जैनत्व दर्शन – JAINATVA DARSHAN


This article is a translation of a pravachan given by Jain Guru kshullak 105 shree Dhyansagarji mararaj.(Book-kaivalyachandane).
In this pravachan maharaj explains true meaning of jainatva.

भक्तामर स्तोत्रातली सर्वच काव्ये भक्तिरसाने ओथंबलेली आहेत, पण त्यातले आम्हाला अत्यंत  आवडणारे काव्य २१वे आहे. “प्रत्येक अवतारात नाविन्य धारण करणारे हरिहरादिक उत्तम आहेत. पण त्यांच्या दर्शनानंतरही दर्शनाची एक शृंखला  बनते. पण आपल्या म्हणजे जिनेन्द्र भगवानांच्या दर्शनाने हृदय एवढे मुग्ध होतेकी अन्य किंवा आगामी भवातही मी अन्य कोणाचे दर्शन इच्छित नाही.” जिनदर्शनाने निजदर्शन होते. निजदर्शनाने सम्यग्दर्शन आणि सम्यकदर्शनाने साधनेद्वारा केवलदर्शन अशी शृंखला बनते.

हे काव्य आम्हाला एवढे का आवडते? १९७९ चा काळ होता. त्यावेळी आम्ही जैन नव्हतो. सुट्टीत पिकनिकला गेलेलो असताना गाडीतून छत्तीसगढहून जबलपुरला आलो. जबलपुरची सर्व पर्यटनस्थळे पहिली. संध्याकाळी नर्मदा नदी जेथून वाहते त्या भेडाघाट या स्थळी पोहोचलो. तेथून परत येताना डाव्या बाजूला एक जैनमंदिर होते. ते पाहून साक्षात असे जाणवलेकी कुठलीतरी चुंबकशक्ती आपल्याला ओढून घेत आहे. बरोबरचे बाकीचे सारेजण म्हणाले, “हे तर जैनमंदिर आहे.” छोट्या भावाला घेऊन त्या मंदिरात गेलो. त्यापूर्वी आम्ही कधी जैन प्रतिमेचे दर्शन घेतले नव्हते. मंदिरातील वेदीवर भ. शांतीनाथ विराजमान होते. भगवंताची नयन मनोहर छबी पहिली. त्यावेळी झालेले ते दर्शन एवढे अदभूत होतेकी त्याचे वर्णन शब्दात नाही करू शकणार. पद्मासनातील ती छबी, दुधासारखी सफेद! आम्ही पहातच राहिलो. आजूबाजूला असलेल्या अनेक दर्पणात भगवंताच्या कितीतरी नयनरम्य प्रतिमा दिसत होत्या. कसे कोठून तरंग येत होते. किती वेळ पहात राहिलो कोणजाणे!  त्या दर्शनाने जे पुण्य प्राप्त झाले त्यामुळेच की काय पण काही काळानंतर जैनदर्शन दाखवणारी जिनेन्द्रवर्णींची एक पुस्तिका हातात पडली. वास्तवात रूपाच्या दृष्टीने ती छबी आणि त्या छबिच्या मुखमंडलावरचे भाव अद्वितीय होते. त्यानंतर भोपाळमध्ये आल्यावर कोणी विचारले, “आपण जैन धर्मच का निवडला?” म्हणालो, “पसंद अपनी खयाल अपना.” विचारणारी व्यक्ति एवढी मनापासून हसलीकी बस!

जैन धर्मच का निवडला? कारण यात कोणाचीही आलोचना नाही. पक्षपात नाही. ज्यांनी याचा महिमा ओळखला तेच याला प्राप्त करतील. जो पाहून पारखून जे ग्रहण करतो त्यालाच त्याची किंमत कळते. ज्याला जन्मापासूनच णमोकार मंत्र मिळाला त्याला त्याची एवढी आस्था असत नाही.

आम्ही विज्ञानाचे विद्यार्थी. त्यामुळे जवळ वैज्ञानिक दृष्टी होती. जैन आगम असे आहेकी जाणून घ्या, विचार करा. पटलं तर माना. नाही पटलं तर सोडून द्या. कसलाही दबाव नाही, दडपण नाही. जैनधर्म प्राप्त करून आम्ही तर एवढे संतुष्ट आहोतकी त्याचे वर्णन कोठल्या शब्दात करावे?

धर्म काय आहे? धर्म वेगवेगळ्या विद्वानांनी वेगवेगळा सांगितला आहे. जैन, बौद्ध, इस्लाम वगैरे विशेषणे न लावता धर्म म्हणजे काय हा खरा प्रश्न आहे. धरति इति धर्म:! जो धारण केला असता तो  आपल्याला थोपवतो, सांभाळून घेतो तो धर्म आहे. आधीच घसरलेल्यांना (अध:पतित झालेल्यांना), घसरणाऱ्या व्यक्तिंना आणि पुढे घसरणार आहेत अशांनासुद्धा धर्म वाचवतो. दु:खातून बाहेर काढून खऱ्या सुखात जो नेतो तो धर्म!

आता जो म्हणजे कोण? काही लोक म्हणतात ती आस्था आहे. काहीजण म्हणतात ते ज्ञान आहे. काहीजण म्हणतात तो संयम आहे. पण धर्म हा असा एकेकटा नाही. काहीजण म्हणतात आस्थेबरोबर ज्ञान म्हणजे धर्म. काहीजण म्हणतात आस्था आणि आचरण म्हणजेच धर्म. काहीजण म्हणतात ज्ञान आणि आचरण म्हणजे धर्म. असे अनेक मतभेद आहेत. खिस्ती धर्माचे दोन संप्रदाय आहेत – प्रोटेस्टंट आणि क्याथलिक. एका प्रोटेस्टंटने एक पुस्तक लिहिले होते. तो म्हणाला, Faith is God. क्याथलिक म्हणतात Work is Worship. दोघेही एकमेकाशी सहमत नाहीत. आज असा एकही धर्म उरलेला नाही की ज्यात विवाद नाहीत, शाखा नाहीत. जैन धर्मात तर केवढया शाखा आहेत. मतभेद असले तरी मनभेद असू नयेत. धर्मामुळे परस्परवात्सल्य प्रस्थापित होते. कषायांचे काम तोडण्याचे असते तर धर्म जोडण्याचे काम करतो. वैऱ्यावरती प्रेम कराया शिकवी आम्हा धर्म भाऊबंदाशीही वैर कराया शिकवी मान कषाय

जैन दर्शन म्हणते भांडू नका. झगडे करू नका. उत्तम सुखात जायची गोष्ट करता तर मग विवाद कशाला? भांडायची तर ही गोष्टच नाही. समस्या हीच आहेकी जेव्हा आपण आपली गोष्ट बरोबर मानतो आणि दुसऱ्याची चूक तेव्हा फक्त आपण कशाचा विचार करतो? फक्त ज्ञान म्हणजे धर्म, फक्त आचरण म्हणजे धर्म, फक्त आस्था म्हणजे धर्म या गोष्टी आपल्याला आपल्या दृष्टीने बरोबरच वाटतात. पण जैन दर्शन म्हणते,  सत आस्था, सत विवेक, सत आचरण यांच्या त्रिवेणी संगमालाच धर्म म्हणतात. या त्रिवेणीमधील सतआस्था म्हणजे सम्यग्दर्शन. सतविवेक म्हणजे सम्यग्ज्ञान व सतआचरण म्हणजे सम्यकचारित्र्य होय.

धर्माच्या नावावर विवाद होतात. पण हे सारे विवाद कषायांचे असतात. धर्म विवाद नाही शिकवीत. श्रद्धेला, ज्ञानाला, चारित्र्याला घेऊन जो रस्सीखेच करेल तो कषायच नाहीका? धर्म खूप दुर्लभ गोष्ट आहे. धर्मावर बोलणारे सहज सापडतील पण धर्म समजणारे दुर्लभ असतात. अकरा अकरा अंगाचे धारक, जाणकार किंवा कठोर तप:श्चरण करणारेही कधी कधी धर्माला स्पर्शही करू शकत नाहीत. स्वत:ला आधुनिक समजणारे लोक म्हणतात, धर्म ही रिकामटेकड्या लोकांची गोष्ट आहे. ती हलकीफुलकी गोष्ट आहे.
‘धम्मो मंगल मुक्कीठं अहिंसा संजमो तवो देवावि तं नंमंसंति जस्स धम्मे सया मणो अहिंसा’, संयम, तपरूपी धर्म सर्व मंगलात उत्कृष्ट आहे. ज्याचे मन धर्मात लीन आहे त्याला देवताही नमस्कार करतात.

विद्वत्ता दाखवून तर्क वितर्काने आपण घोड्याला गाढव व गाढवाला घोडा म्हणू शकतो. पण हा कुतर्क आहे. स्वामी नित्यानंद जो अन्य मतांचा आग्रही होता त्याने जैनांशी शास्त्रार्थ करण्यासाठी जैन शास्त्रांचे अध्ययन केले. पण तो जैनांशी शास्त्रार्थ नाही करू शकला. कारण मग तो स्वत:च जैनी बनला. कर्मानंद बनला. जैन दर्शनाशिवाय शरीर व आत्म्याला भिन्न मानणारी अनेक दर्शने आहेत. पण जैन धर्माची विशेषता ही आहेकी जैन धर्मात सर्व मतांना सामावून घेणारी हृदयाची विशालता आहे. सम्यग्दर्शन, सम्यग्ज्ञान व सम्यकचारित्र्य ही तीन रत्ने भोगभूमीत नसतात. ती कर्मभूमीतच असतात. कर्म भूमीतला माणूस ही तीनही रत्ने धारण करू शकतो. तोच धर्मात्मा असतो. सत म्हणजे खरी श्रद्धा हेच सम्यग्दर्शन. जेथे सम्यग्दर्शन नाही तेथे स्थिरता नाही. खरी निष्काम भक्ती नाही तर ती आस्था काय कामाची? ज्यांच्याजवळ प्रेम आहे त्या मुनिराजांना सर्पही लपेटतात. प्रेमात भयभितता संभवत नाही.  सम्यग्दर्शनाची आठही अंगे प्रेमाचीच स्वरूपे आहेत. आस्थेचेच हे आठही विभाग आहेत.

नि:शंकीत अंग म्हणजे जेथे प्रेम आहे तेथे संदेह नाही. नि:कांक्षित अंग म्हणजे ज्यांच्याप्रती प्रेम आहे त्या आराध्याच्या बदल्यात कोणतीही आकांक्षा नसते. अटींमध्ये खरी आस्था नसते. गुरुंबद्दल आस्था असेल तर गुरूंचे शरीर रुग्ण असले तरी त्याबद्दल घृणा नाही वाटणार. घृणा असेल तर आस्था नाही. अमूढ दृष्टी मधुर वाणी आणि चमत्कारांनी आकर्षित होत नाही. आपले आराध्य, ‘गुरू’ म्हणजे मनुष्य असेल तर गुरू मनुष्य असल्याने काही त्रुटी असू शकतात. आस्थावानाला गुरूचे दोष सामान्यत: दिसत नाहीत. गूणच दिसतात. उपगूहन अंग म्हणजे दोष दिसले तरी त्यांची चर्चा करायची नसते. स्थितीकरण अंगात जर गुरू किंवा सह्धर्मी बंधू अध:पतित होत असतील तर त्यांना थांबवण्याचा  प्रयत्न केला जातो. वात्सल्य अंग म्हणजे निस्वार्थ प्रेम. प्रभावना अंग म्हणजे ज्या धर्माद्वारे आपल्याला लाभ झाला त्याचा दुसऱ्यालाही लाभ घडवणे, पण सहजतेने. दबाव न आणता. प्रभावनेत अनेक गोष्टी येतात. दान ही त्यातलीच एक गोष्ट. दान हे स्वेच्छा असावे.   एकदा एका शेठाणीने मुनींना आहारदान दिले. नंतर तिला समजलेकी ते मुनी म्हणजे आचार्य होते. शेठजींनी भिंतीवर लिहिले होतेकी, ‘दर्शन ज्ञान चारित्राणी मोक्षमार्ग:’ आचार्यांनी ते  संस्कृत शब्द वाचले. शेठाणीला विचारले, “खडू आहेका?” मग आचार्यांनी खडू घेऊन त्या वाक्याच्या आधी फक्त सम्यक हा शब्द जोडला. शेठ आल्यानंतर त्यांनी पुढे लिहिलेला सम्यक शब्द पाहिला. ते म्हणाले, “हा शब्द कोणी जोडला? तू तर हा शब्द जोडूच नाही शकणार.” शेठाणी म्हणाली, “आचार्य महाराज आहाराला आले होते. त्यांनी हा शब्द जोडला.” शेठजींनी ओळखले हे कोणी साधारण माणसाचे काम नाही. या एका वाक्याने जेवढी म्हणून कमी होती त्याची पूर्ती केली. सम्यग्दर्शन-ज्ञान-चारित्र्य हे तीन एकत्र येणे हाच मोक्षाचा उपाय आहे. हाच मोक्षाचा मार्ग आहे.

शेठ आत्म्याचं हित इच्छित होते. त्यांची बुद्धी पण तीव्र होती. ते जाणून घेऊ इच्छित होते. ते तात्काळ आचार्य मुनींच्या कुटीत गेले. आचार्य एखाद्या मूर्तिसमान पद्मासनात बसले होते. ती छबी अतिशय शांत मौन होती. त्यांची छबी पाहून शेठजींना मनोमन वाटले, हेच आपल्याला खरा मार्ग दाखवू शकतात. त्यांनी आचार्यांना विधीपूर्वक तीन परिक्रमा करून नमस्कार केला. विनयपूर्वक बसून ते म्हणाले, “धर्माचा काही उपदेश द्या. जो फक्त आपल्याजवळच मिळेल.अनुभवपूर्वक उत्तर सर्वच ठिकाणी मिळत नाही.” शेठजींनी विचारले, “आत्म्याचे वास्तविक हित काय?” “अर्थात मोक्ष!” आचार्य म्हणाले. “मोक्षाचे स्वरूप व प्राप्तीचा उपाय काय?” “मोक्षाचे स्वरूप म्हणजे पूर्ण शुद्ध निर्विकार अवस्था! मोक्षप्राप्तीसंबधी विवाद आहेत, मतांतरे आहेत. पण मोक्षप्राप्तीचा खरा उपाय म्हणजे सम्यग्दर्शन-ज्ञान-चारित्राणि मोक्षमार्गः!” शेठजींनी विचारले, “सम्यग्दर्शन कशाला म्हणतात?” “तत्वार्थ श्रद्धानं सम्यग्दर्शनं!” आचार्य म्हणाले. “सम्यग्दर्शन कशाने होते?” शेठजींनी विचारले. “तत निसर्गात अधिगमात वा!” आचार्यांनी निरसन केले. शेठजी प्रश्न विचारीत गेले आणि आचार्य शंका निरसन करू लागले. सांगू लागले. येथूनच तत्वार्थसूत्र चालू झाले. तत्वार्थसूत्राचा जन्म हा असा झाला.

आचार्य उमास्वामींनी शेठजींनी भिंतीवर लिहिलेल्या वाक्यापुढे सम्यक हा शब्द जोडला आणि त्यात प्राण भरले. त्याला सजीव बनवले. तत्वार्थसूत्र खूप सुंदर ग्रंथ आहे. धर्म काय आहे? खरा मोक्षमार्ग सांगतो तोच धर्म आहे. पुणे-मुंबई रस्ता पुण्याहून मुंबईला कसे जायचे ते सांगेल. मुंबई-पुणे रस्ता मुंबईहून पुण्याला कसे जायचे ते सांगेल. पण खऱ्या सुखाचा मार्ग दाखवणारा एकच मार्ग आहे सुख आहे . तो म्हणजे मोक्षमार्ग. तो धर्मच सांगेल. तुम्ही माना अगर मानू नका. मानलं तर सर्व काही आहे. नाही मानलं तर  काहीच  नाही.  जसे मदिरापान करणारा गटारीच्या बाजुला पडून म्हणतो, हेच खरे सुख आहे. यातच मजा आहे. पण धर्माबाबत तुम्ही माना अगर मानू नका,तो आहेच! धर्माबाबत संदेह, भ्रम राहू नये. आचार्य समंतभद्र स्वामी म्हणतात, “सम्यग्दर्शन-ज्ञान-चारित्र्याचा धर्म हा त्रिवेणी संगम आहे.” ज्या जीवात हा संगम होतो तो धर्मात्मा होतो. धर्मश्रद्धाळू खूप असतील पण धर्मात्मा खूप दुर्लभ असतो. जे धर्मात्मा असतात ते उपद्रव माजवत नाहीत, भांडणतंटे करित नाहीत, राजनीती खेळत नाहीत. ते संयमी असतात. ते छोट्या प्राण्यांचेही मन दुखवित नाहीत.

कार्तिकेय अनुप्रेक्षेत सांगितले आहे;  एक नाही, दोन नाही, तिघांचीही जरुरी आहे पण सम्यक सहित!


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.