समकालीन मराठी जैन कथा चळवळीची विशिष्ट अशी विचारप्रणाली आणि भूमिका यांचे स्वरूप पुनीत या पहिल्याच कथासंग्रहात अगदी ठळकपणे स्पष्ट झाले आहे. पुनीत ते कथानुयोग असा सात संग्रहांचा हा ठेवा मराठी ललित साहित्यात जतन करून ठेवावा असाच आहे.
कथा चळवळीतील अनेक ज्येष्ठ लेखक लेखिका, समीक्षक यांचे लेखन, मत मतांतरे, समीक्षात्मक लेखन पाहिल्यास या चळवळीमागील प्रेरणा, उद्दिष्ट सुजाण वाचकाला सहज कळू शकते.
या चळवळीतील कार्यकर्त्यांनी साहित्यिकांनी अहिंसा, शाकाहार, अनेकांतवाद, वीतराग विज्ञान यांच्याशी असणारी बांधिलकी चळवळीतील लेखक लेखिकांवर जबरदस्तीने लादलेली नाही.
खरे पाहता जैन साहित्यिकांत ही बांधिलकी थोड्याफार फरकाने उपजतच असते. पण अश्या उपजत बांधिलकीमुळे आपल्या कथांचे मूल्यमापन वेगळ्या वाङ्मयीन कसोट्यांवर व्हावे असा त्यांचा मुळीच आग्रह नसतो. अशी बांधिलकी असल्याने ते साहित्य प्रचारकी वाटते, ठरते असे कोणाला वाटत असेल तर ते त्यांचे मत पूर्वग्रहदूषितच समजले पाहिजे.
आपण स्वतः जगत असलेल्या धार्मिक जीवनाबद्दल जर साहित्यिकांना रस असेल तर त्यांची ही बांधिलकी त्यांच्या जीवनविषयक आकलनातून आपोआपच प्रस्फुटीत होत असते.
समकालीन मराठी जैन कथा चळवळीतील लेखिका नीलम माणगावे यांचे कथालेखन हे त्यांच्या जीवनविषयक आकलनातून, स्त्रीवादी जाणिवेतून, धार्मिक संस्कारातून प्रस्फुटीत झालेले आहे. त्यांचे कथालेखन हे विशिष्ट प्रादेशिक बोलीभाषेतून त्या भागातील ग्रामीण जैन समाजाचे, बहुजन समाजाचे आणि त्यातल्या स्त्रियांचे दर्शन घडवणारे आहे. त्या त्या भागातील चालीरीतींचे वर्णन करणारे आहे.
या चळवळीत त्यांचा सहभाग पुनीत या पहिल्या कथा संग्रहापासूनच आहे. त्यांची शासन या सहाव्या कथासंग्रहातील “जन्मोत्सव” कथा रेवती नावाच्या जैन कुटुंबातील स्त्रीची आहे. रीतसर घटस्फोटही न देता लग्नानंतर काही दिवसातच नवऱ्याने टाकलेल्या बाईची ही कथा आहे. लग्नानंतर वीस वर्षे ही बाई नवऱ्याने टाकलेली बाई म्हणूनच जगते आहे.
या कथेतल्या रेवतीला मधुचंद्राच्या रात्री नवऱ्याने स्पर्शही न करता टाकून दिलेले आहे कारण ती त्याला आवडत नाही. म्हणूनच या रेवतीने पतीला परमेश्वर वगैरे मानण्याचा प्रश्नच येत नाही.
आईवडील, भाऊभावजया, काका काकू यांनी भरलेल्या घरात रहात असूनही ती एकटी आहे. पण तरीही या एकटेपणातही एक माणूस म्हणून, स्त्री म्हणून तिची जगण्यावर श्रद्धा आहे. म्हणूनच पंचकल्याणिकांसारख्या धार्मिक महोत्सवातून दाखवले जाणारे रंगमंचीय कार्यक्रम ती मन लावून पाहते. त्यात दंग होते, गुंगून जाते, हरवून जाते.
पंचकल्याणिक महोत्सवात गर्भकल्याणिकाच्या कार्यक्रमात तीर्थंकरांची माता झालेली देखणी सुमित्रा तिच्या डोळ्यासमोरून हलत नाही.
नवाकोरा शालू, भरगच्च हार गजरे, सोन्यामोत्यांचे दागिने, कपाळावरचा झगमगता किरीट ल्यायलेली सुमित्रा तीर्थंकर माता होऊन तीर्थंकर पित्याला म्हणजे स्वतःच्याच नवऱ्याला तिला पडलेल्या सोळा स्वप्नांचे अर्थ विचारते. मग तो तीर्थंकर पिता बनलेला तिचा नवरा आपल्या परमप्रिय देखण्या पत्नीला त्या स्वप्नांचे अर्थ उलगडून सांगतो.
प्रेक्षकात बसलेली रेवती भारावल्यासारखी मंत्रमुग्ध होऊन त्या स्वप्नांचे अर्थ ऐकत राहते. कित्येक पंचकल्याणिके पाहून ऐकून ते अर्थ तिला तोंडपाठ झालेले असले तरी ती पुन्हा पुन्हा त्यात रमते. सुमित्राच्या ठिकाणी स्वतःला पाहू लागते.
नवऱ्याने टाकलेली बाई म्हणून जगताना ही रेवती पूर्ण घेरली गेली आहे. ती फारशी शिकलेली किंवा कलागुणसंपन्नही नाही. म्हणूनच घरकामाव्यतिरिक्त मनाला रिझवण्याचे, वेळ घालवण्याचे दुसरे कुठलेही साधन तिच्याकडे नाही. कला साधनेत रमावे अशी तिच्या भोवतालची परिस्थितीही नाही. मग अश्या धार्मिक पूजा महोत्सवाच्या प्रसंगीच तिचे अंतर्मन गाऊ लागते. स्वप्नरंजनात रमू लागते.
विसाव्या वर्षीच लग्न झालेल्या पण नवऱ्याचा स्पर्शही न झालेल्या या बाईचे मनोविश्व, भावविश्व गेल्या वीस वर्षात पुरते उध्वस्त झालेले आहे. रात्री भाऊभावजयाच काय पण आई वडीलही आपापल्या खोल्यात झोपायला गेलेकी तिच्या छातीत धडधडायचं. तिच्याही शरीराचं काही एक मागणं असायचं. मग अशावेळी ती भक्तामरस्तोत्र म्हणे, णमोकाराचा जप करे. हातपाय पोटाशी घेऊन चटईवर पडून राही.
अशाप्रकारे रेवतीच्या रुक्ष वास्तव जीवनाचे, तिच्या उध्वस्त मनःस्थितीचे दर्शन घडवणारी कथेत आलेली ही वर्णने तिच्या जीवनातला अभाव आणि तृष्णा दाखवतात. नवऱ्यापासून किंचितही शरीरसुख न मिळालेल्या तिच्या अचेतन मनात अनेक प्रकारच्या अतृप्त कामना, इच्छा किंवा सहज प्रेरणा तृप्तीसाठी धडपडत असणे अत्यंत स्वाभाविकच वाटते.
रेवतीला नवऱ्यापासून न मिळालेल्या शरीरसुखाची तहान आहे. कारण तिचं शरीर सुदृढ आहे, शरीरात लाखमोलाचं गर्भाशय आहे. म्ह्णूनच तिच्या मनात आई होण्याची ओढ, आस आहे. पण तिला आई होता येणार नाही याचं तिला दुःख आहे. तिच्या आजूबाजूच्या स्त्रिया, समाजातली माणसे सुद्धा बाईमधल्या फक्त रतिप्रतिमेलाच महत्व आणि मानसन्मान देणारी आहेत.म्हणूनच तिच्या मनाचा होणारा कोंडमारा अपरिहार्यपणे तिच्याही नकळत तिला स्वप्नरंजनात रमवतो. कल्पनेने का होईना मग ती तिची तृष्णा शमविण्याचा प्रयत्न करते.
तिच्या नेणिवेतील सुप्त इच्छाही तिला रतिप्रतिमेतच अडकवून ठेवतात. म्हणूनच तिच्यातल्या बाईला त्या प्रतिमेतून सहजासहजी बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही. म्हणूनच ती रंगमंचावरील पात्रांच्या भूमिकेत शिरते. सोळा स्वप्नांच्या मालिकेत संचार करू लागते.
त्या रात्री झोपल्यावरही ती सोळा स्वप्नांची मालिका पुन्हा पुन्हा पाहू लागते. तिला वाटू लागतेकी, आपण तीर्थंकर माता आहोत. आपल्या पोटी तीर्थंकर जन्माला येणार या कल्पनेत रंगून सुखावते…पण दुसऱ्याच क्षणी भीतीने ताठरते… तिला वाटतेकी आपल्या पोटी जन्माला येणारा मुलगा आपल्या बायकोशी कसा वागेल… तू मला आवडत नाहीस असं म्हणून तिला टाकून तर देणार नाही… या विचाराने ती उठून बसते. तिच्या हातापायाला थरथर सुटते.
पण तेवढ्यात तिची आई तिला उठवायला येते. घरात बायकांचा आक्रोश चालू असतो. तिला कोणाकडून तरी कळते कि तिचा नवराच मेलाय…
मग भर मध्यरात्री तिला बळेबळेच जीपमध्ये कोंबून घरातली बायका पुरुष मंडळी तिला नवऱ्याच्या गावी नेतात.
सारी मंडळी जेव्हा गावात पोहोचतात तेव्हा त्यांना बघून आठ दहा माणसांचे टोळके निर्लज्जपणे हसत बाहेर येते. तेव्हा नंतर कळतेकी तिच्या नवरा मेलेला नसतोच. पण त्याने मित्रांशी अशी पैज लावलेली असतेकी, बायकोला मी टाकलेले असूनही माझ्या मृत्यूची बातमी ऐकून ती धावत पळत येईल.. आणि घरच्या लोकांमुळे रेवतीला नको असतानाही तिथे यावेच लागते.
हे सगळे कळल्यानंतर मात्र रेवतीच्या मनातला धुमसणारा राग, गेल्या वीस वर्षात तिच्या अंतरीची झालेली घुसमट तिच्या दबलेल्या इच्छांचे पोट फाडून बाहेर येते. तिच्या अंतःकरणातील आग धुरासकट उफाळून बाहेर येते.
परत गावी जाण्यासाठी तिच्या घरची माणसे जेव्हा तिला जीपमध्ये बसवत असतात तेव्हा ती नवऱ्यावर कडाडते, “आज माझ्या दृष्टीने तू खरोखरच मेलास… मी आज खरी विधवा झाले. गळ्यातलं मंगळसूत्र त्याच्या हातात देत ती म्हणते, हे मंगळसूत्र विकून टाक, त्यातले पैजेचे पैसे काढून घे .. उरलेले पैसे तू जेव्हा खरोखर मरशील तेव्हा अग्निसंस्काराला वापरण्यासाठी लावून ठेव….पहाटे घरी आल्यानंतर ती आईला म्हणते, बस्तीतला स्पीकर लागलाय, आज भगवंताचं जन्मकल्याणिक आहे .. आठ वाजता.. मंदिराकडे जायचं आहे.. असे म्हणून बाथरूममध्ये जाऊन थंड पाण्याची बादली डोक्यावर ओतून घेते … तेव्हा तिला वाटते…आज आपला नव्याने जन्म झालाय. आपलाही जन्मोत्सव साजरा होतोय. …
अशी ही उपेक्षित,पीडित स्त्रीच्या दुःखाचे भावभावनांचे, व्यथा वेदनांचे सर्वांगसुंदर दर्शन घडवणारी व त्यातूनच तिच्यातल्या बाईला नवा जन्म देऊ पाहणारी कथा…
खरेतर बाई असो की पुरुष… माणसाची, माणूस या प्राण्याची आदिम गरज प्रेम आहे आणि तीच त्याची अंतिम गरजही आहे. पण या कथेतल्या रेवतीने प्रेम कोणावर करावे, कशासाठी करावे हाच मोठा पेच तिच्यापुढे आहे. नवऱ्यावर करावे तर नवऱ्याला ती आवडत नाही म्हणून नवऱ्याने तिला टाकून दिले आहे. आईवडिलांवर करावे तर त्यांनी तिला या लग्नबंधनात तसेच अधांतरी ठेऊन दिले आहे. समाजावर करावे तर हा समाज मेंढराप्रमाणे अंध रूढी परंपरांच्या मागे मागे जात आहे…
लग्नानंतर तिची मानसिकता नवऱ्याला शरीरसुख देण्याची आहे. त्याचप्रमाणे त्याच्याशी मनानेही एकरूप होण्याचीही आहे. पण लग्नानंतर नवऱ्याने जरी तिला टाकले आहे तरी तिचा समाज तिला या मानसिकतेतून बाहेर येऊ देत नाही.
पण या कथेच्या शेवटी अशी एक घटना घडतेकी तिची ही मानसिकता अकल्पितपणे बदलते. तिच्या स्वत्वाला जाग येते. म्हणूनच लग्नानंतर वीस वर्षे शेळीसारखी जगणारी रेवती, नवऱ्याविरुद्ध एकूणच नवरेशाहीविरुद्ध ब्र उच्चारण्याचे धाडस दाखवते.
पंचकल्याणिक महोत्सवातील गर्भकल्याणिकाचा सोहळा तिच्या नेणिवेतल्या वात्सल्याला जसा जागृत करतो तसेच तिच्या नवऱ्याने तिची केलेली क्रूर थट्टा तिच्यातल्या बाईला नवा जन्म देते. खरेतर हा जन्मोत्सव, कथेतला जन्मोत्सव तीर्थंकरांचा नसून रेवतीच्या स्त्रीपणाचा आहे… तिच्यातल्या स्त्रीला तिने स्वतःच नवा जन्म दिला आहे.. त्याचा जन्मोसव ती साजरा करते आहे.
बाईमधली करुणा, तिचे समर्पण, तिच्यातली सर्जकता, तिची नवनिर्मितीची क्षमता तिच्यातला संयम ही तिची बलस्थाने असतात असा संदेश देणारी ही कथा स्त्रीवादी जाणिवांचे अनेक पदर उलगडून दाखवणारी आहे. या कथेत लेखिकेने रेवती या पात्राचे मनोविश्लेषण करताना रेवतीबरोबर एकंदर ग्रामीण अशिक्षित कृषी संस्कृतीतीलया बायकांचेही मनोविश्लेषण घडवले आहे.
समाजातील धार्मिक, आर्थिक, कौटुंबिक, शैक्षणिक, राजकीय अश्या सर्व व्यवस्थांचे एकमेकात गुंतलेले जे जाळे असते त्याला समाजशास्त्रीय व्यूह म्हटले जाते.
जन्मोत्सव ही कथा स्त्रीच्या जीवनावर या व्यूहाचा कसा परिणाम होतो हे दाखवते. विवाह व्यवस्थेतून स्त्रीची होणारी गळचेपी, नवरा या प्राण्याची संवेदनशून्यता यांचे दर्शन घडवते.
आजमितीस पुरुष हा बहुसंख्यांक व स्त्री ही अल्पसंख्यांक मानली तर या बहुसंख्यांक समाजाला त्यांनी केलेल्या अत्याचारांची, त्यांच्यात निर्माण झालेल्या दोषांची जाणीव करून देणारी ही कथा आहे.
स्त्री ही पुद्गल वस्तू नसून तिच्यातही पुरुषासारखाच जीव असतो. तिच्यातही करुणा, दया, वात्सल्य, वीरत्व असते. स्त्री ही माणूसच आहे आणि पुरुषही माणूसच आहे. मग माणसांनीच माणसांवर केलेले अत्याचार साहित्यातून मांडण्याचा अधिकार स्त्रीला नक्कीच आहे आणि ते ती प्रभावीपणे मांडतही आहे.
या कथेपुरता जरी येथे पुरुष हा पीडक आणि स्त्री ही पीडित मानली तर या कथेतूनच पीडकाने केलेल्या अन्याय्य वर्तनाचे अनेक पातळ्यांवरून अनेक अर्थ लावता येतात. पीडक आणि पीडित यांच्यात जे द्वंद्व चालू असते त्याचेच हे अर्थ असतात. येथे पीडकाच्या अन्याय्य वर्तनामुळे पीडिताच्या भडकलेल्या मनाचा उद्रेक होतो. यातूनच विद्रोह करणे, बंडखोरी करणे व्यक्तीला किंवा समाजाला भाग पडते. म्हणूनच पीडक आणि पीडित यांच्यातल्या द्वंद्वाचे अर्थ विद्रोही व्यक्ती, विद्रोही समाज यांच्याबरोबरच इतरांनी किंवा तटस्थ व्यक्तींनी, तिऱ्हाईत व्यक्तींनीही प्रामाणिकपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणे हे माणूस म्हणून त्यांचे कर्तव्य असते.
येथे विद्रोह हा भडकलेल्या मनाचा उद्रेक असला तरी या उद्रेकामुळेच पीडक, पीडित आणि तटस्थ व्यक्ती यांच्यात सुसंवाद घडण्यास हळूहळू सुरुवात होते. यामुळेच परस्पर पोषक अशी समाजरचना हळूहळू घडण्यासही सुरुवात होते. या समाजात मग धर्म हे विद्रोहाचे कारण नसून माणुसकीशून्य वागणूक हे विद्रोहाचे कारण असते.
कोणत्याही धर्माची मूल्ये ही माणुसकीचीच मूल्ये असतात. कलावाङ्मयसुद्धा धर्माचीच सेवा करत असते. ललित साहित्यातून धार्मिक तत्वांचा, पौराणिक कल्पनांचा प्रतीकांचा वापर जरी हेतूपूर्वकही कोणी केला तर त्यात कोणाला गैर वाटण्याचे कारणच काय… फक्त तो हेतू माणसांसाठी, सृष्टीतील सर्व वनस्पती व प्राणिमात्रांसाठी कल्याणकारी असावा एवढे लक्षात ठेवले तर पुरेसे आहे.
प्रत्येक समाजाची धर्मशास्त्रे, पुराणे, ग्रंथ, यांचा त्या त्या समाजाच्या जडणघडणीत महत्वाचा वाटा असतो. त्यांचा ठसा त्यावर उमटलेला असतो. त्यामुळे या कथेच्या निमित्ताने असे म्हणावेसे वाटते की धर्मनिरपेक्ष साहित्यातूनही अर्थपूर्ण प्रेरक धार्मिक कल्पना, पौराणिक कथेतल्या देवदेवतांच्या कल्पना नवनव्या समाजोपयोगी अर्थाने जतन करणे हे त्या त्या समाजातील साहित्यिकांचे कर्तव्यच आहे.
जन्मोत्सव- लेखिका नीलम माणगावे, कथासंग्रह शासन, (समकालीन मराठी जैन कथासंग्रह भाग ६), पृष्ठ क्र. १ ते १२
संपादन- धनंजय शहा, सुमेरू प्रकाशन
आस्वादात्मक समीक्षा – लेखिका सौ.सुनेत्रा नकाते