In this article the importance of Panch-kalyanik puja is described in modern way on the scientific base.
लेखिका-सुनेत्रा नकाते पूर्व प्रसिद्धी – प्रगती आणि जिनविजय,
२३ ऑक्टोबर २००९ दीपावली विशेषांक
गेल्या २५ -३० वर्षात पंचकल्याणिक महोत्सवातील डामडौल, आर्थिक उधळपट्टी पाहता या महोत्सवाला बदलत्या काळानुसार योग्य तो आकार देणे ही आजची खरी गरज आहे. पूजा महोत्सवात तासनतास घसाफोड करून घेतलेले बोली व चढावे व त्यातून मिळणारा पैसा हा खरेतर स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. या पैशांचा उपयोग हत्तीवरून किंवा घोडयावरून मिरवणे, ध्वनीप्रदूषण वाढवणाऱ्या ढोल, ताशा, लेझीम यांच्या आवाजात मिरवणुका काढणे, कानठळ्या बसवणारे फटाके फोडणे, फक्त एकमेकावर कुरघोडी करण्यासाठी जास्तीत जास्त पैशांची बोली घेणे, श्रीमंतीचे प्रदर्शन मांडून एकमेकांच्या मनात मत्सर निर्माण करणे या सर्व गोष्टीतून जसा पैशांचा अपव्यय होतो तसा वेळेचाही अपव्यय होतच असतो. यातून वैयक्तिक हेवेदावे तर वाढतातच शिवाय एकमेकांविषयी मनात अकारण मत्सर निर्माण होतो.
पुराणांतर्गत वर्णनानुसार पंचकल्याणिकामध्ये एकूण पाच सोहळे असतात. तीर्थंकर भगवान जिनमातेच्या गर्भात आल्यापासून ते मोक्षास जाईपर्यंतच्या पाच सोहळ्याचे सादरीकरण केले जाते. त्यास एकत्रितपणे पंचकल्याणिक सोहळा असे म्हटले जाते. पुराणांतर्गत वर्णनानुसार धनाचा राजा कुबेर गर्भकल्याणिकापूर्वी सहा महिने आधी पृथ्वीवर येऊन सुंदर बागबगीचे, प्रासाद यांनी युक्त अशा नगरांची रचना करतो. अष्टकुमारी देवता जिनमातेच्या सेवेसाठी पृथ्वीवर येतात.
आजच्या काळानुसार याचा अर्थ लावायचा झाल्यास लग्नानंतर कमीतकमी सहा महिने तरी पती-पत्नीने सहवासात राहून एकमेकांचे विचार आवडी निवडी भविष्यासाठीचे आर्थिक नियोजन, मुलांना कसे वाढवावे याबद्दलची आपली मते, नातेवाईकांशी प्रेमसंबंध जपणे याबरोबरच एकमेकांबाबतची सर्व काही अंतर्गत गुपिते जाणून घेणे गरजेचे आहे. त्यानंतर मगच एकमेकांशी संबंध ठेवण्यास आपण योग्य आहोत की नाही याचा विचार करून त्यानुसार निर्णय घेणे हा पहिला टप्पा आहे.
अष्टकुमारी देवता व छपन्न कुमारिका या जिनमातेच्याच वयाच्या असल्याने तिचे त्यांच्याशी असलेले संबंध मनमोकळे असतात. आजच्या काळात भावी मातेला तिच्या समवयस्क मुलींच्या सान्निध्यात ठेवल्याने तिचे मन साहजिकच फुलते, बहरते. यामध्ये भावी मातेबरोबरच तिच्या बरोबर असणाऱ्या कुमारी मैत्रीणीना ही निरनिराळ्या कलांचे शिक्षण जसे विणकाम, भरतकाम, संगीत, गीत, नाट्यकला, चित्रकला, बालसंगोपन, बागकाम, निसर्गातील वनौषधींचे ज्ञान स्वच्छ आरोग्यदायी स्वयंपाक बनविणे, या विषयांचे ज्ञान दिल्याने या कुमारी भविष्यातील सुगृहिणी म्हणून तयार होतात.
शाळा कॉलेजातून लैंगिक शिक्षण दयावे की नाही याबद्दल चर्चा विवाद मत मतांतरे तर खूप चालतात. पण अशा गर्भकल्याणिक सोहळ्यातून विवाहित अशा भावी मातांकडून वैवाहिक संबंधातील बारीक सारीक नाजूक मर्मे कुमारी मुलींना त्यांच्या सहवासात राहून जाणून घेण्याची आयतीच संधी मिळते. समवयस्क मुलींकडून निरोगी असे लैंगिक शिक्षण थट्टा, विनोद, सुसंवाद यातून आपसूकच मिळाल्याने लैंगिक शिक्षणाला विकतचे किंवा बाजारी स्वरूप येत नाही. आपल्या पोटी जन्माला येणारे बाळ तीर्थंकरांच्या मार्गावरून जावे यासाठी आपण आत्तापासूनच प्रयत्न करायला हवेत अशी या कुमारी मुलींची मनोभूमिका तयार होण्यास मदत होते. त्यानुसार मग त्या स्वत:चे मन शरीर बुद्धी यांना निरोगी ठेवण्यासाठी तत्पर राहतात.
यानंतर मग गर्भ कल्याणिकाचा सोहळा असतो. गर्भकल्याणिक पुराणांतर्गत वर्णनानुसार जिन मातेला गर्भसंभव झाल्यानंतर उत्तर रात्री सोळा शुभ स्वप्ने पडतात. या स्वप्नांचे अर्थ तिचा पतीच तिला समजावून सांगतो. म्हणजे तोसुद्धा भविष्यातील घटनांचा आपल्या विवेक बुद्धीनुसार तर्कशक्तीनुसार योग्य तो अर्थ लावण्याइतपत प्रगल्भ व बुद्धिमान असतो. मातेला उत्तररात्री सोळा स्वप्ने पडतात व ती तिला व्यवस्थित आठवतात. याचाच अर्थ असाकी तिचे शरीर आणि मन एवढे निरोगी आहेकी तिला ही स्वप्ने सलग आठवण्याइतपत शांत व गाढ झोप लागू शकते.याचाच आणखी एक महत्वाचा निष्कर्ष असाकी तिला सासरघरी सुद्धा माहेरच्या माणसांप्रमाणे जपणारी मंडळी आहेत.
गर्भसंभव झाल्यानंतर समवयस्क मैत्रिणींसोबत डोंगरावरील तीर्थांच्या यात्रा करणे, वनभोजन, नौकाविहार, पूजापाठ यामुळे गर्भवती स्त्री आनंदी राहण्यास मदत होते. त्यामुळे होणारे बाळही आनंदी प्रवृत्तीचे होते. सुयोग्य व्यायाम व परिपूर्ण आहार यामुळे प्रसुतीही सुलभ होण्यास मदत होते.
जन्मकल्याणिक – तीर्थंकर जन्माला आल्यानंतर इंद्र इंद्राणी नवजात शिशूला घेऊन मेरू पर्वतावर नेऊन क्षीरोदधीचे मंगल स्नान घालतात. सध्याच्या काळात बालके दवाखान्यात जन्माला येतात. पूर्वीच्या काळी दाई सुईणी यांच्या मदतीने मुलीचे बाळंतपण घराच्या घरी केले जाई. पण मूल शेवटी दवाखान्यात जन्माला आले काय किंवा घरी जन्माला आले काय त्याची नळ कापण्यापासून ते त्याला दुध, तूप, उटणे, कडूनिंब, तुळस व इतर औषधी वनस्पतीयुक्त कोमट पाण्याने शास्त्रशुध्द स्नान घालणे गरजेचे असते. स्नानानंतर स्वच्छ मऊ कपडयाने त्यास पुसून डोक्यावर वेखंडाची पूड शिंपल्याने बाळाच्या डोक्यात सर्दी मुरत नाही. नवजात शिशूला अंघोळ घालणे ही सुद्धा एक कलाच असते. प्रत्येक कुमारी मुलीने ती लग्नाआधीच शिकून घेतली तर आजच्या सदनिका संस्कृतीत बाळाला अंघोळ घालण्यासाठी त्यांना शेजाऱ्यापाजाऱ्यावर किंवा अडवणूक करणाऱ्या मोलकरणीवर अवलंबून राहावे लागणार नाही.
बाळ जन्मल्यानंतर बाराव्या दिवशी त्याचे बारसे केले जाते. याप्रसंगी वृध्द, प्रौढ, अनुभवी स्त्रिया, तरुण स्त्रिया, कुमारिका सर्वजणी मिळून पानाफुलांनी पाळणा सजवतात. बाळाचे अर्थपूर्ण नाव ठेवले जाते. अंगाईगीते पाळणे गायले जातात. बाळाचे संगोपन, बाळाचे आजार याविषयीच्या ज्ञानाची देवाण घेवाण होते. एकत्रितपणे हा सोहळा साजरा केल्याने आईचे मन आनंदी राहण्यास मदत होते. व बाळाची पुढील जबाबदारी ती सक्षमपणे पेलू शकते.
जन्म कल्याणिकानंतर पुढील सोहळा राज्याभिषेकाचा असतो. राज्याभिषेक बाळ आठ वर्षांचे झाल्यावर त्याला अष्टमूलगुण व्रत दिले जाते. मुलींना नोपी व्रत दिले जाते. यात पाच उदुंबर फळे व मद्य मास मधु यांचा त्याग सांगितला जातो. या वयातील मुले संस्कारक्षम असतात. आई वडिलांनी केलेल्या शाब्दिक उपदेशापेक्षा ती त्यांच्या आचरणातून कृतीतून चटकन शिकत असतात. त्यासाठी मुळात मातापित्यांचे आचरण धर्मयुक्त असणे गरजेचे असते. यात द्रव्य हिंसेबरोबरच भावहिंसाही कशी त्यागण्यायोग्य असते हे मुलांना आपल्या नित्य आचरणातून शिकवणे गरजेचे असते.
अशी संस्कारयुक्त बालके जेव्हा तारुण्यात पदार्पण करतात तेव्हा राज्याभिषेक केला जातो. यामध्ये तारुण्यातील सर्व सुखेही धर्माच्या अधिष्ठानावरच उपभोगली पाहिजेत व त्यानंतर पुत्र, पत्नी, पैसा, यश, किर्ती या सर्वांचा उपभोग समतोलपणे घेऊन त्यातून तृप्त झाल्यानंतरच या सर्वातून निर्लेपपणे सहजपणे आनंदाने बाहेर पडता येते.
दीक्षा कल्याणिक -पुराणांतर्गत वर्णनानुसार या कल्याणिकात तपामुळे, वैराग्य प्राप्त झाल्यामुळे तीर्थंकर दीक्षा घेतात. त्यांना मन:पर्ययज्ञान प्राप्त होते. आजच्या काळानुसार याचा अर्थ लावायचा झाल्यास उपवास व्रते यामधून शरीराला कृश केले जाते. उत्तम गृहस्थ आणि गृहिणी धर्मपालनासाठी, श्रावकांसाठी असणारी बारा व्रते आपापल्या शक्तीनुसार पाळली जातात. व्रत याचा अर्थ असाकी ज्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतो त्या गोष्टी आपण करू नयेत व दुसऱ्यांच्या बाबतीतही करू नयेत.
चांगल्या गुणांप्रती श्रद्धा असणे, त्या विषयी सम्यकज्ञान असणे व आपल्या कुवतीनुसार त्याप्रमाणेच चारित्र्य किंवा आचरण ठेवण्याचा प्रयत्न करणे ही यशस्वी गृहस्थजीवनाची त्रिसूत्री असते.
केवलज्ञान कल्याणिक – पुराणांतर्गत वर्णनानुसार या कल्याणिकात तीर्थंकर ज्ञानावरील आवरणे एक एक करून दूर करतात.त्यानंतर अंतिमत: त्यांना कैवल्यप्राप्ती होते. म्हणजेच ते पदार्थाच्या भूत, वर्तमान व भविष्यातील सर्व पर्यायांना एकाच वेळी जाणतात.मग इंद्र धर्मसभेची रचना करतो. त्याला समवशरण म्हणतात. त्याचे बारा भाग असतात. यात मुनी, मनुष्य, पशु, पक्षी, देव, आपापल्या योग्यतेनुसार आपापल्या स्थानावर बसलेले असतात. गणधरांचे समवशरणात आगमन होताच तीर्थंकर वाणी सर्व प्राण्यांना, देवांना, मुनींना, त्यांच्या त्यांच्या भाषेत कळायला लागते.
सध्याच्या काळात याचा अर्थ लावायचा झाल्यास आगमातील ज्ञानाचा श्रद्धेने, ज्ञानाने अनुभव घेतल्यास, खरे देव, शास्त्र, गुरू यांच्या वचनांवर श्रद्धा ठेवल्यास त्यातून ज्ञानप्राप्ती होत जाते.सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होऊन अंधश्रद्धेचा अंधार आपोआपच दूर होतो. मनातल्या शंका कुशंकांचे आपोआपच निरसन व्हायला लागते.
निर्वाण कल्याणिक – जेव्हा आपले या जगतातातील कार्य संपल्याची जाणीव तीर्थंकरांना होते तेव्हा ते शुक्लध्यान करता करता चौदाव्या गुणस्थानात जातात व मोक्षप्राप्ती करून घेतात. पुराणातील वर्णनानुसार मोक्षप्राप्तीनंतर तीर्थंकरांचे शरीर कापरासारखे उडून जाते व मागे त्यांची नखे व केस उरतात. आजच्या काळानुसार मोठमोठे शास्त्रज्ञ, तत्वज्ञ, धर्मगुरू, विचारवंत आयुष्यभर ज्ञानाची साधना करता करता निर्मोही होत जातात.
हळूहळू ते ज्ञानातील वरच्या वरच्या स्थानावर जाऊ लागतात. याबरोबरच स्वत:स मिळालेले ज्ञान ते इतरांनाही वाटत असतात. स्वत:च्या ज्ञानाचा उपयोग ते आत्मोन्नतीसाठी करीत असतातच पण त्याचबरोबर त्याचा उपयोग वैय्यक्तिक स्वार्थासाठी, लोभापोटी न करता ते त्याचा वापर फक्त विधायक कार्यासाठी करतात. तेव्हाच हृदयाची विशुद्धी हळू हळू वाढतच जाते व आणखी वरच्या पातळीवरील ज्ञान प्राप्तीतील अडथळे आपोआपच दुर व्हायला लागतात व ते ज्ञानभांडार आपोआपच इतरांनाही खुले होत जाते.
पंचकल्याणिकातील या सौंदर्यस्थळांचा उलगडा मी आजच्या काळानुसार करण्याचा एक अल्पसा प्रयत्न केला आहे. वरील सर्व विवेचनावरून हे लक्षात येते कि अशा पंचकल्याणिकांमधून अशा प्रकारचे ज्ञान देण्यासाठी प्रयत्न केले जावेत. मुले-मुली तरुण-तरुणी, गृहस्थ-गृहिणी व वृद्धांनाही त्याचीगरज आहे. पंचकल्याणिक महोत्सवात आवश्यक तेवढे नावापुरते कर्मकांड करून बाकीचा वेळ व पैसा यांचा संसारोपयोगी, समाजोपयोगी, आध्यात्मिक ज्ञान देण्यासाठी, स्वच्छ सुंदर नगरनिर्मितीसाठी, चारित्र्यसंपन्न नागरिकांचे पीक घेण्यासाठी उपयोग केल्यास अशा पंचकल्याणिकांचे सर्वजण स्वागतच करतील, यात शंका नाही.