मुग्ध-मधुर जुई – MUGDH MADHUR JUI


In the story mugdh-madhur Juee the story of a little girl named juee is told. Her parents were not rich. Her father was working as a priest in the temple. Temple was outside the town. Juee as her name describes was delicate and charming like a flower of Juee.

The flower of Juee belonged to Jasmine family. Jasmine family includes many flowers like mogara, chameli, kund, kakada, sayli, jaee and juee.The flower of juee is delicate and charming like a princess in the English fairy tale. The flower is so delicate that it becomes pale by human breathing. It can’t bear heavy rain.

हिरव्यागार झाडांनी वेलींनी भरलेला एक निळाशार डोंगर होता. त्या डोंगरामधून एक झरा खळाळत वाहायचा. दगड-धोंड्यांवरून खोडकरपणे उसळ्या घेत तर कधी काठावरच्या वेलींची मस्करी करीत झरा एखाद्या उनाड पोराप्रमाणे मजेत धावायचा.

त्या झऱ्याच्या काठाकाठाने पुढे गेल्यावर एक छोटंसं मंदिर होतं. मंदिरात काळ्या पाषाणाची देवाची मूर्ती होती. मूर्तीच्या फण्यावर सहस्त्रफण्यांचा नाग होता. मंदिरासमोरच्या मोकळ्या जागेत चकाकणाऱ्या स्वच्छ पाण्याचं भलं मोठं तळं होतं. त्या तळ्यात नौका विहारासाठी माशांच्या आकाराच्या भल्यामोठ्या नौका होत्या.
गावातले स्त्री-पुरुष, युवक-युवती, मुले-मुली, सकाळ-संध्याकाळ मंदिरात दर्शनात येत असत. काहीजण देवदर्शन घेऊन नौका विहाराचा आनंद लुटत. तळ्याकाठी आंब्याची, कडूनिंबाची कदंबाची झाडे होती. त्यांना झोपाळे बांधलेले होते.

मंदिराच्या शेजारीच एक लहानशी पर्णकुटी होती. त्यात मंदिराचे पुजारीबाबा आणि पुजारीणबाई राहायच्या. त्यांना एक मुलगी होती, नाजूक आणि गोरीगोरीपान! तिचं नाव होतं जुई. जुई आपल्या आई वडिलांना सर्व कामात मदत करायची. देवपूजेसाठी पाणी गाळून ठेवायची. फुले आणून द्यायची. चंदनी खोडाने सहाणेवर गंध उगाळायाची. अभिषेकाच्या वेळी झांगटही वाजवायची.

पुजारीबाबा मनोभावे पूजा-अर्चना करीत. त्यांना ना दक्षिणेचा लोभ होता ना संपत्तीचा. देवाच्या कृपेने जो काही शिधा मिळायचा त्यावर ते समाधानी होते.
जुई कधी कधी सायंकाळी तळ्याच्या काठावर येऊन बसे. नौकाविहारासाठी गावातल्या श्रीमंतांच्या मुली येत. नौकेत बसून त्या मजेत विहार करीत. झोपाळ्यावर बसून उंच उंच झोके घेत. त्यांचे रंगीबेरंगी घागरे, नाजूक नक्षीकाम केलेल्या ओढण्या, वाऱ्याबरोबर लहरत असत.

मग जुईच्या बालमनाला त्यांच्या रंगीबेरंगी तलम घेरदार घागरा-चोळीचा, रेशमी ओढण्यांचा मोह पडे. तिला वाटे आपणही असाच घेरदार घागराचोळी घालावा आणि स्वत:भोवती गरगर फिरावे. गळया रेशमी ओढणी घालावी. झोपाळ्यावर बसून उंच उंच झोके घ्यावेत. वाऱ्याशी हितगुज करावे, ढगांशी मैत्री करावी.
पण छे! आपल्याला एवढे सुंदर कपडे कोठून मिळणार? असे वाटून ती उदास व्हायची. तिचेही कपडे स्वच्छ पण साधेच असायचे. तिला मग आपल्या गरिबीचा खूप खूप राग यायचा.
वसंत ऋतूचे आगमन झाले. बागेतल्या झाडांना नवी पालवी फुटली. आंब्यांच्या झाडांवर मोहोर फुलला. त्याचा आंबट-गोड सुवास मंदिराच्या आसमंतात दरवळू लागला. कोकिळेला कंठ फुटला.

वसंतोत्सव साजरा करण्यासाठी गावातील तरुण स्त्रिया, मुली येऊ लागल्या. त्यांच्या पायातल्या पैंजनांच्या छुमछुमाटाने आणि बांगड्यांच्या किणकिणाटाने सगळा परिसर हसू लागला.
जुई मात्र उदास झाली. उदासवाणी होऊनच ती रात्री झोपली. पहाटे पहाटे तिला स्वप्न पडले. स्वप्नात तिला यक्ष आणि यक्षिणी दिसले. मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर असलेल्या त्यांच्या मूर्ती जुईने पाहिल्या होत्या. अगदी तसेच ते दिसत होते. शिवाय ते जुईकडे पाहून हसत होते आणि बोलतही होते. त्यांनी जुईला विचारले,
“बाळ, अलीकडे तू एवढी उदास का असतेस? ना हसतेस ना बोलतेस.” तेव्हा जुई खिन्नपणे म्हणाली,

“मलासुद्धा नौकेतून दूरवर छान कपडे घालून जल-विहाराला जावे वाटते, झोपाळ्यावर बसून माझी रेशमी ओढणी हवेत फिरवावी वाटते…पण..?”
“पण काय? तुझ्याकडे असे सुंदर कपडे, दागिने नाहीत म्हणून तुला वाईट वाटतेना?” यक्ष म्हणाला. यावर जुई काहीच बोलली नाही. तेव्हा यक्ष परत म्हणाला,
“तुला कसले कपडे हवेत? आम्ही तुला तुझ्या मनासारखे कपडे देऊ.” हे ऐकून जुई खुलली आणि म्हणाली,

“मला ना हिरवागार रेशमी घागरा-चोळी आणि तशीच हिरवीगार ओढणी चालेल बरं का! ओढणीवर पांढरीशुभ्र चांदण्यांसारखी खडी असेल तर खूपच छान होईल.”
“होईल, अगदी तुझ्या मनासारखं होईल… पण त्या बदल्यात तुला एक गोष्ट कबुल करावी लागेल.”
“कुठली गोष्ट?”
“तुला दिवसभरात एक तरी चांगलं काम करावं लागेल, तेही दुसऱ्या कोणासाठी तरी.”
“दिवसभरात फक्त एक चांगलं काम? करेन. मी नक्की करेन. नाहीतरी मी रोज कितीतरी चांगली कामं करते. पक्ष्यांना दाणापाणी देते, झाडांना पाणी घालते, बाबांना देवपूजेत मदत करते.”
“तर मग ठीक आहे. पण जर तू वचन मोडलंस तर…परिणामांची फळे भोगावी लागतील. कदाचित तुझं जीवनही संपून जाईल. लक्षात ठेव…तथास्तु!” यक्ष आणि यक्षिणी म्हणाले आणि अंतर्धान पावले.

जुई जागी झाली आणि पाहते तर काय नवलच घडलं. तिने हिरवा-हिरवागार घोळदार रेशमी घागरा आणि ओढणी परिधान केली होती. त्यावर चांदण्यांची खडी होती. ती अगदी हरखून गेली. तिने आरशात आपली छबी न्याहाळली. तिला वाटलं आपण स्वप्नात तर नाहीना? म्हणून मग तिने स्वत:ला चिमटा काढून पाहिला.

“कित्ती छान दिसते मी, एखाद्या वनपरीसारखी!” ती स्वत:शीच म्हणाली आणि गोल गोल फिरू लागली. जणू हवेतच तरंगू लागली.
आज मग तिने ना झाडांना पाणी घातले ना पाखरांना दाणापाणी दिले. पूजेसाठी फुलं आणि गाळलेले पाणी भरायचंही ती विसरूनच गेली.
एखाद्या राणीप्रमाणे चालत चालत ती तळ्यापाशी आली. सगळ्या मुली तिच्याकडे पहातच राहिल्या. आपापल्या नौकेत तिला बोलावू लागल्या. दिवसभर ती या नौकेतून त्या नौकेत बागडत राहिली. एखाद्या जलपरीसारखी!

झोपाळ्यावर बसून तिने उंच झोके घेतले. हवेत ओढणी तरंगत होती. घागरा लहरत होता. उंच उंच जाणारा झोका आणि त्यावर उभी असलेली नाजुक जुई जणू पवनकन्याच भासत होती. तिचं मन पिसासारखं हलकं हलकं झालं, ढगांवर स्वार झालं. वाऱ्यावर दौडू लागलं.
सूर्य मावळला आणि अंधार पसरू लागला तेव्हा जुई भानावर आली. आकाशात उडणारं तिचं मन खाडकन जमिनीवर आलं. घाईघाईने ती घरी निघाली. रस्ता शांत होता. झाडं स्तब्ध होती. घराच्या ओढीने जुई झपाझप चालत होती.

अचानक तिला कोणीतरी हाक मारल्याचा भास झाला. तिने मागे वळून पाहिले. रस्त्याच्या कडेला एक जख्ख म्हातारा आणि म्हातारी उभे होते. त्यांचे शरीर इतके जर्जर झाले होतेकी त्यांना धड उभेही राहता येत नव्हते.हातपाय लटपटत होते. अंगावरच्या कपड्यांच्या चिंध्या झाल्या होत्या. त्यातला म्हातारा क्षीण आवाजात म्हणाला,

“बाळ, आम्हाला खूप तहान लागली आहे. घसा सुकून गेलाय. त्या झऱ्यापर्यंत आम्हाला घेऊन चल. नाहीतर पाण्याशिवाय आम्ही मरून जाऊ.”
जुईने एकवार त्यांच्या जराजर्जर शरीराकडे व एकवार स्वत:कडे पाहिले आणि ती घाईघाईने म्हणाली,
“छे! छे! मला बिलकुल वेळ नाही आई वाट पहात असेल. मला ताबडतोब घरी जायला हवे.”
असे म्हणून जुई परत घाईघाईने चालू लागली…पण त्याचक्षणी समोरच्या दगडावर अडखळून पडली. तात्काळ म्हातारा आणि म्हातारी यक्ष आणि यक्षिणीच्या रुपात तिच्यासमोर उभे राहिले. ते म्हणाले,
“मुली, तू आज दिवसभरात एकही चांगलं काम केलं नाहीस. एकाच दिवसात या कपडयांच्या श्रीमंतीने तू इतकी बदलून गेलीस. दिलेलं वचनही तू विसरलीस. माणसाने धनवान असण्यात काहीच गैर नाही पण त्या धनाचा श्रीमंतीचा गर्व करणे मात्र गैर आहे.”

हे सारे ऐकून जुई पश्चातापाने अश्रू ढाळू लागली. ती म्हणाली,
“मला क्षमा करा, मला क्षमा करा.” पण त्यावर यक्ष म्हणाला,

“वचन मोडल्याची शिक्षा आता तुला भोगावीच लागेल. पण तुझी आठवण मात्र या भूमीवर नेहमी ठेवली जाईल. नाजुक सुगंधी फुलांच्या रूपाने तू येथे नेहमी राहशील! याक्षणी तुझं शरीर कापरासारखं नाहीसं होईल. पण ज्या वस्त्रांनी तुझ्या मनाला एवढं बदलवलं ती मात्र येथेच राहतील. हिरव्यागार वेलीच्या रुपात!”
“बघता बघता जुईचे शरीर कापरासारखे उडून गेले आणि तिची हिरवीगार घागरा ओढणी मात्र तिथेच राहिली. वेलीच्या रूपाने! त्यावरची नाजुक पांढरी खडी मात्र फुलांच्या रूपाने आजही आपल्याला त्या जुईची आठवण करून देते.

संध्याकाळच्या वेळी जर तुम्ही कधी जुईच्या मांडवाखाली उभे राहाल तर वाऱ्यावर लहरणारी ती फुले आपल्या कानात कुजबुजतात,
“माणसाने स्वप्ने पहावीत, आकाशाला गवसणी घालावी पण पाय मात्र जमिनीवरच रोवलेले असावेत!”

,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.