नवीन मैत्रीण – NAVEEN MAITRIN


ही कविता ‘माय न्यु बेस्ट फ्रेंड’ या कवितेचा अनुवाद आहे.
This poem is a translation of the poem-‘My New Best friend’
Retold by-Kimberly Kirberger, page no. 57, 58.
CHICKEN SOUP FOR THE TEENAGE SOUL, 101stories of life love
ane learning.(Jack Canfield, Mark Victor Hansen, Kimberly
Kirberger)

आज भेटली नवीन मैत्रीण!
जिने खरे मज ओळखले..
मजेमजेची गोष्ट अशीकी,
तिने अचुक मज पारखले …
जे जे मजला म्हणायचे ते,
तसेच तिजला जाणवले…

तिने ऐकली माझी शल्ये-
आणिक माझी स्वप्ने सुंदर!
प्रेमाबद्दल आम्ही बोललो,
ऐकवीत मग जीवन संगर …
नवलाची पण खरी किती ती,
कथा एक पण दोघींची ती…

मुक्तपणाने खूप बोलले,
तरी तिने ना मला जोखले,
ऐकुन पाहुन माझ्याविषयी,
भलते सलते ग्रह ना केले…

कशा झेलल्या मी लाटा अन,
सागरात मी कशी पोहले?
तिने जाणले तिजला कळले,
जीवन मजला कसे वाटले …

तिने मला ना कधी टोकले,
वाक्य न माझे कधी तोडले,
मौन राहुनी फक्त ऐकले!
मज न एकटे कधी ठेविले …

सांगायाचे होते तिजला-
किती किती ती प्रिय मला!
खूप वाटले व्यक्त करावा,
कृतज्ञतेचा भाव मला …

आलिंगाया तिज प्रेमाने,
झाले पुढती मी घाईने,
तरी कशाने अशी दचकले?
खरेच का मी कुठे धडकले…

पसरुन माझे दोन्ही बाहू,
तिला म्हणाले जवळी राहू!
किंचित पण ती पुढे न आली,
तेव्हा मजला जाणीव झाली..
मैत्रीण माझी मीच मनोरम!
मम ऐन्यातिल प्रतिमा प्रियतम…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.