मैत्रीची गोष्ट – MAITRICHI GOSHT


Maitrichi Gosht is a type of Fantasy story. Here we are introduced to a small girl from a happy family. She is a friends with in her house.  Other animals in her house like bullocks, goats are her friends.
Animals in the forest near her house like wild pig, owl, deer, tiger, monkey and bear are also her friends.

मैत्रीची गोष्ट लेखिका- सुनेत्रा नकाते पूर्वप्रसिद्धी- प्रगति आणि जिनविजय २४ डिसेंबर २०१०, अंक ३३

चंदनबालेला तिच्यापेक्षा मोठ्या बहिणी आणि आठ भाऊ होते. तिचे वडील त्या पंच क्रोशीतील उत्तम कुंभकार होते. ते वेगवेगळ्या आकाराची, घडणीची, गाडगी, मडकी, घडे,सुरया, फुलदाण्या, फुलझाडांसाठी कुंड्या, देवदेवतांच्या सुरेख मूर्तीसुद्धा अगदी उत्तम बनवित असत. माती आणण्यासाठी ते दूरदूरचे डोंगरमाथे पालथे घालीत. वस्तूंना रंग देण्यासाठी ते झाडांची मुळे, खोडे, पाने, फुले, रंगीत खडकांचे चूर्ण, यापासून रंग बनवीत. कुंभारीण बाईसुद्धा खूप कष्टाळू व काटकसरी होत्या. भल्या पहाटे उठून त्या कुंभारबाबांबरोबर माती आणायला जात.

त्यासाठी त्यांनी एक गाढव पाळले होते. त्याशिवाय मुलांना प्यायला दूध हवे म्हणून एक शेळीसुद्धा त्यांनी पाळली होती. शेतीच्या कामासाठी एक लाकडी नांगर व एक बैलगाडीसुद्धा त्यांच्याकडे होती. विहिरीचे पाणी उपसून शेतीला पुरवण्यासाठी त्याच्याकडे एक लाकडी मोटपण होती. बैल नांगरओढण्याबरोबर मोट ओढण्याचेही काम करीत. विशेष म्हणजे चंदनबालेच्या हट्टाखातर त्यांनी एक घोड्याचे तट्टूपण पाळले होते.

चंदनबालेचे आठही भाऊ आणि चारही बहिणी खूपच कामसू होते. लवकर उठून ते नित्यकर्मे उरकीत. ओढ्याकाठच्या झाडांची सुगंधी फुले आणून देवांची पूजा करीत. मोठ्या बहिणी शेळीची धार काढून दूध चुलीवरच्या मडक्यात तापायला ठेवीत. सर्व बहिणभाऊ मातीच्या लहान लहान मडक्यामधून शेळीचे दूध पीत. शेळीचे दूध गायीच्या आणि म्हशीच्या दुधापेक्षा औषधी  असल्याने  त्यामुळे कुठलाच आजार होत नाही असे कुंभारीणबाई म्हणत असत. शिवाय शेळीला चाराही कमी लागतो आणि तिची उसाबरही जास्त करावी लागत नाही असे त्यांचे म्हणणे होते. दूध प्यायल्या मुळे सर्वजण धट्टेकट्टे आणि कामाला वाघ होते.   घराजवळच त्यांचे छोटेसे शेत होते. शेतातली सर्व कामे जसेकी नांगरणी, पेरणी, कोळपणी, कापणी, मळणी उफफणी ते सर्वजण स्वत: किंवा बैलांच्या मदतीने पार पाडीत.

त्यांच्या मालकीचा शेताचा तुकडा छोटा असला तरी सदोदित हिरवागार असे. त्यातून त्यांना पुरेल इतका भाजीपाला, फळफळावळ, धान्य पिकत असे. एकंदरीत चंदनबालेचे कुटुंब खाऊन पिऊन सुखी होते.   चंदनबाला मात्र थोडी छंदीफंदी मुलगी होती. ती भल्या पहाटे उठून रानात फिरायला जाई. झाडावरच्या आणि घरट्यातल्या पिलांना नुकतीच जाग आलेली असे. त्यांचा किलबिलाट, चिवचिवाट तिला फार आवडे. पाखरांचं घरट्याच्या आतबाहेर उडणं, पिलांसाठी चारा आणणं, छोट्या पिलांना उडायला शिकवणं, हे सारं ती लक्षपूर्वक पहात असे. त्यामुळे हळुहळू त्यांच्या सवयी, त्यांच्या भाषा, तिला कळायला लागल्या होत्या. त्याचप्रमाणे घरामागच्या छपरात बसून शेळी, गाढव, बैल आणि तिचे आवडते घोडयाचे तट्टू ज्याला ती तट्टू म्हणूनच हाक मारी, यांच्याशी गप्पा मारायला तिला आवडत असे.

तट्टूही  तिच्यासारखाच अडेलतट्टू आणि छंदीफंदी  होता. कधी कधी तो रस्त्यावरच अडून बसे. कितीही फटके दिले तरी जागचा हलत नसे. कधी कधी तो वाऱ्याच्या वेगाने चौखूर उधळत असे. त्याला आवरणं मग चंदनबालेला कठीण होऊन बसे. पण काही जरी असलं तरी त्या दोघांची खूप चांगली मैत्री होती. ते दोघे एके दिवशी सकाळीच रानात जायला निघाले. तेव्हा आई म्हणाली, “घरी लवकर ये, उदया आपल्याला नदी पलीकडल्या गावात जत्रेला जायचे आहे. शिवाय आज सूर्य ग्रहण आहे असं ऐकलंय. तेव्हा दोघे लवकर घरी परत या.” चंदनबालेने आज्ञाधारकपणे मान डोलावली आणि तट्टूला घेऊन ती घराबाहेर पडली.

रानात तट्टूचे काही मित्र मैत्रिणी होते. त्यात एक वाघाचा बछडा, अस्वलाचे पिल्लू, हरणाचे पाडस, वानराचे पिलू, घुबडाचे पिल्लू आणि रानडुकराचे पिल्लूही होते. चंदन बालेचे ते सर्वजण दोस्तच होते. ते दिवसभर रानात फिरत राहिले. मग वानराच्या पिलाला एक कल्पना सुचली. दोघा दोघांची जोडी करून पळण्याची शर्यत लावायची. तट्टू व चंदनबालेने पंच म्हणून काम करण्याचे कबूल केले.

वाघाच्या बछड्याच्या पाठीवर अस्वलाचे पिल्लू, पाडसाच्या पाठीवर वानराचे पिल्लू व रानडुकराच्या पिलाच्या पाठीवर घुबडाचे पिल्लू बसले.चंदनबालेने साडे-माडे-तीन म्हणताच शर्यत चालू झाली.   सुरुवातीला वाघाचा बछडा सर्वात पुढे होता. पण नंतर अस्वलाच्या पिलाला त्याला गुदगुल्या करायची लहर आली. त्यामुळे तो मागे पडला. मग हरणाचे पाडस पुढे गेले. पण पाठीवर बसलेला वानर अधूनमधून येणाऱ्या झाडांवर उड्या मारून जांभळे, करवंदे खात असे. त्यामुळे पाडसही  मागे पडले. तोपर्यंत अंधारून आल्यासारखे वाटले. मग रानडुकराचे पिलूच पुढे गेले. पाठीवरचे घुबडाचे पिलू ज्याला अंधारातपण जरा चांगलेच दिसायचे त्याने त्याला रस्त्यात पडू दिले नाही. अशा तऱ्हेने रानडुकराचे पिलू व घुबडाचे पिलू यांनी शर्यत जिंकली. तट्टूने त्यांना पाठीवर रट्टे मारून शाबासकी दिली.

तट्टू व चंदनबाला घरी आले तेव्हा चांगलाच अंधार पडला होता.  कुंभारीण बाईंना सूर्य ग्रहणाचीच काळजी पडली होती. त्या म्हणाल्या की आज सूर्यग्रहणामुळे अंधार लवकरच पडला असावा. तेव्हा कुंभार बाबा म्हणाले, “आज कुठले सूर्यग्रहण? सूर्यग्रहण तर कालच झाले. सूर्य मावळल्यामुळे रात्र झाली आहे मालकीणबाई!”

कुंभारीणबाईंनी मग चंदनबालेला तिचा नवीन पोशाख ट्रंकेत ठेवायला सांगितला. जत्रेत घालायला तो तिलाही हवाच होता. . तिने आईला विचारले, “आई, मी माझ्या तट्टूलाही बरोबर घेऊका?” आई म्हणाली, “आपल्याला नावेत बसून नदी पलीकडे जायचं आहे. नावेत पाळीव पशूंनाही घेतात.पण त्यासाठी वेगळे पैसे द्यावे लागतात. तू हवेतर त्याला बरोबर घेऊ शकतेस.

पहाटे चंदनबालेला जाग आली तेंव्हा सर्वजण देवपूजा करून तयार झाले होते. चंदनबाला पण नित्याची प्रातःकर्मे उरकून मस्तपैकी तयार झाली.

चंदनबालेचे सगळेजण खूप कौतुक करत होते..गप्पागोष्टी करत होते.चंदनबालेला खूप आनंद झाला. पण… मुळात तट्टूला बरोबर नेणे हेच कुंभार बाबांना पसंत नव्हते. नावाड्याने तट्टूला नावेत घेण्याचे नाकारले तर? नावेत बसल्यावर तट्टू उधळले तर? वगैरे शंका काढून ते व्यथित झाले होते.

पण सर्वांनी त्यांना सांगितले की असे काहीही होणार नाही. शिवाय त्यांनी हे पण सांगितले की “नदी किनाऱ्यापासून जत्रेचे ठिकाण थोडे लांब आहे. आपले थोडे समान आपल्या तट्टूच्या पाठीवर लादता येईल.

त्यानंतर खाण्यापिण्यासाठी शिधासामग्री, कपड्यांची ट्रंक, जत्रेत विकायला मातीच्या वस्तू आणि मूर्ती, खेळण्यांनी भरलेल्या दोन टोपल्या घेऊन कुंभारबाबांचे कुटुंब नदीकिनारी पोहचले…

नदीकिनारी आल्यानंतर सर्वजण नावेत बसले. चंदनबालेच्या शेजारी तिचे आवडते तट्टू बसले होते. आपल्या काळ्याभोर टपोऱ्या डोळ्यांनी कधी ते वरचे निळेभोर आकाश तरकधी खालचे निळेशार पाणी पाहत होते.कुंभारबाबा आणि कुंभारीणबाईंना बर्याच दिवसांनी निवांतपणा मिळाला होता. बाकीचे बहिणभाऊ मजेत हसत खिदळत होते. चंदनबाला आपल्या तट्टू बरोबर आकाशातले देवदूत, पाण्यातल्या पर्या, सातासमुद्रापारचे देश, तिथली माणसे यांच्याविषयी गप्पागोष्टी करत होती.

बोलता बोलता कुंभारबाबा कुंभारीणबाईंना म्हणाले, “चंदनबालेला या वर्षी काहीही करून पोहायला शिकवलं पाहिजे.” त्यावर कुंभारीण बाई म्हणाल्या, “खरं आहे तुमचं म्हणणं. पण त्यासाठी तिला आणखी थोडं सशक्त व्हायला हवं. शेळीच्या दुधाचा वास तिला आवडत नाही म्हणून ती दुध प्यायला नेहमीच कुरकुर करते. म्हणूनच तिचे पाय नेहमीच दुखत असतात. पोहण्यासाठी तिच्या हातापायात आणखी थोडं बळ यायला हवंना?” यावर क्षणभर आपले डोळे मिटून कुंभारबाबा थोडे शांत बसले; आणि म्हणाले, “यावर्षी मातीच्या वस्तूंना चांगला भाव मिळाला तर आपण एखादी गाय विकत घेऊ. गायीचे दुध तिला नक्कीच आवडेल.”

जत्रेसाठी लांबलांबच्या गावाकडची मंडळी आली होती. सर्वांनी आपापले तंबू ठोकले होते. चंदनबालेच्या कुटुंबियांनी एका विहिरीजवळची स्वच्छ जागा बघून तंबू ठोकला. बहिणींनी विहिरीचे पाणी रहाटाने शेंदले. जुन्या मातीची मडकी स्वच्छ धुऊन त्यात गाळून भरले. कुंभारीणबाईंनी तीन दगडांची चूल मांडली. स्वयंपाक रांधला. तोपर्यंत कुंभारबाबा व सर्व भाऊ दुकानासाठी चांगलीशी जागा बघून आले.

चंदनबाला आपल्या तट्टूसंगे जत्रेच्या ठिकाणी हिंडायला गेली. काही ठिकाणी मुली दुसऱ्या दिवशीच्या जलशासाठी  गाण्याचा आणि नृत्याचा सराव करत होत्या. चंदनबाला गाणाऱ्या मुलींजवळ जाऊन म्हणाली, “मी पण उद्या तुमच्या बरोबर गाणी गायले तर चालेलका?” तर त्या मुली जोरजोरात खिदळायला लागल्या. म्हणाल्या, “तू कसं काय गाणं म्हणणार? गाणं शिकावं लागतं. ताल सूर लयीची थोडी तरी जाण आहेका तुला?” तशी चंदनबाला हिरमुसली. पण तट्टूने तिची समजूत घातली. ते दोघे तंबूत परतले तेव्हा सर्वजण संध्याकाळच्या जेवणासाठी तिची वाट पाहत होते.  चंदनबालेने आल्याबरोबर हातपाय धुऊन तट्टूला भिजवलेले हरभरे खायला दिले. मग सर्वांबरोबर बसून तिने जेवण केले. नंतर आवरासावर करायला व भांडी घासायला तिने मदत केली.

त्यानंतर अंधार पडल्यावर आकाशातले तारे, नक्षत्रे बघत तिने तट्टूशी गप्पागोष्टी केल्या. मग सर्वांना शुभ रजनी म्हणून ती झोपायला गेली. सकाळी सर्वजण जत्रेत जायला तयार झाले. चंदनबालेने निळ्याभोर रंगाचा वरती रंगीबेरंगी ठिपके असलेला पायघोळ झगा घातला. सर्वजण त्यांच्या दुकानाकडे आले. दुकानात मोठया लाकडी मंचावर वेगवेगळ्या देवादिकांच्या हसऱ्या मूर्ती, मातीचे घडे, सुरया, फुलदाण्या, पणत्या, मातीचे हत्ती, घोडे, नाग-नागीण, भारद्वाज, गरुड, चंडोलपक्षी वगैरे सर्व काही आकर्षक पद्धतीने मांडले होते.

एका हसऱ्या गोड मुलाने सर्वप्रथम येऊन बऱ्याचश्या देवांच्या मूर्ती विकत घेतल्या. बोणगी तर चांगली झाली म्हणून कुंभारबाबा खूष झाले. त्यांनी मग कुंभारीण बाईंना पैसे दिले. मग त्या सर्व मुलींना घेऊन जत्रेत खूप हिंडल्या. गरगर फिरणाऱ्या पाळण्यात बसल्या. त्यांनी काचेच्या, धातूंच्या, लाखेच्या बांगड्या विकत घेतल्या. रंगीबेरंगी मण्यांच्या माळा विकत घेतल्या. चंदनबालेने तट्टूसाठी रंगीबेरंगी मण्यांची माळ व स्वत:साठी चित्रकलेची वही, ब्रश, पेन्सिली व रंगपेटी विकत घेतली. दुपारपर्यंत कुंभारबाबांचे सर्व सामान विकले गेले. शिल्लक राहिलेली देवाची एक मूर्ती चंदनी पेटीत ठेवली. पैसे बरेच जमल्याने चंदनबालेसाठी एक  पांढरीशुभ्र गाय विकत घेतली. मग सर्वांनी गाय व तट्टूसहित डोंगरावरच्या देवाचे दर्शन घेतले.

त्यानंतर परतीच्या प्रवासासाठी ते सर्वजण परत नावेत येऊन बसले. बोटीच्या एका टोकाला असलेल्या लाकडी फळकुटावर चंदनबाला व तिचे तट्टू बसले होते. चंदनबाला पाण्यात डोकावून आपला चेहरा न्याहाळत होती. तो तिला फुलासारखा टवटवीत वाटला. ती पुन्हा पुन्हा पाण्यात वाकून आपला चेहरा न्याहाळू लागली. पण… बघता बघता अचानक तोल जाऊन पाण्यात पडली. ती पाण्यात पडताक्षणी धप्पदिशी आवाज झाला. त्याचक्षणी तट्टूनेही पाण्यात उडी मारली. दोघेही वेगाने तळाकडे निघाले. तोपर्यंत बाकीच्या भावाबहिणींनी पाण्यात पटापट उड्या मारल्या. सर्वजण पाण्यात बरेच फिरले. काही तळापर्यंत जाऊन आले. पण चंदनबाला आणि तट्टू कोणालाच सापडले नाहीत.

तासाभरापूर्वीच्या हसऱ्या खेळत्या घरावर दु:खाचे सावट पसरले. पण यावेळी कुंभारबाबांनी थरथरत्या आवाजात सर्वांची समजूत घातली.  ते म्हणाले, “आपण आता सर्वजण घरी जाऊयात. चंदनबाला सकाळी सुखरूप परत येईल. कारण तिला आणायला तिचे तट्टू पण गेले आहेचकी. घरी आल्यावर कुंभारबाबांनी शिल्लक राहिलेली देवाची मूर्ती देवघरात ठेवली. तिला नमस्कार करून सर्वजण झोपी गेले.   इकडे चंदनबाला गटांगळ्या खात होती. नाकातोंडात पाणी जात होते. पण ती मोठ्या ताकदीने हात- पाय मारीत होती. अंधार गडद होत चालला होता. आकाशात काही तारे-तारका तेवढ्या लुकलुकत होत्या. वरचे काळेभोर आकाश व खालचे अथांग काळेभोर पाणी!

चंदनबाला  खूप घाबरली. पण तेवढ्यात तिला एक लाकडी ओंडका दिसला. तिने त्याला घट्ट पकडून ठेवले. मग तिने मागे वळून पहिले तर काय बरे दिसले तिला? तिचे लाडके तट्टू तिच्या पाठोपाठ तिच्याचकडे येत होते. ते सुद्धा पोहत होते. त्याने त्याच्या पुढच्या डाव्या पायाच्या बोटात झाडाची एक हिरवी फांदी घट्ट पकडून ठेवली होती. तट्टूने पायात पकडलेली हिरवी फांदी चंदनबालेने स्वत:च्या केसात खोवली. दोघांनीही मग ओंडक्याला घट्ट पकडले. ओंडका हळूहळू नदी किनाऱ्याला लागला.

दोघेही हिरवी फांदी घेऊन चालत चालत घरी आले.पूर्वेकडे झुंजूमुंजू झालं होतं. कुंभारीणबाई नुकत्याच उठून अंगण झाडायला खराटा घेऊन बाहेर आल्या होत्या. दूरवर कुठेतरी कोंबड्याने बांग दिली आणि त्याचवेळी कुंभारीणबाईंना तट्टू आणि चंदनबाला दिसले. आश्चर्याने त्यांनी एवढा मोठा आ वासला की तो मिटता मिटेना.   घरातले सर्वजण पळतच बाहेर आले. त्यांनी कुंभारीणबाईंना बोलते केले. बहिणींनी गायीची धार काढली. गायीचे ताजे ताजे धारोष्ण दूध त्यांनी चंदनबालेला व तट्टूला प्यायला दिले. मग दोघांच्याही अंगात थोडी ताकद आली. मग चंदनबालेने घरासमोरच्या अंगणात खुरपे घेऊन एक छोटेसे आळे तयार केले. त्यात तट्टूने आणलेली हिरवी फांदी लावली. त्यावर माती पसरून घागरीने पाणी ओतले.

लवकरच झाडाला पालवी फुटली. चंदनबाला व तट्टू गाईचे दूध पिऊन धष्टपुष्ट झाले. रोज पोहायला जाऊ लागले. चंदनबालेची  पाण्याची भीती पळून गेली. तेव्हापासून तट्टू व चंदनबाला शहाणे झाले. तट्टू आता वेळी-अवेळी हुंदडून हैदोस घालत नव्हते. चंदनबालेच्या चित्रकलेच्या वहीत तट्टू पुढच्या पायाच्या बोटांनी चित्रे काढू लागले. रंगवू लागले. ती चित्रे पाहायला दूरदूरचे लोक येऊ लागले.   एकदा चंदनबालेने त्याला विचारले,  “एवढी छान छान चित्रे काढायला तू केव्हा शिकलास?” तेव्हा तिच्या डोक्यात टपली मारून तट्टू म्हणाले, “अगं तू जेव्हा पाण्यात पडलीस तेव्हा तुला शोधायला मी तळापर्यंत बुडी मारली. तेथून वर येताना मला खूप छान छान हंसपक्षी, देवदूत, पऱ्या, मंदिरे, दिसली. ते सगळंच रमणीय आणि स्वर्गीय होतं. तेच तर मी माझ्या चित्रात काढत असतो.” यावर चंदनबाला आणि तट्टू जोरजोरात हसू लागले.

एव्हाना दसरा दिवाळीची चाहूल लागली. चंदनबालेच अंगणातलं झाड आता कळ्या फुलांनी लदबदलं होतं. तट्टूच्या चित्रांना आता सोन्याचा भाव आला होता. दसऱ्याच्या दिवशी सोने लुटून सर्व भाऊ व तट्टू सायंकाळी परत आले. चंदनबालेने सर्व भावांबरोबर आपल्या लाडक्या मित्राला तट्टूलाही ओवाळले. आश्चर्य तर पुढेच घडले.  तट्टूचे रुपांतर ओवाळताक्षणी एका उमद्या राजपुत्रात झाले. तो राजपुत्र जत्रेतल्या जलशातल्या राजपुत्रापेक्षाही खूप रुबाबदार होता.

चंदनबाला आनंदाने उडायला आणि रडायला पण लागली. सर्वांनी वाकून कुंभारबाबा व कुंभारीणबाईंना नमस्कार केला. दोघांनी त्यांना हृदयापासून आशीर्वाद दिले. आता दिवाळीच्या चाहुलीने अंगणातलं हिरवं झाड बहरून आलंय. त्याला मोगऱ्याची फुलं आली आहेत. त्याचा परिमल दशदिशात पसरू लागला आहे. चंदनबाला व तट्टू आता रोज त्या मोगऱ्याच्या फुलांनी देवघरातल्या देवांची पूजा करतात.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.