते. पण त्या सोनेरी महालात राहणारी त्याची सहस्त्रपंखी पत्नी मात्र दु:खी होती, कारण अग्नीपुत्राजवळ औदार्य, प्रेमळपणा, शौर्य या गुणांबरोबरच काही अवगुणही होते. तो अगदी शीघ्रकोपी होता आणि शिवाय  हलक्या कानाचाही!

 

लग्नानंतर दुसऱ्या दिवसापासूनच अग्नीज्वालेने सुनेला अगदी धारेवरच धरले. भट्टीतले निखारे फुलवण्याच काम तिच्यावर सोपवलं. शीतल प्रवृत्तीच्या या जलपरीला आगीचा सहवास अगदी असह्य होई. तिच्या शरीराची अगदी लाही लाही होई आणि मग बिचारी अगदी थकून जाई. मग अग्निज्वाला आपल्या पुत्राजवळ सुनेच्या चुगल्या करी. तो हलक्या कानाचा शीघ्रकोपी पुत्र  मग आपल्या शीतलकाय पत्नीवर आगपाखड करी.

 

एके दिवशी ती आपल्या पुत्राला म्हणाली, “तुझी ही बायको फक्त दिसायलाच राजबिंडी आहे पण तितकीच आळशी अन कामचुकारही आहे. घरच्या नोकर चाकरांवर देखरेख करणही जमत नाही हिला. जरा कुठे बोललं की नदीच वहायला लागते डोळ्यातून हिच्या.” आईचं बोलणं ऐकता ऐकता अग्नीपुत्राने आपलं धनुष्य उचललं आणि तो शिकारीला निघून गेला.

 

आपल्या सोनेरी रथात बसून तो मोठया ऐटीत रथ हाकीत होता. रथाचे घोडे चौखूर उधळले होते. अचानकपणे एक बाण सुं सुं करत आला आणि रथासमोरच्या जमिनिवर येऊन रुतला. त्याक्षणी ते सोनेरी अश्व जागीच थबकले. त्या बाणापाठोपाठ एका पांढऱ्या रंगाच्या उमद्या घोडयावर बसून एक तरुणी आली. रथाचा मार्ग अडवून उभी राहिली.

 

त्या घोडयावर बसलेली ती जंगलकन्या अगदी साधीसुधी पण किती तेजस्वी होती. तिच्या डोळ्यातील चमक, तिचा रानवट रुबाब, गुलाबी वर्ण आणि गालावर मुक्तपणे रुळणाऱ्या कुरळ्या कुरळ्या बटा! अग्निपुत्र पाहताच राहिला. तेव्हा ती जंगल सुंदरी  म्हणाली, “खबरदार येथून पुढे आलास तर! येथून पुढची भूमी माझ्या पित्याची, या जंगलच्या राजाची आहे आणि आमच्या जंगलात निरपराध प्राण्यांची शिकार करणाऱ्या लोकांना फासावर लटकवलं जातं.” तिचे हे बोल ऐकून तो शीघ्रकोपी अग्निपुत्र नेहमीप्रमाणे रागावला नाही. उलट त्याला वाटलं अशी मुलगी सून म्हणून आपल्या आईला नक्कीच आवडेल.

 

मग तो रथातून खाली उतरला आणि म्हणाला, “हे रमणी तुझ्यासारखी वीरबाला आमच्या शाही घराण्यात नक्कीच शोभून दिसेल.” जंगलसुंदरी गुलाबीलाही सहस्त्रपंखीप्रमाणेच त्याच्या रूपाचा मोह पडला. ती त्याच्याशी विवाहबद्ध झाली. सहस्त्रपंखीला या विवाहाने खूप आनंद झाला कारण तिला नवी मैत्रीण मिळाली. मायलेकांच्या तापट वागण्याला बिचारी अगदी कंटाळून गेली होती.  दोघी सुनांचं अगदी छान जमलं. हीच गोष्ट अग्निज्वालेच्या डोळ्यात मात्र टोचू लागली.

 

जंगलसुंदरी गुलाबी धीट आणि निर्भय होती. पण ती रानातली रमणी, शिष्टाचार आणि शाही रीवाजान्बद्दल अगदीच अनभिज्ञ होती. मग याच गोष्टींचा बाऊ करून अग्निज्वाला तिचा येताजाता पाणउतारा करू लागली. ती म्हणे, “खेडवळ आणि रासवट आहे ही अगदी. कसलीच रीतभात नाही हिला. चालते कशी पुरुषी, बोलते कशी तडातडा आणि अवतार तर बघून घ्यावा नुसता!” सासूच्या या टोमण्यांनी गुलाबीचा क्रोध अगदी अनावर होई. पण ती काय बोलणार? सासूबाईंना उलटी उत्तरं देणं शाही घराण्यात शोभणारं नव्हतं.

 

सहस्त्रपंखीने मात्र शाही घरातल्या सगळ्या रीतीभाती हळूहळू गुलाबीलाही शिकविल्या. शाही शिष्टाचार शिकविले. वेगवेगळी  वस्त्रं कशी नेटकेपणाने नेसायची, प्रसाधनांनी आपलं रूप कसं खुलावायचं, कसं हसायचं, कसं बोलायचं या साऱ्या गोष्टी तिने थोडयाच कालावधीत आत्मसात केल्या. त्यानंतर मग जणू तिचा कायापालटच झाला. रानातली ही रमणी मग अगदी राणीच्या रुबाबात वावरू लागली. अग्नीपुत्राच्या दरबारात कामकाजाच्या वेळी ती जातीने हजर राहू लागली. तिने दिलेले सल्ले अग्निपुत्रापेक्षाही शहाणपणाचे असत.

 

अग्निपुत्रालाही सुरुवातीला आपल्या या बुद्धिमान पत्नीचं अगदी कौतुक वाटे. पण नंतर नंतर मात्र त्याचा पुरुषी अहंकार जागृत झाला. शिवाय त्याची आई गुलाबीच्याही चुगल्या करून त्याच्या अहंकाराला खतपाणी घालू लागली. मग तो अग्निपुत्र गुलाबीवरही आगपाखड करू लागला. पण गुलाबीने सहत्रपंखी कडून संयमाचेही धडे घेतले होते. त्यामुळे मुद्देसूद बोलून शांतपणे ती अग्नीपुत्रालाही निरुत्तर करी.

 

त्यानंतर काही काळातच त्या अग्निपुत्राला कळून चुकलं की आपल्या दोन्ही राण्या प्रेमळ समंजस आणि सुजाण आहेत. त्यांच्याशी व्यर्थ वाद घालणं निरर्थक आहे. क्रोधामुळे माणसाची विवेकबुद्धी नष्ट होते. क्रोधावर विजय मिळवल्यास मनाला अपूर्व शांती मिळते हे ही त्याच्या लक्षात आलं. आणि म्हणूनच…तपस्वी मुनींचा सहवास त्याला आवडू लागला.

 

त्यानंतर मग दरबाराचे कामकाज गुलाबीवर आणि गृहखाते सहस्त्रपंखीवर सोपवून तो अधिकाधिक काळ संत सहवासात घालवू लागला. हीच संधी साधून एके दिवशी अग्निज्वालेने आपल्या दोन्ही सुनांना जवळ बोलावले व सांगितले, “तुम्ही दोघींनीही माझ्या मुलाचं आयुष्य सुखी बनवलत. त्यासाठी मी महायज्ञ करायचं ठरवलंय. तुम्ही दोघी यालना?”

“का नाही येणार आम्ही? तुम्ही केलेली ही प्रेमळ विनंती अमान्य करायला आम्ही काय मूर्ख थोड्याच आहोत? ” त्या दोघी अत्त्यानंदाने उद्गारल्या. आपल्या सासूची सर्व कृष्णकृत्यं त्या विसरल्या. तिच्याविषयीच्या प्रेम भावनेने त्यांचं हृदय उचंबळून आलं पण त्यांना हे ठाऊक नव्हतंकी त्यांच्या सासूचं हृदय त्यांच्याविषयीच्या सूडभावनेने किती काठोकाठ भरलंय.

 

यज्ञकुंडाजवळ बसून  त्या दोघीही ध्यानात लीन झाल्या होत्या. तेव्हा अग्निज्वालेने दोघींनाही त्या धगधगत्या अग्निकुंडात ढकलून दिले. क्षणार्धात गुलाबी जळून राख झाली. पण सहस्त्र पंखीचं  शीतल शरीर निष्प्राण तर झालंच पण एखाद्या फुलासारखं सतेज होऊन अग्नीकुंडातून  वर आलं. अग्निज्वालेने तिचा तो निष्प्राण देह मग पुष्पवाटिकेतल्या जलाशयात फेकून दिला. तिच्या मनातली सूडभावना तर शांत झाली, पण ह्रदय मात्र पश्चातापाने जळू लागलं. दिवसे दिवस ती आग तिला अधिकाधिक जाळू लागली. एके दिवशी पुष्पवाटीकेतल्या जलाशयाच्या काठावर बसून ती विलाप करू लागली, “माझ्या हृदयातल मातेचं प्रेम तुम्हाला बोलावतंय. परत यालका तुम्ही?”

तिचे अश्रू जलाशयातल्या पाण्यात पावसासारखे बरसू लागले. त्याचक्षणी त्या पाण्यातून सहस्त्रपाकळ्या असलेलं लालगुलाबी कमळ वर आलं. पाहता पाहता त्या कमळफुलाने  जलाशयाचा अर्धाअधिक भाग व्यापून टाकला. ते देखणं, कातीव रेशमी पाकळ्या असलेलं कमळफुल जणू जलसम्राज्ञीच्या थाटात पाण्यावर तरंगू लागलं. आपल्या सासूला म्हणालं,  “सासूबाई यज्ञकुंडातली काही राख पुष्पवाटिकेत टाका आणि उरलेली राख डोंगरावरच्या जंगलात टाका. मग तुम्हाला तुमची प्रिय गुलाबीपण भेटेल.”

सासुबाईंनी मग यज्ञकुंडातली राख पुष्पवाटिकेत शिंपडली. त्यातून असंख्य हिरवे ताटवे वर आले. त्यावर फुललेल्या लाल, गुलाबी, पिवळ्या अर्धोन्मीलित गुलाबकळ्या हसू लागल्या. जंगलात टाकलेल्या राखेतून अनेक हिरव्या रानजाळ्या उगवल्या. त्यावर गुलाबी रंगाची छोटी छोटी गुलाबफुलं निरागसपणे हसू लागली, डोलू लागली.

अग्नीज्वालेच्या हृदयातली आग शांत शांत झाली आणि तिथं प्रेम वाहू लागलं. त्या प्रेमानच मृत शरीराची फुलं बनली; नाहीका? आणि म्हणूनच फुलांना प्रेमाचं प्रतिक मानलं जातं.

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.