गुरु – GURU


This translation describes importance of  ‘GURU’ in our life. The word ‘GURU’ is special word. It is used in Indian education system.

कैवल्य चांदणे- जिव्हाळा प्रकाशन मूळ हिंदी प्रवचन- क्षुल्लक ध्यानसागरजी महाराज मराठी अनुवाद – सुनेत्रा नकाते

कार्तिकेय हा अश्या मातापित्यांचा मुलगा होता की ज्याचे पिता त्याच्या मातेचे  पण पिता होते. त्याचे पिता एक राजा होते. ते त्यांच्या सौंदर्यवती मुलीवरच मोहित झाले. त्यांनी दरबारातल्या विद्वानांना प्रश्न केला, “आपल्याच खाणीतील रत्नांवर कोणाचा अधिकार असतो?” विद्वान जन म्हणाले, “अर्थात खाणीच्या मालकाचा!” पण एक जैन युवकही त्या दरबारात होता. त्याने राजाच्या मनातील भाव ओळखला. तो म्हणाला, “खाणीतील रत्नांवर खाण मालकाचाच अधिकार असतो पण फक्त कन्यारत्न सोडून!” मोहवश झालेल्या राजाने त्या युवकाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले, आणि त्याने आपल्याच मुलीशी विवाह केला. त्यांच्या पोटी कार्तिकेयाचा जन्म झाला.

जेव्हा तो गुरूच्या शोधात भटकू लागला तेव्हा कुठलाही गुरु त्याला शिष्यत्व देण्यास तयार नव्हता. त्याच्या जन्मासंबंधीचे रहस्य जाणताच गुरु त्याला नाकारीत असत. त्याचा जन्म मातापित्यांच्या कलंकाशी जोडलेला असल्याने त्याला कोणी प्रवेश देत नसत. गुरूंच्या शोधात भटकत असताना एका शिलेवर विराजमान झालेले  जैन गुरु त्याला दिसले.तो त्यांच्या चरणाशी नतमस्तक झाला. गुरु म्हणाले, “ये कार्तिकेया, वत्सा ये!” हे शब्द ऐकून कार्तिकेय आश्चर्य विभोर झाला. त्याला वाटले, यांनी माझे नाव कसे जाणले? कदाचित हे माझे जन्म रहस्य ही जाणत असतील. त्याच्या मुखमंडलावरील आश्चर्य पाहून गुरु म्हणाले, “एकदा तुझ्या पित्याने दरबारातील विद्वानांना प्रश्न विचारला होता, “खाणीतील रत्नांवर कोणाची मालकी असते?” तेव्हा एक जैन युवा तरुण म्हणाला होता, “फक्त कन्यारत्न सोडून इतर रत्नांवर खाणीच्या मालकाचा अधिकार असतो.” तेव्हा असे सांगणारा जैन तरुण मीच होतो.”

जैन गुरूंनी कार्तिकेयाला फक्त ओळखलेच नाही तर त्याचा स्वीकारही केला. ते म्हणाले, “धर्मपालनाचा अधिकार पात्रतेप्रमाणे सगळ्यांनाच असतो.”  यावेळी कार्तिकेयाची मानसिक व शारीरिक स्थिती अत्यंत सैरभैर झाली होती. म्हणून गुरूंनी त्याला प्रकृतिच्या सान्निध्यात जलप्रपातांच्या सान्निध्यात महिनाभर राहून परत येण्यास सांगितले.

जंगलातील प्राकृतिक फळे, झऱ्यांचे शुद्ध पाणी, जंगलातील निर्मल हवा, सुंदर सुगंधित फुले याचा त्याने आनंद घेतला. त्याचे शरीर व मन प्रसन्न झाले. महिन्या भराने तो गुरूंकडे परतला. सूर्योदय होताच तो गुरुचरणांपाशी आला. महिन्याभरात त्याची आकुळ व्याकुळ स्थिती बदलली होती. तो प्रसन्नचित्त दिसत होता. गुरूंनी विचारले, “काय केले महिनाभर?” “प्रकृतिच्या सान्निध्यात राहिलो. तिथल्या सुंदरतेचा अनुभव घेतला.” कार्तिकेय उत्तरला. मग गुरु एका पाठोपाठ एक असे प्रश्न विचारीत गेले आणि या साऱ्या प्रश्नांची उत्तरे कार्तिकेय देत गेला, पण मौनातच. पक्ष्यांचा कलरव कोणी ऐकला? फुलांचा सुगंध कोणी घेतला? प्रकृतिचे सौंदर्य कोणी पहिले? सुगंधित वायू लहर कोणी अनुभवली? फळांचा स्वाद कोणी घेतला?

कार्तिकेय मनातच म्हणत राहिला, ‘पक्ष्यांचा कलरव कानाने ऐकला. सुगंध नाकाने घेतला. वायू लहर त्वचेने अनुभवली. प्रपातांचे सौंदर्य डोळ्यांनी पाहिले. फळांचा स्वाद जिभेने घेतला.’  मनातच तो विवेचन करीत राहिला. पण या सर्वांना ग्रहण कोणी केले? प्रत्येक ठिकाणी मी ऐकलं, मी पाहिलं, मी अनुभवलं, असं मी म्हणालो. हे कसलं बरं गूढ रहस्य आहे?  मी ऐकलं, पाहिलं, अनुभवलं, चाखलं असं म्हणणारा तो ‘मी’ कोण आहे?

कार्तिकेयाच्या मनात उठलेल्या त्या मौन प्रश्नांना गुरु ऐकत होते. पण त्याच्या चिंतनात ते आडवे येत नव्हते. अंतिमतः कार्तिकेयाने गुरुचरणी हात जोडले आणि तो म्हणाला, “तो ‘मी’ कोण आहे? हे रहस्य फक्त गुरूच उलगडून दाखवू शकतात.”

जैन दर्शनात पंच परमेष्ठींना गुरु मानतात. पंचपरमेष्ठी मधील अरिहंत, सिद्ध, देवपदाला पोहोचलेले असतात. लिंडा गुडमन, गॉडेस ऑफ एसट्रोलॉजी म्हणते की, गुरूला कुठलाही पर्यायवाचक शब्द नाही. ‘गुरु’ शब्दापुढे इतर सर्व शब्द फिके पडतात. म्हणून या शब्दाचा जसान तसा स्वीकार केलेला आहे. गुरु- या शब्दातील, g – जी-अहो, आदरणीय  u –  यु – तू  r –  आर- आहेस  u –  यु- तू म्हणजेच तू ‘तू’ आहेस असा परिचय करून देणारे ते गुरु! गुरु म्हणजे जे तुम्हाला परिचय करून देतात. तुमच्यातल्या जीवाचा परिचय करून देतात.

जीव सिद्धांतातील जीव म्हणजेच आत्मा होय. काही लोक आत्म्याबद्दल संदेह बाळगतात. काहीजण जाणू इच्छितात की खरंच आत्मा आहे का? पण आत्म्याला जाणणारे  आणि जाणून त्याचा आनंद प्राप्त करणारे दुर्लभ असतात. आत्मानंद प्राप्त करणे सर्वात कठीण काम आहे. मृत शरीर असते की ज्याला आपण शव म्हणतो. हे शवसुद्धा नाक, कान, जीभ, डोळे, त्वचा या इंद्रियासहितच असते. पण ही सगळी इंद्रिये असुनसुद्धा शव बोलत नाही, ऐकत नाही, पहात नाही. पंचेंद्रिये म्हणजे तर फक्त खिडक्या असतात. या खिडक्यानद्वारे पाहणारा, ऐकणारा, बोलणारा, कोणी दुसराच असतो. ते शरीर नसते. जिवंत शरीरात कोणी होतं. शरीर मृत झाल्यावर ते निघून गेलं. जे मागे राहिलं ते फक्त त्याचं शरीर! ते शरीर म्हणजे तो नव्हता. निघून गेला तो वेगळा आणि मागे राहिला तो वेगळा आहे. म्हणून दोघांना एक समजणे चूक आहे. शरीर जीव नाही आणि जीव शरीर नाही.

जेव्हा जीवाचं मिथ्याज्ञान नष्ट होतं, सम्यक प्रकाश प्रकाशित होतो तेव्हाच शरीर व जीवाचं वेगळेपण जाणवतं. अश्या या जीवाचा परिचय करून देणारे, तू ‘तू’ आहेस हे सांगणारे गुरु असतात. ते जीवनाचं रहस्य उलगडून दाखवू शकतात.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.