अहिंसा हाच आत्म्याचा धर्म – AHIMSAA HAACH ATMYAACHAA DHARMA


Ahimsaa dharma means relegion of nonviolence. Dharma means nature of a substance.  e.g. water is originally cold. So coolness is the nature of water and it is it’s dharma.
All living beings have ‘soul’. Nature of soul is to remain free from outer bondings. By deep devotion and true trust on Ahimsaa dharm we can go near to the pure nature of soul. We should learn to keep control on our violent feelings. Kshama is the base of all virtues.  To forgive and foget is soul’s true nature.
Religious forgiveness means Kshama dharma and perfect forgiveness means uttam Kshama dharma.
Uttam- kshama, mardav, arjav, shouch, satya sanyam, tap, tyag, akinchanya and bramhachary are ten ways of interpretation of Ahimsaa dharma.

 

पृथ्वीवरील सर्व जीवांमध्ये म्हणजे जलचर प्राणी, वनस्पती,सुक्ष्म जंतू, कीटक, प्राणी, पक्षी आणि मनुष्यप्राणी या सर्वांमध्ये आत्मा विद्यमान असतो. बऱ्याच धर्मांना ही गोष्ट मान्य आहे. आत्मा हा चैतन्यमय, ज्ञानमय आहे आणि आत्म्याशिवाय इतर सर्व म्हणजे आपले शरीरदेखील जड अचेतन आहे. आत्मा सोडून इतर सर्व वस्तूंबद्दलजे ममत्व मोह आहे त्याचा हळू हळू त्याग करत जाणे, आत्म्याच्या स्वाभाविक रूपाबद्दल श्रद्धा असणे, त्याबाबतचे ज्ञान होत जाणे व त्याप्रमाणे आचरण करणे, हा आत्म्याचा स्वभाव म्हणजेच आत्मधर्म होय असे जैन आगम सांगते.

जैन याचा अर्थ जिनांचा अनुयायी आणि जिन म्हणजे जिंकणारा किंवा ज्याने जिंकले आहे असा. ज्याने आठ प्रकारच्या कर्मशत्रूंचा नाश केलेला आहे आणि राग, लोभ, मान, माया, क्रोध, काम, मद वगैरे विकारांना जिंकले आहे तो म्हणजे जिन होय. आत्मिक विकारांना जिंकल्यामुळे जिन हे संसारातून मुक्त झालेले असतात.

एखादा जीव मुक्त होणे आणि एखाद्या जीवाचा मृत्यू होणे या दोन्ही गोष्टी पूर्णत: वेगवेगळ्या आहेत. मुक्त होणे म्हणजे मोक्षाला जाणे. या संसारात परत कुठल्याही स्वरुपात जन्माला न येणे. जैन मतांप्रमाणे एकदा मुक्त झालेला जीव परत या संसारात कधीच जन्म घेत नाही. अवतार घेत नाही. वरील सर्व चर्चेवरून असे म्हणता येतेकी असा जो जीव की ज्याने आठही प्रकारच्या कर्मांचा नाश केला आहे; जो क्षुधा, तृष्णा, भय आदि अठरा दोषांनी रहित आहे व जो सिद्ध बनला आहे तोच जैनांचा देव जिन आहे.

पण असे हे जिन कोठून येतात असा प्रश्न काहीजणांना पडणे स्वाभाविक आहे. तर त्याचे उत्तर म्हणजे हे जिन आपल्यातूनच निर्माण होतात. जैन शास्त्रानुसार किंवा विज्ञानानुसार जिन बनण्यासाठी योग्य काळ म्हणजे चतुर्थ काळ होय. पण इतर काळातही सुक्ष्म जंतू, कीटक, वनस्पती, पक्षी, पशू वगैरेपासून विकासाच्या पायऱ्या चढत चढत आपण मनुष्य म्हणून जन्म घेऊ शकतो. मनुष्य जन्मात व्रते, तप, ध्यानसाधना या द्वारे आत्म्याचा विकास करून घेऊ शकतो. चतुर्थ काळात(FOURTH ERA) मनुष्य सम्यकश्रद्धा, सम्यकज्ञान, सम्यकचारित्र्य या रत्नत्रयांची प्राप्ती करून घेऊन स्वत:च्या पुरुषार्थाने जिन बनू शकतो. अशा जिनांनी प्रतिपादित केलेला धर्म म्हणजे जैनधर्म होय.

या धर्माचे स्वरूप जिनांनी विशद केले पण त्यांनी तो स्थापण केला असे म्हणता येत नाही. जैन धर्मात वर्तमानकालीन चोवीस तीर्थंकर आहेत. प्रथम तीर्थंकर भगवान वृषभनाथ (भ. आदिनाथ) हे कैलासगिरीवर मोक्षास गेले. विसावे तीर्थंकर भ. मुनिसुव्रत यांच्या काळात रामायण घडले. राम, रावण, लक्ष्मण, हनुमान, सीता त्याच काळात होऊन  गेले. जैन रामायण हे पद्मपुराण या नावाने ओळखले जाते. जैनधर्मीय रामाला पद्म म्हणतात. राम व हनुमान हे मांगीतुंगी पर्वतावर तप करून मोक्षाला गेले असे जैन पुराणात म्हणजेच प्रथमानुयोगात सांगितले आहे. बाविसावे तीर्थंकर भ. नेमीनाथ यांच्या काळात महाभारत घडले. श्री कृष्णाचे आध्यात्मिक गुरू अरिष्टनेमी (भ. नेमीनाथ) होते. या गोष्टीचा उल्लेख कै.शिवाजी सावंत यांनी युगंधर या कादंबरीच्या प्रस्तावनेत केला आहे.

जैनांचे महाभारत हे हरिवंशपुराण या नावाने ओळखले जाते. जैन पुराणानुसार युधिष्ठिर, भीम, अर्जुन हे त्या काळात जिनदीक्षा धारण करून मोक्षाला गेले.  त्यानंतर तेविसावे तीर्थंकर भ. पार्श्वनाथ व चोविसावे तीर्थंकर भ. महावीर झाले. सध्या आपण भ. महावीर यांच्या तीर्थात आहोत असे जैनधर्मीय मानतात. प्रथम तीर्थंकर ऋषभनाथ, द्वितिय तीर्थंकर अजितनाथ आणि बाविसावे तीर्थंकर नेमीनाथ यांचा उल्लेख वेदांमध्येही आला आहे.

जैन धर्मीय असे मानतात की जैन धर्म हा तीर्थंकरांनी स्थापन केलेला नसून तो त्यानी फक्त शुद्ध स्वरुपात प्रतिपादित केला. जैन धर्म हा अनादी अनंत आहे. वर्तमानकालीन चोवीस तीर्थंकरांच्या पूर्वी भूतकालीन चोवीस तीर्थंकर होऊन गेले आहेत व भविष्यकाळात असेच चोवीस तीर्थंकर निर्माण होणार आहेत असे जैन आगम ग्रंथात म्हटले आहे. जैन धर्मात ‘जिन’ आणि ‘जिन’ बनण्यासाठी मोक्षमार्गस्थ झालेले साधू-मुनी हे वंदनीय असतात.

जैन धर्मियांचा परम पवित्र णमोकार मंत्र हा प्राकृत भाषेतील आहे. या णमोकार मंत्रात अरिहंत सिद्धादी पंचपरमेष्ठींना वंदन केलेले आहे. पण या वंदनेत कोठेही दीनता किंवा याचना दिसून येत नाही. हा मंत्र दिगंबर किंवा श्वेतांबर या दोनही पंथीयांना सारखाच पूज्य आहे. या मंत्रात व्यक्तीपूजेपेक्षा गुणपूजेलाच जास्त महत्व दिले आहे. केवळ शुद्ध आत्म्यापुढेच अनन्य भावाने शरण जावे असे सांगितले आहे.

साधारणपणे णमोकार मंत्र म्हणणारे, रात्री आहार न करणारे, पाणी गाळून पिणारे नित्य देवदर्शन करणारे ही जैन माणसाची ओळख असते. पण या आचारामागच मुख्य हेतू म्हणजे गुणांची पूजा, अहिंसापालन आणि आरोग्याचे रक्षण हाच असतो.

प्रत्येक जैन श्रमणांनी व व्रती श्रावकांनी अहिंसा, सत्य, अस्तेय (अचौर्य) अपरिग्रह व ब्रम्हचर्य या पाच व्रतांचे पालन करावे अशी अपेक्षा असते. संन्यासाश्रमात वरील पाच व्रते सुक्ष्म रूपात पाळायची असतात. म्हणून त्यांना महाव्रते  म्हणतात. श्रावकांनी ही व्रते स्थूल रूपात पाळायची असतात. म्हणून त्यांना अणूव्रते म्हणतात. जैनधर्मीय आपापल्या शक्तीनुसार व्रतांचे पालन करतात. यात कोणावरही कसलीही बळजबरी नसते.

 

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.