महावीर निर्वाण – MAHAVEER NIRVAN


This is a translation of Hindi pravachan given by Dhyansagarjee Maharaj. In this Pravachan it is told that  duty done by pure mind is known as Dharma.
भ.महावीर आणि भ. गौतम बुद्ध हे दोघेही समकालीन होते. महावीर स्वामींनी घरातल्या सर्वांना सांगून घर सोडले. त्यांनी सांगितले, “मी आता तपश्चरण करण्यासाठी जात आहे.” त्यांच्या आईने विचारले,”तू घर सोडून का जात आहेस? तुला माझे अश्रू दिसत नाहीत काय?” त्यावर महावीर स्वामी म्हणाले,”जर मी तुझे अश्रू पाहून थांबलो तर इतरांचे अश्रू कोण पुसेल? मी तर तुला माझी अंतिम आई मानतो, कारण मी या जगात परत येउच इच्छित नाही. माझ्या आत्म्याने पूर्वकर्मानुसार तुझ्या उदरी जन्म घेतला. आता मात्र मी जात आहे.

 वयाच्या तीस वर्षानंतर घर सोडले. दीक्षा घेतली. त्यानंतर त्यांना केवलज्ञान प्राप्त झाले. समवशरणाची रचना झाली. ६६ दिवसानंतर एक शिष्य आला. त्यानंतर त्यांचा उपदेश झाला. त्यानंतर तीस वर्षे त्यांनी उपदेश दिला. धनत्रयोदशीला त्यांनी समवशरण सोडले. ते पावापुरी येथे आले. योगनिरोध केला. अमावस्येच्या दिवशी सूर्याच्या प्रथम किरणांच्या आगमनानंतर त्यांनी निर्वाण प्राप्त केले. अनादी पिंजऱ्याला नष्ट करून पक्षी उडून गेला. महावीरांना निर्वाण प्राप्त झाले.
 पंडित जिनेन्द्रवर्णींनी सांगितलेली पंचम काळातली एक घटना आहे. एकदा एक मुनी १ महिन्यांच्या उपवासानंतर आहारासाठी श्रावकवस्तीत येणार होते. एक श्राविका होती. अतिशय थकलेली ती एक वृद्धा होती. पण खूप श्रद्धाळू होती. तिला कळलेली एक महिन्यानंतर मुनींचा आहार होणार आहे. किती खळबळ माजली तिच्या हृदयात! आहार देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींना ती जाऊन सांगत होतीकी, “सावधान रहा, रुखासुखा आहार देऊ नका.चांगला आहार द्या.” सगळ्यांना ती हेच सांगत होती. काहीजण म्हणायचे, “आम्हाला चिंता आहे, तुम्ही का एवढा त्रास करून घेता?” असा होता होता महाराज येण्याची वेळ झाली.  महाराज गुंफेतून बाहेर आले. शरीर क्षीण व हातपाय दुबळे झालेले.  पण डोळ्यात आणि अपूर्व तेज आलेले. महाराज येताच संपूर्ण जनतेत खळबळ माजली. मासोपवासिंचा आहार कोठे होईल?

चारी बाजूंनी भो स्वामी, नमोस्तु, अत्र अत्र चा गजर झाला. वस्तीत सर्व बाजूंनी आवाजाचा कोलाहल झाला. मुनीश्री संकल्प घेऊन निघाले होते पण संकल्प पूर्ण नाही झाला. मग मात्र वृद्धा घाबरली. असे का झाले? काय असावा संकल्प? ती हात जोडून णमोकर मंत्र म्हणू लागली. महाराजांना ती दिसली. णमोकर मंत्र म्हणत कुठल्यातरी कोपरयात उभी असलेली ती वृद्धा दिसताच महाराज पुढे निघाले. तिच्याचकडे निघाले. सारी जनता पाहत राहिली. पण तिला मात्र काहीच माहिती नाही. ती डोळे मिटून मंत्र म्हणत होती. मग लोक सांगू लागले, “आजी महाराज येत आहेत. पड्गाहन करा.” ती मात्र घाबरली. तिला वाटले, मी गरीब! काय आहे माझ्याजवळ? काय देऊ मी महाराजांना? पण महाराज येताच तिने पड्गाहन केले. महाराज तिच्या छोट्याश्या कुटीत आले. त्या कुटीत कसलीही व्यवस्था नव्हती. उकळत्या पाण्यात भिजवलेले दाणे होते. पण महाराज जाणत होतेकी तिचे दाणे सर्वात उत्कृष्ट आहेत.
बाहेर लोकांची गर्दी लोटली होती. आसपासचे लोक आपापला आहार घेऊन उभे होते.
मग वृद्धेने प्रक्षालन करून महाराजांना विधिवत आहार ग्रहण करण्यास सांगितले. तेच उकळलेले दाने तिने महाराजांच्या अंजलीत घातले.
त्या शुद्ध  प्रासुक दाण्यांचा आहार महाराजांनी ग्रहण केला. आहार एवढा चांगला झाला कारण त्या दाण्यांबरोबर आजींची भावना एवढी निर्मल होतीकी तीच महाराजांना आवश्यक होती. मुनिश्रींचा आहार झाल्याबरोबर ते परत जंगलात निघून गेले. त्यानंतर मग सगळेजण त्या आजींना विचारू लागलेकी आहारात कोणते दाणे दिले? आजींनी सांगितलेकी ते मेथीचे दाणे होते. मग दुसऱ्यावेळी जेव्हा महाराज आले तेव्हा सगळ्यांनी आहारासाठी मेथीचे दाणेच ठेवले. खरी भावना काय असते आणि कोरी क्रिया काय असते हेच यावरून कळते.

अशीच एक ४००-५०० वर्षांपूर्वीची घटना आहे. खंडेलवाल समाजातील एक दानवीर सेठ होते. सेठ जीवराज पापडीवाल त्यांचे नाव. त्या जमान्यात यात्रा संघ निघायचे. म्हणजे समाजातील मोठे लोक तीर्थयात्रेचे आयोजन करीत. जेव्हा ते संघ घेऊन निघाले तेव्हा कुठल्याशा गावातील दोन मुलांनाही यात्रेला जाण्याची इच्छा झाली. त्यांनी त्यांच्या आईला विचारले, “आई, आम्हीही यात्रेला जाऊका?” आई म्हणाली,
“आपण गरीब आहोत. गरिबांना यात्रेत कोण स्थान देणार?” मुले म्हणाली, “आम्ही प्रयत्न करतो. नोकर म्हणून आम्ही यात्रेबरोबर जातो.” आईला वाटले, मुलांची एवढी इच्छा आहे तर आपण त्यांना का अडवावे? ती म्हणाली, “मुलांनो, जा तुम्ही, पण तीर्थवंदना कधी रिकाम्या हाताने करायची नसते.” असे म्हणून तिने कपड्यामध्ये ज्वारीचे दाणे बांधून दिले. मुलांनी जाऊन यात्रा संयोजकाकडे निवेदन केलेकी, आम्हालाही यात्रेला यायचे आहे. त्यानाही कामासाठी माणसांची जरूरी होतीच. दोघांनाही नोकर म्हणून यात्रेत सामील करून घेतले. ते दोघे यात्रेत खूप काम करायचे. तीर्थस्थान आल्यावर वंदना करून दाणे चढवायचे. शेवटी हा काफिला शिखरजीला येऊन पोहोचला.
रात्रीची वेळ होती. ती लहान मुले तंबूच्या एका कोपऱ्यात झोपून गेली. शेठजींनी त्या मुलांकडे पाहिले. ती मुले नोकर म्हणून आलेली असली तरीही कामासाठी त्यांना एवढ्या रात्री उठवणे शेठजींना बरोबर वाटले नाही. त्या निष्पाप मुलांना पाहून त्यांना असे वाटलेकी त्यांना असेच झोपू द्यावे. शांतपणे झोपलेली मुले हे जगातले सर्वात सुंदर दृश्य असते असे त्यांना वाटायचे. बाकीचे सारे लोकही मग झोपून गेले. मध्यरात्री मुले उठली. एकमेकांना म्हणू लागली, “चला आपण आत्ताच वंदनेला जाऊयात.” दोघेही मग वंदनेला जाण्यासाठी तयार झाले. तंबूतून बाहेर पडताना पहारेकऱ्याने त्यांना पाहिले व विचारले,
“कोण आहात तुम्ही? एवढ्या रात्री कोठे निघालात?” मुले मग घाबरली व त्यांनी खरेखरे सांगुन टाकले की आम्ही वंदनेला निघालो आहोत. मग पहारेकऱ्यांनी त्यांना जाऊ दिले.
कपड्यात बांधलेले ज्वारीचे दाणे घेऊन मुले गंधर्वनाल्याजवळ आली. त्यांनी पाण्यात दाणे धुवून घ्यायचे ठरवले. मात्र दाणे धुवून घेत असताना कपड्याचे एक टोक मुलांच्या हातून निसटले. त्यातील दाणे पाण्याबरोबर वाहून जाऊ लागले. मुलांनी खूप धडपड केली, पण शेवटी मुलांच्या हातात फक्त दोन दाणे आले. दोघांनी मग एक एक दाणा वाटून घेतला. मग ते वंदनेला निघाले. कुंथुनाथ टोकावर आल्यावर हातातला एक एक दाणा दोघांनी तेथील चरणपादुकांवर ठेवला. भक्तिभावाने वंदन केले. पण आता जवळचे दाणे तर संपलेले. मग आता पुढच्या वंदनेला कसे जायचे? मुलांना प्रश्न पडला. रिकाम्या हाताने वंदनेला कसे जायचे? त्यांना वाटले, आता आमच्याकडे काहीच नाही उरले  म्हणून आपण पुढची वंदना नाही करू शकणार. त्यांनी मनात विचार केलाकी आम्ही हे जे दोन दाणे चढवले आहेत तेच सर्व भगवंतांनी आपापसात वाटून घ्यावेत. असा विचार करून ते परत तंबूत आले व झोपून गेले. त्यावेळी इतर सर्वजण झोपलेलेच होते.

पहाटे शेठजी व इतर सर्वजण मोतीमुक्ता घेऊन वंदनेला निघाले. कुंथुनाथ टोकावर आले. पाहतात तर त्यांच्याआधी कोणीतरी वंदना करून काहीतरी चढवून गेलेले! त्यांना मग प्रश्न पडला, आपल्या आधी इथे कोण बरे येऊन गेले? कोणी  वंदना केली? हे काय चढवले त्यांनी? मग ते तसेच पुढे निघाले.पुढच्या पुढच्या प्रत्येक टोकावर तेच तसेच द्रव्य चढवलेले! दोन दाणे! अगदी अंतिम टोकावरही तसेच द्रव्य चढवलेले. वंदना करून आल्यानंतर शेठजींनी पहारेकऱ्यांना विचारले,”आमच्या आधी कोण गेले होते वंदनेला? कुठले शेठ गेले होतेका?” त्यावर पहारेकरी म्हणाला,”नाही, दोन मुले गेली होती.बहुतेक नीकर असावीत.”
शेठजींना आश्चर्य वाटले, की नोकर एवढी अमुल्य वस्तू कशी चढवतील? त्यांनी मुलांना बोलावणे पाठवले. मुले आल्यावर पहारेकऱ्यांनी सांगितलेकी हीच ती दोन मुले! शेठजींनी त्यांना विचारले,”काय होते तुमच्याजवळ? काय चढवलेत तुम्ही? कोठली स्तुती म्हणालात?” मग मुले घाबरली. म्हणाली, “कान नका पकडू, आम्ही खरे खरे सांगतो.” असे म्हणून त्यांनी घडलेला सर्व वृतांत शेठजींना सांगितला.तो ऐकताक्षणी शेठजी भारावले.त्यांनी मुलांना हृदयाशी धरले. त्यांचे डोळे अश्रूंनी भरून वाहू लागले. त्यांना वाटले, मी एवढ्या यात्रांचे नियीजन केले,एवढ्या जिनबिम्बांच्या प्रतिष्ठा घडवल्या पण या मुलांसारखे पुण्य नाही कमावता आले. याचे कारण ही मुले माझ्यापेक्षा विशुद्ध हृदयाची आहेत. त्यांच्या अंतरंगात कुठलेही कषाय नाहीत.फक्त विशुद्ध भक्ती आहे. म्हणूनच त्यांची प्रार्थना ऐकून चमत्कार घडला. मामुली ज्वारीचे दाणे गजमुक्ता झाले.त्यांची प्रार्थना भगवंतांनी ऐकली. म्हणूनच त्यानंतरच्या प्रत्येक टोकावर अगदी अंतिम टोकावर देखील तसेच दोन दोन गजमुक्ता होते.
खऱ्या मनाने एका भगवंताची वंदना केली तर सगळ्या भगवंतांची वंदना झाली. मामुली ज्वारीचे दाणे अनमोल गजमुक्ता बनले. याला म्हणतात खरी भावना! म्हणूनचआम्ही बोलीचे समर्थक नाही. जेथे बोली होते, चढावे होतात तेथे पैशाची किंमत भावनेपेक्षा जास्त होते आणि मग धर्म तेथे उरतच नाही.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.