In this Article(pravachan) it is told that how kshama(To forgive and forget) is a basic principle of all religions.
कैवल्य चांदणे- क्षु. ध्यानसागर महाराज यांच्या
हिंदी प्रवचनांचा मराठी अनुवाद
अनुवादक-सुनेत्रा नकाते
क्षमा ही मनाबरोबरच मधुर वचनानीही प्रकट करावी. क्षमा मागणे ही फक्त वरवरची क्रिया आहे पण जर त्यात भाव भरायचे असतील तर हृदयापासून क्षमा मागायला हवी. हृदय म्हणजे हृदयाचा तो भाग की हृदयाच्या ज्या भागापासून भावना उत्पन्न होतात तो भाग. क्षमा करणे तेव्हाच संभव आहे जेव्हा आपल्याजवळ भावनात्मक हृदय असेल. सरळ वृत्तीचा क्षमा मागतो आणि जवळ हृदय असणारा क्षमा करतो. सरलतेने क्षमायाचना सहज होते. खरी क्षमा तीच की ज्याने मन शुद्ध व स्वच्छ होईल. विषारी सापाने जर सहज क्षमा केली तर ते महत्वपूर्ण असते. पण दंतविहीन विषरहीत सापाने क्षमा केली तर त्याचे काय महत्व?
विल्यम ऑकर ऑटकिनसन्स म्हणतात, “क्रोध आला तर तो तात्काळ प्रकट करू नका. क्रोधाचा आवेग टाळा. मग तो आपोआप विलीन होईल.” स्वभावत: कोणीही आवेगी नसतो. स्वभावत: तो शांतच असतो. आवेगाशिवाय आत्महत्या नसते. पण हा आवेग क्षणिक असतो. या क्षणिक आवेगात मनाचा तोल जाऊ न देता संयम बाळगणे आवश्यक आहे. अवनीश तिवारी यांनी क्रोधापासून शांत होण्यासाठी काही मुद्रा सांगितल्या. क्रोध आल्यावर दातावर दात कधीही ठेऊ नये. हाताच्या बोटांचा स्पर्श एकमेकांना होऊ देऊ नये.
क्रोध आल्यावर थंड पाणी प्यावे असेही कोणी म्हणतात. कारण त्यामुळे क्रोधामुळे उत्पन्न झालेले रस वितळतात. क्रोध आल्यावर आपला क्रोधीत चेहरा आपण आरशात पहावा. मग आपण आपली मुद्रा रागीट ठेऊ शकणार नाही. कारण आपल्याला तर आपला प्रसन्न हसतमुख चेहरा पाहण्याची सवय असते. क्रोध आल्यावर मनातल्या मनात दहा आकडे मोजावेत असेही म्हणतात. जर दहा आकडे म्हणूनही क्रोध शांत नाही झाला तर हा डोस २०, ३०, १०० आकड्यापर्यंत ही वाढवता येतो. आणि १०० आकडे म्हणेपर्यंत ज्याचा क्रोध टिकून राहतो तो बहादुरच म्हणावा लागेल. ज्याचा क्रोध आला अथवा ज्या वस्तूवर क्रोध आला तिच्याकडे न पाहता क्रोध जेथून आला तेथे पाहण्याचा प्रयत्न करावा. कोठून येतो हा क्रोध? कसा येतो? अंतरंगात हळूहळू डोकावण्याचा प्रयत्न करावा. तटस्थपणे क्रोधाकडे पाहावे. क्रोध हळूहळू शांत होईल.
श्वास हळूहळू आत घ्यावा क्रोधावर विजय मिळवलेल्या मुनींचे अथवा गुरूंचे स्मरण करावे. त्यांच्या पवित्र स्मरणाने आजूबाजूच्या वातावरणातील प्रदूषण कमी झाले असे मानावे. क्रोधामुळे निर्माण झालेले अंतरंगातील प्रदूषण कमी करण्यासाठी बाहेरील वायू आत घ्यावा. तो अंतरंगात मिसळतो आहे अशी कल्पना करावी. अशीही कल्पना करावीकी उच्छवासातून बाहेर पडणारा कार्बनडायऑक्साईड धूरमिश्रीत आहे. असे चार-पाच वेळा करावे. क्रोध शांत होईल. डावा हात वर ठेवावा. उजवा हात जमिनीपासून थोडासा वर ठेवावा. पंचपरमेष्ठींचे स्मरण करावे. असे भाव करावेत की स्वच्छ चांगल्या भावनांचे तरंग डाव्या हातामार्फत आत येत आहेत व वाईट भावनांचे तरंग उजव्या हातामार्फत जमिनीत जात आहेत. भगवंताचे स्मरण करावे. नकारात्मक उर्जा जमिनीत निघून गेली असे मानावे. नकारात्मक उर्जा स्वत: धारण केल्याबद्दल भूमीला धन्यवाद द्यावेत.
एक पहाड होता. निसर्गसौंदर्याने नटलेला होता. त्या पहाडावर एक गुंफा होती. वातावरण अत्यंत मनोहर रमणीय होते. या गुंफेत एका बुजुर्ग साधूंचा निवास होता. तेथून जवळच एक नगर होते. त्या नगरीचा राजा अत्यंत आदर्श होता. प्रजेची खूप काळजी घ्यायचा. प्रजा सुखी होती. त्या राजाने एक बगीचा करवून घेतला होता. विविध फळाफुलांची झाडे होती. या बगीच्याचा राजाला इतका मोह पडलाकी तिचे सोंदर्य जपण्यासाठी तो कोणालाही त्या बागेत बसू देईना झाला. झाडावरची फळे खाण्यासाठी येणाऱ्या पक्षांनाही तो हाकलवून लावी. झाडावरच्या फुलांना तो कोणालाही हात लावू देत नसे.
जवळच्याच जंगलात एक वानरांचा कळप होता. त्या वानरांचा प्रमुख मात्र रखवालदाराची नजर चुकवून त्या बगीच्यात येई. तिथली फळे खाऊन जाई. तो वानरप्रमुख मोठा चतुर होता. कितीही बंदोबस्त ठेवला आणि कितीही नजर ठेवली तरीही तो मोठया चतुराईने बगीच्यात येऊन फळे खाऊनच जाई. बगिच्याला जीवापाड जपणाऱ्या राजाची मनस्थिती यामुळे बिघडली. तो त्रस्त झाला. राज्यकारभारावरचे त्याचे लक्ष उडाले.
वानराचा बंदोबस्त कसा करावा याच चिंतेने तो पिडीत झाला. त्यामुळे त्याचे मंत्रीगणही त्रस्त झाले. सर्वांचेच मनस्वास्थ्य बिघडले. त्यामुळे प्रजाही त्रस्त झाली. यातून मार्ग काढण्यासाठी सर्व मंत्री गुंफावाले बाबांकडे गेले. विनयपूर्वक सर्व घटना निवेदन केली. मंत्र्यांनी साधूबाबांना विनंती केलीकी वानराला कसे पकडावे याचा मार्ग सुचवावा.
बाबा म्हणाले, “मी सकाळी स्वत: येऊन वानराला पकडेन. राजाला सांगा.” या कामासाठी बाबांनी काही सामग्री मागितली. जसेकी एक स्फटिकमण्यांचा घडा की ज्याचे तोंड अतिशय लहान आहे. एक पिंजराही मागवला. शिवाय असेपण सांगितलेकी माझ्याशिवाय बगीच्यात त्यावेळी कोणी राहू नये.
केळ्यांमध्ये सर्वात उंच झाडाची केळी सर्वश्रेष्ठ मानली जातात. ती आकाराने मात्र लहान असतात. असे एक सर्वश्रेष्ठ केळे स्फटिक मण्यांच्या घडयात ठेवण्यात आले. हा घडा स्फटिकमण्यांचा असल्याने त्यातून केळे दिसू शकत होते. हा घडा बगीच्यात ठेवण्यात आला. जेव्हा वानराने ते केळे पाहिले तेव्हा तो त्या घडयाजवळ आला. घडयाचे तोंड लहान असल्याने त्याने केळे घेण्यासाठी मूठ बांधून घडयात हात घातला. पण केळे निघू शकले नाही. वानराची मूठ मात्र घडयात अडकली. त्यामुळे वानरराजा पकडला गेला. त्याला ताबडतोब पिंजऱ्यात अडकवण्यात आले. राजा अतिशय आनंदित झाला. साधुबाबांना म्हणाला, “तुमचे आभार मी कोणत्या शब्दात मानू? आता मी या वानराकडे बघून घेईन. पण तुम्हाला या कामाबद्दल कोणता पुरस्कार देऊ?”
साधूबाबा म्हणाले, “मला पुरस्कार वगैरे काही नको. पण जर तुमची इच्छाच असेल तर या वानराला सोडून द्या.” “या वानराला कसे सोडू? याला पकडण्यासाठी तर एवढा प्रयास केला. त्याच्यामुळे केवढी बरबादी झाली.” राजा उत्तरला.
साधूबाबा म्हणाले, “नसेल सोडायचे तर नको सोडू पण मला तुझा पुरस्कार नको. हा मी चाललो.” राजा विनवणी करीत म्हणाला, “या वानराने एवढी अशांती माजवली. ह्याला कसे सोडू? ” यावर साधूबाबा म्हणाले, “ते मला काही माहित नाही. तू त्याला सोडणार आहेसकी नाही?”
अखेर राजाने त्या वानराला सोडून दिले. मग बाबा राजाला म्हणाले, “तुम्हाला प्रजेची शांती हवी आहेना?” राजा म्हणाला, “हो, हवी आहे. मग साधुबाबांनी विचारले, “राजा अशांती कोणी पसरवली? तू समजतोस की वानराने? वानराला कोणी पकडले? तू समजतोसकी मी याला पकडले?”
मग मात्र राजा विचारात पडला. त्याला समजलेकी वानर पकडला गेला तो मूठ बांधल्याने. मग साधूबाबा त्याला म्हणाले, “राजा मूठ बांधल्याने वानर पकडला गेला आणि मूठ बांधल्याने वैर तू पकडलेस. म्हणूनच सगळीकडे अशांती पसरली. तुझ्या राज्यात प्रत्येकाने पाच नियम पाळायचे असतात. ते कोणते ते तू सांगशीलका?” राजाने पाच नियम सांगितले.
“आजच्या दिवशी मी क्रोध करणार नाही. आजच्या दिवशी मी निश्चिंत राहीन. आजच्या दिवशी घडलेल्या कुठल्याही वाईट-चांगल्या घटनेबद्दल धन्यवादच देईन. आपल्या कामाला भार न समजत निष्ठेने करेन. सर्वांप्रती करूणाभाव ठेवीन.”
साधूबाबा म्हणाले, “राजा तू हे पाच नियम तोडले आहेस. वानराला सोडून दे आणि पाचही नियमांचं नीट पालन कर.”
राजाने मग वानराला सोडून दिले. त्याने पाचही नियमांचे नीट पालन चालू केले. आठवडाभराने राजा बागेत उभा होता. त्यावेळी वानरराजा परत बागेत आला. बाग परत पहिल्यासारखी फुलली होती. पशुपक्षी मानवी मनातील चांगले वाईट तरंग ओळखू शकतात. राजाला पाहूनही वानर तेथे आला. त्याने झाडावरचे फळ तोडले. तरीही राजा फक्त पहातच होता. वानर राजाच्या निकट आला. त्याने राजाच्या हातातले फळही घेतले. तरीही राजा शांतच होता. फळ घेऊन वानर आला तसा निघून गेला.
राजा मात्र शांत आणि विचारमग्न झाला. त्याला कळलेकी सगळी चूक माझीच आहे. माझ्या मनातली शांतीच सगळीकडे पसरली. प्रजापण अशांत झाली. जर विश्वशांती हवी असेल तर सर्वप्रथम स्वत:च्या हृदयात शांती प्रस्थापित करायला हवी.
शील नारीचे भूषण आहे,
सत्य पुरुषाचे भूषण आहे आणि
क्षमा वीरांचे भूषण आहे.
क्षमा वीरस्य भुषणम!