The story chandratanaya Ratarani describes importance of self-reliance. In this story it is told in an interesting manner that, how stars in the sky, change into flowers.
In summer season Ratarani plant bears flowers. It is the blooming period of Ratarani. Its origin is in South America. scientific name of Ratrani is cestrum nocturne. The tree looks simple but flowers are tiny and beautiful. Its fragrance is very nice. Flowers are white in colour. They bloom only at night.
कोजागिरीची रात्र होती. आकाशाच्या अंगणात चंद्रदेव आपल्या मुलींसमवेत म्हणजे चांदण्यांच्या समवेत गप्पा मारीत बसले होते. गप्पा अगदी रंगात आल्या होत्या. जुन्या आठवणी सांगता सांगता चंद्रदेवाला आपल्या मोठया बहिणीची वसुंधरेची आठवण झाली.त्याचा कंठ दाटून आला. मग दाटलेल्या स्वरात चंद्रदेव सांगू लागले,
“आम्हा सर्व भावांची वसुंधरा नावाची सर्वात मोठी बहिण होती. तिला पृथ्वी असेही म्हणायचे. मी सगळ्यात धाकटा भाऊ म्हणून ती माझे खूप खूप लाड करायची. झोपाळ्यावर बसवून झोके दयायची. छान छान गोष्टी सांगायची. गाणी म्हणायची. आवाज तर किती गोड होता तिचा; आणि तिचे हात अगदी सायीसारखे मऊमऊ होते. त्या हातांनी ती मला थोपटायची. त्या हातांचा तो स्पर्श किती प्रेमळ होता म्हणून सांगू?” बोलता बोलता चंद्रदेव थांबले. तेव्हा चांदण्या म्हणाल्या, “पिताश्री कुठे आहे ती वसुंधरा? आम्हाला तिला भेटायचंय.” तेव्हा चंद्रदेव म्हणाले, “एकदा आमचे पिताश्री सूर्यदेव आम्हाला म्हणाले, “मुलांनो, तुम्हाला किती सुखात ठेवलंय मी! तुम्हाला जे हवं ते सर्व मिळतं, ते सुद्धा कष्ट न करता. तुम्ही सुखी आहात कारण तुम्हाला माझ्यासारखा पिता मिळाला. खरय ना?” तेव्हा आम्ही सर्व भावांनी मना डोलावल्या; पण वसुंधरा मात्र ताडकन म्हणाली, “मुळीच नाही! हे असं बसून खाणं मजा करणं मला मुळीच आवडत नाही.कष्ट करून जगतो तोच खरा सुखी असतो.”
त्यासरशी मग पिताश्री खूप रागावले.त्यांचा अहंकार दुखावला गेला.ते म्हणाले खूपच गर्विष्ठ आणि उद्धट आहेस तू! उन्हातान्हात, पाऊसवाऱ्यात काम करावं लागलं म्हणजे मग समजेल तुला.बडबड करणं खूप सोप्पं असतं.” त्यावर वसुंधरा नम्रपणे म्हणाली, “पिताश्री मी फक्त बडबड नाही करत. या दोन हातांनी नंदनवन फुलवण्याची तयारी आहे माझी!” तेव्हा मात्र सूर्यदेव आणखीनच रागावले.
त्यांचा अहंकार दुखावला गेला. ते म्हणाले, “खूपच गर्विष्ठ अणि उद्धट आहेस तू. उन्हातान्हात पाऊसवाऱ्यात काम करावं लागलना की मग समजेल तुला. फक्त बडबड करण खूप सोप्पं असतं. त्यावर वसुंधरा नम्रपणे म्हणाली, “पिताश्री या दोन हातांनी नंदनवन फुलवण्याची तयारी आहे माझी.” तेव्हा मात्र सूर्यदेव आणखीनच रागावले. रागाने अगदी लालेलाल झाले. त्यांनी वसुंधरेला अगदी लांब लांब भिरकावून दिले. ते म्हणाले, “निघून जा इथून. खूप गर्व आहेना तुला आपल्या भाग्याबद्दल? मग परत इथं कधीच येऊ नकोस.”
त्यानंतर वसुंधरा गेली ती गेलीच. परत आलीच नाही. पण आपलं म्हणण मात्र तिने खरं केलं. खूप कष्ट करून घाम गाळून तिने आपलं वेगळं जग निर्माण केलं. झाडाचं, वेलीचं, प्राण्याचं, पाखराचं, फळाफुलांच! तिने हे जग निर्माण केलं कारण तिच्या हृदयात प्रेम होतं. स्पर्शात जादू होती, चैतन्य होतं.” बोलता बोलता चंद्रदेवाने भला मोठा सुस्कारा सोडला. मग चांदण्याही गंभीर झाल्या. म्हणाल्या, “पिताश्री, तिला तुम्हाला भेटावसं वाटत नाही का?”
वाटतं ना, खूप वाटतं. पण ती आता इकडे कधीच येणार नाही. भाऊबीजेला सुद्धा लांबूनच ओवाळते ती मला.” चंद्रदेवाचा म्लान चेहरा पाहून काही धिटुकल्या चांदण्या पुढे आल्या व म्हणाल्या, “पिताश्री, वसुंधरा म्हणजे आमची आत्या! मग आम्ही काहीजणी जाऊ का आमच्या आत्याकडे? तिथे आम्ही काही दिवस राहतो. तिथल्या गमती-जमती पाहतो आणि मग परत येतो. मग तुमची खुशाली आत्याला कळेल आणि आत्याची खुशाली तुम्हाला कळेल.”
सगळ्यांनाच ही कल्पना मनापासून आवडली. काही चांदण्या मग तयारीला लागल्या. म्हणाल्या, “पिताश्री लवकरात लवकर आमच्या प्रस्थानाची तयारी करा. आम्हाला पाहायचेत तिथले खळाळणारे निर्झर, साळीची शेतं, नाचणारे मोर, गाणाऱ्या मैना आणि लाल चोचीचे हिरवे पोपट!”
चंद्रदेवाने मग सेवकांना आज्ञा केली. सेवकांनी रथ तयार केलं. रथाला सात पांढरे घोडे जोडले. बऱ्याचश्या चांदण्या त्यात दाटीवाटीने बसल्या. आपल्या वडिलांचा आणि बहिणींचा त्यांनी हात हलवून निरोप घेतला.
सारथ्याने इशारा करताच घोडे सुसाट धावू लागले. किती लांबचा प्रवास होता तो! वाटेत कितीतरी ढग भेटले. काळे आणि पांढरे सुद्धा.वाट संपता संपत नव्हती. थोडया वेळाने चांदण्या कंटाळल्या. जांभया देऊ लागल्या. रात्र हळूहळू संपत होती आणि रथ हळूहळू पृथ्वीच्या जवळ येऊ लागला. पूर्वेकडच आकाश तांबूस केशरी रंगांनी न्हाऊन निघालं होतं. पक्ष्यांचा मधुर किलबिलाट कानांना सुखावत होता. सगळा आसमंत सुगंधाने भरून गेला होता.
चांदण्यांनी वर पाहिलं तेव्हा पूर्वेकडच्या आकाशातून एक लालसर सोनेरी बिंब वर येत होते. ते सूर्यदेव होते. ते आपल्या नातींकडे कौतुकाने पहात होते. आपल्या कोवळ्या किरणांनी त्यांना गोंजारत होते. तेवढयात रथाचा सारथी ओरडला, “आलं बरका तुमच्या आत्याच घर! उतरा आता पटपट! पटापट उड्या घ्या खाली! मला आता लवकर निघायला हवं.” त्यासरशी सगळ्या चांदण्यांनी पटापट खालच्या हिरव्यागार वेलींवर उड्या घेतल्या. वेलींनी मग पानांची झोळी करून त्यांना अलगद झेललं. हिरव्यागार पानांच्या अलवार स्पर्शानं चांदण्या अगदी मोहरून गेल्या. असा मखमली स्पर्श त्या प्रथमच अनुभवत होत्या. वाऱ्याच्या मंद झुळकी पानांच्या झोळ्यांना झोके देवू लागल्या. रात्रभरच्या प्रवासाने दमलेल्या शिणलेल्या साऱ्या चांदण्या मग पानांच्या झोळीत शांतपणे झोपी गेल्या.
वसुंधरा मात्र नेहमीप्रमाणे उठून कामाला लागली. रानातल्या झाडांची, पोळ्यातल्या मधमाशांची, वारुळातल्या मुंग्यांची काळजी देखभाल तिलाच करायची होती. दिवसभराच्या कामातून तिला क्षणाचीही उसंत मिळत नसे. जेव्हा संध्याकाळ झाली आणि अंधार पडू लागला तेव्हा मात्र ती थोडीशी विसावली. तृप्त नजरेनं स्वत: फुलवलेलं गोकुळ पहात राहिली. तिने मग समोरच्या वेलींकडे पाहिलं…तर काय? हिरव्या हिरव्या वेलींवर खूप खूप चांदण्या लुकलुकत होत्या.
वसुंधरा मग त्यांच्या जवळ गेली…आणि चांदण्या खूप मोठयाने हसू लागल्या. गोड आवाजात म्हणाल्या, “आत्या आम्हाला ओळखलं नाहीसका?आम्ही चंद्र्देवांच्या मुली आहोत. तुला भेटायला आलो आहोत.” वसुंधरा मग गहिवरली. आवेगाने पुढे झाली. आपल्या भाच्यांना-चांदण्यांना ती जवळ घेणार तोच …ती परत मागे सरकली. मग चांदण्याच म्हणाल्या,”आत्या घेना आम्हाला जवळ. थोपट ना आम्हाला तुझ्या हातांनी. त्यासाठी तर आम्ही एवढया लांबून आलो.”
वसुंधरेने एकवार आपल्या काम करून रुक्ष झालेल्या हातांकडे पाहिले. तिला आपले बालपणीचे सुखाचे दिवस आठवले. मग ती भरल्या आवाजात म्हणाली, “मुलींनो, मला तुम्हाला नाही जवळ घेता येणार. कारण माझ्या स्पर्शान तुमचं तेज तुमचं सौंदर्य नाहीसं होईल आणि तुम्हाला परत आकाशात नाही जाता येणार.
” का नाही जाता येणार?” चांदण्यांनी विचारले. त्यावर वसुंधरा म्हणाली, “कारण इथला तसा नियमच आहे. आकाशातलं तेज इथं काय कामाचं? तुमच्यातल्या काही हट्टी तारका जेव्हा कुणालाही न सांगता इकडे येतात तेव्हा जमिनीवर पडता क्षणी त्यांचं रुपांतर दगडामध्ये होतं. आम्ही त्यांना उल्का म्हणतो.”
“म्हणजे आमचंही रुपांतर दगडात होणार?” चांदण्यांनी घाबरून विचारले. त्यावर वसुंधरा म्हणाली, “नाही! तुम्हाला या वेलींनी झेललं म्हणून तुम्ही वाचलात. इथल्या प्रत्येक जीवाचा स्वत:चा असा वेगळा गंध असतो. जर मी तुम्हाला स्पर्श केला तर तुमचं रुपांतर मोहक सुगंधी फुलांमध्ये होईल. रात्रीच्या वेळी तुमच्यातला सुगंध साऱ्यांना आनंद देईल. वेडावून टाकेल. तुमचं जगण इतरांच्या जीवनात सुगंध आणि आनंद निर्माण करेल.” वसुंधरेच्या या शब्दांनी चांदण्या मोहोरल्या. भारावून गेल्या. त्यांना वाटलं, आकाशात फक्त चमचमत राहून काय फायदा? त्या म्हणाल्या,
“आत्या, घे आम्हाला कुशीत. तुझ्या प्रेमळ स्पर्शान होऊ देत आमची फुलं, तुझ्यातला त्याग, क्षमा, मार्दव आमच्यातही थोडं उतरू दे. आमचं जीवन दुसऱ्यांच्या आनंदासाठी उपयोगी पडू दे! आमच्यातला आत्मगंध पसरू दे. त्यांच्या या लडिवाळ बोलांनी वसुंधरेच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिने त्यांना जवळ घेतलं, कुरवाळलं, गोंजारलं, थोपटलं. त्या वात्सल्याच्या स्पर्शान त्या चमचमणाऱ्या चांदण्यांची फुलं झाली. रातराणीची फुलं!