जाग ललित कथा -आस्वादात्मक समीक्षा
समकालीन मराठी जैन कथा चळवळ ही जैन समाजातील काही चळवळ्या(active) स्वभावाच्या लोकांनी ललित साहित्यावरील प्रेमापोटी सुरु केलेली चळवळ आहे. म्हणून या चळवळीतील साहित्यिकांची बांधिलकी फक्त साहित्य धर्माशीच आहे…
साहित्य धर्माशी बांधिलकी असणारी व्यक्ती मग ती कुठल्याही धर्माची असो, जातीची असो, त्या व्यक्तीच्या लेखनात विशिष्ट धर्मानुयायांची जीवनपद्धती, त्यांचे उपास्य देवदेवता, पूजापद्धती यांचे दर्शन प्रचारकी थाटात येत नाही. त्यातून फक्त त्या त्या समाजाचे जीवनदर्शन, सामाजिक समस्या यांचेच दर्शन घडत असते. तसेही जीवनदर्शन घडवणे हे तर साहित्याचे प्रमुख कार्य आहे.
अत्यंत श्रद्धाळू, अहिंसक आणि जाज्वल्य जीवननिष्ठा जोपासणाऱ्या जैन समाजाचे आणि त्याबरोबरच या समाजाचे परिसरातील इतर घटकांबरोबरचे परस्पर स्नेहबंध, एकत्रित जीवनपद्धती यांचे दर्शन घडवणाऱ्या ललित कथांचे सात संग्रह सुमेरू प्रकाशनाने प्रकशित केले आहेत.
डोंबिवली येथील ज्येष्ठ लेखिका लीला शहा यांचा या चळवळीच्या आरंभापासूनच यात सहभाग आहे. ही चळवळ सुरु होण्याच्या आधीपासूनच विविध मासिकातून त्यांनी कथालेखन केले आहे. त्यांनी लिहिलेल्या जैन ललित कथा त्यांच्या स्वतःच्या खास अश्या लेखनशैलीमुळे, त्यातून व्यक्त होणाऱ्या स्त्रीवादी जाणिवांमुळे आपले वेगळेपण सिद्ध करणाऱ्या आहेत.
स्त्रीपुरुष विषमतेचे भान आणि त्यातूनही जैन समाजातील स्त्रीपुरुष विषमतेचे भान … मग हे स्त्रीपुरुष कवी-साहित्यिक, डॉक्टर इंजिनियर शेतकरी व्यापारी शास्त्री पंडित कोणीही असोत… हे विशिष्ट भान लीला शहांच्या लेखनातून स्पष्टपणे जाणवते.कारण त्यांच्या कथा वाचल्यास हे जाणवतेकी कथेतल्या त्यांच्या नायिका वेगळ्या आहेत. लेखिका कधी नायिकांच्या मनोभूमिकेतून आणि कधी कधी नायकाच्याही मनोभूमिकेतूनही त्यांच्या खास शैलीने पुरुषरचित स्त्रीत्वाच्या आणि स्त्रीरचित पुरुषत्वाच्या कल्पनेला नकार देण्याचे धाडस दाखवतात.
गिरनार या समकालीन मराठी जैन कथासंग्रहातील ” जाग ” ही कथा जैनत्वाची सखोल जाण देहामनात मुरलेल्या एक लग्नाळू आणि स्वप्नाळू तरुणीच्या मनातील मुग्ध सोज्वळ भावभावनांना उजळवून टाकणारी आहे.
या कथेची नायिका प्राजक्ता उर्फ माधवी आणि तिचा मिलनोत्सुक पती यांचे अखेरीस कसे सुरेख मनोमीलन घडते याचे चित्रण करणारी अगदी कवितेसारखीच भासणारी ही कथा आहे.
लेखिकेने ही कथा पात्रमुखी पद्धतीने लिहिली आहे. विशेष म्हणजे हे निवेदन करणारे पात्र पुरुषपात्र आहे. तो प्राजक्ताचा पतीच आहे. एका पुरुषाच्या मनोभूमिकेतून त्याच्याच स्टाईलने पण स्वतःला हवे तसे नायिकेचे धूसर पण तरल रेखाचित्र लेखिकेने रेखाटले आहे.
नायकाचे वडील तो बारावीत असतानाच हार्टअटॅकने वारलेले आहेत. त्यानंतर तो ,त्याची आई आणि त्याच्या पाठीवरच्या दोन धाकट्या बहिणी असा संसार त्याने व त्याच्या आईने केजी ते दहावीपर्यंतच्या ट्युशन्स घेत घेत पुढे रेटलेला आहे.
त्यातच रात्री जागून, पहाटे उठून अभ्यास करून त्याने शिक्षणही पूर्ण केले आहे. बँकेच्या डिपार्टमेंटच्या परीक्षा देऊन नोकरीत स्थिरस्थावर झाल्यावर त्याने व त्याच्या आईने त्याच्यासाठी वधूसंशोधन सुरु केले आहे. दोघांनीही अगदी चोखंदळपणे मुलीची निवड केली आहे. त्यानंतर त्याचे प्राजक्ताशी लग्न झाले आहे.
दोघांचा विवाह झाला, मधुचंद्रही झाला… पण तरीही अगदी दोन मुले झाल्यानंतरही नवराबायकोची वेव्हलेन्थ काही जुळत नाही.
प्राजक्ता धार्मिक आणि बाळबोध वळणाच्या कुटुंबात लाडाकोडात वाढलेली मुलगी आहे. ती व्रतवैकल्ये उपवास करते, मुक्या पशुपक्ष्यांवर, वृक्षवल्लींवर प्रेम करते, निसर्गात रमून जाते. ती शिकलेली असून लग्नानंतर नोकरी करण्याचीही तिची तयारी आहे.
लग्न ठरल्यानंतर जेव्हा ते दोघे एकांतात बोलण्यासाठी गावाबाहेरच्या मंदिराजवळील निसर्गरम्य परिसरात येतात तेव्हा ती न लाजता न बुजता अगदी मनमोकळेपणाने त्याच्याशी बोलते. शहरातल्या बनेल आणि धीट मुलींपेक्षा ही मुलगी वेगळी आणि निरागस वाटल्यामुळे त्याला ती मनापासून आवडते.
लग्नानंतर दोघेही मधुचंद्रासाठी माथेरानला येतात. तिथल्या दऱ्याखोऱ्यात डोंगरमाथ्यावर माधवी म्हणजे प्राजक्ता निःसंकोचपणे बागडते. पण तरीही नवऱ्याबरोबरच्या शरीरसंबंधासाठी ती फारशी उत्सुक नसते. त्याने तो विषय काढला किंवा तो थोडेही तिच्याजवळ गेला तर ती त्याला नकारच देते. म्हणून तो तिला तिच्या पूर्वायुष्यात प्रेमभंग किंवा फसवणूक असे काही घडले आहेका याबद्दल विचारपूस करतो, तेव्हा ती म्हणते,
” शी; काय बोलताय ! असं काहीही झालेलं नाही पण… कसं सांगू मी… मला हे सगळं कसंतरीच वाटतं … अपवित्र अमंगल… पण … ”
यानंतर तो तिला समजावून सांगतोकी सृजनासाठी प्रकृती आणि पुरुषाने एकत्र आलंच पाहिजे ही जगरहाटीच आहे, हे सारं नॉर्मल आणि नैसर्गिक आहे वगैरे वगैरे….
तिला हे सारं पटलं किंवा नाही हे त्याला समजलं नाही पण ती रात्र त्यांच्यादृष्टीने चांगलीच गेली असावी … कारण त्या रात्रीचं अगदी सूचक, सुखद आणि काव्यात्म वर्णन त्याने पुढीलप्रमाणे केलेलं आहे … ” त्या रात्री चंद्र ढगाआड गेला, झाडं हळुवार सळसळली. फुलांचे वेगवेगळे सुगंध दाही दिशांनी धावत आले. झिमझिम पाऊस धरती भिजवीत गेला. ”
त्यानंतर त्या दोघांचे आठ दहा दिवस भटकण्यात, भविष्याची स्वप्ने रंगवण्यात गेले. त्यावेळी माधवी वेळ साधून सूचकतेने त्याला सांगतेकी, “मला आईने अष्टमी चतुर्दशी पाळायला सांगितले आहे.” त्यावेळी तो मनातल्या मनात चिडला आहे. त्यावेळचे त्याचे चिडणे अगदी साहजिकच वाटते…. कारण लग्न करून प्रथमच पतीगृही जाणाऱ्या आपल्या देवभोळ्या आणि स्वप्नाळू मुलीला असे सल्ले तिच्या आईने का बरे दिले असावेत? असा प्रश्न सुजाण वाचकाला पडल्याशिवाय राहत नाही.
लग्नापूर्वी प्राजक्ताने राजुलमतीची कथा वाचलेली आहे. तिने सोळाव्या वर्षी दीक्षा घेतली असे ती नवऱ्याला सांगते. मग तिने पद्मपुराणातील सती अंजना आणि पवनंजय यांचीही कथा वाचलेली असणारच ना ? असा प्रश्न माझ्यासारख्या वाचकांना नक्कीच पडला असेल… पण या पात्रमुखी कथेत कथा निवेदक हा तिचा नवरा आहे.म्हणूनच तो जे सांगतो तेवढेच आपल्याला कळते. राजुलमतीच्या कथेचा उल्लेख करण्यामागची तिची स्पष्ट मनोभूमिका वाचकांना कळत नाही. असे सगळे असूनही तो तिला नाईलाजानेच समजून घेतो आणि रुळेल हळूहळू म्हणून स्वतःची समजूत काढतो.
लग्नानंतर तिचे प्राजक्ता हे नाव बदलून माधवी असे ठेवले आहे. तिला हे नाव आवडलेलं आहे कारण लग्नापूर्वी फिरायला गेलेले असताना ती म्हणालेली आहेकी, “गोमटेश्वराच्या अंगावर चढलेली माधवी लता आहेना ! मला हे नाव आवडेल… ”
त्यानंतर ते दोघेही संसारात पडले आहेत. वर्षे वहात गेली आहेत. त्यांना दोन मुले झाली आहेत. लग्नानंतर त्यांची आर्थिक परिस्थितीही सुधारत गेली आहे. बहिणींची लग्नं झाली आहेत. दोन खोल्यातून ते रोहाऊस मध्ये राहायला आले आहेत.
माधवीनेही लग्न झाल्यापासून त्याचा व तिचा संसार काटकसरीने केला आहे. आईची सेवा, बहिणींची माहेरपणे, पै पाहुण्यांचे आतिथ्य ती न कंटाळता करते. विशेष म्हणजे हे सर्व करत असताना तिची स्वतःची व्रते, उपवास, अष्टान्हीक, पर्यूषण यात तिने कसलाही खंड पडू दिलेला नाही.
ती फक्त धार्मिक कर्मकांडातच रमणारी नसून मनानेही खूप संवेदनशील आहे. कारण मुले आजारी पडली किंवा आजूबाजूला एखादी दुर्घटना घडली, अपघात झाला तरी ती आपल्याच कोषात गेलेली असायची.
कथेत आलेल्या वरील सर्व वर्णनांवरून असे वाटतेकी, तिचा स्वभाव जरी प्राजक्ताच्या फुलाप्रमाणे असला, फुंकरीनेही कोमेजणारा असला तरी तिची एकंदर शरीररचना, मनोभूमिका प्राजक्ताच्या फुलाप्रमाणे नसून प्राजक्ताच्या झाडाप्रमाणे असणार ! कारण त्याने तिला कितीही दुखावले, टोमणे मारले तरीही ती ओठ मिटून गप्प राहते आणि स्वतःला जे हवं तेच करते.
ती त्याच्याकडे साड्या, दागदागिने, वस्तूंसाठी कधीही हट्ट करत नाही पण कधीतरी ती त्याला आग्रहाने सुचवतेकी, आपण पंधरा दिवसांची रजा काढून मुलांसहित कैलास यात्रेला जाऊयात. पण तो तेव्हाही तिला नकार देतो. तिला दुखावतो.
माधवीची मालतीताई जेव्हा पाहुणी म्हणून घरी येते तेव्हा तिच्यापुढेही तो माधवीबद्दलच्या अनंत तक्रारींचा पाढाच वाचत राहतो. माधवीबद्दलच्या लहानपणच्या सुंदर आठवणी मालतीताई त्याला सांगते. पण त्या सुंदर आठवणींना त्याच्या लेखी काहीच मोल नसते.
त्याच्या आईने वैधव्यात केलेले कष्ट, तिचा खंबीरपणा, या सगळ्यांमधूनही त्याच्या कुटुंबाने केलेली भौतिक प्रगती याबद्दलचा त्याचा अभिमान, धुंदी त्याच्या वागण्यातून स्पष्ट जाणवत असूनही मालतीताई त्याकडे दुर्लक्ष करते.
पण शेवटी तो जेव्हा ताईला पोहोचवायला स्टेशनवर जातो तेव्हा त्याला ती एक मोलाचा सल्ला देते. ती त्याला सांगते ” प्राजू जरा वेगळी आहे. तिच्या भूमिकेत जाऊन बघा. तुम्हाला ती समजेल, सहज कळेल. ”
अगदी असाच सल्ला तिने आपल्या बहिणीलाही कदाचित दिला असावा कारण त्यानंतर सर्व चित्र बदलले आहे.
त्यादिवशी रात्री माधवी जेव्हा म्हणतेकी, “आता मी व्रत उपवास संयम बंद करणार आहे आणि तुमच्या भूमिकेतून जगणार आहे. त्यावेळी तोसुद्धा आतून कुठेतरी हलला आहे म्हणूनच तो तिला सांगतोकी, आता तो तिला तिच्या सर्व कुटम्बियांसमवेत कैलास यात्रेला नेणार आहे.
तेव्हा मात्र माधवी आतुन आतुन उमलून आली आहे. तिच्या पापण्यांवर निळसर कंदील झुलू लागले आहेत. तिचं हे रूप पाहून तोही एका अनामिक आनंदाने उदात्ताच्या स्पर्शाने थरारून गेला आहे. कदाचित त्याच्यातल्या सत् ला जाग आली असावी असे त्याला स्वतःला वाटते..
जाग हे कथेचे शीर्षक या काव्याप्रमाणे वाटणाऱ्या कथेला यथायोग्यच आहे. कारण कथेचे एकंदर स्वरूप पाहता, त्यातल्या पात्रांची नायकाने केलेली स्वभाववर्णने पाहता येथे दोघांनाही प्रथमच जाग आली आहे असे वाटते. खरी जाग ही खरोखर झोपेत असणाऱ्यालाच येत असते. झोपेचे सोंग घेणाऱ्याला जाग कशी येईल?
इतके दिवस माधवी व तिचा पती फक्त आपापल्याच बाजूने विचार करीत असल्याने दुसरी बाजू त्यांच्या लक्षातच आलेली नसते. म्हणूणच माधवीच्या पतीची नको तिथे चिडचिड होत असते. तो जेव्हा माधवीच्या भूमिकेत जाऊन विचार करू लागतो तेव्हा मात्र त्याची झोप खाड्कन उतरते.
इतके दिवस तो माधवीची स्वतःच्या आईशी फक्त तुलनाच करीत असतो. त्याच्या आईने केलेली कष्टाची कामे, वाटणघाटण, आईला न करता आलेली हौसमौज, तीर्थयात्रा याबद्दल तो माधवीला सतत अभिमानाने सांगत असतो. पण या सगळ्या गोष्टीत माधवीचा काय दोष? या त्यांच्या भूतकाळातील गोष्टी माधवीने मनाला का लावून घ्याव्यात? कारण… माधवी खूप समंजस आहे.
खरेतर लग्नापूर्वीच अर्थार्जनासाठी नोकरी करण्याची तयारी तिने दर्शवलेली असूनही लग्नानंतर ती फक्त घरकामालाच जुंपून घेते. आणि याबद्दल तिची कसलीही तक्रार कुरकुर नाही. घर सांभाळून, मुलेबाळे सांभाळून ती तिच्या आवडीच्या देवधर्मात मनापासून रमलेली आहे. सासूची, नणंदांची, पै पाहुण्यांची उस्तवार ती मनापासून करते आहे. पण तरीही…. तिने नवऱ्याच्या शर्टाची तुटलेली बटणे लावली नाहीत, त्याच्या बनियनला भोक पडलेले असूनही तिने दुकानात जाऊन त्याच्यासाठी नवीन बनियन आणला नाही, तुटलेला रिमोट तिने दुरुस्त करवून घेतला नाही अशा आलतू फालतू कारणांसाठी तो तिला सतत सर्वांसमोर टोचून बोलतो, जाता येता तिचा अपमान करतो… असे हे सर्व वागणे त्याच्यासारख्या परिस्थितीने तावून सुलाखून निघालेल्या कर्तृत्ववान माणसाच्या बाबतीत अगदी हास्यास्पद वाटत नाही काय…
माधवीला जर टीव्ही पाहण्यातच रस नसेल व त्यापेक्षा देवापुढे बसून जाप देणेच तिला जास्त भावत असेल तर तिने तुटलेला रिमोट दुरुस्त करून आणण्याच्या भानगडीत का पडावे? ती त्याच्या कुटुंबीयांची अगदी बारीकसारीक बाबतीतही काळजी घेत असेल तर त्याच्या स्वतःच्या शर्टाची तुटलेली बटणे त्याने स्वतःच का लावून घेऊ नये? दुकानात जाऊन त्याने स्वतःच स्वतःसाठी बनियन का खरेदी करू नये? असे अनेक प्रश्न माझ्यासारख्या सामान्य संसारी वाचकांना निश्चितच पडण्यासारखे आहेत.
पण तरीही उशिरा का होईना त्याच्यातल्या सत् ला जाग आली आहे. तशीच जाग माधवीमधल्या मुग्ध प्रेयसीलाही थोडीफार आलेली आहे.
या कथेच्या निमित्ताने काही गोष्टी सहज लक्षात येण्यासारख्या आहेत. स्त्रीपुरुष जेव्हा प्रथमच लग्न करतात तेव्हा आपले सर्व अहंगंड, न्यूनगंड बाजूला ठेऊन त्यांनी शरीराने आणि मनानेही एकरूप झाल्याशिवाय दोघांच्या नात्यात प्रेम आणि विश्वास निर्माण होत नाही.
मधुचंद्राच्या नाजूक काळात आपली व्रते, नियम थोडे बाजूला ठेऊन माधवी आपल्या नवऱ्याशी शरीराने आणि मनाने एकरूप झाली असती तर त्याने मधुचंद्रानंतर घरी न जाता तिला त्याचवेळी कैलासाच्या यात्रेलाही का बरे नेले नसते ? पण असो… या साऱ्या जर तर मुळेच कथा घडत असते…
कथेच्या शेवटी दोघांच्याही मनातल्या सत् ला जाग आल्याने शेवट गोड झाला आहे.
या कथेत समकालीन जैन कुटुंबांचे त्यांच्या जगण्याचे, त्यांच्या धार्मिक जीवनाचे, पूजापाठाचे, व्रते सण उत्सव, धार्मिक श्रद्धास्थाने यांचे उल्लेख सहजगत्या अगदी ठायी ठायी विखुरलेले आहेत.
कथेत आलेली पावापुर, कुंडलपूर, महावीरजी, हळेबीड, बेल्लूर, कारकल, मूडबिद्री या क्षेत्रांचे उल्लेख आणि मुलींसाठी सुचवलेली चंदना, ऋजुकला आणि माधवी ही नावे जैनत्वाशी नाते सांगणारी आहेत.
हिंदूंच्या महाभारतात माधवी हे द्रौपदीचेच एक नाव आहे पण या कथेत आलेल्या माधवी या नावाचा हिंदूंच्या महाभारताशी काहीएक संबंध नाही.. कथेतच या नावामागचा इतिहास माधवीच्या तोंडी आलेला आहे.
भ. बाहुबली जेव्हा खड्गासनात बारा वर्षे ध्यानस्थ उभे होते तेव्हा सर्प त्यांच्या अवतीभवती निर्भयपणे फिरत असत. त्यांच्या पायांवर हातांवर वेलीही चढल्या होत्या. तर त्या काळात गोमटेश्वराच्या अंगावर चढलेल्या वेलीचे नाव माधवी असे होते.
कथेत आलेले मंदिर, तिथली आरती, टाळ मृदूंग झान्ज यांचे आवाज, देवघरातील समयसार, प्रक्षाळाची झारी, सहाण, खोड, पोवळ्याची जपमाळ धार्मिक वातावरण र्निर्मिती करतात.
ही कथा वाचताना तिसऱ्या पिढीचे कथाकार (१९४४ नंतरचा काळ) श्री अरविंद गोखले यांच्या मंजुळा या कथेची आठवण आल्याशिवाय रहात नाही… आणि तुलना करता अरविंद गोखल्यांची मंजुळा ही लीला शहांच्या माधवीपेक्षा जास्त खरी आणि वास्तववादी वाटते.
या कथेतून लीला शहा यांनी असा महत्वाचा विचार मांडला आहे की , सृजनासाठी स्त्री आणि पुरुष यांनी एकत्र येणे गरजेचे असले तरी त्यात कोणाची कोणावर जबरदस्ती नसावी. पण या कारणासाठी जेव्हा ते विवाह करतात तेव्हा शारीरिक मीलनाबरोबरच मनोमिलनही गरजेचे असते. कारण या विवाहाने दोन कुटुंबे जवळ येत असतात. एका नव्या कुटुंबाचा पाया भरला जात असतो.
या कथेत लेखिकेने इतरधर्मीय लेखकांनी विकसित केलेले शब्दार्थ, प्रतिमा स्वतःच्या नव्या भाषेत सहजपणे मांडल्या आहेत. उदा. माधवी हे नाव किंवा पापण्यांवरच्या झुलणाऱ्या निळसर कंदिलांची प्रतिमा नेहमीपेक्षा वेगळ्या आनंदासाठी आली आहे.
घरातल्यांसाठी चोवीस तास झिजणारी, नवऱ्याचे अपमानास्पद बोलणे मूग गिळून झेलत राहणारी, इच्छा नसतानाही मनावर दगड ठेवून नवऱ्याला शरीरसुख द्यायला तयार होणारी स्त्री स्वतःवरच अन्याय करत असते. अंतरीच्या आवाजाला सतत दाबत राहिल्याने तिची शारीरिक आणि मानसिक फरफट होते. … तिची ही दुबळी प्रतिमा पुसून टाकण्यासाठी लेखिकेने अत्यंत संयत पद्धतीने आणि पुरुषपात्र मुखी पद्धतीने हि कथा साकारली आहे असे वाटते.
या कथेतली माधवी उद्दाम बंडखोरीची भाषा कुठेही वापरत नाही. तशी कृतीही करत नाही. पण तरीही पुरुषप्रधान संस्कृतीला विरोध करणारी एक मॅड वूमन तिच्यात दडलेली आहे. ही मॅड वूमन आपल्या वेडेपणाचा कुठेही स्फोट होऊ देत नाही.
त्यापेक्षा त्या काळात ती देवघरात बसून जाप देणे पसंत करते. परिस्थिती समर्थपणे हाताळून आपल्याला जे अपेक्षित आहे जे हवं आहे ते ती मोजक्या शब्दातून, कृतीतून दाखवून देते.
या कथेची नायिका भावुक आहे, श्रद्धाळू आहे म्हणूनच व्यक्तिस्वातंत्र्य जपूनही तिने विवेकवादाची कास धरली आहे.
ती तिच्या पद्धतीने नवऱ्याला समजून घेत जगण्याचा प्रयत्न करते. देवघर, मुले आणि त्यांचा अभयास, बगीचा यात जगण्याचा आनंद शोधत राहते. प्राजक्ताच्या झाडाप्रमाणे स्वतःची मुळे सासरघरी रुजण्यासाठी अखंड धडपड करते आणि गोमटेश्वराच्या अंगावर चढलेल्या माधवीप्रमाणे अध्यात्मिक बाबतीतही उंच उंच जाण्याचा प्रयत्न करते . म्हणूनच तिला आत्मकेंद्री किंवा स्वकेंद्री म्हणावेसे वाटत नाही.
शेवटी या कथेच्या निमित्ताने एवढेच म्हणावेसे वाटतेकी, स्त्री ही सदोदित नवऱ्यावर संशय घेणारी, लाडीकपणे नखऱ्याने बोलणारी, खोटा खोटा रुसवा आणून गाल फुगवून बसणारी, सतत लाजणारी अत्यंत आज्ञाधारक असावी या पुरुषरचित जैनत्वाच्या आणि स्त्रीत्वाच्या कल्पनेला नकार देणारी ही माधवी आगळी वेगळी आहे…. म्हणूनच तिच्या अंतरंगात शिरून त्याचा वेध घेण्यासाठी केलेला हा अल्पसा प्रयत्न…..
जाग – लेखिका सौ. लीला शहा , कथासंग्रह गिरनार(समकालीन मराठी जैनकथासंग्रह भाग ३) पण क्र. ९४ ते १०५
संपादन – श्रेणिक अन्नदाते, सुमेरू प्रकाशन.
आस्वादात्मक समीक्षा – लेखिका सौ. सुनेत्रा नकाते