‘ पिंछी कमंडलू ‘ या ग्रंथात धर्म आणि पंथ यासंबंधी आचार्यश्री विद्यानंद मुनी महाराज म्हणतात,
“धर्म आणि पंथ यात मौलिक अंतर आहे. पंथ व्यक्तिवादी विचारधारेला उचलून धरतो. तो सत्यांशाला पूर्ण सत्य समजतो. धर्म वस्तुस्वभावाचे निरूपण करतो. तो त्रिकालाबाधित असतो. धर्म एकरूप असतो तर पंथ अनेकरूपी असतो. पंथ बाह्यगोष्टींवर भर देतो. मग एकाला उभा गंध चालत नाही तर दुसऱ्याला आडवा गंध चालत नाही. एक शुभ्र वस्त्रे परिधान करतो तर दुसरा भगवी वस्त्रे परिधान करतो. (कपड्यांच्या या वादाला कंटाळूनच भगवंतांनी दिगंबर रूप घेतले असेल काय ?)
धर्म सांगतोकी, भगवंताची पूजा पारिजात पुष्पांनी करा अथवा बदामाने वा तांदुळांनी करा, यात वाद करण्यासारखे काय आहे? वीतराग जिनेंद्राला पारिजात पुष्पेही नकोत आणि तांदूळही नकोत.. तुम्ही आपली श्रद्धा अर्पण करत आहेत कि वादविवादाला जन्म देत आहात आत्मनिवेदन हे पूजकाचे खरे देय द्रव्य आहे. ”
आचार्यश्रींचे हे विचार जर आचरणात आणले तर फक्त पंथीय विवादच संपतील असे नाही तर सामाजिक सांस्कृतिक, साहित्यिक, राजकीय क्षेत्रातले विवादही संपतील. व्यक्तिगत विवादाबरोबर आत्मगत विवादही संपून जातील.
दिगंबर पंथ व श्वेतांबर पंथ हे जैन धर्मातील दोन प्रमुख पंथ आहेत. ‘वर्ज्य’ ही नलिनी जोशी यांची कथा ‘शासन’ या समकालीन मराठी जैन कथासंग्रहातील कथा आहे.या कथेला श्वेतांबर पंथीय जैन समाजाची चौकट आहे. या कथेची नायिका साध्वी होण्यासाठी दीक्षार्थीनी विद्यार्थिनी म्हणून साध्वी अक्षताजींच्या संघात सामील होते. पण अतिशय सौंदर्यासक्त मनाची ही मुलगी खऱ्या अर्थाने त्यात रमू शकत नाही. म्हणूनच तिच्या मनाचा कल ओळखून तिचा विवाह जमविण्यात अक्षताजीच पुढाकार घेतात व तिच्या जीवनाची फरफट थांबवतात.
मराठी जैन वाङ्मय व त्याचा इतिहास यास समृद्ध परंपरा आहे. या वाङ्मयाचे शोधक दृष्टीने वाचन केल्यास त्यात अत्यंत ताकदीची कथाबीजे सापडतात. वाङ्मयातील कथा, कादंबरी, कविता हे विविध रचनाप्रकार आपापल्या नियमात बांधलेले असतात. त्यांच्या अभिव्यक्तीचे काही ढोबळ नियम असतात. पण रचनेबाबतचे नियम यांत्रिकपणे लावले तर कलाकृती साचेबंद होऊन त्यात नावीन्याला वाव मिळत नाही. कलाकृतीची किंवा वाङ्मय प्रकाराची समीक्षा करताना काही ठराविक चौकटी वापरल्या जातात. या चौकटी आधीच्या वाङ्मय परंपरेतूनच निर्माण झालेल्या असतात. पण त्यांचे स्वरूप काळानुसार बदलणे गरजेचे असते.
गेल्या दोन तीन दशकात मराठी ललित साहित्याचा जो ठळक प्रवाह निर्माण झाला आहे त्याच्या प्रामाणिक मूल्यमापनाची आज गरज आहे. पण त्यासाठी समीक्षेची पारंपरिक चौकट मोडण्याची किंवा बदलण्याची गरज नाही…पण ती चौकट अधिक विशाल, व्यापक व्हायला हवी आहे. कारण ज्या अहिंसा, आणि अनेकांतवादावर जैन साहित्य उभे आहे त्याच मूल्यांची चौकट समीक्षेसाठी वापरावी लागेल. त्यासाठी आस्वादकाला किंवा समीक्षकाला वाङ्मयीन व्यापाराची जाण हवी. वेगवेगळ्या धर्मांचे तत्वज्ञान, सामाजिक सांस्कृतिक घडामोडींचे ज्ञानही असायला हवे.
रसास्वादात फक्त कथाकृतीतील पात्रांच्या भावभावना अनुभवणे, त्यांचे आपल्या मनावर संक्रमण होणे एवढेच अपेक्षित नसून त्या पात्रांच्या विशिष्ट वागण्याचा, कृतींचा तर्काधिष्ठित विचार करून त्यांचे मूल्यमापन करावे लागते. मगच त्याला विश्लेषणात्मक रूप प्राप्त होते.
समीक्षेचे स्वरूप वाचन , विश्लेषण व मूल्यमापन या क्रमाने उलगडून सांगितल्यास कलाकृतीचे साहित्यगुण ओळखता येतात. त्यातल्या कोणत्या गुणांमुळे ती चांगली वाटते याची उत्तरे समीक्षेतून मिळतात. अशी समीक्षा लेखक व वाचक यांच्यातील अंतर कमी करण्यास मदत करते.
‘ वर्ज्य ‘ या कथेचा अश्या दृष्टिकोनातून विचार केल्यास ती कोणत्या गुणांमुळे चांगली वाटते याचा विचार करणे क्रमप्राप्त आहे.
कथेचे कथाबीज खूप ताकदीचे आहे आणि ते पेलताना कथेचा तोल कुठेही ढळलेला नाही. ही कथा वाचून याच कथाबीजातून आणखीन कित्येक सुंदर कथा निर्माण होतील अशी जाण प्रतिभावंतांच्या मनात निर्माण होते. याशिवाय या कथेचा आणखी एक गुण म्हणजे ती सहेतुक असूनही कथेचा अविष्कार अत्यंत सहजसुंदर झाल्याने त्यातला हेतू हा हेतू म्हणून जाणवत नाही.
या कथेचा देह खूप लहान असला तरी त्यातूनही कथेतले नाट्य अजून थोडे फुलवता आले असते. कथाबीज ताकदीचे असल्याने कथेचा विस्तार थोडा वाढवूनही त्या प्रमाणात कथेत नाट्यमयता आणणे सहजशक्य होते. पण असे असले तरी कथा विस्ताराने लहान असूनही एका वेगळ्या ज्वलंत विषयाकडे लक्ष वेधणारी, धार्मिक चौकट असूनही चौकटीबाहेर पडायला लावणारी आहे.
ही कथा ललित लेख व कथा यांच्या सीमारेषेवरील वाटते. म्हणजे म्हटले तर ही कथाही आहे व म्हटले तर तिचे स्वरूप थोडे ललितलेखासारखेही आहे.
वरील विधानाचा अर्थ समजण्यासाठी आपल्याला कविता, ललितलेख व कथा अश्या टप्प्याने पुढे जावे लागेल.
कवितेतील अनुभव ललितलेखातील कलानुभवापेक्षा जास्त आत्मनिष्ठ असतो व ललित लेखातील कलानुभव हा कथेतील कलानुभवापेक्षा जास्त आत्मनिष्ठ असतो.
कवितेची भाषा ही खास कवितेचीच भाषा असते. त्यामानाने ललित लेखाची भाषा ही रोजच्या व्यवहारातली पण जास्त काव्यात्म असते.कथेची भाषा मात्र एकाचवेळी काव्यात्मही असू शकते आणि चिंतनशीलही असू शकते. ते लेखकाच्या पिंडावर अवलंबून असते
.
ललित लेखातील ‘मी’ प्रमाणे कथेतही ‘मी’ असेल तर या कथेस पात्रमुखी कथा म्हणतात. कथेतला ‘मी’ निवेदन करत असला तरीही तो लेखक ‘मी’ नसतो. तो कल्पित असतो. म्हणून अश्या कथेतील आत्मनिष्ठेचे स्वरूप कविता किंवा ललित लेखातील आत्मनिष्ठेपेक्षा वेगळे असते. ललित लेखात घटनानिष्ठा गौण असते तर पण कथेत ती प्रमुख स्थानीही असू शकते.
वर्ज्य या कथेतही घटनानिष्ठा आहेच पण तिचे स्वरूप आत्मनिष्ठेपेक्षा वस्तुनिष्ठेकडे कलणारे आहे. कारण ही कथा कथेच्या साच्यात बसणारी आहे. सुरुवातीपासून ते अंतापर्यंत तिचा प्रवास कथेप्रमाणे विकास पावत गेला आहे.
कथानायिका सुप्रिया खिंवसरा ही स्थानकवासी श्वेतांबर जैन समाजातील एका सनातनी श्रावक जोडप्याचे सहावे अपत्य आहे. या कुटुंबाच्या गेल्या काही पिढ्या महाराष्ट्रातच वास्तव्य करून असल्याने घरातही सर्व व्यवहार मारवाडीपेक्षा मराठीतच चालतात.
तिच्या आधीच्या पाचही मुलीच .परिस्थिती बेतास बात. वडील तिखट व हळदीचे होलसेल व्यापारी. एकामागून एक एक वर्षाआड बहिणींची लग्ने झाल्याने खाणारे एक तोंड कमी झाले तरी काम करणारे दोन हातही कमी व्हायचे. त्यामुळे घरात नेहमीच ओढग्रस्त असायची.
मोठे जिजाजी कॅन्सरने गेले त्यामुळे दोन मुलांना घेऊन मोठी बहीण परत आलेली. पडवीतल्या मशीनवर शिवणकाम करून स्वतःपुरत व दोन मुलांपुरतं कमवायची. त्यानंतरच्या दोन बहिणींचे नवरे बेताचे शिकलेले त्यामुळे धंदा करू न शकणारे. दोन दोन तीन तीन मुले … त्यामुळे त्यांचाही संसार असा तसाच. चार नंबरच्या बहिणीच्या घरी सासूसुनांची कचकच. तिच्यामुळे माहेरीपण कचकच. शेवटच्या पाच नंबरच्या बहिणीचा नवरा बँकवाला.. म्हणून ती टेचात राहायची.
सुप्रियाने हे सारे जवळीं पाहिलेले. म्हणूनच असा ओढग्रस्तीचा संसार तिच्या सौंदर्यासक्त मनाला भुरळ पाडू शकला नाही. शिवाय तिचे डोकेही अभ्यासात जेमतेमच होते . त्यामुळे शिकून सवरून फार मोठे करियर करण्याची शक्यता कमीच. त्यामुळे ती अक्षताजींकडे ओढली गेली.
अक्षताजी जैन साध्वी आहेत. त्यांच्या संघाला समाजात मान-मरातब आहे. शिवाय त्यांचं वक्तृत्व गायन यामुळेही ती त्यांच्याकडे ओढली गेली आहे.
वय वर्षे सोळा ते बावीस हे खरे तर तारुण्यातले फुलपाखरी दिवस, पण त्या वयात ती साध्वीचा आचार शिकली. संघाबरोबर विहार करताना एकदा दर्शनाला आलेल्या बी. ए. च्या विद्यार्थिनींकडून तिने विश्राम बेडेकरांची रणांगण कादंबरी मागून घेतली. ती वाचण्याचा तिला अनावर मोह झाल्याने दुपारी घाईघाईने वाचायला घेतली. त्यात ती इतकी गुंगून गेली कि मागे अक्षताजी केव्हा येऊन उभ्या राहिल्या ते कळलेही नाही. त्यांनी ते पुस्तक तिच्या हातातून अलगद काढून घेतलं व युवती संघात गेल्यावर परत करायला सांगितलं. त्यांचं सौम्य समजावणं तिला पचवणं तिला जरा अवघडच गेलं कारण अश्या समजावण्याची आईकडे असताना तिला कधी सवयच नव्हती.
पण तरीही तिचे मन स्थिर होत नव्हते. अक्षताजींनी तिच्या आईवडिलांना निरोप धाडला. त्यांना समजावून बरासा मुलगा. पाहून लग्न करून देण्यास सांगितले. आईवडीलही नाराज झाले. सुप्रियाचे भावबंध जरी अक्षताजींशी जुळले होते तरी ती अक्षताजी होऊ शकत नव्हती.
ती परत चाकणला आली. वरांना दाखवण्याचे खर्चिक कार्यक्रम, आईवडिलांची चिडचिड, बहिणींच्या कधी रागेजल्या तर कधी दयाळू नजरा… ही घुसमट तिला सहन होत नव्हती.
शेवटी नारायणगावच्या चातुर्मासात अक्षताजींपुढे जाऊन दीक्षा द्या म्हणून लकडा लावला. पण अक्षताजींनी प्रेमाने जवळ ठेऊन घेतलं. स्वतःचा नियम तोडून चंपकलाल जैन या सुयोग्य व्यक्तीशी तिचा विवाह जुळविला. पस्तिसाव्या वर्षी ती सुप्रिया चंपकलाल जैन झाली. शिक्षण पूर्ण केले. साहित्याची आवड असणारा ग्रुप जमवला. संसार वेलीवर चिमुकली कळी उमलली. कुठेच उणे राहिलं नाही. मग आत्मचरित्र लिहिले. नाव अर्थातच विकथा … त्याचं प्रकाशन थाटात केलं. अक्षताजींमुळे एका न झेपणाऱ्या साध्वीपणाच्या फरपटीऐवजी एक परिपूर्ण विकथा जगासमोर आली.
अशी ही लहानशीच पण घाटदार कथा आहे. कथेचे शीर्षक वर्ज्य आहे. साध्वी बनण्यासाठी दीक्षार्थीनी विद्यर्थिनी बनलेली सुप्रिया एक विकथा वाचायला घेते . ही विकथा तिच्यासाठी वर्ज्य असूनही तिला ती वाचण्याचा मोह होतो. त्यातूनच पुढे मग अशा काही घटना घडतातकी तिच्या आयुष्याचीच एक सुंदर विकथा होते. खरेतर ही विकथा तिच्यासाठी वर्ज्य नसून साध्वी बनण्यासाठी मनाविरुद्ध केलेली फरफट तिच्यासाठी वर्ज्य असते.
जे कोणा एकासाठी वर्ज्य असते ते दुसऱ्या कोणासाठी आवश्यकही असू शकते. खरेतर आयुष्यातली कुठलीच कथा आपल्यासाठी वर्ज्य नसते. ती विमल कथाच असते. पण हे जर ओळखता आले नाही तर ती आपल्यासाठी विरुद्ध, विपरीत किंवा विकृतही ठरू शकते.
वर्ज्य ही कथाकृती कथेसाठी ठरवलेल्या चौकटीत बसणारी असल्याने तिचे मूल्यमापन करताना कथासमीक्षेचे निकष वापरावे लागतात. समीक्षा लेखनासाठी कथा लेखकाच्या किंवा लेखिकेच्या वैयक्तिक जीवनाची माहिती असणे गरजेचे नसते. उलट लेखकाच्या ऐहिक जीवनाला त्यातून शक्य तितके बाहेर ठेवणेच योग्य असते.
काहीजणांच्या मते कथेतल्या पात्रांचे जीवन समजण्यासाठी मनोविश्लेषण पद्धतीचा अवलंब करावा लागतो…पण येथे मनोविश्लेषण पद्धती त्या पात्रांच्या संदर्भात वापरावी. लेखकाचे मनोविश्लेषण असा चुकीचा अर्थ त्यातून काढू नये.
समीक्षकाची समीक्षा कितीही तटस्थ निर्लेप म्हटली तरीही ती सुद्धा विशिष्ट संदर्भ चौकटीतच लिहिली जाते. चौकटी धर्माच्या, सामाजिक सांस्कृतिक परिस्थितीच्या. तत्त्वज्ञानाच्या किंवा सौंदर्यशास्त्राच्याही असू शकतात.
कोणाच्याही मनाची पाटी कोरीकरकारीत कधीच नसते. कधी कधी व्यवहारात आपण ती कोरी झाली किंवा केली असे म्हणत असतो. त्यावर न दिसणारे संस्काराचे ठसे असतातच. जाणीवयुक्त मनाप्रमाणे नेणिवेतही काही गोष्टी नकळतपणे साठत जातात.
ज्या कवितेला किंवा कथेला आपण उस्फुर्त म्हणतो ती सुद्धा कवी, लेखकाच्या चिंतनशील मनातूनच स्फुरलेली असते. समीक्षा लिहावी असे कधी उस्फुर्तपणे वाटले तरीही ही समीक्षा मात्र समीक्षकांच्या चिंतनशील मनातूनच आलेली असते.. आणि त्यात उस्फुर्ततेपेक्षा चिंतनशीलता जास्त असते.
या कथेत नाट्यमय प्रसंगांचे चित्रण नसले तरी निवेदनातील सहजता आणि सरलता पात्रांचे स्वभावदर्शन प्रामाणिकपणे घडवते.
उदा. कथेतील प्रमुख पात्र सुप्रिया खिंवसरा हिचे आत्मनिवेदन व्यक्त करणारी काही वाक्ये पहा…
“मी शेवटची. दिसायला सुरेख गुड्डीसारखीच म्हणून लाडकी. ”
दहावीपर्यंत शाळा केली, मराठी सगळ्यात आवडे, निबंध, हस्ताक्षर सुंदर, छान कविताही स्फुरत, घरात इतकी ओढग्रस्त की बाबांना सांगून टाकलं . मला नाही शिकायचं! ”
“आईबाबांचा संसार बघतच होते. आपण लग्न संसाराच्या वाटेने जाऊ नये अशी इच्छा होऊ लागली. नगर मुक्कामी अक्षताजींचं प्रवचन ऐकलं आणि आयुष्याची दिशाच बदलली. ”
“वयाची सोळा ते बावीस वर्षे साध्वीचा आचार शिकले . तत्वार्थसूत्र कंठस्थ केले. इतर ग्रंथही अभ्यासले पण ज्या अक्षताजींच्या पावलावर पाऊल टाकू बघत होते ते काहीच जमेना… लेखणी चालवावी वाटली तरी… साऱ्या कविता आणि विकथाच ! चित्ताचा नुसता गोंधळ, मेंदूत गुंता झाला, धरवेना की सोडवेना.”
भावबंध जुळलेत अक्षताजींशी पण शरीर चाललंय आईवडिलांच्या पाठोपाठ! ”
या कथेत सुप्रियाइतकेच किंबहुना त्याहीपेक्षा महत्वाचे पात्र म्हणजे अक्षताजी ! खरेतर ” आद हिदं कादव्वं ” हे साधू-साध्वींचे कर्तव्य असते.पण त्याबरोबरच जर सहजपणे करता आले तर परहित सुद्धा साधू-साध्वींना करायचे असते।
” आद हिदं कादव्वं… जं सक्कइ.. पर हिदंच कादव्वं ! ” ही उक्ति सार्थ ठरवणाऱ्या अक्षताजींचे हूबेहुब चित्र लेखिका शब्दातून आपल्यापुढे उभे करते.
उदा. पुढील आत्मनिवेदनातून सुप्रियाने केलेले हे अक्षताजींचे शब्दचित्र आपल्या डोळयासमोर उभे राहणारे आहे .
“इतक्या सौम्य आणि समजूतदार होत्या त्या! हातातलं पुस्तक अलगद काढून घेतलं. मधुर स्वरात म्हणाल्या, बेटा, एकेकाळी मीही वाचली आहे ती कादंबरी! पण मी तेव्हा साध्वी नव्हते आणि दीक्षार्थीनी विद्यार्थिनीही नव्हते . फार सुंदर वातावरण रंगवलं आहे त्यात ! सुप्रिया बेटी आता आपण ज्या मार्गावर पाऊल ठेवलं आहे त्या दृष्टीने या विकथा आहेतना बाळा? तू असं काहीबाही वाचत राहिलीस तर विचलित होशील. सोळाव्या वर्षांपासून तुझी आराधना चालू आहेना ? मग त्यात असा व्यत्यय येऊ देऊ नकोस.
किंवा अक्षताजींनी आईबाबांना समजावलं,
“सुप्रियानं खूप प्रयत्न केला भाईजी. तिचं मन स्थिर होत नाही. खूप सौंदर्यासक्त आहे . आत्म्याचे विचार रिझवू शकत नाहीत तिला.. अद्याप उशीर झाला नाही. बरासा मुलगा पहा ,लग्न करा, संसारात रमेल हळूहळू… आता इथं ठेवून अन्याय नको… ”
किंवा सुप्रियाचे हे मनोगत पहा ,
“अंतःकरणात अनेक वावटळी घेऊन त्यांच्यासमोर उभी राहिले. दीक्षा द्या म्हणून लकडा लावला. कितीही हट्ट केला तरी त्यांनी प्रेमाने जवळ ठेऊन घेतलं. त्यांची नजर सतत शोधक असायची. विवाह वगैरे जमवणं खरेतर साधू – साध्वीना निषिद्धच.. पण माझ्यासाठी स्वतःचा नियम तोडला त्यांनी..”
सुप्रिया, अक्षताजी, सुप्रियाचे आईवडील, तिच्या बहिणी, पस्तिसाव्या वर्षी तिचा स्वीकार करणारे चंपकलाल जैन या सर्वच व्यक्तिरेखा वेगवेगळया मानसिकतेचे दर्शन घडवतात.
कथेतले सर्वच प्रसंग स्थळे यांना जैन समाजाची, एका स्थलांतरित कुटुंबाची पार्श्वभूमी लाभलेली आहे. जैन साधू साध्वी यांचे आहार विहार आचार तसेच सनातनी जैन श्रावक श्राविकांचे कौटुंबिक जीवन, मुलांबाबतचे विचार, मुलगा मुलगी असा केला जाणारा भेद, त्यांच्या समस्या, दैनंदिन सोवळे ओवळे, त्यांची कडवी पण सचोटीची मनोवृत्ती, कष्टाची तयारी यांचे सुरेख चित्रण छोट्या छोट्या वाक्यातूनही जाणवत राहते.
उदा.
” राजस्थानमधील स्थलांतरित पक्ष्यांसाठी सुप्रसिद्ध असलेलं खीचन आमचं मूळ गाव ! पण अक्षरश: सांगण्यापुरतंच.”
“पहिल्या पोरसीत सामायिक प्रतिक्रमण केलं. आम्ही विद्यार्थिनी आन्हिक उरकून साध्वीन्साठी गोचरी घेऊन आलो. पात्र- प्रतिलेखना व्यवस्थित करून जरा पुस्तक उघडून बसलो. ”
“रात्री दिवा वगैरे लावणं अगर टॉर्च सुद्धा साध्वीजींना चालत नसे. ”
” आईबाबा धंदा सचोटीने करीत असावेत. मिसळ भेसळ वगैरे काहीच करत नसावेत. आम्ही बहिणी हातभार लावीत होतोचना…आमच्याही लक्षात आलंच असतं”
” मुलगा- मुलगा म्हणून वाट बघण्यात आम्ही सहाजणी झालो. ”
“आई बाबांना कामाशिवाय बोलताना इतकंच काय एकत्र झोपतानाही कधी बघितलं नाही. माझ्या जन्मानंतर ते कायम व्रतस्थ राहिले असं दीदी सांगत असताना मी ऐकलं होतं .”
“सारखं सोवळं ! गहू धुवा, मीठ धुवा, अर्थात खडेमीठ, हातपंपाचं बोअरिंगचं पाणी! कांदा, लसूण, बटाटा, टोमॅटो, गाजर, बीट सर्व काही वर्ज्य !”
“माझ्या आईबाबांना माझा फार अभिमान वाटू लागला. दीक्षा घेणार, दीक्षा घेणार असाही गाजावाजा होऊ लागला.”
“माझी वृत्ती स्थिर होईपर्यंत त्या दीक्षा देणारच नव्हत्या. ”
“अक्षताजींबरोबर आठ-दहा वर्षे राहिले आणि दीक्षा घेतली नाही हाच लग्नाच्या बाजारात माझा मोठा गुन्हा ठरला.”
“कितीतरी दिवस झाले, अंग उपांग मूलसूत्र असे आगमग्रंथ सोडून दुसरं काही वाचलंच नव्हतं . म्हणूनच एका दर्शनार्थी विद्यार्थिनीजवळची रणांगण कादंबरी पाहून वाचण्याचा इतका मोह झाला म्हणून सांगू !”
अश्या काही मोजक्या प्रसंगातून वाक्यांमधून जैन समाजातील साधू साध्वी यांच्याबद्दल असणारा आदरभाव, दीक्षा या शब्दाला असलेले वजन जाणवते.
एका श्वेतांबर जैन समाजातील कुटुंबाच्या चौकटीत घडणारी ही कथा एकंदर सर्वच सनातनी जैन जीवनाचा आढावा घेणारी, त्यातल्या मुलांच्या मनाची जडणघडण कशी होते, जैन धर्मीयांमध्ये तरुण वयात घेतल्या जाणाऱ्या दीक्षा, त्यामागची मूळ कारणे, दीक्षा कोणी द्यावी आणि कोणी घ्यावी… ? या सर्व प्रश्नांवर प्रकाश टाकणारी, त्या प्रश्नातच दडलेली उत्तरे शोधण्यास भाग पाडणारी आहे.
कथा साहित्य हे एक भाषिक माध्यम आहे पण या माध्यमाचा उपयोग केवळ आपल्या भाषेचा संस्कृतीचा वेगळेपणा दाखवण्यासाठी केल्यास ते प्रदर्शनीय ठरते.
साहित्यासाठी माध्यम म्हणून वापरलेली भाषा त्या विशिष्ट प्रकारासाठी संस्कारित करून, तिला वेगवेगळी परिणामे देऊन, त्या माध्यमासाठी उपयुक्त बनवून उपयोगात आणावी लागते . मगच त्यातून होणारी अभिव्यक्ती वाचकांच्या मनावर अपेक्षित परिणाम घडविते.
लेखिकेची भाषाशैली जैन पारिभाषिक शब्दांनी संपृक्त असली तरी त्या शब्दांचा वावर सहजपणे आल्याने हा वावर कुठंही खटकत नाही. उलट तो मनात जिज्ञासा उत्पन्न करतो. त्या शब्दांचे अर्थ शोधून समजून घेण्यासाठी वाचकाला प्रवृत्त करतो.
म्ह्णूनच प्रतिभासंपन्न व्यक्ती जैन असो, हिंदू असो कीं मुस्लिम वा ख्रिश्चन असो साहित्याच्या मुख्य प्रवाहात जर टिकून रहावयाचे असेल तर तिला साहित्य प्रकारांच्या तंत्राची, मंत्राची, नियमांची गरज लागतेच. त्यासाठी अभ्यासाची साधनेची गरज असते. मगच तिच्या हातून उत्कृष्ट कलाकृती निर्माण होते.
जैन साहित्यातून व्यक्त होणारी जीवनमूल्ये मानवसंस्कारीतच आहेत. ती या समाजाच्या जीवन वास्तवाचा भाग आहेत. जैन जीवनपद्धती सुद्धा एक भारतीय जीवनपद्धतीच आहे. म्हणूनच जैन साहित्याच्या वर्धनासाठी वर्ज्य सारख्या प्राकृतिक कथा अधिकाधिक प्रमाणात लिहिणे, त्यांचे समीक्षात्मक यथायोग्य मूल्यमापन वेळच्या वेळी होणे ही समाजाची गरज आहे.
वर्ज्य – लेखिका डॉ. सौ. नलिनी जोशी, कथासंग्रह- शासन (समकालीन मराठी जैन कथासंग्रह भाग ६), पृष्ठ क्र. १४६ ते १४९
संपादन – प्रा. धनंजय शहा, सुमेरू प्रकाशन
आस्वादात्मक समीक्षा – लेखिका सौ. सुनेत्रा नकाते