श्रावण या ललित कथेचा पुराणकथेच्या आधारे तुलनात्मक अभ्यास …..
श्री सिद्धचक्र विधान मंडळाच्या संदर्भात आदर्श स्त्री पतिसेवा परायण मैनासुंदरीची एक कथा आपल्या जैन पुराणकथांमध्ये आहे. ही कथा काही जैन तत्वे वाचकांच्या मनावर बिंबवण्यासाठी एक सुंदर कथा आहे असे मानले जाते आणि तशी ती आहेच. ज्या काळात ती रचली गेली त्या काळात त्या काळच्या समाजाला ती काहीतरी चांगले देणारी निश्चितच असणार. त्या कथेवर मी काहीतरी लिहावे एवढी माझी योग्यता आहे असे कोणास वाटत असेल किंवा नसेल पण या कथेतून मला जे काही चांगले वाटले ते मांडण्याचा अधिकार मला आजच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळात आहेच.
उज्जैनीचे महाराज पहुपाल यांच्या दोन कन्या सुरसुंदरी आणि मैनासुंदरी यांनी अनेक शास्त्रे विविध कला यांचे अध्ययन पूर्ण केले होते. त्या दोघीही आपल्या विद्येतील आणि कलेतील प्रगती राजदरबारी दाखवणार होत्या. त्यासाठी त्यांची राजमार्गावरून राजदरबारात जाण्यासाठी मिरवणूक निघाली होती.
राजदरबारात राजपुरोहितांकडून दोन्ही कन्यांची परीक्षा घेण्यात आली. त्यात कमी अधिक प्रमाणात दोघीही वेगवेगळ्या विषयात पारंगत दिसल्या. त्यावेळी हर्षभरित झालेल्या महाराजांनी आपले मनोगत व्यक्त केले.
“मुलींनो! तुम्हाला राजकन्यांना योग्य असे सर्व शिक्षण मी दिले आणि तुम्हीही सर्व कलात व विद्येमध्ये नैपुण्य दाखवले याबद्दल माझे हृदय अभिमानाने आणि आनंदाने भरून आले आहे. तुम्ही आता मोठ्या झाल्या आहात आणि आता तुमचे विवाह एकदा उरकून टाकले की मी निश्चिन्त झालो.”
राजाचे हे बोलणे ऐकून निर्भयतेने सर्व दरबारावर नजर फेकीत आपल्या आसनावर बसलेली सुरसुंदरी हर्षित झाली. पण खाली मान घालून विनयाने आपल्या वडिलांचे बोलणे ऐकणारी मैनासुंदरी मात्र गप्प होती.
महाराज सुरसुंदरीकडे पाहून म्हणाले,
“सुरसुंदरी बोल…तुला आपला विवाह कुणाशी व्हावा असं वाटतं ?” यावर किंचित लाजत पण धिटाईने सुरसुंदरीने आपल्या आवडत्या राजकुमाराचे कौशांबीचे हारीवाहन यांचे नाव सांगितले.
महाराजांनी आनंदाच्या भरात या नाजुक गोष्टी भरदरबारात काढल्या व सुरसुंदरीने त्याला बेदिक्कतपणे साथ दिली हे पाहून महाराणींना खेद वाटला.
महाराजांनी जेव्हा तोच प्रश्न मैनासुंदरीला विचारला तेव्हा ती शांतपणे म्हणाली,
“पिताजी! भर दरबारात अश्या प्रश्नांना उत्तर देणं माझ्यासारख्या कुमारिकेला शोभत नाही… आणि वडील माणसांनी निवडलेल्या वराशी लग्न लावून घेणे हा तर आम्हा आर्य तरुणींचा आदर्श आहे! शिवाय प्रत्येकाचे जन्माचे जोडीदार पूर्व-कर्मानुसार ठरवलेले असतात…वडील माणसे केवळ निमित्त मात्र.. असे असताना…”
मैनासुंदरीचे सरळ साधे सविनय उत्तर मात्र राजाला दुरुत्तर वाटले. त्याचा अभिमान दुखावला गेला. भर दरबारात त्यांना आपल्या विरुद्ध वचन आपल्या कन्येकडूनच ऐकावे लागले. आणि त्यांचा क्रोध अनावर झाला. ते म्हणाले,
“मूर्ख पोरी ! माझ्या अधिकाराचा वडिलकीचा अवमान करतेस?आम्हाला निमित्तमात्र समजतेस?उज्जैनीच्या महाराजांच्या शक्तीला आव्हान देतेस? ठीक आहे ! पाहूया तुझ्या कर्माची परीक्षा!”
यानंतर प्रतिष्ठित श्रेष्ठींनी महाराजांना विनंती केलीकी, “मैनासुंदरी किती झाले तरी बालकच आहे तिला क्षमा करावी.”
पण त्यानंतर कथेत जे काही घडले ते थोडक्यात असे, … राजाने मैनासुंदरीचा विवाह कुष्ठरोगी राजा श्रीपालाशी लावून दिला. त्यास मैनासुंदरीने आनंदाने स्वीकारले. त्यानंतर मुनींच्या उपदेशानुसार तिने भाव-भक्तीपूर्वक सिद्धचक्र विधान केले. त्याचप्रमाणे पतीला धीर देऊन त्याचे आत्मबल वाढवले. पतीची सेवा व त्याच्या व्याधींवर उपचार करून त्याला बरे केले. त्यानंतर त्याचा रोग पूर्ण बरा झाला. त्याने चम्पापुरीचे राज्य स्वीकारले. राजा पहुपालालाही नंतर तिची जिनधर्माबद्दलची अढळ श्रद्धा जाणवली व त्याने तिच्या धैर्याचे कौतुक करून स्वतः तिला दिलेल्या त्रासाबद्दल पश्चाताप व्यक्त केला.
लग्नानंतर सुरसुंदरी व तिच्या पतीवर रस्त्यातच भिल्लांच्या टोळीने प्रचंड हल्ला केला. त्यांची दाणादाण उडाली. त्यातून कसाबसा जीव वाचवून सुरसुंदरी पळाली. तिच्यापुढेही अनेक संकटे आली. ती हैराण झाली. त्यानंतर स्वतःची गुजराण करण्यासाठी मैनासुंदरीच्या दरबारात ती राजगायिका म्हणून गेली. पण त्यानंतर साऱ्या गोष्टींमुळे तिचे मन विरक्त झाले. मग काही दिवसानंतर तिने अर्जिकेची दीक्षा घेतली.
या कथेतून मला काही चांगल्या गोष्टी आढळल्या आणि त्या आजच्या काळातही अनुकरणीय अशाच आहेत.
राजा पहुपाल हा आपल्या मुलींना मुली म्हणून कुठलीही गौण वागणूक देणारा नव्हता. तो प्रगत व आधुनिक विचारांचा होता. त्याने आपल्या मुलींना सर्व कलांचे आणि विद्यांचे शिक्षण देऊन त्यात पारंगत केले होते. मुलींचे विवाह त्यांना आवडणाऱ्या योग्य अश्या मुलांशी व्हावेत व दरबारातील प्रतिष्ठित व्यक्तींनाही याची माहिती असावी असे त्याला वाटत होते. यावरून तो मुलींशी व दरबारातील व्यक्तींशी मनमोकळे विचार व्यक्त करीत असे जाणवते.
महाराणी सुद्धा धार्मिक विनयशील व स्त्रीस्वभावानुसार थोड्या मर्यादाशील होत्या.
सुरसुंदरी व मैनासुंदरी या दोघीही जिनधर्मावर अढळ श्रद्धा असणाऱ्या होत्या. त्या कलानिपुण, सुविद्य व शालीन होत्या.
सुरसुंदरी ही पित्याप्रमाणे मनमोकळ्या स्वभावाची होती. दरबारी जनांना ती परके मानत नव्हती. ती थोडी धीटही होती व मोकळेपणाने मनाला जे भावले ते व्यक्त करणारी होती.
मैनासुंदरी सुद्धा बहिणीप्रमाणेच श्रद्धाळू, कलानिपुण आहे पण ती तिच्या आईच्या स्वभावाची आहे. म्हणजे थोडी जास्तच शालीन आहे. सर्वांसमक्ष या प्रश्नाचे उत्तर देणे त्यामुळे तिला योग्य वाटत नाही किंवा लग्नासाठी त्यावेळेपर्यंत त्या दृष्टीने तिने कोणाचा विचार केलाही नसेल किंवा तिच्यासाठी उत्तम वर तिचे आईवडिलच निवडतील असेही तिला वाटले असेल, म्ह्णून ती तसे उत्तर देते.
राजा अभिमानी आहे व भर दरबारात मिळालेल्या या उत्तराने दुखावला गेला आहे. तो सुद्धा जिनधर्मावर अढळ श्रद्धा असणाराच आहे पण क्रोधामुळे व अभिमानामुळे त्याने पुढील कृती केलेली असावी.
कदाचित मैनासुंदरीने दरबारात असे काहीही भाष्य न करता नंतर आपले विचार पित्याला सांगितले असते तरी राजा एवढा दुखावला नसता व क्रोधितही झाला नसता. कारण तो मोकळ्या मनाचा आहे.
पण श्रेष्ठींच्या म्हणण्यानुसार मैनासुंदरी अजून बालकच आहे, त्यामुळे अजाणपणे भर दरबारात पित्याला तिने आपले विचार ऐकवले असतील.
पण मैनासुंदरीची ही कृती जरी बालकाप्रमाणे भासत असली तरी ती दृढनिश्चयी व खंबीर मनोवृत्तीची आहे. तिच्या या स्वभावाची जाण असल्यामुळेच तिच्या जिनधर्मावरील श्रद्धेची व खंबीरपणाची परीक्षा घ्यावी असे कदाचित राजाला वाटले असेल व म्हणून त्याने तशी परीक्षाही घेतली असेल … आणि या परीक्षेत ती पूर्णपणे यशस्वी झाली आहे.
सुरसुंदरीसुद्धा आपल्यावर कोसळलेल्या आपत्तीने हैराण झाली असली तरी प्रयत्नपूर्वक तिने स्वतःचा जीव वाचवला आहे. नंतर तिने स्वतःतल्या कलागुणांचा उपयोग करून स्वतःची गुजराण केली आहे. मैनासुंदरीच्या दरबारात ती कुठलीही भीक मागण्यासाठी गेलेली नाही. उलट राजदरबारात गायिकेची नोकरी करण्यासाठी ती गेली आहे.आपदकाळात जगण्यासाठी आपल्यातल्या कलेचा उपयोग केला आणि त्यानंतर काही दिवसांनी विरक्ती आल्यानंतर अर्जिकेची दीक्षा घेतली आहे.
या कथेचे एवढे दीर्घ विवेचन मी एवढ्याचसाठी केलेकी अश्या धार्मिक, दृढनिश्चयी, श्रद्धाळू स्त्रियांचा वारसा लाभलेल्या आम्ही जैन स्त्रिया आहोत. आम्ही आपल्या मुलींना उच्चशिक्षित करतो, त्यांना कलेचे शिक्षण देतो. संपन्न कुटुंबातील सुयोग्य व्यक्तींशी त्यांचा विवाह लावून देतो. पण तरीही या मुली कधी कधी आत्महत्येला का प्रवृत्त होतात?यामागची कारणे काय असू शकतात… याचा शोध घ्यावा असे मला वाटले ते ज्येष्ठ लेखिका सुरेखा शहा यांची श्रावण ही कथा वाचून !
‘ श्रावण ‘ ही सुरेखा शहा यांची कथा सध्याच्या काळातील एका संपन्न जैन गुजराथी कुटुंबाच्या घरात घडते. आणि मग ती वाचकाला विचारप्रवृत्त करते. ही कथा समकालीन मराठी ललित कथा असल्याने सध्याच्या वाङ्मयीन कसोट्यांवर तिचे मूल्यमापन करावे लागते.
या कथेचे निवेदन करणारी स्त्री ही ब्राम्हण म्हणजे हिंदू धर्मीय कुटुंबातली आहे. ती या जैन कुटुंबाची शेजारीण आहे. ती फक्त नावाची शेजारीण नसून सखी शेजारीण आहे. धर्म वेगळा असला तरी दोन्ही कुटुंबात परस्पर जिव्हाळा आहे. ही दोन्ही कुटुंबे आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या समान पातळीवरची आहेत.
पण तरीही त्या घरातल्या व्यक्तींचा विशेषतः स्त्रियांचा जगण्याविषयीचा दृष्टिकोन यात एक मूलभूत फरक आहे. हा फरक नेमका काय आहे? तो कशामुळे निर्माण होतो?हे पाहण्यासाठी या कथेच्या अंतरंगात तर शिरावेच लागेल पण इतरही काही गोष्टींकडे लक्ष वेधावे लागेल. ‘ स्त्रीवादी जाणीव ‘ या कथेत कशाप्रकारे व्यक्त झाली आहे हे पाहावे लागेल.
स्त्रीवाद हा भारतात १९७५ नंतर मूळ धरू लागला. त्यापूर्वी म्हणजे १९६० च्या सुमारास तो युरोपात व पाश्च्यात्य देशात मूळ धरू लागला होता.
१९७५ नंतर भारतात, महाराष्ट्रात व मराठी भाषेतूनही स्त्रीवादी जाणिवा प्रखरपणे व्यक्त करणारे साहित्य लिहिले जाऊ लागले. तत्पूर्वीही ते लिहिले जायचे पण त्यात विद्रोह दिसून येत नव्हता.
स्त्रीवादी साहित्य म्हणजे काय हे पाहण्यासाठी प्रथम स्त्रीवादी जाणीव म्हणजे काय हे पाहणे हे लक्षात येणे जरुरी आहे.
स्त्रीच्या व्यक्तिमत्वाला परिपूर्णता येण्यासाठी तिला पुरुष जोडीदाराची साथ हवीच असते. जर ती तशी मिळाली तर त्यात तिला आनंदच असतो. पण जर ती तशी मिळाली नाही तर त्याच्या आधाराशिवाय सुद्धा तिच्या व्यक्तिमत्वाला परिपूर्णता येऊ शकते.
प्रेमाची गरज फक्त स्त्रीलाच नाहीतर पुरुषालाही असते. पण कधी ते विनासायास आपोआपच मिळाल्याने ते व्यक्त करण्याची त्याला गरज वाटत नाही.
प्रेमाप्रमाणेच माणसासारखे जगण्याची भूकसुद्धा स्त्रीला असते. ती पुरुषाच्या बरोबरीने शिक्षण घेऊ शकते, बरोबरीने पैसे मिळवू शकते. याशिवाय गृहिणीला आवश्यक असणाऱ्या कौशल्याबरोबरच जर तिच्याकडे काही वेगळे कलागुण असतील तर ते जोपासण्याचा त्यातून आनंद मिळवण्याचा तिला पूर्ण अधिकार असतो. कारण तीसुद्धा एक माणूसच आहे.
पुरुषाच्या कलागुणांना जे पाठबळ कुटुंबाकडून मिळते ते तिलाही मिळायला हवे, पण त्याबरोबरच स्त्रियांनी हेही लक्षात ठेवायला हवेकी असे पाठबळ न मिळाल्यास पुरुष कसे झगडतात तसे झगडण्याची तयारी स्त्रियांनी ठेवायला हवी.
एखाद्या स्त्रीला किंवा सर्वसामान्य स्त्रियांना स्त्री म्हणून जगताना झगडताना जे वेगवेगळे अनुभव येतात व त्या अनुभवांना ती कशी सामोरी जाते, कधी त्यात तिची हार होते तर कधी विजय होतो… त्यावेळची तिची मानसिकता व्यक्त करणारे, तिचे अनुभव व्यक्त करणारे जे साहित्य असते त्याला स्त्रीवादी जाणिवा व्यक्त करणारे साहित्य असे म्हणतात. स्त्रीवादी जाणिवा व्यक्त करणारे साहित्य हे नेहमी बंडखोरच असायला हवे असे नाही.
या कथेतली निवेदिका हिन्दु ब्राह्मण कुटुंबातली असून तिचे निवेदन त्या पद्धतीने तटस्थ व प्रांजळ भूमिका दाखवणारे आहे.
एका सुस्वरूप कलासक्त मनाच्या मुलीला लग्नानंतर तिची कला जोपासू न दिल्याने आत्महत्येला सामोरे जाण्याचा प्रसंग येतो. हे अगदी ओघवत्या शैलीत कथेतून सांगितले आहे.
अगदी जुना काळ सोडल्यास आपल्याला आज पहायला मिळतेकी इतर समाजाच्या मानाने ब्राम्हण समाजातील स्त्रीला कुटुंबात बऱ्यापैकी समानता मिळते. मुलांप्रमाणेच मुलींनाही कलागुण जोपासून त्याद्वारे व्यक्तिमत्व विकास साधण्यास मदत केली जाते. तिला शिक्षण देऊन तिला आर्थिकदृष्टया स्वावलंबी बनवण्यासाठी मुलांप्रमाणेच तिलाही नोकरीधंदा करणे गरजेचे आहे असे मानले जाते. त्यानंतरच तिच्या लग्नाचा विचार केला जातो. लग्नापेक्षा तिचा व्यक्तिमत्व विकास महत्वाचा मानल्याने व आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र झाल्याने लग्नाबाबतचे व इतरही बाबतीतले निर्णय ती ठामपणे घेऊ शकते. तिच्यात आत्मविश्वास निर्माण होतो. म्हणूनच साहित्य संगीत इ. कलाक्षेत्रात या समाजातील स्त्रियांचा वावर जास्त व सहज ही असतो. अर्थात यातही अपवाद असतातच.
त्यामानाने याबाबतीत जैन समाज अजूनही मागासलेलाच आहे असे खेदाने म्हणावे लागते. मागासलेला या अर्थाने म्हणयचेकी, जैन समाजात मुलगा असुदे किंवा मुलगी त्यांचे लग्न म्हणजे आईवडिलांना फार मोठी जबाबदारी वाटते. खरेतर यात गैर काहीच नाही. पण मग लग्न ठरविताना मुलामुलींचे शिक्षण, वय, आर्थिक परिस्थिती, कुटुंबाची समाजातली पत, रंग, रूप,गुण यांचाच फक्त विचार का केला जातो…त्याऐवजी मुलाचा व मुलीचा स्वभाव एकमेकांशी मिळताजुळता आहेकी नाही, किंवा हे स्वभाव एकमेकांना पूरक तरी आहेतका? याचा विचार का केला जात नाही.
कुटुंबातल्या इतर माणसांशी जुळवून घेणे मुलीला मानवणारे आहेकी नाही…याचा विचार का केला जात नाही? या गोष्टी अजूनही खूप गौण समजल्या जातात. या बाबतीत अगदी उच्चशिक्षित आईवडिलांना उच्चशिक्षित मुलामुलींशीही संवाद का साधता येत नाही. समाजाचे एवढे दडपण त्यांना का वाटते? याचा विचार विचारवंतांनी करायला हवा.
सुरसुंदरी व मैनासुंदरी यांची जडणघडण उत्तम जैन तत्वज्ञानातून झालेली असल्याने स्वतःच्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगांना व आलेल्या संकटांना त्यांनी आपापल्या स्वभावानुसार तोंड दिले. त्याबद्दल आईवडिलांना किंवा सभोवतालच्या परिस्थितीला दोष दिला नाही. मग श्रावण या कथेतली अमृता परिस्थितीशी झगडताना कोठे कमी पडली? ती तशी का कमी पडली ? याचा विचार करणे भाग पडते.
कथेच्या अनुषंगाने हा विचार करताना व कथेचे रसास्वादात्मक विवेचन करताना समीक्षकाला किंवा आस्वादकाला आपली खाजगी मते किंवा आपल्या आठवणी सांगायच्या नसतात. जी मते सर्वसमावेशक असतील व विश्वात्मक भान व्यक्त करणारी असतील तीच मांडायची असतात. कथेतल्या जीवनदर्शनावर मूल्यात्मक दृष्टिकोनातून भाष्य करायचे असते.
श्रावण या कथेत निवेदक “मी” आहे. येथे “मी” कथानायिका नसून कथानायिकेची मानलेली मावशी, शेजारीण आहे. त्यामुळे या कथेत निवेदिकेने केलेल्या वर्णनातून किंवा पात्ररेखाटनातून, पात्रांच्या संवादामधून कथानायिकेला समजून घ्यावे लागते.
कथा निवेदिका “मी” हे सुद्धा या कथेतले महत्वाचे पात्र आहे. शिवाय ती कथानायिकेपेक्षा वेगळ्या धर्मीय समाजाची म्हणजेच भिन्नधर्मीय व सहृदय दाखवल्याने तिच्या भाष्यात विश्वात्मक भान जाणवते. अर्थात हे कौशल्य एका अर्थी लेखिकेचेच आहे.
कथेची निवेदिका एक मध्यमवयीन प्रौढा आहे. कथेचे शीर्षक श्रावण आहे. श्रावणातल्या रिमझिमत्या रेशीमसरी, ढगाळलेले आकाश, श्रावणातला ऊन-पावसाचा खेळ या पार्श्वभूमीवर एका प्रौढ स्त्रीच्या मनात दाटून आलेल्या भावभावना आणि मग त्यातूनच झरणाऱ्या शब्दांच्या श्रावणसरींनी ही कथा कागदावर उतरली आहे. विशेष म्हणजे श्रावण महिना असूनही या वातावरणात त्यातल्या इंद्रधनुष्याचा उल्लेख नाही. कथेचा शेवट पाहता त्याची उपस्थिती जाणवल्याशिवाय नाही.
कधीकाळी पावसात भिजून, वादळवारं अंगावर झेलून, आषाढ- श्रावणातील चिंब भिजलेपण उत्साहानं पेलणारं शरीर आता सर्दीपडश्याच्या भयानं पावसात भिजायला तयार होत नाही… असं निवेदिका म्हणत असली तरी मनाने ती अजूनही तरुणच आहे. तारुण्यातले नव्हाळीचे धुंदफुंद दिवस ती अजून विसरलेली नाही. म्हणूनच शेजारणीच्या तरुण मुलीच्या मनातल्या व्यथा तिला जाणवतात, व्यथित करतात. तिची शेजारीण प्रभा व तिची मुलगी अमृता यांच्याशी तिचा जिव्हाळा आहे. नुकतीच पावले टाकायला लागल्यापासून ती अमृताला ओळखते. तिला स्वतःला दोन्ही मुलगेच असल्याने या मोहक, लाघवी मुलीवर तिचा जीव आहे.
या मुलीच्या स्वभावात जितका गोडवा आहे तितकच माधुर्य तिच्या कंठात आहे. म्हणूनच तिच्या आईवडिलांनी अगदी लहानपणापासूनच तिला शास्त्रीय संगीताचे शिक्षण दिले आहे. बालवयापासूनच आकाशवाणी व दूरदर्शनवर तिचे गाण्याचे कार्यक्रम होत आहेत. एका नामवंत गायिकेचे पाय जणू पाळण्यातच दिसू लागले आहेत.
अशा तऱ्हेने एका संपन्न गुजराथी जैन कुटुंबातली, सगळ्यांच्या कौतुकाने बहरलेली, रूप गुण कला लक्ष्मी सरस्वती यांचा वरदहस्त लाभलेली ही गुणी मुलगी कल्पवेलीसारखी बहरत पाहता पाहता तरुण झाली.
रोज सकाळी तिचा चालणारा गाण्याचा रियाज, तिने मिळवलेल्या पारितोषिकांनी भरून गेलेले शोकेस, कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये तिने सादर केलेले, “विलोपलें मधुमीलनात या” हे नाट्यगीत, या सगळ्या गोष्टींमुळे निवेदिकेला तिचे भविष्य अगदी चित्राप्रमाणे डोळ्यासमोर दिसते आहे.
ती नामवंत गायिका झाली आहे, तिच्या मैफली होताहेत, गाण्याच्या कॅसेटस निघताहेत असे स्वप्न ही निवेदिका पहात आहे. पण असेच स्वप्न अमृताची आई पहात आहेका? अमृता स्वतःतरी पाहते आहेका? कदाचित अमृताचे स्वप्न याहीपेक्षा वेगळे, मोठे असू शकते.
या कथेत मात्र अमृताला सर्वतोपरी योग्य असा नवरा मिळावा व योग्यवेळी तिचे लग्न व्हावे हे स्वप्न अमृताच्या आईला जास्त महत्वाचे वाटत असावे.
अमृताची रेवतीबाई खाडिलकर यांच्याकडे दोन वर्षे नाट्यसंगीताचे शिक्षण घेण्याची इच्छा आहे. त्यांनी तिच्या आवाजाची टेस्टही घेतली आहे. त्या अतिशय चोखंदळ असून अमृताला शिष्या म्हणून स्वीकारण्यास तयार आहेत.
पण अगदी याचवेळी तिच्या घरच्यांना मात्र तिच्या लग्नाची स्वप्ने पडू लागली आहेत. नात्यातलेच कोणाचे तरी उत्तम स्थळ आहे. मुलगा शिकलेला, दोन फॅक्टऱ्या, तीन गाड्या, प्रचंड मोठा बंगला, सुस्वभावी माणसं असं लाखात एक स्थळ घरी चालून आलं आहे. म्हणूनच प्रभाचे सासू सासरे असं स्थळ सोडायचं नाही म्हणताहेत.
आणि प्रभालाही अगदी तसंच वाटत आहे त्यामुळे ती हुरळून गेली आहे.
पण तरीही एका गोष्टीबद्दल अमृता नाराज आहे कारण त्या लोकांची एक अट आहेकी लग्नांनंतर अमृताने कुठल्याही बाहेरच्या कार्यक्रमात गायचे नाही. ही अट प्रभाने कबूल केली आहे आणि अमृतानेही कबूल केली आहे. याची निवेदिकेला कमाल वाटत आहे. अमृताच्या आईला यात काहीही वावगे वाटत नाही. ती तर म्हणतेकी “अश्या गोष्टींसाठी लाखातलं एक स्थळ कोण सोडील? अमूला शोभणारं आहे सारं, लहानपणी आवड होती म्हणून शिकवलंकी गाणं! आता संसाराला लागल्यावर कुठलं गाणं न काय? विसरायचं ते.”
हे असे विचार काय दर्शवतात? अमृता म्हणजे काय फक्त शोभेची बाहुली आहेका? अमृताला मिळालेली कला हे एक दैवी वरदान आहे, मनापासून त्यात तिने प्राविण्य मिळवले आहे, ती फक्त तिची आवड नसून त्यात ती खूप उंची गाठू शकते हे तिने बाहेरच्या जगतात सिद्ध केले आहे.
लहानपणी तिला मिळालेल्या बक्षिसांमुळे प्रभा जशी हुरळून जायची तशी या स्थळामुळेही हुरळून गेली आहे. हे स्थळ म्हणजे अमृताला मिळालेलं एक मोठं बक्षीस आहे असं तिला वाटत असावं. याची कारणं दोन असू शकतात, एक म्हणजे प्रभा अमृताच्या मागच्या पिढीची आहे आणि दुसरं म्हणजे तिच्या स्वतःकडे ही कला नसल्याने कलेतला आनंद काय असू शकतो याची तिला कल्पनाच नाही. पण अमृताने कलेतला आनंद घेतला आहे, त्या आनंदात ती डुंबली आहे. पण तरीही अशी अट तिने का बरे मान्य केली?
कदाचित याबाबतीत तिला मोकळेपणाने कोणाशी तरी बोलायचे असेल पण घरच्या लोकांशी ती याबाबत मनमोकळी चर्चा करू शकत नसावी. किंवा जरी अशी चर्चाझाली तरी तिला जो मुद्दा महत्वाचा वाटतो तो घरच्यांना महत्वाचा वाटणारा नसावा असे तिला वाटत असावे. म्हणूनच ती आपल्या शेजारच्या मावशींपुढे जेवढे मनमोकळे बोलू शकते तेवढे घरच्यांपुढे बोलू शकत नाही.
पण तरीही… तिच्या लग्नाचा निर्णय जेवढा तिच्या घरच्यांसाठी महत्वाचा आहे किंबहुना त्याहीपेक्षा जास्त तिच्यासाठी महत्वाचा आहे. तरुण वय, वैभवसंपन्न जीवनाचा तिला पडलेला मोह यांनी तिच्या मनातल्या कलेच्या ओढीवर मात केली आहे. किंबहुना स्वतःच्याच मनातल्या दोन प्रबळ इच्छांचा समन्वय साधताना तिचा निर्णय चुकला आहे. लग्नानंतर कदाचित आपण सासरच्या लोकांना किमान नवऱ्याला तरी बदलवू शकू या आशेवर तिने या स्थळाला होकार दिला असावा.
घरातल्यांचे बोलणे एकमेकांशी होत नाही असे गृहीत धरले तरी, अमृताचे बाहेरच्या जगातले वागणे मोकळेपणाने आहे, कारण एका समवयस्क तरुणाबरोबर तिचा परिचय आहे. दोन तीन ओझरत्या भेटीतच त्याला ती आवडते असे त्याने सुचवले आहे. तिने गाणे शिकून त्या क्षेत्रात नाव कमवावे असे त्याला वाटते. तिच्याशी लग्न करण्याचीही त्याची इच्छा आहे. तरीपण त्याबाबतीत तिचा निर्णय नाही असाच आहे. कारण तो दुसऱ्या जातीचा आहे. तिच्या घरच्या लोकांना आंतरजातीय विवाहाची कल्पना मानवणारी नाही. प्रभाच्या मैत्रिणीलाही याची कल्पना आहे. शिवाय अमृताचे असे म्हणणे आहेकी, तिचे त्याच्यावर प्रेमही नाही.
इथे प्रेम म्हणजे काय असा विचार केल्यास किंवा कथानायिकेच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास असे वाटतेकी, प्रेम याचा अर्थ शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक किंवा आत्मिक आकर्षण असाच घ्यावा लागेल. तिला त्या मुलाबद्दल असे कुठलेही आकर्षण वाटत नसावे … म्हणूनच ती तसा विचार करत नसावी.
शिवाय तिच्या मावशीला म्हणजे निवेदिकेला तिच्या सासरच्या मंडळींची एक गोष्ट पटलेली आहे. कारण त्यांनी आपल्या आवडीनिवडी लपवून न ठेवता लग्नाच्या आधीच प्रामाणिकपणे या सर्व गोष्टींची कल्पना दिलेली आहे. त्यामुळे त्यांना दोष देणे बरोबर नाही असे तिला वाटते आहे.
त्यानंतर अमृताचे लग्न थाटामाटात पार पडले आहे. सुरुवातीच्या काही दिवसात ती सासरच्या वैभवात नवऱ्याच्या सहवासात रंगून गेली आहे. पण नंतर नंतर तिची ही प्रसन्नता टिकत नाही. तिने बाथरूमध्ये गाणे म्हटले तरी ते सासूस आवडत नाही, नवऱ्याला गाण्याच्या कार्यक्रमाला गेलेकी झोप येते, रात्री बेडरूममध्ये गाणी लावलीकी त्याला त्रास होतो, त्यापेक्षा त्याला व्हीसीआर वर पिक्चर पाहणे जास्त आवडते. म्हणुणच अमृता निराश झाली आहे. माहेरी आल्यावर निवेदिकेच्या सुनेच्या डोहाळेजेवणात तन्मयतेने गाणे म्हणता म्हणता तिचा स्वर भन्गला आहे, आवाज फाटला आहे.
तिच्या मनातली सारी व्यथा मग तिने मावशीपुढे म्हणजे निवेदिकेपुढे व्यक्त केली आहे. पण ही व्यथा तिने तिच्या आईपुढे व्यक्त केली आहे कि नाही कोण जाणे! जरी ती तशी तिने व्यक्त केली तरी तिच्या आईला ती कितपत समजली कोण जाणे? कारण यात तिचा आणि तिच्या आईचा जगण्याचा दृष्टिकोनच वेगळा आहे. म्हणूनच तिची आई म्हणते,” हिचं काहीतरी बिनसलंय, काही सांगत नाही, तसं तिथं कशालाच कमी नाही, सुख टोचतंय म्हणतात तसं आहे.”
यात अमृताचा जगण्याचा दृष्टिकोन तिच्या आईपेक्षा वेगळा असला तरी तो नेमका कश्या प्रकारे वेगळा आहे हे तिला उशिरा उमगले आहे, सारे काही घडून गेल्यानंतर जाणवते आहे.
कदाचित काही गोष्टी प्रत्यक्ष अनुभवाशिवाय उमगत नाहीत हेच खरे असावे. प्रत्यक्ष वैभवाचा उपभोग घेतल्यानंतरच वैभवाचा आनंद आणि कलेचा आनंद यातला फरक कळतो. कलेचा आनंद पैशाने विकत घेता येत नाही. म्हणूनच अमृता व्यथित आहे. तिच्या डोळ्यात रोरांवणाऱ्या वादळाने ती मुळापासून गदगदत आहे. म्हणूनच तिच्या आयुष्यातला हा श्रावण तिला रसहीन रंगहीन वाटत आहे.
कथेच्या शेवटच्या भागात अमृताने झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. डॉकटरी उपचार सुरु आहेत आणि ती जीवन मरणाच्या सीमारेषेवर आहे.
या कथेतल्या स्त्रीपात्राने कथेच्या शेवटी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यातून लेखिकेला जे काही सुचवायचे आहे ते तिने अप्रत्यक्षपणे सुचवून वाचकांना विचारप्रवृत्त केले आहे. खरेतर वाचकाला विचारप्रवृत्त करणे, त्याच्या अंतर्मनात खळबळ माजविणे, हे ललित साहित्याचे एक महत्वाचे प्रयोजन आहे. बुद्धीच्या प्रांगणात ठिणग्या पाडण्याचे काम ललित साहित्य कुठलाही अभिनिवेश न बाळगता करू शकते. मग त्या ठिणगीने कधी फटाके फुटतात, कधी चंद्रज्योती उजळतात, कधी फुलबाजी उधळतात.
आज कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांप्रमाणेच शालेय, महाविद्यालयीन युवक युवतींच्या आत्महत्या हा समाजापुढचा ज्वलंत प्रश्न आहे.
गरीब शेतकऱ्याची आत्महत्या काळीज पिळवटते. तरुणांच्या आत्महत्या गोठवून टाकतात. शेतकऱ्यांच्या आत्महत्येला काही प्रमाणात नैसर्गिक विपदा जबाबदार असली तरी शासकीय पातळीवरील भ्रष्टाचार,आत्यंतिक भोगलोलुपता जबाबदार आहे. विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांना त्यांची स्वतःमधली वाढती चंगळवादी वृत्ती, पालकांच्या अवाजवी अपेक्षा, चुकीची शेक्षणिक धोरणे जबाबदार आहेत.
पण अश्या कथेतल्या आत्महत्येला कोण जबाबदार आहे?
वैभवाला भुलणारं भोगलोलुप मन जबाबदार आहे. नायिकेची दुबळी मनोवृत्ती जबाबदार आहे. लग्न म्हणजे मुलीच्या आयुष्याची इतिकर्तव्यता असे समजणारी पालकांची मानसिकता जबाबदार आहे.
यापूर्वीही आणि आजही वाङ्मयात विविध प्रवृत्ती जोपासणारे गट तयार होत असतातच. त्यामुळे लेखकाने गरीब शेतकऱ्याच्या आत्महत्येवर लिहिलेकी युवकांच्या आत्महत्यांवर लिहिलेकी संपन्न कुटुंबातील व्यक्तीने कलेची भूक भागत नाही म्हणून केलेल्या आत्महत्येवर लिहिले यावरही जोरदार चर्चा होतच असतात.
पण लेखकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे असतेच.. त्याने कशावर लिहावे हा त्याचा व्यक्तिगत प्रश्न असतो.
लेखक बैलगाडा शर्यतीतल्या बैलांच्या किंवा रेसच्या घोड्यांच्या पिळवणुकीवर लिहू शकतो. जवळ बैल नसल्याने स्वतःच नांगर ओढणाऱ्या वृद्ध शेतकऱ्यावरही लिहू शकतो. कसायाला विकल्या जाणाऱ्या म्हाताऱ्या गाईम्हशींच्या प्रश्नावरही लिहू शकतो. त्याचप्रमाणे तो बांधावर चरणाऱ्या गाईम्हशींच्या गळ्यातल्या घुंगरांच्या मंजुळ घंटानादावरही लिहू शकतो.
उत्कृष्ट साहित्याचे प्रयोजन सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनाबरोबरच व्यक्तीच्या मनात परिवर्तन घडवणे हेही असतेच. नवी संस्कृती, नव्या मूल्यांवर आधारित समाज घडवायचा असेल तर जुने सर्व मोडूनच टाकायला हवे असे नसते. जे टाकाऊ असते, निरर्थक असते ते काळाच्या कसोटीवर टिकतच नाही. ज्या साहित्यातून फक्त घटकाभराची करमणूक असते तेही काळाच्या कसोटीवर टिकत नाही.
जैन धर्मात आत्महत्येला पाप समजले जाते कारण आत्महत्या म्हणजे एक प्रकारची हिंसाच आहे. स्वतःच्याच जीवाची केलेली हत्या आहे. काही जैनेतर लोक जैन धर्मातील सल्लेखनेला आत्महत्या समजण्याची घोडचूक करतात. या ललित कथेत त्यावर चर्चा मला अपेक्षित नाही.
इथे या कथेत प्रश्न असा आहेकी, एका संपन्न जैन कुटुंबात वाढलेली, अहिंसा शाकाहार रात्रिभोजनत्याग यांचे महत्व जाणणारी, परजातीय विवाहाला तयार नसणारी एक कलासक्त मनाची मुलगी आत्महत्येला का प्रवृत्त होते?
खरेतर याला आपला अतिरेकी कर्मठपणा जबाबदार आहे. दिखाऊ कर्मकांड व दिखाऊपणाचा सोस जबाबदार आहे.
सुरुवातीच्या ज्या काळात गौतम बुद्धाने आपल्या संघात स्त्रियांना प्रवेश देणे टाळले होते त्या काळात महावीरांनी चंदनबालेला एका स्त्रीला दीक्षित करून संघात स्थान दिले होते. मग अश्या उच्चतम अध्यात्मिक क्षेत्रातही समानता दाखवणाऱ्या जैन समाजातील काही कुटुंबात स्त्रियांना अजूनही कठपुतळीप्रमाणे का वागविले जाते?
कला ही जीवनात आनंद निर्माण करते. कला म्हणजे स्वैराचार नसून अव्यक्त भावनांचे सहजसुंदर प्रकटीकरण असते. कलेचा उपयोग जीवनात जशी सुंदरता आणतो तसेच तो मनालाही सुंदर बनवतो. यावरून असे म्हणावेसे वाटतेकी मन खंबीर बनवण्यास कलेचा कलेकलेने उपयोग करण्याची कलाही आपल्याला अवगत असायला हवी. जी जैन पुराणातल्या मैनासुंदरी व सुरसुंदरी यांच्याकडे होती.
या कथेचे शीर्षक श्रावण हे सर्वार्थाने सार्थ असेच आहे. कथेची बोलीभाषा तरल रिमझिमती व नादमधुर आहे. कथेचा एकंदर घाट श्रावणातल्या निसर्गाप्रमाणे मनमोहक तर आहेच पण मोजक्या शब्दातले निवेदन कथेची परिणामकारकता वाढवते. कलात्मकतेचा घाटही सांभाळते.
कथा वाचताना मनोवृत्तीतही श्रावणच दाटून येतो. वाचताना कधी मनात काळेशार मेघ दाटून येतात तर कधी पुढच्याच क्षणी ते बरसायलाही लागतात. मन क्षणात निरभ्रही होतं आणि पुन्हा भरुनही येतं.
कथेतली काही वाक्ये अमृताच्या मनातला बदलता श्रावण आणि तिची भावस्थिती नेमकी टिपणारी आहेत. जसे,
“सकाळच्या प्रसन्न उन्हावर क्षणात काळ्या ढगांची छाया पसरावी तसा तिचा सुंदर चेहरा झाकोळून गेला.
“तिच्या काळ्या करंद खोल डोहासारख्या गूढ भासणाऱ्या डोळ्यात बरसणारा तो श्रावण मला त्याक्षणी दिसला.”
“ती स्वस्थ बसून राहिली, किल्ली संपलेल्या खेळण्यासारखी”
“मला पाहून ती फिकटसं हसली, पारिजातकाच्या सुकलेल्या फुलासारखी”
“हिचं काहीतरी बिनसलंय , काही सांगतही नाही”
“अमृताच्या आयुष्यातला श्रावण आला तसा गेला होता तिला रसहीन रंगहीन करून ”
या कथेत प्रभाचे सासू सासरे, प्रभा व तिची शेजारीण निवेदिका, अमृता मधुरा आणि अमृताचा नवरा अशी तीन पिढ्यातली माणसे दाखवली आहेत. असे म्हटले जातेकी दरपिढीगणिक स्त्रीपुरुषांचे आचार विचार बदलत जातात. काळाप्रमाणे ते बदलणे इष्टच असते. पण पुरुषांप्रमाणे स्त्रीचे आचारविचारही काळाप्रमाणे बदलायला हवेत. ते त्या प्रमाणात बदलले नाही तर मग एकमेकांचे शोषण सुरु होते. यासाठी आचार विचार फक्त वरवर बदलून चालत नाही. तर ते मुळापासून बदलायला हवेत. नाहीतर मग स्त्रीचे व पुरुषाचेही वागणे विसंवादी होऊ लागते. व्यक्तिमत्वात दुभंगलेपण येऊन नैराश्य येते.
या कथेतल्या स्त्रीपात्राचे निराश होणे व आत्महत्येस प्रवृत्त होते यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यांची उत्तरे शोधता शोधता स्त्रीवादी जाणिवेचे अनेक पदर उलगडण्याचा वाचक प्रयत्न करतो. म्हणूनच पुढील काळात सकस साहित्य निर्मितीसाठी ही कथा प्रेरणा देणारी ठरते.
श्रावण – लेखिका सौ.सुरेखा शहा,
कथासंग्रह परहिदं च कादव्वम(समकालीन मराठी जैन कथासंग्रह भाग २)
पान क्र. १०१ ते १०८
सुमेरू प्रकाशन, संपादन – श्रेणिक अन्नदाते
आस्वादात्मक समीक्षा – लेखिका सौ. सुनेत्रा नकाते