‘देऊळ ‘ ही प्रा. डी. डी. मगदूम यांनी लिहिलेली कथा रूढ अर्थाने एक समकालीन मराठी जैन कथा असली तरीही मला मात्र तिला एक नवकथा असे म्हणावेसे वाटते. ज्येष्ठ समीक्षक गंगाधर गाडगीळ आपल्या ‘ नवकथेचे स्वरूप ‘ या लेखात म्हणतात,
” वाङ्मयातील काही विशिष्ट प्रवृत्तीतून निर्माण झालेल्या कथेला नवकथा हे नाव देणे अप्रस्तुत आहे, कारण आज जे नवीन आहे ते उद्या जुने होणारच. शिवाय एखादी कथा नवी आहे ह्या गोष्टीला वाङ्मयीन मूल्य तसे पाहिले तर काहीच नाही. पण मनोविश्लेषणात्मक कथा अगर वास्तववादी कथा असे एखादे लेबल न चिकटवता एखाद्या कथेला नवकथा म्हणण्यात आले ही गोष्ट मला फार अर्थपूर्ण वाटते. कारण त्यामुळे असे सिद्ध होतेकी, कुठचेही लेबल चिकटवण्याइतकी ही कथा विशिष्ट साच्यातून निघालेली नाही. अनेक भिन्न प्रवृत्तीतून ही कथा निर्माण झालेली आहे. ती काही ठोकळेबाज तंत्रविषयक कल्पनातून निघालेली नाही. तिचे स्वरूप लवचिक आहे “(निवडक समीक्षा, पान क्र. १५संपादन- गो. मा. पवार, म. द. हातकणंगलेकर )
वरील दृष्टीने पाहता त्यातल्या काही मुद्द्यांचा विचार देऊळ या कथेबाबत करावा असे मला प्रकर्षाने वाटते. देऊळ ही नवकथा आहे असे मला वाटते कारण…
या कथेला वास्तववादी, रंजनात्मक, आशयप्रधान, प्रचारकी मनोविश्लेषणात्मक अशी वाङ्मयातील काही विशिष्ट प्रवृत्तीतून निर्माण झालेली लेबले चिकटवावीत असे तिचे स्वरूप नाही.
या कथेचा लेखक समकालीन मराठी जैन कथा चळवळीतील एक सक्रिय कार्यकर्ता व साहित्याची जाण असणारा प्राध्यापक आहे.
अगदी सुरुवातीच्या काळातही काही विशिष्ट तत्वांबाबत कर्मठपणा जोपासणाऱ्या जैन धर्मियांमधील चोखंदळ पण जाणकार वाचकांना व लेखकांनासुद्धा या चळवळीमुळे एका वेगळ्या आनंदाचा लाभ झाला आहे.
जैन ललितकथांमुळे मराठी ललित साहित्यात नव्या पारिभाषिक शब्दांची रेलचेल असणारं, संगीतमय अश्या पूजा पद्धतीचं साग्रसंगीत वर्णन करणारं, अहिंसा आणि अनेकांतवाद ही कोणत्याही काळाच्या कसोटीवर उतरणारी शाश्वत मूल्ये जपणारं एक समृद्ध दालन खुलं झालं आहे असं समीक्षक म्हणतात आणि ते सर्वार्थाने खरंही आहे.
पण सुरुवातीला आलेल्या “नवकथा’ या लेखाच्या संदर्भात पाहिल्यास देऊळ ही कथा ठोकळेबाज अश्या जैन कथेच्या तंत्रात बसणारी नाही; कारण त्यात जैन तत्वज्ञानातील पारिभाषिक शब्दांची रेलचेल नाही. जैन धर्मियांच्या विशिष्ट देवदेवता, तीर्थंकर, त्यांच्या पूजापद्धती याबाबतचे वर्णन यात आलेले नाही. जैनधर्माचे जे मूलभूत तत्व अहिंसा याचे महत्व कळत नकळत मनावर बिंबवण्यासाठी ही कथा लिहिली आहे असेही वाटत नाही. पण तरीही ही कथा याच चळवळीतील एक नव्या बाजाची, दमदार कथा आहे. या कथेवर लेखकाच्या विशिष्ट व्यक्तिमत्वाचा ठसा उमटला आहे.
त्याचप्रमाणे गंगाधर गाडगीळ म्हणतात त्याप्रमाणे या कथेने साहित्याच्या ज्या श्रेष्ठ परंपरा आहेत त्या नाकारलेल्या नाहीत. पण त्या सर्व परंपरांना जपूनही तिने आपले वेगळेपणही जपले आहे.
देऊळ या कथेतून वेगवेगळ्या पातळ्यांवरचे अनुभव वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त झाले आहेत. ते अनुभव अर्थपूर्ण भावपूर्ण भासण्यासाठी किंवा कथेतल्या पात्रांचे भावविष्कार व्यक्त करण्यासाठी अतिरेकी भावनांचे ओसंडणे, ओथंबणे दाखवलेले नाही.
नवकथा निर्मितीसाठी आवश्यक असणारी सचोटी, ठोकळेबाज तंत्रप्रधानतेला दिलेला फाटा, सीमावर्ती प्रदेशातील दोन किंवा अनेक भाषांची व त्यांच्यातल्या विशिष्ट लकबींची सरमिसळ होऊन तयार झालेल्या बोलीभाषेचा सहजसुंदर वापर देऊळ या कथेत पाहायला मिळतो. म्हणूनच तिला नवकथा म्हणणे सयुक्तिक वाटते.
देऊळ ही कथा पात्रमुखी आहे म्हणजे ती कथेतल्या ‘मी ‘ ने निवेदन केलेली आहे. त्यामुळे या कथेत आलेले सर्व प्रसंग पात्रांचे स्वभाववर्णन हे ‘मी ‘ च्या दृष्टिकोनातून व्यक्त झालेले आहेत .
निवेदक ‘मी ‘ हा पेशाने प्राध्यापक असून सीमावर्ती भागातील खेड्यात वाढलेला, एका शेतकरी कुटुंबातला आहे . म्हणूनच कर्मवीर शिक्षणसंस्था वगैरेसारख्या शिक्षणसंस्थांत त्याचा सक्रिय सहभाग आहे . प्राध्यापकी पेशा असल्याने वाचन संस्कार वगैरे आपोआपच होतात. त्यामुळे साहित्यिकांचे मंडळ, पुस्तकांवरील चर्चा या सगळयात त्याला मनापासून रस आहे. पण तरीही शेतकरी कुटुंबाचा वारसा असल्याने शेतीचे सर्व व्यवहार- उदा. चौथाईच्या कष्टाची वाटणी, सोयाबीनची लावणं, भांगलण, कोळपणी, उसाची फायनल बिले, खतपाणी या सगळ्यांची त्याला फक्त रीतसर पुस्तकी माहिती नसून तो अश्या व्यवहारात पक्का मुरलेला आहे. स्वतः प्राध्यापक असल्याने मुलाला चांगले शिक्षण मिळावे म्हणून खेडे सोडून तो तालुक्याच्या गावी येऊन राहिला आहे . गावाकडच्या वाटणीला आलेल्या शेतातून तो उत्पन्नही मिळवतो आहे.
निवेदक ‘मी ‘ चा मित्र श्रीकांत हा या कथेचा नायक आहे. शिक्षण फारसे नाही तरीही तो व्यवहारचतुर, लघवी, बोलघेवडा, प्रेमळ व जैन धर्माप्रमाणे सम्यक्तवी आहे.
वाटणीला आलेले वडिलोपार्जित शेत तो कष्टाने कसतो म्हणून अडीच एकर बागायती जमिनीत दहाबारा एकर कोरडवाहू जमिनीत जेवढं उत्पन्न निघेल त्याच्या दिडीने उत्पन्न तो काढायचा.
त्याचा मुलगा अजित घरची शेती बघत कापडाचे दुकानही चालवतो. धाकटा मुलगा अभिनंदन इलेक्ट्रिकल इंजिनियर..तो पुण्यात नोकरी करतो. एकंदर त्याचे कुटुंब खाऊन पिऊन सुखी आहे . पण … अश्या या सम्यक्तवी श्रीकांतच्या जीवनात एकदा एक मोठा पेच निर्माण झाला व ही कथा घडत गेली आहे.
एकदा श्रीकांत क्याटक्याळ,मुडबिद्री, श्रवण बेळगोळच्या यात्रेला गेल्यावर गावाकडे एक घटना घडली. श्रीकांतचा गडी मुर्ग्याप्पा शेतात ट्रॅक्टर चालवत असताना नांगराचा फाळ कशात तरी अडकला. कुदळीने उकरून पाहिले असता कुठल्यातरी देवीची मूर्ती निघाली. देवभोळा मुर्ग्याप्पा त्यामुळे घाबरला व हारुगेरीजवळच्या आपल्या गावी गेला.
तिथल्या त्याच्या स्वामी गुरूने त्याला याबाबतीत असा सल्ला दिला की शेतातच एक देऊळ बांधून या मूर्तीची प्रतिष्ठापना करावयास पाहिजे, शिवाय दर पौर्णिमेस मूर्तीला नारळ फोडावा व तसे नाही केले तर तुला काही सुख लागणार नाही.
मुर्ग्याप्पा गावाकडून आला व त्याने अजितला सांगितले की देऊळ बांधल्याशिवाय मी कामास राहणार नाही.
पण दरम्यानच्या काळात आणखी एक विशेष घटना घडली. अभिनंदन व त्याचा पुरातत्व खात्यात काम करणारा मित्र दोघे गावी आले असताना मित्राला त्या मूर्तीचे काहीतरी ऐतिहासिक महत्व वाटले. म्हणून त्याने मूर्ती मिरज तहसीलदारांची रीतसर परवानगी काढून ती मूर्ती अधिक अभ्यासासाठी पुण्यास नेली.
आता देऊळ बांधले तरच मुर्ग्याप्पा कामावर राहणार आणि त्याच्याशिवाय शेती व ट्रॅक्टरच्या धंद्याचा व्याप सांभाळणे कठीण आहे हे अजित जाणून होता. त्यामुळे तेरदाळच्या पंडितांकडे जाऊन त्याने सल्ला विचाराला व पेचप्रसंगाचे गांभीर्य जाणून पंडिताने असा सल्ला दिलाकी’बांधावर एक छोटे देऊळ बांधावे आणि मूर्ती नसल्याने शेतातल्याच एका गुंड दगडास शेंदूर फासून देवळात ठेवावे. ‘ त्याप्रमाणे अजितने वडील यात्रेहून यायच्या आत देऊळ बांधवून त्यात शेंदूर फासून दगड ठेऊन दिला. पण देवभोळ्या मुर्ग्याप्पाचे यामुळे समाधान झाले नाही. तो काम सोडून गावी निघून गेला व जाताना त्याने बसप्पा नावाचा दुसरा प्रामाणिक गडी अजितला आणून दिला.
यात्रेहून आल्यानंतर घडलेल्या सर्व प्रकाराचा श्रीकांतला उलगडा होत गेला. अजित व त्याची आई यांचेही मत देऊळ काढू नये असेच होते. त्यामुळे या सर्व गोष्टी पटत नसूनही ज्याचे कर्म त्याच्याबरोबर असा विचार करून श्रीकांतने देऊळ काढण्याचा विचार सोडून दिला.
पण त्यानंतर आणखीन एक वेगळाच पेच निर्माण झाला. श्रीकांतच्या मंडळी देवीच्या दर्शनाला येऊन नारळ वगैरे फोडतात हे पाहून शेतात कामाला येणाऱ्या बायकाही दर पौर्णिमेला देवीला नारळ वगैरे फोडू लागल्या. त्यामुळे त्यांची शेतात आणल्यावर रडणारी मुले शांत होतात असे त्यांना वाटू लागले.
कर्णोपकर्णी ही बातमी पसरत गेली. देवळातली देवी जागृत आहे असे समजून लोक तिला नवस सायास करू लागले. त्यामुळे देवीच्या दर्शनासाठी लोकांची वर्दळ वाढू लागली. देऊळ हे शेताच्या बांधावर असल्याने त्याच्या जवळपासची दोन गुंठे जमीन अशीच पड पडू लागली. शिवाय कायमच्या वर्दळीमुळे एक माणूस सतत शेतात राखणीला लागू लागला. परत एवढे कमी म्हणून की काय सम्यक्तवी श्रीकांत हा शेताच्या बांधावर देऊळ बांधून मिथ्या देवीची भक्ती करतो असा बभ्रा समाजात होऊ लागला.
या कठीण प्रसंगात तोडगा काढण्यासाठी शेतातल्या छपरात श्रीकांत, प्राध्यापक निवेदक मी, अजित आणि त्याची आई एकत्र बैठक घेतात. तेथे त्यांचा गडी बसप्पाही असतो.
सर्वांचे बोलणे ऐकत बसलेला बसप्पा शेवटी एक आयड्या सुचवतो, की
” या देवळाच्या मागंच त्याला लागून रस्त्याला तोंड करून दुसरं देऊळ बांधायचं. लोक बाहिरच्या बाहिर दर्शन करतीली आणि समाधानाने जातीली. रस्ता आणि बांध यामधी यामधी बक्कळ जागा हाय. त्यामुळे पड पडणारी जिबिनबी पड पडणार न्हाई आणि कसलं वर्दळ पण व्हणार न्हाई.”
बसप्पाची हीच नामी आयड्या पुढे श्रीकांत व अजित अमलात आणतात. त्यामुळे भोसे-सोनी रस्त्यावर पाच बाय चारचं एक मंदिर व पुढे एक मंडप उभा राहतो. बाया बापड्या दार पौर्णिमेला देवीला नारळ फोडतात. पण आता श्रीकांत व त्याच्या कुटुंबियांना त्याचा त्रास होत नाही.
अशी एक सर्वसाधारण विषय असलेली ही कथा आहे. कथेत जी वेगवेगळया पातळ्यांवरची (आर्थिक, बौद्धिक, मानसिक,धार्मिक, सामाजिक) माणसे व त्या पातळ्यांवरचे त्यांचे विचार आपल्याला समजतात. त्यामुळे ही कथाही त्या वेगवेगळ्या दृष्टीने अभ्यासली गेली पाहिजे असे मला वाटते.
सर्वप्रथम या कथेतली भाषा याचा विचार केल्यास या कथेतली भाषा ही प्रमाणभाषा नसली तरी सांगली, कोल्हापूर, बेळगाव, निपाणी या पट्ट्यात वापरली जाणारी मराठी-कानडी मिश्रित अशी भाषा आहे. निवेदक मी ने सुद्धा हीच भाषा निवेदन करताना वापरली आहे.
कथेतली वेगवेगळी पात्रे व त्यांचे बोलणे यातून त्यांचा स्वभाव, व्यक्तिमत्व यांचे हुबेहूब व्यक्तिचित्र डोळ्यासमोर उभे राहते. त्याचप्रमाणे या भाषेत आलेले काही विशिष्ट शब्द, त्यातले खटके वाचकालाही एका वेगळ्या मनोवस्थेत नेऊन त्यांच्याही मनातल्या काही सुप्त गुप्त कळा दाबून त्यांनाही विचारमग्न होण्यास भाग पाडतात. भाषेचा उपयोग या कथेत इतका प्रभावीपणे करून घेतला आहेकी व्यक्ती व्यक्तींमधील संवादाची साधी झलकही त्या व्यक्तीच्या अंतरंगाचे दर्शन घडवण्यास पुरेशी ठरते.
देऊळ या कथेतील भाषा ही सीमावर्ती भागातील दोन भाषाभगिनींची बेमालूम सरमिसळ होऊन निर्माण झालेली एकसंघ भाषा आहे. या बोलीमुळे त्या भागातील रीतिरिवाज, परंपरा, रुढीप्रथा त्या जपणारी जिवंत मनाची माणसे यांचे यांचे दर्शन होते. त्यामुळे त्या भागात व्यवसायाधिष्ठित व शहरीकरणामुळे रूढ झालेले काही शब्द जसे भांगलण, लावणं, चौथाईच्या कष्टाची वाटणी, फ्रिक्वेन्सी, टीपॉय, किलतानाचे ताटुक वगैरे सहजगत्या आल्याने ती विशिष्ट ग्रामसंस्कृतीची भाषा आहे हे कळते.
या कथेत आलेली भोसे, मिरज, जमखंडी, तेरदाळ , हारुगेरी ही गावे आता जरी कर्नाटक प्रांतात असली तरी स्वातंत्र्यपूर्व काळात ती कोल्हापूर, रायबाग या मराठी भाषक संस्थानात अंतर्भूत होती. त्या संस्थानात त्या काळी घरात कन्नड व शिक्षणाचे माध्यम म्हणून मराठी भाषा वापरली जाई.
या प्रदेशातला बहुसंख्य समाज चतुर्थ, पंचम, कासार, बोगार, या जैन उपजातींचा व लिंगायत वाणी समाजाचा मिळून बनला आहे. या समाजाचे लोक साधारणपणे कन्नड व मराठी या दोन्ही भाषा बोलतात. ते दुकानदारी व शेती करतात. लिंगायत समाजाचे लोकही शाकाहारी व पाणी गाळून पिणारे असतात. ते त्यांच्या स्वामी गुरूला खूप मानतात. हा समाजही जैन धर्मियांप्रमाणे पापभिरू व अहिंसक वृत्तीचा आहे.
संत बसवेश्वर हे लिंगायत धर्माचे संस्थापक.पूर्वीच्या काळी हा समाज व्यापारउदीम करताना वाणसामान वाहून नेण्यासाठी’ बसव ‘ म्हणजेच गाईच्या खोंडाचा उपयोग करीत. (संदर्भ- प्राचीन मराठी जैन साहित्य-डॉ. सुभाषचंद्र अक्कोळे)
देऊळ या कथेत आलेली माणसे ही महाराष्ट्राच्या ग्राम संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. त्यामुळे त्यांच्या जैनत्वाइतकंच त्यांचं मराठीपणही महत्वाचं आहे. या कथेतून व्यक्त झालेल्या जाणिवा या अस्सल मराठी आहेत. इथली माणसे ही इथल्याच मातीत जन्मलेली, वाढलेली व घडलेली असल्याने ती याच मातीशी समरस झालेली आहेत.
या कथेतला श्रीकांत हा जैन आहे, पण तरीही आपल्या कुटुंबाला जपण्यासाठी, लोक जरी त्याला मिथ्यात्वि म्हणाले तरी त्याची त्याला पर्वा नाही. तो स्वतःचे म्हणजे कुटुंबाचे हित जपणारा साधा सामान्य माणूस आहे. कोणी मित्थ्यात्वी म्हणेल तरीही तो स्वतःला पटेल तेच करणारा आहे. याच मातीतल्या इतर धर्मीयांशी सुद्धा त्याचे स्नेहाचे आणि सलोख्याचे संबंध आहेत.
म्हणूनच या कथेतला श्रीकांत आदर्श जैन श्रावक असूनही दसरा-जोगिणीच्या मिरवणुकीत सर्वांबरोबर असायचा. महावीर जयंती, पर्युषण पर्व याप्रमाणेच रामनवमी, हनुमान जयंती, उरूस इ. कार्यक्रमात सर्वांच्या बरोबरीने सक्रीय असायचा. तो सम्यक्त्वि असलातरी त्याच्या धार्मिक आचरणात अवडंबर नव्हते. तो श्रद्धाळू असून वशीच्या पारिसनाथाला दर अमावास्येला नेमाने जायचा. या कथेत काहीशी तर्हेवाईक, देवभोळी, तरीही एकमेकांच्या भावना जपणारी, कुठल्याही पेचप्रसंगातून तोडगा काढण्यासाठी धडपडणारी माणसे देवभोळी सश्रद्ध पण तरीही कधी अंधश्रध्द वाटणारी वागणारी माणसे यात आली आहेत.
काही लोकांच्या मनातल्या अंधश्रद्धा पटत नसूनही त्या जपणे एखाद्याला जपणे कसे क्रमप्राप्तच होते हे या कथेत निदर्शनास येते. कारण त्यांच्या अंधश्रद्धा जपल्याशिवाय आपले स्वतःचे व पर्यायाने कुटुंबाचे जगणे सुखावह होणार नाही असे त्यांना वाटत असते.
त्याचप्रमाणे या कथेतून सुसंस्कृत समृद्ध अश्या ग्रामीण भागातही प्रथा, रूढी व अंधश्रध्दा कश्या निर्माण होतात व हळव्या संवेदनशील स्वभावाची माणसेच त्यासाठी कशी कारणीभूत होतात हेच पाहावयास मिळते.
शेवटी या कथेच्या निमीत्ताने या सर्व घटनांमधून असा प्रश्न निर्माण होतेकी, देवीची मूर्ती हलवल्यामुळे नाराज झालेल्या मुर्ग्याप्पाचे प्रबोधन करणे जास्त आवश्यक आहेकी, ज्या स्वामी गुरुवर त्याची नितांत श्रद्धा आहे त्यांचे प्रबोधन करणे जास्त गरजेचे आहे.
त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे श्रीकांतच्या मंडळींचे प्रबोधन करणे श्रीकांत व अजित याना सहजशक्य असून ते तसे का करत नाहीत? याचे उत्तर म्हणजे मुर्ग्याप्पासारखा देवभोळा, प्रामाणिक, कष्टाळू गडी गमावणे त्यांना परवडणारे नाही.
आजकाल वाढत्या औद्योगिकरणामुळे खेड्यापाड्यातसुद्धा शेतावर काम करण्यासाठी प्रामाणिक गडी माणसे मिळणे किती दुरापास्त झाले आहे हेपण पाहायला मिळते. सम्यक्त्वि श्रीकांतलाही देऊळ काढून टाकण्याचे धाडस त्यामुळे होत नाही.
आजकाल शहरी संस्कृतीतही ,मंदिरे देवळे , मशिदी, गुरुद्वारा नव्याने निर्माण होतच असतात. कधीकधी त्यामागची कारणे राजकीय हेतूतून निर्माण झालेली असली तरी अशी स्थळे वृद्धांना , एकलकोंड्या जीवांना वरदान वाटतात.
शहरी भागातल्या वृद्धांच्या समस्या वेगळ्या असतात. फ्लॅट संस्कृतीमुळे अंगण, घराभोवतीचा बगीचा, परसदार केव्हाच हद्दपार झालेले आहे. घरातले सर्वचजण नोकरीवर, मुले पाळणाघरात, त्यामुळे वृद्धांचे जीवन एकलकोंडे भयग्रस्त होत आहे. अश्या लोकांना एकत्र जमून चार गोष्टी बोलण्यासाठी, आरत्या भजने म्हणण्यासाठी अशी मंदिरे, प्रार्थनास्थळे निर्माण होणे ही काळाची गरज आहे पण त्याहूनही महत्वाचे म्हणजे अश्या मंदिरातून कर्मकांडाचे स्तोम न माजवता तिथली ,शिस्त, स्वच्छता, शांतता, मंदिरपणा जपणे जास्त महत्वाचे आहे.
अश्या प्रकारच्या गोष्टी न घडाव्यात यासाठी समाजाचे प्रबोधन करणारी देऊळ ही एक नवकथा आहे . अश्या कथांमधून स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या काळातील महाराष्ट्रीयन समाजाच्या बदलत्या मानसिकतेचे, त्यांच्या चालीरीतींचे, सणवार, धर्मश्रद्धा यांचे दर्शन घडते. म्हणूनच भाविकाला महत्वाचा ऐतिहासिक सामाजिक दस्तऐवज म्हणूया कथांचे मोल जास्त आहे.
आजच्या भोगलोलुप, धकाधकीच्या काळात संवेदनशील माणसे ही खरीखुरी संपत्ती आहे. माणसांमधली संवेदनशीलता जपण्यासाठी तिला योग्य वळण देणे किती गरजेचे आहे हे सांगणाऱ्या देऊळ सारख्या कथा निर्माण होणे साहित्याची गरज आहे.
देऊळ-लेखक प्रा. डी. डी. मगदूम, कथासंग्रह – परहिदंच कादव्वं (समकालीन मराठी जैन कथासंग्रह भाग २)पृष्ठ क्र. २४ ते ३७
संपादन- श्रेणिक अन्नदाते, सुमेरु प्रकाशन
आस्वादात्मक समीक्षा – लेखिका सौ. सुनेत्रा नकाते