चोविस ताशी घड्याळ अंबर
मला दावते जिन तीर्थंकर
शून्य प्रहर रात्रीचे बारा
लख्ख झळकतो तारा तारा
वृषभनाथ तीर्थंकर पहिले
एक वाजता मजला दिसले
अजितनाथ तीर्थंकर दुसरे
दोन वाजता सुनेत्र हसरे
संभव जिन तीर्थंकर तीज
तीन वाजता लखलखे वीज
अभिनंदन जिन चवथे भगवन
चार वाजता त्यांचे दर्शन
पंचम तीर्थंकर सुमती जिन
पाच वाजले हृदयी किणकिण
पद्मप्रभू भगवंत सहावे
ठीक सहाला दर्शन घ्यावे
सुपार्श्वस्वामी जिनवर सप्तम
सात वाजता अंतर नर्तन
चंद्रप्रभू तीर्थंकर अष्टम
आठ वाजता पूजन अर्चन
पुष्पदंत तीर्थंकर नववे
नऊ वाजता दर्शन बरवे
देव दहावे शीतल जिनवर
दहा वाजता मी जोडे कर
अकरावे जिन श्रेयांस देव
आत्मज्योती अकराला तेव
वासुपूज्य बारावे भगवन
बाराला करु त्यांना वंदन
तेरावे प्रभु विमलनाथ जिन
धरू तयांचे तेरास चरण
अनंत तीर्थंकर चौदावे
चौदाला दो कर जुळवावे
धर्मनाथ पंध्रावे प्रभु जिन
पंधरास त्यांना शत वंदन
शांती जिन सोळावे भगवन
सोळाला सोलहकारण मन
सतरावे प्रभु कुंथू जिनवर
सतराला उजळूदे अंतर
अरहनाथ प्रभु जिन अठरावे
अठराला गुण गान करावे
एकोणिसवे जिनवर मल्ली
एकोणिसला उजळे गल्ली
सुव्रत मुनी वीसावे स्वामी
वीस वाजता समई धामी
एकविसावे नमि निलकमली
एकवीसला दीप हृदयजली
बावीसावे नेमिनाथ जिन
बाविस बजता पर्व पर्युषण
तेवीसावे पार्श्व देव जिन
तेवीसला ग जप जाप पठण
चोवीसावे वीर सन्मती
चोविस बजता चिराग गाती
वंदूयात त्रिकाल चोविसी
आत्मदेव अगणित सुख राशी