धर्म: मुक्तीच्या मार्गावरील एक दीपस्तंभ­ – DHARM: MUKTICHYA MARGAVARIL EK DEEPSTAMBHA


In this article it is told that Dharm is like Deepstambha which guides us on a path of true relegion.

धर्म: मुक्तीच्या मार्गावरील एक दीपस्तंभ लेखिका- सुनेत्रा नकाते
प्राचीन काळापासून या जगाच्या पाठीवर अनेक धर्मप्रणाली मानणारे लोक नांदत आहेत. ज्या धर्मियांच्या घरात माणूस जन्म घेतो तो धर्म त्याला वंश परंपरेनेच मिळतो. पण असा वंश परंपरेने मिळालेला धर्म जो मनापासून मानतो, त्यातल्या तत्वांचा मुळापर्यंत जाऊन जो शोध घेतो, त्यातल्या खटकणाऱ्या गोष्टींचे खंडणमंडण करून त्यातल्या स्वत:ला पटणाऱ्या व इतरांनाही पटतील अशा गोष्टी निर्भीडपणे जगासमोर मांडण्यासाठी तो तन, मन, धन पणाला लावतो तोच त्या धर्माचा खरा प्रेमी असतो. धर्मप्रेमी आपल्या किंवा इतर कुठल्याही धर्माचे अवडंबर माजवत नाही. तो इतर धर्मप्रेमी माणसांना व त्या माणसांच्या भावनांना जपतो. इतकेच नाही तर शक्य तोवर तो पशु-पक्ष्यांच्या भावनाही जपतो.

अनेक देशात अनेक प्रकारची माणसे आहेत. त्यांना त्या देशाचा इतिहास भूगोल प्राप्त झालेला असतो. त्यानुसार त्यांची संस्कृती, भाषा, खानपानाच्या सवयी  आचार, विचार यात बरीच तफावत आढळून येते, पण यातल्या प्रत्येक माणसाच्या मनात त्याच्या अंतरंगात धर्म नावाची गोष्ट असतेच असते. या धर्मालाच माणसाचे माणसावरील, जीवसृष्टीवरील किंवा निसर्गावरील प्रेम असे म्हणता येईल. यालाच माणुसकीचा  धर्म असे पण म्हणता येईल. या अशा धर्मांचे स्वरूप, त्याला मिळालेली वेगवेगळी नावे यात भिन्नता असली तरी मानवी मनात धर्माचे स्थान अढळ आहे.

अशा निरनिराळ्या धर्मांचे स्वरूप त्यांचा अभ्यास करण्याआधी धर्म म्हणजे काय? यावर विस्तृत पण सुबोध चर्चा करणे आवश्यक ठरते. ध्रर्म हा खऱ्या अर्थाने जरी आध्यात्मिक क्षेत्रात प्रचलित असणारा शब्द असला तरी नित्याच्या व्यवहारात जगत असताना हा शब्द विविध अर्थांनी वापरला जातो. माणूस आध्यात्मिक क्षेत्रात काम करणारा असो किंवा शेतीवाडी व्यापारधंदा करणारा असो किंवा कला कौशल्य यांच्या द्वारे पैसा मिळवणारा असो पण त्याला उदरनिर्वाहासाठी काही गोष्टींची गरज असते. त्याच्या काही नैसर्गिक गरजाही असतात. म्हणूनच जगत असताना त्याचा कुठल्याना कुठल्या तरी धर्माशी संबंध येतोच. रोजचे व्यवहार, आचार यातील अनेक गोष्टी धर्मात समाविष्ट करता येतात. रस्त्यावर भीक मागणारा एखादा भिकारी असो किंवा देव देवतांच्या उत्सवासाठी घरोघरी हिंडून वर्गणी गोळा करणारा असो त्यांच्या दृष्टीने अन्नदान किंवा पैशांचे दान हा धर्म असतो. देणारासुद्धा दयाधर्म अथवा समाजधर्म म्हणूनच अशा प्रकारचे दान देत असतो.

आपली कुटुंब संस्था म्हणजे विश्व संस्थेचेच एक छोटे रूप असते. कुटुंबाप्रती किंवा समाजाप्रती आपली जी कर्तव्ये असतात ती धर्माचीच रूपे असतात. गृहस्थाश्रमात प्रवेश केलेल्या जोडप्याला जेव्हा अपत्य प्राप्ती होते तेव्हा ते माता-पिता बनतात. अशावेळी मातृपितृधर्माचे पालन करणे हे त्यंचे प्रथम कर्तव्य ठरते. मुलांचे पालनपोषण करणे, त्यांच्यावर उत्तम संस्कार करणे, त्यांना त्यांच्या क्षमता व आवडीनुसार योग्य प्रकारचे शिक्षण देणे म्हणजेच मातृपितृधर्माचे पालन करणे होय. त्याचप्रमाणे कुटुंबातील मुलामुलींनी आपल्या आई-वडिलांची काळजी घेणे, त्यांचा आदर करणे याला पुत्रधर्म किंवा कन्याधर्म म्हणता येते.

याचप्रमाणे समाजात वावरतानाही राज्यकर्ते म्हणून, गुरू म्हणून, उद्योगशेती करणारे म्हणून किंवा चाकरमाने म्हणून, विद्यार्थी म्हणून वेगवेगळ्या कर्तव्यांचे पालन करावे लागते. विद्याध्ययनाच्या काळात अध्ययनावर पूर्ण लक्ष केंद्रित करणे, गुरुजनांचा आदर करणे, हा शिष्यांचा किंवा विद्यार्थ्यांचा धर्म असतो. आपण ज्या ठिकाणी राहतो तेथे आपले जे शेजारी असतील त्यांच्याशी सुसंवाद राखणे, अडचणीच्या काळात त्यांना मदत करणे हा शेजार धर्म असतो. म्हणजेच व्यावहारिक दृष्टया धर्म म्हणजे परस्परांचे परस्परांशी असलेले कर्तव्य होय. व्यवहाराचे पालन करताना नीती धर्माचेही पालन करावे लागते. नीतीधर्मात सर्व धर्मियांना सर्व काळात पटणाऱ्या काही गोष्टींचा समावेश होतो. उदा. भूतदया, खरे बोलणे, चोरी न करणे, हिंसा न करणे वगैरे.

अनेक व्यक्ती मिळून व्यक्तींचा समूह बनतो. त्यांचाच पुढे समाज बनतो. अशा समाजाला आणि त्यातील व्यक्तींना स्थैर्य देणारे, त्यांचा ऐहिक आणि पारमार्थिक उत्कर्ष साधणारे जे तत्व असते त्याला धर्म म्हटले जाते. धारणात धर्म: म्हणजे सर्व समाजाची किंवा व्यक्तींची ज्या योगे धारणा होते तो धर्म होय. आध्यात्मिक क्षेत्रातील धर्मात त्या त्या धर्मातील विशिष्ट देव देवतांची उपासना, धर्मातील अधिकारी व्यक्तींनी सांगितलेले तत्वविचार त्यांचे मनन, चिंतन त्याप्रमाणे आचरण यांना धर्म म्हणतात.

अशा अनेक धर्मापैकी जैन धर्म हा एक प्राचीन धर्म आहे. जैन धर्म वस्तूच्या  मूळ स्वभावाचा सर्वांगीण विचार करतो. म्हणूनच जैन धर्मात वस्तूच्या स्वभावाला धर्म म्हटले जाते. वस्तूचा जो मूळ स्वभाव असतो तोच त्या वस्तूचा धर्म असतो.  त्याचप्रमाणे पृथ्वीतलावरील सर्व सजीव गोष्टींमध्ये जे समान आत्मतत्व असते त्या आत्म्याचा स्वभाव म्हणजे आत्मधर्म होय.

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.