Flower jasvandi blooms in all seasons. Its origin is in China. We offer jasvandi flowers to God Ganpati. Botanical name of jasvandi is hibiscus rosa sinensis. In Sanskrit language jasvandi is known as japa. In Bangla it is known as jabakusum.
Jasvandi is fresh red coloured flower. Flower looks like a bell or ear-drops(Zumaka).
‘Japa-kusumeche kundle’ is a story of a snowwhite girl. This girl is very loving, caring and beautiful. At the end of the story snowwhite girl becomes(turns into) a dewdrop.
कथाफुलांच्या- सुमेरू प्रकाशन
पूर्व प्रसिद्धी- आनंद मासिक, दिवाळी २००३
तो एक विशालकाय पर्वत होता. तो करड्या मातकट रंगाचा नव्हता की हिरवागारही नव्हता. तो पर्वत होता पांढऱ्याशुभ्र रंगाचा! सतत बर्फाची दुलई पांघरून बसलेल्या त्या पर्वताचे कडे अगदी आकाशाशी स्पर्धा करीत. त्या पर्वतावर एका बर्फाच्या घरात एक आजीबाई रहायची. एकटीच होती ती. शेजारीपाजारीसुद्धा कोणीच नव्हते. हुडहुडी भरवणाऱ्या थंडीत आपल्या बर्फाच्या घरात ती शेकोटी पेटवायची. तिच्या उबेत बसून स्वप्नं रंगवायची.
तिला वाटे आपल्याला एखादी चुणचुणीत नात असती तर किती बरं झालं असतं. तिने आपल्यासाठी गरमागरम चहा बनवला असता अन आपले पायही चेपले असते. स्वत:च्या एकटेपणाला एकदा आजीबाई खूप कंटाळली. मग बसल्या बसल्या तिने बर्फाची एक छोटी मुलगी बनवली. ती शुभ्र वर्णाची अन बाहुलीसारखी सुंदर होती. तिचे केस मेघमालेप्रमाणे घनदाट कुरळे कुरळे होते. आजी बाईने मग त्या मुलीच्या कानात जोरात फुंकर मारली. तशी ती मुलगी आपल्या भुंग्यासारख्या काळ्याशार डोळ्यांची उघडझाप करू लागली. चालू लागली आणि बोलूही लागली. ते पाहून आजीबाईंना इतका आनंद झाला इतका आनंद झाला की आनंदाने त्यांची शुद्धच हरपली.
थोड्या वेळाने ती जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा ती हसरी हिमकन्या तिच्या पायाशी बसून तिच्या पायांचे गार गार झालेले तळवे आपल्या मऊमऊ हातांनी चोळत होती. ते पाहून आजीबाई अत्यानंदाने उठून बसली. मग या हिमकन्येने तिला नक्षिदार कपातून शेकोटीजवळ ठेवलेल्या किटलीतला चहा दिला. आजीबाईंनी तिला आनंदाने जवळ घेतले आणि त्या म्हणाल्या, “माझी गुणाची पोर ती! कुठे होतीस इतके दिवस? किती दिवस वाट पहायला लावलीस मला? आता कुठेही जाऊ नकोस. सदोदित माझ्या नजरेसमोरच रहा. अगदी फुला सारखी हसत रहा.”
“हो! हो! मी हसेन फुलासारखी. पण फुलं कशी हसतात? कशी दिसतात? अन माझं नाव काय आहे?” चिमुकल्या हिमकन्येने अगदी निरागसपणे विचारलं. तेव्हा आजीबाई म्हणाली, “तू अगदी फुलासारखी सुंदर आहेस आणि हसतेसही अगदी फुलांसारखीच गोड! म्हणून मी तुला कुसुम म्हणेन. जपाकुसुम म्हणेन. जपा! माझी लाडकी जपा!” तेव्हापासून जपा आजीबाईंची सेवा करू लागली. तिचे कपडे धुऊ लागली. तिला गोड आवाजात गाणी म्हणून दाखवू लागली.
एकदा काय झालं आजीबाईंचे पाय चेपता चेपता जपेला डुलकी लागली, अन तिला स्वप्न पडलं. स्वप्नात ती चालत चालत एका गर्द वनात आली. तिथलं गावात पोपटी होतं. फुलं सुगंधी होती. जलाशय शुभ्र पाण्याने भरले होते. पक्षी गाणी गात होते. तेवढयात तेथे एक वनपरी आली. तिने जपेला वेगवेगळ्या अलंकारांनी सजवलं. गळ्यात मोत्यांचे सर कर्णफुले घातली. वाऱ्याने ती कुंडले मोहकपणे डोलू लागली. जपेने मग जलाशयातल्या त्या नितळ पाण्यात डोकावून पाहिलं तेव्हा तिला प्रथमच कळलं की आपण खूप खूप सुंदर आहोत आणि या दागिन्यांमुळे आपलं सौंदर्य अधिकच खुललंय. मग त्या पाण्यात जपा डोकावून पाहू लागली. पाहता पाहता तोल जाऊन पडली. दचकून ती झोपेतून जागी झाली तेव्हा आजीबाई तिच्याचकडे पाहून हसत होती.
त्यानंतर मग रोजच आजीबाईचे पाय चेपता चेपता जपेला डुलकी लागे. मग स्वप्नात ती त्या वनात जायची. वनपरी तिला रानावनातून हिंडवायची तिथल्या गमतीजमती दाखवायची. एकदा ती जपेला म्हणाली, “असं फक्त स्वप्नात किती दिवस भेटायचं आपण? एकदा जागेपणी येना या वनात.” तेव्हा जपा म्हणाली, “खरं तर या एकाकी बर्फाच्या घरात रहायचा मलाही खूप कंटाळा येतो. पण मी काय करू? आजीबाई मला क्षणभरही नजरेआड होऊ देत नाही.”
“मग काय तू तुझं सर्व आयुष्य तिच्या सेवेत व्यर्थ घालवणार?”
“व्यर्थ कसं घालवेन? पण तिची सेवा करणं हे माझं कर्तव्यच नाहीका? कारण तिनेच मला आकार दिला, माझ्यात प्राण फुंकला.”
त्यावर वनपरी हसून म्हणाली, “हो तर, तिची सेवा करणं हे तुझं कर्तव्यच आहे. तिने तुला नवजीवन दिलं हेही खरं आहे पण म्हणून तुझं आयुष्य हे थोडंही तुझं नाही काय? मग तुझ्या या अस्तित्वाला अर्थच काय उरला?”
वनपरीचं बोलणं ऐकून जपा थोडी विचारात पडली. पण तिने मनात विचार केला, ‘म्हातारीचे आता नाहीतरी किती दिवस उरलेत? पण ती आहे तोपर्यंत मला तिला आनंदी ठेवायलाच हवं. तिच्या मृत्यूनंतर मग मी मला हवी तशी जगेन. हिरव्यागार वनात जाऊन कायमचीच तिथे राहीन.”
त्यानंतर जपा आजीबाईंची मनोभावे सेवा करू लागली. वनपरी तिला रोज स्वप्नात भेटतच राहिली. एके दिवशी वनपरी तिला म्हणाली, “म्हातारीला संपवणं तुझ्या हातात आहे. म्हातारीचा प्राण तिच्या लाल रंगाच्या काठीत आहे. काठी जळाली की म्हातारी मारून जाईल.” हे ऐकताच जपा दचकून जागी झाली. तिने पाहिलं तर आजीबाई शांतपणे झोपली होती. तिच्या बिछान्याजवळ तिची लाल रंगाची काठी होती. जपेने ती काठी हातात घेतली पण शेकोटीत टाकलीच नाही. उलट तिने ती काठी शेकोटीपासून खूप लांब खिडकीजवळ ठेवून दिली. ती म्हणाली, “मला आता या काठीला खूप खूप जपायला हवं.”
त्यानंतर काही दिवस गेले. हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागली. एका रात्री त्या बर्फाच्या एकाकी घरात जपा आणि आजीबाई शांतपणे झोपल्या होत्या. तेव्हा अचानकपणे वादळ सुटलं. विजेचं तांडव सुरु झालं आणि पाहता पाहता विजेचा लोळ खिडकीतून आत आला. काठीवरच पडला. काठी जळू लागली. जपा झोपेतून जागी झाली तेव्हा काठी जळत होती आणि आजीबाई शांतपणे तिकडेच पहात होती. जपा धावत जाऊन काठीला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करू लागली. तेव्हा आजीबाई तिला म्हणाली,
“नको नको बाळ, नको विझवू ती आग’
जळून जाउदे त्या काठीला, होऊन जाऊदे तिची राख!”
मग अचंबित झालेल्या जपेला ती म्हणाली, “तुला स्वप्नात भेटणारी वनपरी मीच आहे. एका वठलेल्या वयोवृद्ध वडाची मी चेष्टा केली तेव्हा मला असं एकाकी जराजर्जर जीवन जगण्याचा शाप मिळाला. शापातून लवकर मुक्त होण्यासाठी मीच तुला ती काठी जाळायला सांगत होते पण तुझा चांगुलपणा तुला तसं करू देत नव्हता. तुझं मनही या बर्फाच्या कायेप्रमाणे निर्मल आहे. आज मी शापमुक्त होत आहे पण त्याआधी मी तुला तुझ्या प्रामाणिक सेवेबद्दल एक भेट देणार आहे. असं म्हणून तिने आपल्या उशीखालून एक मखमली डबी काढली. त्या डबीत लालजर्द कर्णफुलांची जोडी होती. त्याचा आकार पाच पाकळ्यांच्या घंटेप्रमाणे होता. आतल्या वेलांटीदार दांडीवर माणिकमोती लगडले होते. त्या कर्णफुलांचा लाल केशरी प्रकाश खोलीभर पसरला होता. आजीबाईने ती कर्णफुले आपल्या हाताने जपेच्या कानात घातली आणि शांतपणे प्राण सोडला.
त्यानंतर जड अंत:करणाने जपा त्या बर्फाच्या घरातून बाहेर पडली. स्वप्नातलं वन शोधायला निघाली. बर्फाच्या वाटेवरून एकाकीपणे चालताना तिला बर्फावरून घसरत येणारी एक घसरगाडी दिसली. त्या घसरगाडीत गोबऱ्या गालांचा, अपऱ्या नाकाचा, बारीक डोळ्यांचा आणि पिंगट रंगाचा एक मुलगा बसला होता. जवळ येताच तो तिला म्हणाला, “कुठे चाललीस तू? तुझं नाव काय?”
“मी स्वप्नातल्या वनात चाललेय, जिथे पोपटी गवत आहे. सूर्याचे चमकदार किरण आहेत. फांदयांचे झोपाळे आहेत.” यावर तो छोटुकला हसला आणि म्हणाला, “तुझ्या स्वप्नातलं वन या बर्फाच्या पलीकडल्या देशात आहे. मी तिथेच राहतो. चल माझ्या बरोबर.” जपा मग बर्फाच्या घसरगाडीत बसून बर्फाच्या वाटेवरून पर्वतापलीकडच्या देशात गेली. जिथे बर्फाची वाट संपली तिथे तिच्या स्वप्नातलं वन होतं. त्या वनात त्या मुलाचं घर होतं. जपेला ते खूप खूप आवडलं. छोट्याने जपेला आपल्या घरात नेलं आणि सांगितलं, “या सुंदर हिरव्यागार वनात सकाळी आणि संध्याकाळी तू हवी तेवढी फिरत जा पण दुपारच्या वेळी मात्र जाऊ नकोस. नाहीतर सूर्याच्या प्रखर उन्हाने तू वितळशील आणि नाहीशी होशील.”
दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठून जपा वनात गेली. वेलीवर फुलं डोलत होती. पक्षी किलबिल करीत होते. पूर्वेकडून सूर्यबिंब वर येऊ लागलं तेव्हा त्याच्या सोनेरी किरणांनी साऱ्या वनराईवरून जणू जादूची कांडीच फिरवली. आंब्याच्या डहाळीवर बसून जपा गाऊ लागली. फुलपाखरांच्या मागे धावत सुटली. गाताना धावताना तिला काळवेळ याचं भानच राहिलं नाही. ती अखंड धावत होती, गात होती, डोलत होती… आणि अचानकपणे तिला भोवळ येऊ लागली.
तिने घाबरून आकाशाकडे पाहिलं तेव्हा सूर्यबिंब अगदी माथ्यावर आलं होतं. त्याच्या प्रखर किरणांनी जपेच शरीर वितळू लागलं. तिच्या सर्वांगाची लाही लाही होऊ लागली. घाबरून तिने जवळच्याच एका हिरव्यागार रोपट्यावर उडी मारली. पण त्या रोपट्याचा गारवा तिला फार काळ वाचवू शकला नाही. हळूहळू तिचं बर्फाचं शरीर नाहीसं झालं आणि त्या रोपट्याच्या पानापानावर पाण्याचे टपोरे थेंब चकाकू लागले. जपेच्या कानातले लालजर्द झुमके त्या रोपट्यावर फुलांप्रमाणे डोलू लागले. त्या चकाकणाऱ्या थेंबांना आणि लालजर्द झुपकेदार फुलांना पाहण्यासाठी उंच उंच झाडंही खाली वाकली. वेलींनी माना वेळावल्या…आणि त्याचवेळी जपेला शोधत शोधत तो छोटुकलाही तेथे आला. त्याने पाहिलं, पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जपा हसत होती. छोट्याने ते झाड मग गदगदा हलवलं. पाण्याचे थेंब जमिनीवर टपटपले. जमिनीवर पडलेल्या प्रत्येक थेंबातून झुपकेदार फुलं डोलू लागली. त्या फुलांना जपेच्या कुंडलांना आपण जपाकुसुम किंवा जास्वंदी म्हणतो.