भक्तामर स्तोत्र प्रवचन – BHAKTAMAR STOTRA PRAVACHAN


Bhaktamar stotra is famous stotra written by Achary Mantung in 7’th century. It is also known as Adinath stotra. Bhagvan Adinath is also known as Rushabhnath. He is a first tirthankar of Jain dharmiy people.

कैवल्य चांदणे- ध्यानसागरजी महाराज यांच्या हिंदी प्रवचनांचा मराठी अनुवाद ९ एप्रिल २००४, जिव्हाळा प्रकाशन, वृद्धाश्रम रोड, रामदासनगर, चिखली, पुणे-४१२११४
अनुवादक – सुनेत्रा नकाते

सन १९९२ मध्ये आम्ही भक्तामर स्तोत्राचे तिसरे शिबीर घेतले होते. त्याचवेळी बाबरी मशीद कांड घडले. पूर्ण भारतात दंगे, तोडफोड, हिंसाचार उसळला. १४४वे कलम लागू केले होते. संचारबंदी जरी केली होती. त्यावेळी एका उपद्रवी शहरात शिबीर चालू होते. काहीजण असे (उपद्रवी) म्हणतात. थंडीचे दिवस होते. कडाक्याची थंडी होती. प्रवचनाची वेळ सकाळची आठची असे. सगळ्यांना शिबीर एवढे रोचक वाटेकी सर्वजण धुक्यातही यायचे. तर त्या शहराचे नाव आहे सागर! मध्यप्रदेशातील एक जिल्हा आहे. तेथील सागर विद्यापीठ प्रसिद्ध आहे. पवित्र भावनेने म्हटलेल्या भक्तामर स्तोत्राचे शुद्ध तरंग जरी एका खोलीतुनही निघाले तरी संपूर्ण वसाहतीलाही प्रभावित करू शकतात. मग भक्तामर स्तोत्राच्या सामूहिक पाठाचे तरंग संपूर्ण देशाला किंवा विश्वालाही प्रभावित करू शकले तर त्यात काय आश्चर्य? पण त्यासाठी सगळ्यांनी श्रद्धापूर्वक पाठ करायला हवा.

एक गोष्ट सांगू इच्छितोकी, कधी आपल्या जीवनात कर्माच्या उदयाने काळेकुट्ट दिवशी येऊ शकतात. आपण चारी बाजूने निराशेने घेरले जाऊ शकता. कुठलाच रस्ता सापडत नाही. आता काय करायचे? अशी स्थिती येते. त्यावेळी नव्वद टक्के लोकांना वाटतेकी आता जगण्यात काय अर्थ? त्यावेळी ते जगले तर ठीकच आहे. पण जरका त्यावेळी चुकीचे पाऊल उचलले तर जे मिळाले आहे तेही गमावून बसाल. पण जरका अशावेळी आपल्याला णमोकर मंत्र येत असेल आणि भक्तामर स्तोत्र काही वेळ काढून आपण शिकलात व त्याच्याप्रति आपल्या हृदयात आस्था असेल तर स्वत:ला कधीही कंगाल समजू नका. णमोकर मंत्र व भक्तामर स्तोत्र म्हणजे एवढे मोठे खजिने आहेतकी बडया बडया अब्जाधीशांजवळही ते नसतात. जर आपल्याजवळ हे खजिने आहेत आणि तरीही तुम्ही स्वत:ला कंगाल समाजात असाल तर मात्र तुम्ही खरोखरच कंगाल आहात.

आचार्य मानतुंग यांनी ४८ कडव्यांच्या भक्तामर स्तीत्राची रचना केली. त्यावेळी मानतुंगाचार्यांना ज्या ४८ कड्यांच्या शृंखलेने बांधले होते त्या तुटून पडल्या यात कोणती मोठी गोष्ट झाली? कारण ज्या स्तुतीने अंतरंगातली मोहाची बंधनेही गळून मग लोखंडी कड्या तुटल्या तर त्यात काय नवल? भक्तामर स्तोत्राबाबतची ही कथा राजा भोजच्या काळातली मानली जाते. पण राजा भोजचा काळ  हा अकरावी शताब्दी आहे. पण ही कथा थोडी शंकास्पद मानली जाते.

आचार्य मानतुंगावर गहन संशोधन करणारे पं. ज्योतीप्रसाद, पं. पन्नालाल साहित्याचार्य, पं. अमृतलाल जैन या जैन विद्वानांनी संशोधन करून हे शोधून काढले  की आ. मानतुंग हे राजा भोज यांच्या काळात झालेले नाहीत. त्यांचा शोध असे सांगतोकी त्यांचा काळ हा राजा हर्षवर्धनाचा काळ आहे. पं. दुर्गाप्रसाद, पं. हिराशंकर ओझा या ब्राम्हण विद्वानांनीही शोध करून असे सांगितलेकी भक्तामर स्तोत्राची भाषा ही शास्त्रीय संस्कृत युगाची भाषा आहे, आणि हा काळ सातव्या शताब्दीचा आहे. डॉ. ए.व्ही. किथ, डॉ. हर्मन जेकोबी या पाश्चात्य विद्वानांनीही सातवी शताब्दी हाच भक्तामर स्तोत्राचा काळ ठरवला आहे. डॉ. हर्मन जेकोबी यांनी भक्तामर स्तोत्राचा जर्मन भाषेत अनुवाद केला. राजस्थानी, मराठी, इंग्रजी, गुजराती आणि दक्षिण भारतीय भाषा मिळून जवळ जवळ  १३० पेक्षा जास्त अनुवाद भक्तामर स्तोत्राचे झाले आहेत. वरील सर्व विद्वानांच्या मते ‘क्लासिकल संस्कृत एरा’ हाच भक्तामर स्तोत्राचा काळ होता. सातवे शतक हे क्रांतिकारी शतक होते. हजरत मोहम्मद हे त्याच काळातले जैन रामायण (पद्म पुराण) त्याच काळात रचले गेले. आ. अकलंक देवही याच काळात होऊन गेले. भक्तामर स्तोत्राचा काळ सातवे शतक ठरवल्याने राजा भोजाचे नाव मात्र लुप्त झाले. पण यात कुणाला काही आपत्ती वाटण्याचे कारण नाही. कारण  प्रामाणिक इतिहासच असे सांगतोकी त्यांचा काळ राजा भोजच्या ४ शताब्दीपूर्व आहे. हा काळ तर भ. महावीर स्वामींच्या काळाला आणखीनच निकट येतो. ही तर अभिमानाची गोष्ट झाली. हा झाला कालविषयक निर्णय.

आचार्य मानतुंगाची भाषा ही जास्त जड नाही. म्हणजे ती वाचताना बुद्धीला जास्त कठीणाई वाटत नाही. ही भाषा सरल असूनही सरस आहे. ही एक मोठीच विशेषता आहे. आ. मानतुंग यांनी स्वत:ला मी काहीच नाही असे समजून, भावनेला प्रधान मानून भगवंताची स्तुती केली आहे. स्तुती करताना स्वत:ला त्यांनी अगदी अकिंचन ठेवले आहे.

भक्तामर स्तोत्राची रचना वसंततिलका छंदात केली आहे. या संबंधी श्री. नेमिचंद्र जैन म्हणतात की आचार्य मानतुंग स्वामींनी हा छंद निवडला याचे कारण हा छंद अत्यंत संतुलित आहे. यात प्रत्येक चरणात ७ गुरु व ७ लघु अशी चौदा अक्षरे आहेत. असे संतुलन साधणे हे सोपे काम नाही. हा वसंततिलका छंद वाचण्याची एक पारंपारिक लय आहे. दक्षिण भारतात थोडी अलग लय आहे. संगीत हा तसा मोठा विस्तृत विषय आहे. जर संगीतात या स्तोत्राला गुंफीत केले तर अनेक प्रकारच्या लयीत भक्तामराचा पाठ संभाव आहे. वसंततिलका हा छंद भूपाळीपासून भैरवीपर्यंत कुठल्याही रागात व्यवस्थित बसू शकतो. स्तोत्रपाठासंबंधीही काही नियम आहेत. पहिले दोन चरण सामान्य लयीत म्हटले जातात. तिसऱ्या चरणात आवाज चढवून स्वरांचे आरोहण केले जाते. चौथा चरण परत सामान्य लयीत म्हटला जातो.

भक्तामर स्तोत्राचा पाठ करताना संस्कृत भाषेच्या उच्चारणासंबंधी पण माहिती देणे आवश्यक आहे. उच्चारांचीही काही नियतस्थाने म्हणजेच जन्मस्थाने असतात. काही उच्चार ओष्ठ्य, काही दंत्य, काही जिभेच्या मुळापासून होणारे म्हणजेच जिव्हामूली असतात. ॐ चा उच्चार वेगळा असतो. ॐ चा गहन उच्चार नाभीपासून केला जातो. खोल अभ्यासाने ॐ सर्वांगाने स्पंदित होतो.

अक्षर हे स्वर अथवा स्वरयुक्त व्यंजन असते. एकट्या व्यंजनाने अक्षर होत नाही. भक्तामर स्तोत्रातील चरण चौदा अक्षरांचे आहेत. त्यातील सात अक्षरे गुरु व सात अक्षरे लघु आहेत. गुरू म्हणजे दोन मात्रायुक्त. उदा. ‘आ’ हे अक्षर गुरू आहे. गुरू उच्चारण करताना दोन मात्रा इतका वेळ लागतो. लघु म्हणजे एक मात्रायुक्त अक्षर. उदा. ‘अ’ हे अक्षर एक मात्रायुक्त आहे. लघु उच्चारण करताना एक मात्रेइतका वेळ लागतो. गुरू अक्षरांचेही पाच प्रकार आहेत. १-  अनुस्वारयुक्त, उदा. अं, कं २-  विसर्गांत, उदा. अ: , क: ३-  दीर्घ, उदा. ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ ४-  युक्तपूर्व- म्हणजे जोडाक्षर किंवा संयुक्त अक्षराच्या आधीचे अक्षर जरी ऱ्हस्व असले तरी त्याचा उच्चार दीर्घ होतो. उदा. भक्तामर प्रणत मौलि मणि प्रभाणा यामधील प्रभाणा मधील प्र या जोडाक्षराच्या आधीचे णि हे अक्षर ऱ्हस्व असले तरी त्याचा उच्चार दीर्घ होतो. स्वराघात णि वर होतो. ५-  पदाच्या किंवा पंक्तिच्या शेवटचे अक्षर जरी ऱ्हस्व असले तरीपण ते लघु नसून गुरू असते.

स्वराघात आदिसंबंधीचे पण नियम आहेत. कोणत्या अक्षरांचे उच्चारण कोठून होते याचेही नियम आहेत. अ आणि आ चे उच्चारण गळ्यातून म्हणजे कंठातून होते. त्याचप्रमाणे क, ख, ग, घ, ड यांचे आणि ह (हत्ती) चे उच्चारण सुद्धा कंठातून होते. त्याचप्रमाणे नम: या शब्दातील विसर्ग म्हणजे म: चे उच्चारण कंठातून होते. म्हणजेच कंठातून होणारे एकंदर नऊ उच्चारण झाले. तालू म्हणजे टाळू ही तोंडाच्या आतमध्ये असते. इ- इमलीचा आणि ई- ईखचा यांचे उच्चारण तालूपासून म्हणजे तालव्य आहे. त्याचप्रमाणे च, छ, ज, झ, त्र- या पाच व्यंजनांचा उच्चार तालव्य आहे. म्हणजे उच्चारणाच्या वेळी तालूवर जोर येतो. त्याचप्रमाणे श- शक्कर, शांतिनाथमधला आणि च- चहा किंवा चायमधला यांचे उच्चारण तालव्यच आहे.

संस्कृत उच्चारणात स्पष्ट ऐकणे महत्वाचे आहे. षटकोनातील ष,  हा मूर्धन्य आहे. ट, ठ, ड, ढ, ण आणि र, ष यांच्या उच्चारणासाठी ताकद लावावी लागत नाही. यांचे उच्चारण, पूर्ण उच्चारण डोक्यातून होते. स्पंदने पूर्ण मस्तकात होतात. म्हणून उच्चारण मूर्धा सांगितले आहे. त्याचप्रमाणे ऋ, लृ असे मिळून नऊ उच्चारण मूर्धन्य आहेत.

त, थ, द, ध, न आणि ल, स यांचे उच्चारण-स्थान दात असल्याने ते दंतव्य आहेत. उ, ऊ, प, फ, ब, भ, म यांना उपपदमानिय मोषो म्हणतात. पूर्वी उपपदमानिय पण वर्ण असायचा. यांचे उच्चारण ओष्ठव्य असते. उच्चारणाच्या वेळी दोन्ही ओठांची जरूरी लागते. आता फ च्या खाली नुक्ता लावली तर उच्चारण वेगळे होते. उर्दू भाषेतला फ किंवा फादर मधला फ असा असतो. असा फ- संस्कृतात नाही. संस्कृतमध्ये फ च्या उच्चारणासाठी दोन्ही ओठ जुळवावेच लागतात. य, र, ल, व मधील व च्या उच्चारणासाठी वरचे दात आणि खालचा ओठ जुळवावा लागतो.

जिव्हामूलींचे उच्चारण जिभेच्या मुळापासून होते. जसे दु:ख मधील विसर्गापुढील ख चे उच्चारण जिव्हामूली असते. विसर्गापुढे प, फ आले तर त्याला उपपदमानिय म्हणतात. आता स चा उच्चार दंतव्य असतो. जेव्हा लहान मुलांचे दात पडतात तेव्हा ती जेव्हा स बोलतात तेव्हा तोंडातून वायू बाहेर पडतो आणि उच्चारण योग्य होत नाही. पूर्वीच्या काळी उच्चारण,  व्याकरण, छंदशास्त्र, सामुद्रिक, आयुर्वेद हे शिकविण्यासाठी वेगवेगळे आचार्य असत. गुरूकुल पद्धतीत या सर्व गोष्टी येत असत. आताच्या काळात अध्यापकांचेच उच्चारण कधीकधी असे असतेकी, वाटते यांना कोणी व्यवस्थित शिकविले आहेकी नाही?

कोणा विद्वानाने भारताच्या ऱ्हासाची दोन मूळ कारणे सांगितली आहेत. ती कारणे म्हणजे शिक्षणपद्धतीचा ऱ्हास आणि न्यायपद्धतीचा ऱ्हास. स्वातंत्र्यानंतर इंडियन एज्युकेशनल एक्ट आला आणि गुरूकुल शिक्षणपद्धतीला गौण ठरवले गेले. त्यामुळेच हा ऱ्हास झाला. हा ऱ्हास जर झाला नसता तर भारत आज जगातला प्रथम श्रेणीचा देश झाला असता.

भक्तामर पाठ म्हणताना स्वराघातासंबंधीही काही नियम आहेत. ऱ्हस्व स्वरावर आघात केव्हा होतो? तर पुढे जर संयुक्त अक्षर आले तर होतो. आघाताचा आवाज वेगळा येतो. हिंदीतही काही ठिकाणी स्वराघात आहे पण हिंदीत स्वराघात गौण आहे. जसे चेतनप्रकाश या शब्दात न वर स्वराघात होत नाही. पण हाच शब्द जर संस्कृतात असेल तर न पुढे संयुक्त अक्षर आल्याने न वर प चा आघात होतो. उदा. भक्तामर प्रणत मौलिमणि प्रभाणा या ओळीत दोन स्वराघात आहेत. येथे र आणि णि वर स्वराघात होतो.

उच्चारणाची कठिणाई काही दिवसच वाटेल. पण भक्तामरस्तोत्र शिकताना, म्हणताना तुम्हाला अपार आनंद मिळेल. आणखी एक लक्षात ठेवाकी कुठल्याही वयात तुम्ही ते शिकू शकता. डॉ.ब्रूस गोल्ड यांनी ११००० पेशंट्सवर प्रयोग केले. त्यावरून त्यांना एक दिसून आलेकी माणसाचे वय वाढले, केस पिकले तरी बुद्धी कमी होतेच  असे नाही. मनात जर अशी धारणा केलीकी आपले वय आता वाढले, स्मृती कमी होणारच तर अशा धारणेमुळेच स्मृती, मेधा कमी होऊ लागते. अशी धारणा बनवावीकी आपण अजूनही शिकू शकतो. सत्तर वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांनीच जगातल्या महान वस्तू निर्माण केल्या आहेत.

भक्तामर स्तोत्राची आणखी एक विशेषता म्हणजे त्यातील अठ्ठेचाळीस कडव्यांमधील कुठल्याही चरणात मंत्र (म न त र ) हा शब्द मिळतो. महाकवी धनंजय हे आचार्य मानतुंगांचे शिष्य होते. महाकवी धनंजय हे संस्कृत नाममाला, विषापहार-स्तोत्र, द्विसंधान महाकाव्य यांचे रचनाकार आहेत. विषापहार स्तोत्राच्या रचनेच्या वेळी धनंजय कवीचे विषाने बाधित बालक पूर्ववत झाले. द्विसंधान महाकाव्यातील शब्दरचना द्वयर्थी आहे. या द्वयर्थी काव्यरचनेत रामायण व महाभारत या दोन्हींचा अंतर्भाव आहे. म्हणजेच यातून रामायण व महाभारत दोन्हीही ध्वनीत होतात.

रामायण म्हणजेच पद्मपुराणाचा कालखंड विसावे तीर्थंकर मुनिसुव्रत यांचा आहे. महाभारत म्हणजेच हरिवंशपुराणाचा कालखंड बाविसावे तीर्थंकर नेमीनाथ यांचा आहे. रामायण घेतले तर धर्माच्या नेमिवर (अक्सलवर) फिरणाऱ्या सुव्रत स्वामींना नमस्कार अशी वंदना आहे. महाभारत घेतले तर सुंदर व्रतांचे धारक भ. नेमिनाथ यांना नमस्कार अशी वंदना आहे. यातील काव्यांना एकदा वाचत गेल्यास त्यातून रामायण निघते. तर दुसरा अर्थ काढल्यास महाभारत निघते. रामायणात जेथे लक्ष्मण श्रीरामाशी बोलत आहे त्याठिकाणी महाभारतात अर्जुन श्रीकृष्णाशी बोलत आहे. रामायणात शूर्पणखा लक्ष्मणाशी बोलते तेथे महाभारतात द्रौपदी श्रीकृष्णाशी बोलते. दोन्हीही अगदी पूर्ण सुव्यवस्थित कथा बनल्या आहेत. या द्विसंधान काव्याचा अनुवाद भारतीय ज्ञानपीठाने प्रकाशित केला आहे. तर सांगायचे हे की शिष्य महाकवी धनंजय एवढे विद्वान तर त्यांचे गुरू आ. मानतुंग केवढे विद्वान असतील? पण खरा विद्वान स्वत:ला लघुच समजतो.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.