ब्रम्हचर्य धर्म – BRAMHACHARYA DHARM


This article is a translation of a Pravachan (lecture) by Jain Guru, Kshullak 105 Shree Dhyaansaagarjee Maharaj – included in the book Kaivalya Chandane. In this pravachan, Maharaj-Jee explains the importance and true meaning of Bramhacharya. In Jain philosophy, the word Bramhacharya not only means to abstain from sex; however, it is also associated with qualities qualities like dayaa (compassion), kshamaa (forgiveness), etc.).

दशधर्मामध्ये अंतिम धर्म ब्रम्हचर्य आहे. ही मुनीधर्मातली गोष्ट आहे म्हणून येथे त्या उत्तम ब्रम्हचर्याचे स्मरण केले जाते की ज्याचे पालन मुनिराज करतात. एक गाथा आहे, ब्रम्ह्चर्याला सूचित करणारी,

“जीवो बम्मा बम्मम मिचेव चर्या हवीज्ज जो जदिना

सोचेव बंब चेरं विमुक्क परदेह भत्तीये”

 ब्रम्हामध्ये म्हणजेच आपल्या आत्म्यामध्ये साधूची जी चर्या असते तिला ब्रम्हचर्य असे म्हणतात. ते ब्रम्हचर्य पर अशा शरीराच्या भक्तीने रहित आणि विमुक्त असते. ब्रम्हचर्याचे.

दोन भेद आहेत. बहिरंग आणि अंतरंग किंवा व्यवहार आणि निश्चय.

व्यवहार ब्रम्हचर्य म्हणजे स्त्रियांच्या प्रती माता, बहीण, कन्या या दृष्टीने पवित्र भाव ठेवणे. अंतरंग किंवा निश्चय ब्रम्हचर्य म्हणजे व्यवहार ब्रम्हचर्याने जी शक्ती प्राप्त होते, संचयित होते तिचा उपयोग आत्मध्यानासाठी करणे. ब्रम्हामध्ये विचरण किंवा रमण करणे म्हणजे ब्रम्हचर्य होय. ब्रम्ह म्हणजे आत्म्याचे स्वरूप जे शांत, निर्विकार आणि चैतन्यरूप आहे.

आता या बाबतीत आपण सकाळी जी दशलक्षणी पूजा म्हणतो त्यातली एक ओळ खूपजणांना खटकते. ती ओळ म्हणजे ‘संसारमे विषवेल नारी तज गये जोगीसरा’. म्हणजे या संसारात नारी विषाची वेल आहे. योगीश्वरांनी तिचा त्याग केला आहे. एकदा एका भगिनीने आम्हाला विचारले होते, “हा काय अन्याय आहे? स्त्री पर्यायात राहून ती पूजेची पंक्ती वाचताना स्वत:लाच विषवेल म्हणणे काहीसे खटकते.” तर याचे समाधान खूप सरळ स्पष्ट आहे.

ब्रम्ह म्हणजे आत्म्याचे स्वरूप. म्हणून जेथे ब्रम्हचर्याची गोष्ट येते तेथे आत्म्याचेच स्वरूप बघावे. आत्म्याचे स्वरूप पाहिले तर निश्चयाने ना कोणी पुरुष आहे ना कोणी स्त्री. आत्ताची अवस्था कर्म संयोगाने प्राप्त झालेली आहे. जो कोणी स्वत:ला स्त्री किंवा पुरूष समजतो ती त्यांची स्थिती किती दिवसांची आहे? जरुरी आहेका की जी स्त्री आहे ती अनंत काळापासून स्त्री आहे, स्त्री होती किंवा जो पुरूष आहे तो अनादी काळापासून पुरूष आहे व होता. सगळ्याच जीवांनी अनंतवेळा या संसारात कधी स्त्री, कधी पुरूष, कधी पशु तर कधी वनस्पतीचे शरीर धारण केले आहे. किती ठिकाणी भटकला आहे हा जीव!

ब्रम्हचर्यामध्ये जेव्हा स्त्रीच्या परित्यागाची गोष्ट येते तेव्हा त्याला श्रेणीमध्ये विभाजित केले जाऊ शकते. ब्रम्हचर्याच्या एका श्रेणीत मनाला पवित्र बनवण्यासाठी प्रयत्न किंवा पुरूषार्थ केला जातो. परस्त्री, व्यसन, वेश्याव्यसन यांचा सर्वप्रथम त्याग केला जातो. त्यामुळे मनात जे पाप, विकृती येत होती त्यापासून दूर होण्यासाठी परोक्ष रूपाने अशा साधनांचाही त्याग केला जातो, जसे की अशी पुस्तके नाही वाचणार, अशी दृश्ये नाही बघणार असा अभ्यास त्याने प्रारंभ केला आहे. नंतर याच्याही पुढे त्याने संकल्प केला आहेकी माझी पत्नी हीच माझी पत्नी आहे. बाकीच्या ज्या कोणी स्त्रिया आहेत त्या सर्वजणी माता, भगिनी, कन्या,  सर्वांच्या प्रती माझे मन आकांक्षेने रहित आहे. ही झाली  गृहस्थ ब्रम्हचर्याची श्रेणी! की विवाहित आहे, पत्नी आहे पण बाकीच्या सर्व ठिकाणांहून इच्छांना निवृत्त केले आहे. तो मनाला चित्रे, चलतचित्रे पाहूनही लालसेकडे जाऊ देत नाही. स्वत:ला संयत ठेवतो.

शास्त्रांमध्ये बऱ्याच प्रकारच्या ब्रम्हचाऱ्यांचे वर्णन येते, जसेकी गूढ ब्रम्हचारी, उपनय ब्रम्हचारी, नैष्ठिक ब्रम्हचारी असे बरेच भेद आहेत. आता याचा अभ्यास करता करता त्याची विशुद्धी, पवित्रता आणखी वाढते. मग तो गृहस्थाश्रमात सहाव्या स्थानावर पोहोचतो.

गृहस्थांच्या जीवनात ज्या अकरा प्रतिमा सांगितल्या आहेत त्यातली सहावी व सातवी प्रतिमा ब्रम्हचर्यासंबंधी असते. सहाव्या प्रतिमेत दिवसाच्या वेळी जीवनभर ब्रम्हचर्याचा नियम, सातव्या प्रतिमेत जीवनभर ब्रम्हचर्याचा नियम घेतला जातो. पत्नी बरोबर राहील पण तरीही मी ब्रम्हचारी राहीन असा नियम घेतला जातो. अकराव्या प्रतिमेत घराचाही त्याग केला जातो. मग ना कोणी पत्नी असते ना कोणी पुत्र असतो ना कोणता परिवार असतो. सगळे संबंध सोडून संघस्थ व्हायचे. यात दोन  वस्त्रधारी, एकवस्त्रधारी असे क्षुल्लक व ऐलक मुनी असतात. यांना लघु वस्त्रधारी किंवा  देशयतीही म्हटले जाते. उपासक अध्ययन ग्रंथात यांना मुनिकुमारही म्हटले आहे. यानंतर नम्र वचन कायेने कृतकारीत अनुमोदनाने जीवनभरासाठी ब्रम्हचर्याचे धारक असणारे निर्ग्रंथ मुनीही असतात. विशुद्धीच्या अपेक्षेने त्यांचे ब्रम्हचर्य आणखी उच्च श्रेणीचे मानले जाते.

आचार्य कुंदकुंद बारस अनुवेख्खा ग्रंथात लिहितातकी  प्रम्भिक अभ्यासाच्या काळात अशा वस्तू नाही पहायच्या नाही ऐकायच्या की ज्यायोगे मनात पाप उत्पन्न होईल. ही झाली सुरुवातीची गोष्ट पण जेथे ब्रम्हचर्याला उत्तम हे विशेषण लागते तेथे काही जरी पाहिले तरी मन बिलकुल शांत असते. आचार्य कुंदकुंदांचा एक श्लोक आहे. त्याचा अर्थ असाकी; जेथे सर्वांगाला पाहूनही मन निर्विकार आहे त्याचे ब्रम्हचर्य अशा श्रेणीचे आहे. (सव्वंगम पेच्छंतू)

आता मुल प्रश्न म्हणजे संसारमे विषवेल  नारी असे का म्हटले आहे? यामुळे नारी पर्याय धारण करणाऱ्या सर्व स्त्रिया आणि तीर्थंकरांची मातासुद्धा विषवेल होऊ शकते. प्रश्नकर्त्याच्या मनात असेपण येऊ शकते. ही गोष्ट गळ्यातून कशी उतरणार? पण उत्तर अगदी सरळ आहे. त्यात असे लिहिले आहेका की संसारमे विषवेल माता, संसारमे विषवेल भगिनी, संसारमे विषवेल कन्या! लिहिले आहेका? नाही, असे नाही लिहिले. याचा अर्थ असाकी ज्या स्त्रीला पाहून मनामध्ये ही स्त्री आहे हा भाव उत्पन्न होतो तर ती फक्त तुमच्यासाठी विषवेल आहे. जेथे फक्त आणि फक्त स्त्रीत्वावर नजर जाते तेथेच तिला विषवेल म्हटले आहे.

एक पंक्ती आम्ही लिहिली होती, “ज्याच्या दृष्टीने नारी नारी आहे तो कसला ब्रम्हचारी?” जर एक उच्च अध्यात्मिक दृष्टी असेल तर ना कोणी पुरुष दिसेल न कोणी स्त्री! फक्त चैतन्यस्वरूप आत्माच दिसेल.

स्त्री, पुरुष  हे तर शरीराचे भेद झाले. प्रत्येक ब्रम्हचाऱ्याचे किंवा साधकाचे साधनेचे अनुभव वेगवेगळे असतात. आदिनाथ भगवानांनी जे १००० वर्षे तप केले त्याचा अनुभव मल्लिनाथ स्वामींनी जे सहा दिवस तप केले तसा कसा असेल? आदिनाथ भगवानांनी जो तेरा महिने आठ दिवस निराहार राहण्याचा अनुभव घेतला तो अनुभव दुसऱ्या कोणाला तसा कसा येऊ शकेल? ब्रम्हचर्याशी संबंधित प्रत्येक ब्रम्हचारीचे अनुभव एकसारखे असतील किंवा नसतीलही. तसा काही नियम नाही. नियम तर असा आहेकी एक तर आपल्या दृष्टीत आदरभाव किंवा करूणा असेल तर पाप उत्पन्न नाही होणार. हा आमचा व्यक्तिगत अनुभव आहे. जर आपण अंजना सतीची कथा वाचली तर तर मनात असे प्रश्न येतील की, त्यांनी एवढया संकटात आपल्या सतीत्वाचे रक्षण कसे केले? बिकट परिस्थितीतून मार्ग कसा काढला? आदर व करूणा असेल तर विकार येत नाहीत.

जर त्या पर्यायांच्या विशेषते संबंधी विचार केला तर त्या पर्यायाची प्राप्ती ज्यांना झाली आहे त्यांनी किती शारीरिक व मानसिक दु:ख सहन केले, त्या पर्यायात किती पराधीनता असते, किती बंधने असतात, जर त्या पर्यायांचे उल्लंघन केले तर भविष्यात त्यांची काय स्थिती होणार? या विचाराने करूनच उत्पन्न होते. स्त्रीपर्यायात आर्तध्यान जास्त असते व पुरुष पर्यायात रौद्रध्यान जास्त असते.

संसारातील सुखदु:खांची कारणे आर्त व रौद्र ध्यानेच असतात. दोन्हीही दुर्ध्यानच! ते मोक्षासाठीचे ध्यान नाही. नाहीतर आपणाला वाटेल आपल्याला तर वारसा हक्कानेच मिळाले ध्यान! आर्तध्यान म्हणजे सतत कुठल्याना कुठल्या पीडेने चिंतीत होऊन विचार करीत राहणे की केव्हा संपेल ही पीडा? रौद्रध्यान म्हणजे कोणालातरी संकटात पाहून खूष होणे, त्रास देऊन, खोटे बोलून, परिग्रह वाढवून खूष होणे. परक्याचे धन लुटून आनंदित होणे. ही सारी रौद्रध्यानेच आहेत. स्त्री-पुरुष दोघेही दोन्ही प्रकारचे ध्यान करीत असतात पण अधिकतेच्या अपेक्षेने स्त्रियांचे आर्तध्यान जास्त व पुरुषांचे रौद्रध्यान जास्त असते. इर्षानंद, मृषानंद, चौर्यानंद, परिग्रहानंद ही सारी संसारातील सुखाची कारणे रौद्रध्यानेच झाली.  आर्तध्यानाचेही प्रकार कार्तिकेय अनुप्रेक्षेत आले आहेत. जसे संयोगज, वियोगज, रोगज आणि भोगज.

आता अनिष्ट संयोगज म्हणजे अनिष्ट वस्तूच्या संयोगाने पीडा सुरु होते. उदा. कोठूनतरी दुर्गंध येऊ लागला, नको असलेला मनुष्य समोर आला तर कोठून आला हा वास? कोठून टपकला हा माणूस? असा विचार सुरु होतो. इष्ट वियोगज हे ध्यान इष्ट वस्तूच्या वियोगाने सूरू होते. एखादी आवडती वस्तू वा इष्टजन आपल्यापासून कायमचे विलग झाले तर सूरू होते. रोगजध्यान शरीराच्या पीडेशी रोगाशी सबंधित असते. भोगजध्यान म्हणजे भविष्याच्या सुखाच्या चिंतेने होणारे दु:ख, जसे की कधी मिळेल मला ती वस्तू? ते सुख?

तर ज्यांना स्त्री पर्याय मिळाला आहे त्यांना वाटते परत नको मिळायला.

 या पर्यायातून सुटण्याचा श्रेष्ठ उपाय म्हणजे, सम्यग्दर्शन. ज्याला सम्यग्दर्शन होते त्याला स्त्री पर्याय(आर्त ध्यान) नाही मिळत. मग तो स्त्री अथवा पुरूष कोणीही असो. पण जर मिळालेले सम्यग्दर्शन सुरक्षित ठेवले तरच हे शक्य आहे. कारण सम्यग्दर्शन अनंत वेळा प्राप्त होते आणि सुटतेही. कार्तिकेय अनुप्रेक्षेत असे म्हटले आहेकी, ‘एक जीव मोक्षास जाईपर्यंत असंख्यात वेळा सम्यग्दर्शन प्राप्त करतो आणि सोडतोही. पण सर्वच जीव नियमाने असे करतातच असे नाही.’ पण सम्यग्दर्शन प्राप्त झाल्यानंतर ते सुरक्षित ठेवण्याचेही उपाय आहेत. आचार्य कुंद्कुंदांनी ते सांगितले आहेत. पण आम्हीही यासाठी काही व्यावहारिक उपाय जे व्यक्तिगत चिंतनावर आधारित आहेत ते सांगतो. ते असे,

१-छल कपटापासून दूर रहा.

२-कोणाचीही बढती पाहून इर्षा करू नका, जळू नका.

३-इकडचे तिकडे करू नका.(चहाडी, चुगली वगैरे)

या तीन नियमांचे पालन केले तर आमच्या दृष्टीने ती व्यक्ती या पर्यायापासून वाचेल.

जर आपण आपल्या शक्तीनुसार ब्रम्हचर्याचा नियम घेतला तर ती अप्राकृतिक गोष्ट होत नाही. काही लोक म्हणतात की ही तर अप्राकृतिक गोष्ट झाली. नाहीतर वंश कसा चालेल? पण कोणावर ब्रम्हचर्य लादले जात नाही. ध्यान आणि आत्म्याची विशुद्धी वाढवण्यासाठी हे नियम आहेत. तरीपण कोणी असे म्हणेलकी, असे बनू इच्छिणारा प्रकृतीच्या विरुद्ध चालेल.पण असे नाही.

जर कोणी घाबरून, जबाबदारीपासून पळून जाऊन त्याग करेल तर तो पुढे मनाला जिंकू नाही शकणार. आमचे आचार्यश्री एक वाक्य म्हणायचे, प्राकृत भाषेतले आहे. ‘जो कम्मे सुरा तो धम्मे सुरा.’

म्हणजे जे पुरुषार्थात शूर वीर होतात तेच धर्मातही शूर वीर होतात. तेथे म्हणजे संसारात घाबरणारा की, पैसे कसे मिळवू? किती त्रास होतो त्यासाठी! असे म्हणणारा इथे धर्मातही सफल होत नाही. तेथे कोणी शेजारीसुद्धा ओळखत नव्हते मग इथे सर्वजण प्रणाम करतील  म्हणून आलो असे होत नाही. सबस्टीटयूशनचे नाव त्याग नाही. गोड रसाचा त्याग केला आणि साखर सोडून मुठी भरभरून मनुके खायला सुरुवात केली  किंवा गूळ खायला सुरुवात केली तर तो त्याग नाही. त्यागाच्या मार्गात बेईमानी नाही चालत. खरे ब्रम्हचर्य म्हणजे तर लालसेला सोडण्याचे नाव आहे.

संधीच मिळत नाही म्हणून परिस्थितीवश पाप न करणे म्हणजे पुण्य नाही. तो संयम नाही. संधी मिळूनही पापाकडे मन नाही गेले तर तो संयम. ते खरे व्रत! संधीच्या अभावाच्या सुविधेमुळे आलेला संयम म्हणजे ब्रम्हचर्य नाही.

मानसशास्त्रामध्ये एक भूमिका सांगितली आहे. ती अशीकी, आपली दृष्टी त्या विकारावर पहिल्यांदा जाईल की जो आपल्या आत खोलवर दडलेला आहे. आपल्या नजरेमध्ये जो विकार पहिल्यांदा येतो तेव्हा समजा तो विकार आपल्यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. ज्याचे मन निष्पाप आहे तो खरा व्रती! नियमसारामध्ये आचार्य कुंद्कुंद म्हणतात, ‘मेहून सन्न वीवज्ज परिणामो अहव तुरियवदो’ म्हणजे

कुशीलाची इच्छा न होणे म्हणजे ब्रम्हचर्य व्रत आहे.

योगशास्त्र ग्रंथातली एक गोष्ट आहे. कलकत्त्याच्या एका मासिकामध्ये छापलेली होती. भद्रबाहू महाराजांच्या काळातली २००० वर्षापेक्षा जुनी गोष्ट आहे. अंगावर रोमांच उभे करणारी आहे. जेव्हा चातुर्मासाचा समय आला तेव्हा शिष्यांनी गुरूला विचारले, “आम्ही कोठे चातुर्मास करायचा?” गुरूंनी सर्वांना काही काही सांगितले, कोणाकोणाला स्वत:बरोबरच चातुर्मास करायला सांगितले. एक शिष्य गुरूंना म्हणाले, “मी विहिरीच्या कठड्यावर मंडूकासनात बसून चातुर्मास करेन.” गुरूंनी त्याची योग्यता बघून त्याला सांगितले, “ठीक आहे एवमस्तु!”.

दुसरा शिष्य म्हणाला, “मी जंगलामध्ये सिंहाच्या गुहेसमोर बसून चातुर्मास करू इच्छितो.” त्यालाही गुरु म्हणाले, ” तथैवमस्तु !एक स्थुलीभद्र नावाचे  साधू म्हणजे शिष्य होते. पूर्वायुष्यात ते व्यसनी होते पण साधू बनून त्यांनी मनाला एवढे वश केले होतेकी त्यांनी गुरुंजवळ अशी अनुमती मागितलीकी, मी पूर्वी जेथे व्यसन करीत होतो तेथे त्या ठिकाणी चातर्मास करू इच्छितो. बाकी सर्वांना आश्चर्य वाटले. पण गुरु काही काळ शांत राहिले आणि म्हणाले, “एवमस्तु!”

स्थुलीभद्रांच्या चातुर्मासाचे स्थळ म्हणजे त्यांच्या पूर्वायुष्यातील व्यसनस्थळ, कोसा नामक वेश्येची चित्रशाळा होती. त्यांना पाहून कोसाला सर्वप्रथम आश्चर्य वाटले. हे इथे कसे आले? पण नंतर तिला समजलेकी हे ते नाहीत की मी जे समजते आहे. हे तर पूर्ण बदलले आहेत. तिने चार महिने खूप प्रपंच म्हणजे प्रयत्न केले पण त्यांचे मन विकृत झाले नाही. मग त्यांच्या चरणांशी प्रणाम करून ती म्हणाली, “आता मी ब्रम्हचर्य व्रत धारण करते.” त्यांच्या साधनेने प्रभावित होऊन अगदी विरुद्ध मार्गावर असणाऱ्या तिने हे व्रत धारण केले.

शेवटी सफलतापूर्वक चातुर्मास पूर्ण करून सर्व साधू-शिष्य परत आले. गुरूंनी त्यांना खूप चांगल्या शब्दांनी संबोधित केले. पहिल्याला ते म्हणाले, ये धीर! दुसऱ्याला म्हणाले, ये वीर! आणि स्थुलीभद्राला म्हणाले, ये धीर शिरोमणी! अप्रतिम साहसी! तेव्हा सिंहाच्या गुहेसमोर चातुर्मास केलेल्या मुनींच्या मनात विचार आलाकी, दिवसरात्र प्राण संकटात टाकून मी चातुर्मास केला आणि कसातरी जिवंत राहून आज परतलो आहे तर मी फक्त वीर? आणि तो मात्र धीर शिरोमणी?

मग दुसऱ्या वर्षी ते सिंहाच्या गुहेवाले साधू गुरूंना म्हणाले, “मी यावर्षी त्याठिकाणी चातुर्मास करेन.” गुरु म्हणाले, “तेवढी तुझी क्षमता नाही.” भर्तुहरीचा एक श्लोक आहे, त्याचा अर्थ असाकी, मदोन्मत्त हत्तीला वश करणारे वीर मनुष्य या धरतीवर असतात. प्रचंड मृगराजाला नष्ट करणारे सक्षम लोकही असतात. पण मी त्या बलवानांच्या समोर बलपूर्वक सांगतोकी, कामाला जिंकणारी माणसे बोटांवर मोजण्याइतकीच असतात. म्हाणून गुरू शिष्याला सांगतात की, “हे वत्सा हा आग्रह सोड.” पण शिष्य म्हणतो, “गुरुवर मी सफलतापूर्वक परत येईन.” गुरू म्हणतात, “स्वत:च्या आग्रहावरून चातुर्मास करणार असशील तर तुझी मर्जी.”

त्यानंतर शिष्य त्यास्थळी  आला. कोसणे पहिले, विचार केला, हे का बरे आले? ते आले होते ठीक होते. स्वत:च्या परीक्षेसाठी आले होते. पण हे कशासाठी आले? साधूंच्या मनातही एक-दुसऱ्यांबद्दल स्पर्धा असतेका? असेच जर असेल तर मी बघून घेईन. मग तिने परत पहिल्याप्रमाणेच प्रपंच प्रारंभ केला. साधूंनी काही दिवस मन सावरले पण हळूहळू ते विचलित झाले. त्यांचे मन अस्थिर झाले. पण तिने उतावळेपणा केला नाही. अंतिमत: काही काळानंतर साधू अधीर झाले. त्यांनी आपली भावना व्यक्त केली. कोसाच्या मनात विचार आला, मी तर व्रती आहे. फक्त परीक्षा घेण्यासाठी मी हा उपक्रम रचला. त्यांचा अभिमान दूर करण्यासाठी मी हे केले. माझ्या निमित्ताने यांना दुर्बुद्धी होत आहे. हे खरोखरच भ्रष्ट व्हायला निघाले आहेत. आता यांना सद्बुद्धी देणे माझे कर्तव्य आहे. म्हणून ती म्हणाली,

“आम्ही धंदेवाईक लोक आहोत. कोणी धन देतात, सोनेचांदी देतात, तुम्ही काय देणार?” “काय पाहिजे?” साधूंनी विचारले.

“नेपाळ नरेशांजवळ असलेली रत्नकांबळ आणून द्याल?” ती म्हणाली. किती अदभूत घटना! आतून तर ते भ्रष्ट झालेच होते. म्हणाले, “यात कोणती मोठी गोष्ट आहे?” मग ते पायी चालत चालत नेपाळ पर्यंत गेले. त्यांना पाहताच नेपाळनरेश विनम्र झाले, म्हणाले, “आदेश द्या. तुम्हाला काय हवे आहे? ” साधू म्हणाले, “तुमच्याजवळ असणारी रत्नकांबळ हवी आहे.” नेपाळनरेशांनी नेपाळच्या उत्कृष्ट मखमलीपासून बनवलेली ती रत्नकांबळ तात्काळ साधुंना दिली. साधी प्रसन्न झाले. ती घेऊन परत पदयात्रा करीत वाराणसीला आले. कोसा त्यावेळी बगीच्यात होती. त्यांना पाहून ती म्हणाली,

“आलात?”

“हो देवी, मी आलो.”

“घेऊन आलात?”

“होय सुंदरी, मी घेऊन आलो.” साधू म्हणाले.

मनुष्य जेव्हा पतनाच्या निकट येतो तेव्हा त्याच्या शब्दातही फरक पडतो. त्याचे मन-वचन-कायही बदलते. विचलित होते. साधुंनी कोसाला ती रत्नकांबळ दिली.कोसाने ती हातात घेतली. मग ती बगिच्यातून दरवाजाकडे आली. पायाला थोडा चिखल लागला होता. तिने तो चिखल त्या रत्नकांबळाला पुसला आणि मग ती फेकण्यासाठी इकडेतिकडे पाहू लागली. पाहता पाहता तिने ती रत्नकांबळ बाजूच्या गटारात फेकून दिली. साधू आश्चर्यचकित झाले. म्हणाले, “हे तू काय केलेस? वर्षाकालात इतक्या मैलांची पदयात्रा करून मी ही रत्नकांबळ आणली होती. तू तर गटारीत फेकून दिलीस!” यावर कोसा काय म्हणाली ते ऐकून साधूंची बुद्धी ठिकाणावर आली. ती म्हणाली, “तुम्ही जे केलेत तेच मी केले. ही तर केवळ रत्नकांबळ होती. आपण तर तिन्ही जगताच्या अनमोल रत्नाला सम्यग्दर्शन-ज्ञान चारित्र्याला गटारीत फेकण्यासारखे काम केलेत. आपण माझ्यासाठी रत्नकांबळ आणायला गेलात? धिक्कार आहे या अशा दुर्बुद्धीवर!”

त्यावर साधू विचारमग्न झाले. त्यांना आठवली, त्यांनी केलेली ती कित्येक मैलांची यात्रा! ते कष्ट! साधू असूनही याचक बनलो. सारा स्वाभिमान नष्ट केला. फक्त हिच्या इच्छेखातर. त्यांनी स्वत:चाच धिक्कार केला. मग कोसा म्हणाली, “हे साधू आपण मला जशी समजता तशी मी नाही. स्थुलीभद्र आले होते तेव्हाच मी ब्रम्हचर्य व्रत धारण केले आहे. हे ऐकताच साधुंना ग्लानी आली. त्यांना वाटले धरणीने आपल्याला दुभंगून पोटात घ्यावे. हात जोडून ते म्हणाले, “मला सद्बुद्धी दिल्याबद्दल वारंवार नमस्कार आणि माझ्या दुर्बुद्धीबद्दल वारंवार क्षमा मागतो.” चातुर्मास संपवून ते परत आले. गुरूंनी तर सर्व जाणलेच होते. मग शिष्याने योग्य वैराग्यासहित पुनरपि दीक्षा घेतली.

 

 

मनाला वश करण्यासाठी जिनेन्द्र भगवानांनी एक सुंदर सूत्र सांगितले आहे. त्या सूत्रानुसार

१-अशी चर्चा, गाणी, गोष्टी नका ऐकू की ज्यामुळे मन पापाच्या बाजुला जाईल.

२-अशी दृश्ये नका पाहू की ज्यामुळे मन बेकाबू होईल.

३- भूतकाळातील अशा घटनांचे स्मरण नका करू की ज्यामुळे मनात पाप उत्पन्न होईल.

४- भोजनात अशा वस्तू नका घेऊ की ज्यामुळे इंद्रियात विकार उत्पन्न होईल. गरिष्ठ, मादक वस्तुंमुळे मनात पाप उत्पन्न होते. राजसी भोजन ब्रम्हचर्यात बाधक आहे.

५-शरीराला अशाप्रकारे नका सजवू की ज्यामुळे दुसऱ्याच्या मनात पाप उत्पन्न होईल.

किती सुंदर नियम सांगितले आहेत जिनेंद्र भगवानांनी!  कारण केवली भगवान जाणत होते की कसे कसे लोक येणार आहेत कलियुगात. मूलाचार ग्रंथात लिहिले आहेकी , जशी माझी माता तशाच सर्व माता आहेत. जशी माझी बहिण तशाच सर्व बहिणी आहेत. अशी दृष्टी, अशी समता आली तर ब्रम्हचर्य कठीण नाही. मग इतकी पवित्रता येईलकी  खूप मोठा भार हलका होईल. संयमाचा रस येऊ लागेल. अशा पवित्रतेसमोर

देवताही नतमस्तक होतात. त्या अशा ब्रम्हचर्याला पूजतात की जे या जगतात दुर्लभ आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.